Halloween Costume ideas 2015

मोडकळीस आलेलं घर आणि कुरकुरणारी खाट!

रसिक मायबाप हो, गेली सुमारे तीन महिने टाळेबंदीमुळे आम्ही आपल्या मनोरंजनासाठी तमाशा सादर करू शकलो नाही. त्यासाठी आपली माफी मागून परत आपल्या सेवेत रुजू होत आहोत. तशी तर आमच्या कलाकारांची तमाशा सादर करण्याची कधीपासूनच तयारी होती, पण या करोनाच्या संकटामुळे जनाची नाहीतर निदान मनाची तरी वाटून त्यांनी स्वतःला आवरून ठेवले होते. आता मात्र त्यांना आवरून ठेवणे आम्हालाही शक्य नसल्यामुळे आपल्या मनोरंजनासाठी सादर करीत आहोत, ‘मोडकळीस आलेलं घर आणि कुरकुरणारी खाट!' आता ज्या घराच्या अंगणात कुरकुरणारी खाट असेल ते घरही तसंच असेल आणि त्यात राहणारी माणसंही तशीच असतील हे वेगळं सांगायला नकोच. तमाशा सुरू करण्याची तयारी जवळपास पूर्ण होत आली आहे, पण त्यापूर्वी तुम्हाला त्यातल्या पात्रांचा, कथानकाचा थोडक्यात परिचय करून देतो म्हणजे मग प्रत्यक्षात तमाशा बघतांना तुम्हाला त्याचा पूर्णपणे आस्वाद घेता येईल.
तमाशाचं स्थळ - एक मोडकळीस आलेलं भाड्याचं घर, ज्याच्या अंगणात एक जुनाट, कुरकुरणारी खाट पडलेली आहे. वेळ - थोडी कटकट करण्याची तर बरीचशी तडजोड करण्याची.
थोडक्यात कथानक - तीन बेघर ज्यांची स्वतःचं तर सोडाच पण स्वतंत्रपणे भाड्याचंही घर घेण्याची ऐपत नाही ते ज्याची तशी थोडीफार का होईना पण ऐपत आहे, त्याची जिरविण्यासाठी एकत्र येतात; आणि एक मोडकळीस आलेलं घर पाच वर्षांच्या भाडेकराराने घेतात. तिघांकडे जेमतेमच पैसे असल्यामुळे मोडकळीस आलेल्या घरातच राहण्याचा निर्णय घेतला जातो. अगदीच बेघर असण्यापेक्षा हे काय वाईट आहे, असा विचार त्यामागे असतो. तिघांचे विचार अगदीच भिन्न असल्यामुळे आणि पूर्वी सुस्थितीत असतांना एकमेकांची भरपूर निंदानालस्ती केलेली असल्यामुळे, गृहप्रवेशापासूनच त्यांच्यात मतभेद सुरू होतात. आपल्याला बाहेरच्या अंगणात एका कुरकुरणाऱ्या खाटेवर उपाशी बसवून इतर दोघे मात्र आतल्या खोलीत सागवानी पलंगावर डनलपच्या गादीवर बसून मेवा - मिठाई खात आहेत, हे लक्षात आल्यावर तिसरा अस्वस्थ होतो. त्या अस्वस्थतेतून पुढे जे काही घडतं ते म्हणजे हा तमाशा, 'मोडकळीस आलेलं घर आणि कुरकुरणारी खाट!'

पात्र परिचय

१)    कुरकुरणाऱ्या खाटेवर बसलेली म्हातारी - कोणे एकेकाळी या बार्इंचा फार दरारा होता. देशभरात कुठेही गेल्या तरी त्यांना आलिशान बंगला राहण्यासाठी मिळत असे, ताटात मिष्टान्न पडत असे, पण बार्इंना काळाची बदलणारी पावलं ओळखता आली नाहीत, म्हणून आज त्यांची अशी दयनीय अवस्था झाली आहे. असे असले तरी या घरातील इतर दोन भाडेकरूंना या म्हातारीने भांडवल पुरवल्यामुळेच या घरात राहायला मिळालं आहे. असे असूनही ते या म्हातारीला वाळीत टाकल्यासारखी वागणूक देत आहेत म्हणून तिची चिडचिड होते आहे, पण या दोघांशी जमवून घेतले तरच आपल्याला ही या घरात राहता येईल, नाहीतर या दोघांसोबत आपल्यालाही बेघर व्हावं लागेल हेही म्हातारी ओळखून आहे, म्हणूनच थोडीशी कुरकुर करण्यापलीकडे ती फार काही करत नाही.

२)    ‘दै. हमरीतुमरी'चे संपादक - हे महाशय आपल्या वर्तमानपत्राच्या नावाला जागून नेहमीच कोणाशी ना कोणाशी हमरीतुमरीवर येत असतात. अगदीच कोणी नाही मिळालं तर हे आपल्या कार्यालयातील भिंतांrशीच हमरीतुमरीवर येतात असे यांच्याच कार्यालयातील कर्मचारी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगतात. आपल्या धन्याला खूश ठेवण्यासाठी हे कोणावरही ‘सुटतात', पण धन्याने पट्टा ओढला की त्याच माणसाच्या घरी जाऊन, कमरेतून झुकून त्याला कुर्निसात घालतात आणि परत निर्लज्जपणे तो फोटो आपल्या दैनिकाच्या पहिल्या पानावर छापतात! यांच्या हातात लेखणी आल्यानंतरच ‘माकडाच्या हाती कोलीत' हा वाव्âप्रचार वापरात आला असावा असा कयास आहे. वास्तविक यांचा आणि या घराचा फारसा संबंध नाही, पण आपल्या धन्याला हे घर मिळवून देण्यासाठी यांनी अनेकांची मनधरणी केली असे म्हणतात. त्यासाठी यांना आपल्या धन्याची मनधरणी करण्याचा अनुभव कामी आला असावा. तसे थोरल्या धन्याला, मधल्या धन्याला यांनी व्यवस्थित सांभाळले, पण धाकटे धनी यांचा वेळोवेळी पाणउतारा करीत असतात. असे असले तरी धन्याचे घर सोडले तर बाहेर आपल्याला कवडीचीही किंमत नाही हे माहीत असल्यामुळे, ‘दुभत्या गाईच्या लाथा गोड' मानून हे सर्व काही सहन करीत असतात.

३)    घड्याळवाले काका - या काकांच्या हातातलं घड्याळ नेहमीच फसवी वेळ दाखवत असतं, म्हणून यांच्या नादी लागणारा फशी पडत असतो. हे काका अत्यंत व्यवहारकुशल असून, आपण स्वतंत्रपणे घर घेऊ शकत नाही हे लक्षात आल्यावर, जे घर आपण भांडण करून सोडलं होतं त्याच घरात परत जाण्यातही यांना काहीच वावगं वाटत नाही. हे बारा गावचं पाणी प्यायलेले असल्यामुळे सर्व यांना वचकून असतात. कात्रजचा घाट हे यांचं आवडतं स्थळ. अनेकांना यांनी तो दाखवलेला आहे. यांनी स्वतःचा पुतण्या तर सांभाळलाच आहे, पण इतरांच्या पुतण्यांनाही नादी लावण्यात यांचा हातखंडा आहे. यांच्या या कलेमुळेच काही जण यांना ‘भानामती -कर' म्हणून संबोधतात! आपल्या तारुण्यात पावसात भिजत गाणं म्हणण्याची हौस भागवण्याचे राहून गेल्यामुळे आता हे भर पावसात सभा घेऊन दुधाची तहान ताकावर भागवून घेतात म्हणे! खासगीत यांच्याबद्दल बोलतांना कोणी काहीही बोलत असले तरी जाहीरपणे बोलतांना त्यांची नेहमीच स्तुती केली जाते. हे मोडकळीस आलेलं घर भाडे करार पूर्ण होइपर्यंत टिकवून ठेवायचं की मधेच मोडून टाकायचं, हे सर्वस्वी यांच्याच हातात आहे म्हणे.
तर रसिकहो हा झाला, आमच्या तमाशातील पात्रांचा परिचय आणि थोडक्यात कथानक. आता हे मोडकळीस आलेलं घर आधी मोडून पडतं की भाडेकरूंना भाडे करार संपण्यापूर्वीच ते सोडून जावं लागतं? त्यानंतर या तिघांपैकी कोणी दुसरा घरोबा करून नवीन घर मिळवितो का? एखादा बोकोबा जसं शिंक केंव्हा तुटते आणि लोण्याचा गोळा केव्हा आपल्या तोंडात पडतो म्हणून त्या शिंकेकडे डोळे लावून बसलेला असतो तसं कोणी यांच्या मोडकळीस आलेल्या घराकडे डोळे लावून बसला आहे का?  या तिघांपैकी कोणी त्याच्यासोबत नवीन घरात जाण्यासाठी हे घर मोडून इतर दोघांना वाऱ्यावर सोडेल का?या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी तयार राहा. लवकरच आपल्या पुढे आमच्या नेहमीच्या यशस्वी कलावंतांच्या संचात सादर करीत आहोत, ‘मोडकळीस आलेलं घर आणि कुरकुरणारी खाट!'

-    मुकुंद परदेशी, मुक्त लेखक
भ्रमणध्वनी क्र. ७८७५०७७७२८

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget