Halloween Costume ideas 2015

मराठी मुस्लिमांची गोची आणि ... इतर !

Education
नुकताच एमपीएससीचा निकाल लागला. यात नु मुस्लिम समाजाच्या 3 मूली आणि एक मुलगा उत्तीर्ण झाले. यावरून आरक्षण आवश्यक आहे ते अन्याय होतो या सर्व बाबींचा परामर्श होतो आहे. हे योग्य ही आहे, किमान या निमित्याने चर्चा तरी घडू दे...    मात्र आम्ही मुस्लिमांच्या शैक्षणिक मानसिकतेवर प्रकाश टाकणाऱ्या काही बाबींचा इथे स्वयं अनुभवावरुन उल्लेख करणार आहोत.
   आमचा जन्म गड़चिरोली चा. अत्यंत मागास, आदिवासी बहुल जिल्हा. मुस्लिमांची एक मोठी वस्ती. आमचे वडील रेवेन्यू इन्स्पेक्टर असल्याने आमचे घर बस स्टँड जवळ, म्हणजे आजही जिथे मुख्य पोलिस स्टेशन आहे, त्याच्या समोर, मुस्लिम वस्तीपासून बऱ्याच अंतरावर होते. आम्ही वडीलांसह नमाजला मुस्लिम वस्तीत असलेल्या मस्जिदीत जायचो. तिथेच मदरसा ही होता, तिथेहि जायचो. वडील शासकीय नौकरीत असल्यामुळे शिक्षणाचे महत्व जाणत होते. त्यांनी आम्हा सर्व भाऊ-बहिणीना शिकविले. घरात सर्व ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रज्यूएट. दोन्ही ताई आणि मी शिक्षकी पेशात. मोठा कॉन्ट्रेक्टर, मजवे भाऊ फूड इंस्पेक्टर होते, राजीनामा देऊन कॉन्ट्रेक्टर झाले.
       वडिलांनी मोठ्या ताईस आणि भावंडास मराठीतूनच शिकविले. मला रामपुरी प्राथमिक मराठी शाळेत टाकले. पुढे शिवाजी महाविद्यालयातून बीकॉम, बीएड, नागपुरला एमए, एमएड, एमफिल, एमएफए वगैरे...
    काळ 1969-70 चा! या लहानपणी एक वेगळाच भाषिक तनाव पुढे आला. मुस्लिम वस्तित एक उर्दू शाळा होती. 4 थी पर्यन्त. या शाळेची कमेटी हिच मशिदिची कमेटी होती. जे मौलाना मदरसा शिकवायचे, ते उर्दू शाळेतही शिकवायचे आणि दूसरे जनाब देखील होते. अर्थात, मौलाना बिहारचे होते.
      मौलाना म्हणायचे, उर्दू ये अपनी जबान है. तहजीब की और मजहब की भी.मुस्लिम बच्चों को इसी जबान में पढ़ना चाहिए. मराठी  जबान अपनी नहीं है और उससे जबान तो खराब होती ही है और तहजीब भी! मजहब से भी बच्चे दूर हो जाते है... हे वाक्य ते मदरस्यात देखील बोलायचे...!
    घरी आल्यावर वडिलांना विचारल्यावर वडील एवढेच बोलले, उनका सुनने का, मदरसा जाओ, लेकीन इधर मराठी स्कूल में पढ़ने जाओ!
     मदरशात शिकविन्याची पद्धत छडीबाज होती. जबरदस्त मार पडायची. मौलाना क़ुरानच्या आयती पाठ करायला लावायचे, ते झाले नाही की जबरदस्त हातावर, तंगडीवर आणि पाठीवर मार! मदरशात 20-22 मुले आणि 15-16 मूली असायच्या. बहुतेक गरीबच! एकाध दूसरा मध्यमवर्गीय! सर्वांच्या मनात मौलानाजींच्या माराची जबरदस्त भीति. रोज कुणाला ना कुणाला जबर मार पडतच असे! घरी सांगायची सोय नाही! कारण क़ुरआन शिकणे हे पवित्र कार्य आणि मौलानाजींचा जबरदस्त मानसन्मान आणि भीतियुक्त आदर पाहून लहान तोंड उघडतच नव्हते! मिळणारा मार आणि पुढ़े आयात पाठ झाली नाही की पडणार असलेला जबरदस्त मार या भीतिने तेव्हा दूसरे काहीही सूचत नव्हते आणि संपूर्ण लक्ष पूर्ण ताकदिनीषि त्या आयाती पाठ करण्यावरच असायचे! आयाती पाठ करताना मेंदुच्या पाठांतरन् शक्तिचा कस लागायचा!
       जेव्हा मी स्वतः एमएड, एमफील झाल्यावर, त्या शैक्षणिक पद्धतिचा आणि त्या लहाणपणाची चिकित्सा करताना मुस्लिम विद्यार्थ्यांच्या लहाणपणीच्या घुसमटीचा मानसिक द्वंद्व ओळखू शकलो!
   त्या काळी मराठी शाळेत फक्त मी एकटा मुस्लिम विद्यार्थी! बाकी सर्व उर्दू शाळेत. कुणीही मुसलमान आपल्या मुलाला मराठी शाळेत पाठवेणा! वर्गामध्ये मुली 2 होत्या. ते ही पिंजरी जातीच्या. माझी मोठी ताई जेव्हा 12 वी उत्तीर्ण झाली आणि तिला पदविच्या अभ्यासक्रमात प्रवेश दिला आणि ताई सलवार-कुर्ता घालून इतर मूली सोंबत कॉलेजला जायची. गॅदरिंग आणि स्पोर्टमध्ये भाग घ्यायची, तेव्हा काही मुसलमान घरी येऊन ये मुस्लिम लड़की के लिए बराबर नहीं है म्हटल्याचे आणि वडिलांनी त्यांना घरुन हाकलून दिल्याचे आठवते! पुढे ताई भिवापुर येथील समर्थ जुनिअर कॉलेज मधुन प्रिंसिपल म्हणून सेवानिवृत्त झाली आणि तिचा मुलगा, परवेज आज इंजीनियरिंग करून प्रोडक्शन असिस्टेंट मॅनेजर पोस्टवर आहे. छोटी ताई शिक्षिका आहे.
    बाकी जी मुसलमानांची मुले होती ती उर्दू शाळेतच! 4 थी पर्यन्त अनुदानित शाळा. त्यांच्या लहानपनाची सर्व चौकस बुद्धि मौलानाजींच्या मारेला घाबरून आयाती पाठ करण्यात आणि पाठ सुजन्याच्या भीतिने सर्व बुद्धिचि शक्ति अत्यंत कठिण, वापरात आणि बोलचालित नसलेल्या अरबी भाषेच्या पाठान्तरात कामी लगत असे.
     मी वडिलांना मौलाना खुप मारतात असे सांगितले आणि वडिलांनी घरीच आईला अरबी शिकविन्यास सांगितले! आणि आई उर्दू शिकली असल्यामुळे बरिचशी प्राथमिक उर्दू घरिच शिकलो आणि अरबी वाचने सुद्धा!
    परन्तु माझ्या वयांची ती सर्व मुले फक्त उर्दू शाळेत शिकली. बाहेर पूर्ण मराठी! उर्दू शाळेचे शिक्षण नावाचेच! शिकविणारे शिक्षकही धन्यच! 4 थी पर्यन्त अनुदानासाठी पुढच्या वर्गात ढक्कल गाड़ी आणि 4 थी उत्तीर्ण झाल्यावर ठणठण! 4 थी नंतर पुढची शाळाच गावात किंव्हा जवळपास नाही! आज चिंतन केल्यावर कळते, त्या लेकराना 4 थी नंतर पर्याय नव्हता, असता तरीही काय केले असते? शेवटी ती सर्व मुलें पानठेला, फ्रूट गाड़ा, लहान-सहान टपरी, ब्रेड, भाजी विकायला लागले...
मराठी भाषेबद्दल बनविल्या गेलेला नकारात्मक दृष्टिकोण आणि तिथुन झिरपणारी शिक्षणाबद्दलची नकारात्मकता, लहाणपनीच भाषिक द्वंदात नष्ट होणारी बालबुद्धि... या सगळ्यांचा एकत्रित परिणाम बहुसंख्यक गरीब मुसलमानावर पडतो! सहज विचार येतो, वडील शिकले नसते आणि त्यांनी कनखर वास्तविक भूमिका घेतली नसती तर... आज जो जावेद पाशा उभा आहे, तो कुठे असता...!! ज्यांच्याकडे साधन भरपूर किंव्हा किमान आहेत, ते थोडेफार टिकतात तरी! मात्र 90-95%  है प्राथमिक शिक्षणातच बाहेर फेकल्या जातात!
 हा कुणाला आरोपी करण्याचा, किंव्हा दोष देण्यासाठी चिंतन नाही! स्वतः मुस्लिम समाजाने आणि त्याच्या नेत्यांनी आत्मचिंतन करण्यासाठी हे अनुभव मांडलेत! कित्येक पिढ्या 1969 पासून अश्या स्थितित लहानपणीच संपल्या असतील...!!
म्हणून मुस्लिम समाजाने शिक्षणाच्या क्षेत्रात मुलभूत सुविधा वाढविणे गरजेचे आहे! मदरसा शिक्षणाचा योग्य अभ्यासक्रम, प्रादेशिक भाषेशी सांगड घालने गरजेचे आहे....मदरसा शिक्षणाला आनंददायी करण्याची तर खूपच गरज आहे!
  इतर कारणे ही मुस्लिमाच्या नकारत्मकतेला कारणीभूत आहेतच! संघी मानसिकतेचे हल्ले आणि त्यातून येणारा प्रत्येक क्षेत्रातील नकार, जीवघेनी स्पर्धा आणि मुस्लिमांची आर्थिक समस्या... ह्या सर्व बाबीही आहेतच! आम्ही मांडलेला अनुभव त्यापैकी फक्त एक!

प्रा.जावेद पाशा 
9422154223

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget