Halloween Costume ideas 2015

इब्राहिमी धर्मावलंबियांमधील पेटलेला वाद

जेरूसलम-येरूशलम आणि अल-कुद्स हे एकाच शहराची तीन नावे आहेत. इजराईलमध्ये असलेले हे शहर इब्राहिमी धर्माचे संयुक्त श्रद्धास्थान आहे. इब्राहिमी धर्म तीन आहेत. एक जुडाई़ज्म, दोन ख्रिश्‍चॅनिटी, तीसरा इस्लाम. या शहराचे ऐतिहासिक महत्त्व किती आहे? याचा अंदाज वाचकांना यावरून लागेल की हे शहर दोन वेळा पूर्णपणे उध्वस्त करून पुन्हा बांधले गेले. 52 वेळेस यावर हल्ले झाले आणि 44 वेळेस या शहराचा वेगवेगळ्या फौजांनी घेराव केला होता.
ज्यूंसाठी या शहराचे महत्त्व
    इब्राहिमी धर्मांपैकी सर्वात प्राचीन धर्म ज्युडाई़ज्म आहे. जेरूसलम सर्वात अगोदर डेव्हीड अर्थात दाऊद (अलै.) यांनी  1000 बीसी (इ.स.पूर्वी) मध्ये स्थापन केले, जे की अगोदर बॅबीलोनियन्स यांनी उध्वस्त करून टाकले. त्यानंतर हे शहर दाऊद अलै. यांचे पुत्र सालोमन अर्थात सुलैमान अलै. यांनी 40 वर्षानंतर पुन्हा बांधले व एक मोठे सेनेगॉग  अर्थात हैकल-ए-सुलैमानी उभे केले. सेनेगॉग म्हणजे ज्यू धर्मियांचे प्रार्थनास्थळ. यानंतर किंग रोडस् याने हे शहर पुन्हा उध्वस्त केले जे की कालांतराने पुन्हा बांधण्यात आले. 
    वेळोवेळी झालेल्या हल्ल्यांमध्ये ज्यूंचे धार्मिक स्थळ असलेले सेनेगॉग उध्वस्त झाले. त्याची फक्त एक भींत शिल्लक राहिलेली आहे ज्याला ’वेलिंग किंवा विपिंग वॉल’ असे म्हणतात. जगभरातून आलेले ज्यू या भिंतीला डोके टेकून आपल्या उध्वस्त झालेल्या प्रार्थनास्थळाचे रडून दुःख व्यक्त करतात आणि या ठिकाणाहून मस्जिद-ए-अक्सापर्यंत थर्ड टेम्पल अर्थात हैकले सुलेमानी अर्थात सेनेगॉग पुन्हा बांधण्याचा निश्‍चय करतात. असे असले तरी आजमितीला या शहरामध्ये छोटे-मोठे 1 हजार 204 सेनेगॉग आहेत, जेथे ज्यू धर्मीय प्रार्थना करतात.
ख्रिश्‍चनांच्या दृष्टीने या शहराचे महत्त्व
    या शहरामधील बैथल हॅम येथे पैगम्बर येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला आणि याच ठिकाणी ज्यूंनी त्यांना क्रॉसवर चढवून खिळे मारून त्यांची हत्या केल्याची घटना घडली. ज्या क्रॉसवर त्यांना चढविण्यात आले त्याचे अवशेष व ज्या ठिकाणी त्यांना पुरण्यात आले ते थडगे सुद्धा याच ठिकाणी आहे. या शहरामध्ये एकूण 158 चर्चेस आहेत. म्हणून ख्रिश्‍चन समाजासाठी हे शहर अतिशय पवित्र शहर मानले जाते. 
मुस्लिमांच्या दृष्टीने या शहराचे महत्त्व
    पैगम्बर मुहम्मद सल्ल. यांच्यानंतर आलेल्या द्वितीय खलीफा हजरत उमर रजि. यांच्या काळात म्हणजे इ.स. 637 मध्ये मुस्लिमांचा या शहरावर कब्जा झाला, ज्यावर ख्रिश्‍चनांनी इ.स. 1099 मध्ये पुन्हा ताबा मिळविला. या शहरावर ताबा मिळविण्यासाठी मुस्लिम आणि ख्रिश्‍चन धर्मियांमध्ये 200 वर्षे युद्ध सुरू होते. यात एकूण 6 युद्धे झाली, ज्यांना क्रुसेडस् किंवा सलीबी युद्ध असे म्हणतात. पहिले सलीबी युद्ध 1095 मध्ये सुरू झाले आणि शेवटचे सलीबी युद्ध 1187 मध्ये झाले. या युद्धात निर्णायक - विजय सलाहुउद्दीन अय्युबी या मुस्लिम यौध्याचा झाला   आणि पुन्हा या शहरावर मुस्लिमांनी ताबा मिळविला. तेव्हापासून 1922 पर्यंत हे शहर मुस्लिमांच्या ताब्यात होते. शेवटचा ताबा ऑटोमन साम्राज्याचा होता. या शहरामध्ये आजही 15 टक्के मुस्लिम राहत असून, डोम ऑफ रॉक आणि मस्जिद-ए-अक्सा शिवाय, 71 अन्य छोट्या मोठ्या मस्जिदी आहेत. या शहराचा उल्लेख दस्तुरखुद्द कुरआनमध्ये सुरे अस्रच्या आयात क्रमांक 17 मध्ये आलेला आहे.
    आजमितीला या शहराला 75 टक्के ज्यू, 15 टक्के मुस्लिम आणि 10 टक्के इतर धर्मिय लोक राहतात. शहराच्या मध्यभागी असलेल्या 35 एकराच्या परिघामध्ये या तिन्ही धर्मियांचे पवित्र स्थानं एकवटलेली आहेत. त्यातील मोठ्या भागावर मुस्लिम धर्मियांची पवित्र ठिकाणे आहेत. ज्यात दोन प्रमुख ऐतिहासिक इमारती आहेत. एक डोम ऑफ रॉक जी की सोनेरी रंगाचे घुमट असलेली मोठी इमारत आहे. या इमारतीची निर्मिती खलीफा अ. मलिक यांनी केली होती. या इमारतीमध्ये एक खडक असून, याच खडकावरून प्रेषित मुहम्मद सल्ल. हे सदेह शब-ए-मेराजच्या रात्री अल्लाहच्या भेटिसाठी अवकाशात गेले होते. त्या खडकाभोवती जी मोठी इमारत बांधून त्या खडकाला संरक्षित करण्यात आले त्यालाच डोम ऑफ रॉक म्हणतात. याच डोम ऑफ रॉकच्या बाजूला एक मोठी मस्जिद असून, तिला मस्जिद-ए-अक्सा असे म्हणतात. मक्का येथील काबागृहाकडे तोंड करून नमाज अदा करण्यापूर्वी मुस्लिम समाज याच मस्जिदीकडे म्हणजे मस्जिद-ए-अक्साकडे तोंड करून नमाज अदा करत होता. म्हणून या मस्जिदीला किब्ला-ए-अव्वल असेही म्हटले जाते. डोम ऑफ रॉकवरून अल्लाहच्या भेटिला प्रस्थान करण्यापूर्वी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी याच मस्जिदीमध्ये समस्त प्रेषितांना नमाज पढविली होती. 
    डोम ऑफ रॉक (किबतुल स़करा) आणि मस्जिद-ए-अक्सामध्ये एक मोठे मोकळे मैदान असून, त्याला हर्मल शरीफ असे म्हणतात. या ठिकाणी एक मोठे गेट आहे. त्या गेटमध्ये प्रलयानंतर एक मिजान (तराजू) लावण्यात येईल व त्या तराजूमध्ये आदम अलै. पासून प्रलयाच्या दिवसापर्यंत जन्मलेल्या प्रत्येक इसमाचे पाप आणि पुण्य तोलून पुढे त्यांची रवानगी जन्नत किंवा जहन्नम मध्ये करण्यात येईल, अशी इस्लामला मानणार्‍यांची धारणा आहे.
    येणेप्रमाणे तिन्ही इब्राहिमी धर्माच्या महत्त्वाची पवित्र स्थानं एकाच ठिकाणी एकवटलेली असल्यामुळे या शहराला इतिहास, वर्तमान आणि भविष्यात अनन्यसाधारण महत्त्व राहणार आहे. या शहरावर सलजूक, बॅबेलोनियन, हेरॉड्स, रोमन, ज्यू, अ‍ॅबेसिनियन, फातेमी आणि मुस्लिम या सर्वांचा ताबा राहिलेला आहे. शेवटचा ताबा आणि हुकूमत मुस्लिम ऑटोमन साम्राज्याची राहिलेली आहे. जी की 1517 ते 1922 पर्यंत राहिली. 
    अरब-इजराईल समस्या
    1914 ते 1918 दरम्यान लढल्या गेलेल्या पहिल्या महायुद्धामध्ये ऑटोमन साम्राज्य (सल्तनते उस्मानिया) ने जर्मनीच्या बाजूने युद्धात भाग घेतला होता. या युद्धात जर्मनीचा पराजय झाल्यामुळे ऑटोमन साम्राज्याचाही पराभव झाला व ऑटोमन साम्राज्य ब्रिटनच्या ताब्यामध्ये आले. त्यानंतर 1917 मध्ये ब्रिटनने बेलफोर्ड डिक्लेरेशनच्या अंतर्गत ऑटोमन साम्राज्याचे तुकडे करून टाकले. ज्यामुळे 40 नवीन देश अस्तित्वात आले. या युद्धामध्ये ब्रिटनसोबत असणारे ज्यू आणि अरब या दोघांनाही बक्षिस म्हणून इजराईल आणि सऊदी अरब ही दोन राष्ट्रे नव्याने जन्माला घालण्यात आली.
    1918 मध्ये इजराईलमध्ये ज्यू लोकांची संख्या फक्त 3 टक्के होती. पहिले महायुद्ध जिंकल्यानंतर जगभरातून विशेषतः पूर्वी युरोपमधून ब्रिटनने ज्यू लोकांना बोलावून जेरूसलम आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये स्वतःच्या देखरेखीखाली त्यांचे पुनर्वसन केले व 1948 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होऊन संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावानुसार 15 मे 1948 साली स्वतंत्र इजराईलची निर्मिती करून त्याला ज्यू धर्मियांचे होमलँड म्हणून जाहीर करण्यात आले. अरबांनी सुरूवातीला इजराईलच्या निर्मितीचा मोठा विरोध केला. 1937 मध्ये सशस्त्र विरोध सुद्धा करण्यात आला, परंतु अमेरिका आणि ब्रिटनने लष्करी कारवाई करून पॅलिस्टीनियन मुस्लिमांचा इतका मोठा नरसंहार केला की, त्या काळी 10 टक्क्यांनी पॅलिस्टीनी पुरूषांची लोकसंख्या कमी झाली.
    ज्यूंचा मुख्य व्यवसाय व्याज होता आणि आजही आहे. अमेरिकेचे लेहमन ब्रदर्स ही सर्वात मोठी बँक जी 2008 साली वित्तीय घोटाळ्यामुळे बंद झाली ती ज्यूंचीच होती. चक्रव्याढ व्याजाचा व्यवसाय करून जुल्मी वसूली करत असल्यामुळे त्यांचा इतर धर्मियांकडून कायम दुस्वास केला जातो. आजही युरोप आणि अमेरिकेमधील प्रमुख बँकर्स हे ज्यूज आहेत. सुरूवातीला त्यांनी जेरूसलमधील पॅलिस्टीनी मुस्लिमांना मागतील ती रक्कम देऊन जमीनी आणि घरे खरेदी केली आणि हळूहळू जेरूसलम येथे आपले बस्तान बसविले. मात्र ज्या गतीने त्यांना आपली लोकसंख्या वाढवायची होती त्या गतीने ब्रिटिश शासन ज्यूंच्या वस्त्या वाढवित नसल्यामुळे नाराज होऊन त्यांनी ब्रिटीशांविरूद्धच सशस्त्र चळवळ सुरू केली. त्या अंतर्गत त्यांनी 1944 मध्ये जेरूसलमधील इन डेव्हिड हॉटेलमध्ये पहिला बॉम्बस्फोट करून ब्रिटिशांना थेट आव्हान दिले. या स्फोटामध्ये 90 पेक्षा जास्त लोक मरण पावले होते व अनेक जखमी झाले होते. ज्यूंच्या आर्थिक शक्ती आणि सशस्त्र उठावामुळे लवकरच जेरूसलम आणि जवळपासचा परिसर ब्रिटनसाठी डोईजड झाला. अगोदरच पहिल्या महायुद्धात प्रचंड हानी सहन केलेल्या ब्रिटिशांनी हा प्रश्‍न युनोकडे सुपूर्द केला. युनोने यात एक प्रस्ताव तयार करून इजराईल आणि आसपासच्या पॅलिस्टीनी भूमीचे दोन भाग केले आणि पॅलेस्टिनी मुस्लिमांची संख्या जास्त असतांनासुद्धा त्यांच्यावर अन्याय करून 45 टक्के जमीन त्यांना तर 55 टक्के जमीन ज्यूंना देण्याचा प्रस्ताव दिला. त्यातही महत्त्वाची उपजावू जमीन ज्यूंना देऊ केली. जेरूसलमचे दोन भाग करून दोघांना दिले व धार्मिक स्थळे सर्वांसाठी खुली ठेवली. येणेप्रमाणे 15 मे 1948 ला युनोच्या एका कराराद्वारे इजराईल या देशाची स्थापना झाली. अधिकृतरित्या देश मिळाल्याबरोबर ज्यू लोक सर्वशक्तीनिशी आपला विस्तार करण्यामध्ये व्यस्त झाले ते आजतागायत व्यस्त आहेत. इजराईलला स्थापण्याच्या दिवशीच अमेरिका आणि ब्रिटनने मान्यता दिली तर 2012 साली पॅलिस्टीनला नॉन मेंबर स्टेटस मिळाला.
    दुसर्‍या महायुद्धापर्यंत जागतिक महासत्ता अर्थात सुपर पॉवर ब्रिटन मानली जात होती. त्यानंतर मात्र सुपर पॉवर म्हणून आजपर्यंत अमेरिकेला जागतिक मान्यता प्राप्त आहे. हे महासत्तेचे पद प्राप्त करण्यामध्ये आखाती देशांतील खनिज तेलाचे फार मोठे योगदान अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये होते. 1970 च्या दशकामध्ये सऊदी अरबच्या शहा फैसल यांनी तेलाच्या किमती 12 डॉलर प्रती बॅलरवरून थेट 48 डॉलर प्रती बॅलर करून, ”आमचे तेल आमची किंमत” हे तत्व लागू केले. तेव्हा अमेरिकेने घाबरून इजराईलला आणखी मदत देऊन इजराईलची स्थिती मजबूत केली. जेणेकरून आखाती देश आणि त्यातील खनीज तेलावर आपले कायम नियंत्रण राहील. याच उद्देशाने अमेरिकेने संयुक्त राष्ट्रामध्ये इजराईलविरूद्ध आलेल्या प्रत्येक प्रस्तावाला व्हेटो केले. अमेरिकेच्या या अनकंडिशनल सपोर्टचा भरपूर फायदा उचलत इजराईलने आपला विस्तार चालूच ठेवला. इजराईलच्या विरूद्ध बोलणारा प्रत्येक मुस्लिम सत्ताधारी मग तो गद्दाफी असो, सद्दाम हुसैन असो की मुहम्मद मुर्सी असोत अमेरिकेने इजराईलच्या मार्गातून दूर केले. त्यामुळे उरलेले अरब घाबरून अमेरिकेवर अधिक अवलंबित झाले. सऊदी अरब आणि इजिप्त सारख्या देशांनी सुद्धा इजराईलशी सरळ राजनैतिक संबंध स्थापन केले. इजराईलला अरबांपासून धोका होऊ नये म्हणून अमेरिकेने इजराईलमध्ये अण्वस्त्र तैनात केली. त्यांना बॅलेस्टिक मिजाईलपासून संरक्षक देणारी यंत्रणा उभारून दिली. एकंदरित या पाठबळामुळे इजराईल दिवसेंदिवस शक्तीशाली होत असून, पॅलेस्टिनियन मुस्लिम दिवसेंदिवस दयनीय अवस्थेमध्ये ढकलले जात आहेत. इजराईलचे पॅलेस्टीनियनवर जे अत्याचार सुरू आहेत. त्याला अवघे जग उघड्या डोळ्यांनी पहाते पण कोणीही अमेरिकेला घाबरून त्यात हस्तक्षेप करत नाही. आज जगात इजराईल एकमेव असे राष्ट्र आहे जे गाझापट्टीमधील जीव मुठीत धरून राहणार्‍या पॅलिस्टीन मुस्लिमांना सामुहिक शिक्षा देतो. मनात येईल तेंव्हा त्यांच्यावर बॉम्ब हल्ले करतो. 57 मुस्लिम राष्ट्रांची संघटना ओआयसी सुद्धा यात काही करू शकत नाही. हे कटू मात्र सत्य आहे.

- एम.आर.शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget