Halloween Costume ideas 2015

जगणे कोणासाठी... की आत्महत्येसाठी

Hang
प्रत्येक व्यक्ती स्वतःवर आणि समस्त निसर्गावर विचारमंथन करीत नाही तोपर्यंत त्याला सत्यमार्ग सापडणे कठीण आहे. या मंथनातून त्याला का जगावे, कोणासाठी  जगावे की अनंत अडचणीतून मुक्त होण्यासाठी आत्महत्या करावी की करू नये, या प्रश्नाची उत्तरे मिळतात. ईश्वर प्रत्येकाला झेपेल एवढेच ओझे त्याच्यावर लादतो. कोणावरही अधिकचे ओझे टाकत नाही. तसेच मनुष्य स्वतःच्या चुकांमुळे अडचणीत येतो. मात्र तो याची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतो. त्याला सतत असे वाटते की, परिस्थिती त्याच्या नियंत्रणात आहे, पण प्रत्यक्षात परिस्थितीवर नियंत्रण अल्लाहचे असते. त्यामुळे परिस्थिती कधीही बदलू शकते. म्हणून परिस्थिती अनुकूल असो का प्रतिकूल असो अल्लाहवर विश्वास ठेऊन जीवन जगल्यास आत्महत्येपर्यंत जाण्याची गरजच भासत नाही.
खरे तर प्रत्येक मनुष्य हा खलीफा आहे. त्याला अश्रफुल मख्लुकात म्हटले जाते. म्हणजेच सर्वश्रेष्ठ जीव. मात्र तो स्वतःला ओळखण्यात गफलत करतो. तो ईशमार्गाचा अवलंब आपल्या जीवनात करण्याला प्राधान्य देत नाही. ईश्वराच्या मार्गदर्शनाला त्याच्या नियमांना आणि त्याच्या निर्मितीचा योग्य फायदा घेत नाही. तो थोडयाश्या सुखासाठी मोठे गुन्हे करून बसतो. आपल्या चुका सुधारून सत्मार्गाचा अवलंब करण्याकडे डोळेझाक करतो. जो व्यक्ती सत्याचा मार्ग अवलंबवितो तो सत्यात मग्न होतो. त्याचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोण हा सकारात्मक असतो. वाईट मार्गात जरी त्याला भरपूर फायदा मिळत असला तरी त्याला तो स्वैच्छेने तिलांजली देतो आणि समाधानी राहतो. अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीतही तो आपले पाय डगमगू देत नाही. त्या व्यक्तीला निश्चित सत्यमार्ग सापडतो तो ईश्वराच्या सांगितलेल्या मार्गावर चालण्यास प्रवृत्त होतो आणि ऐहिक आणि पारलौकिक जीवनातही यशस्वी ठरतो. मात्र एखाद्याला त्याच्या सद्सद्विवेकबुद्धीने वारंवार सत्याचा मार्ग लक्षात आणून देखील तो व्यक्ती जर थोड्याशा लाभासाठी, थोड्याशा सुखासाठी असत्य मार्ग स्वीकारत असेल तर त्याला त्यामध्ये गुरफटविले जाते. तो इतका त्या असत्य मार्गात तल्लीन होऊन जातो की, त्याला आपला गुन्हा, गुन्हा दिसत नाही तर ते त्याच्या जगण्याचे अंग बनते. आणि त्याला हा मार्ग आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलायला भाग पाडते. त्याला हे करताना जराही मागच्या पुढच्या जबाबदारीचे भान राहत नाही. मात्र असे नाही की प्रत्येक आत्महत्या करणारा व्यक्ती स्वतःच्या चुकामुळेच आत्महत्या करतो कधी-कधी दुसऱ्याकडून होणाऱ्या विनाकारण त्रासाला कंटाळूनही आत्महत्या करतो. मात्र अशा व्यक्तींना धैर्याने काम करायला हवे.
खरे तर मनुष्याने स्वतःच्या अस्तित्वावर विचारमंथन करायला सुरूवात केली तर तो निश्चितच स्वतःमध्ये अमुलाग्र बदल करून ईश्वरीय मार्गाचा अवलंब करू शकतो. मनुष्याची निर्मिती, निर्मितीनंतर त्याला जे नातलग, समाज आणि निसर्गाचे सानिध्य मिळते ते त्याच्या इच्छेनुसार कमी आणि ईश्वरीय इच्छेनुसार जास्त असते. ईश्वराने त्याला काय हवे यापेक्षा त्याच्या फायद्याचे काय आहे हे देऊन टाकलेले असते किंबहुना त्याच्यासमोर ठेवलेले असते. त्याला जन्म देऊन सोडलेले नसते तर त्याला मार्गदर्शन मिळावे म्हणून ईश्वर, पैगंबर, संत, महात्म्यांचे मार्गदर्शन त्याच्यासमोर असते. फक्त त्याला स्वतःच्या पोटाची खळगी भरण्याएवढे परिश्रम करावे लागते. या परिश्रमात त्याला सत्याच्या कसोटीवर उतरावे लागते. त्याला काही अधिकार बहाल केलेले असतात. या बहाल केलेल्या अधिकारात जर तो सत्मार्गाने चालला तर त्याच्या नशीबात जे काही लिहिले आहे ते त्याला मिळते, एवढे मात्र नक्की. मात्र जर तो मनुष्य त्याला दिलेल्या अधिकाराचा मनमानी पद्धतीने वापर करत गेला तर त्याचा सगळा दोष त्याच्यावर येतो. त्यामुळे प्रत्येकजण जे जीवन जगत असतो त्यासाठी तो स्वतःच जबाबदार असतो. कारण प्रत्येकाला विशेषाधिकारासोबत ईश्वरीय मार्गदर्शन आत्मसात करण्याचा अधिकार आहे.
जन्म आणि मार्ग...
कितीही मोठा व्यक्ती या एखाद्या श्रीमंत कुटुंबात जन्मास आला आणि कितीही गरीब व्यक्ती एखाद्या गरीब घरात जन्मास आला तरी त्या दोघांची जी निर्मितीची प्रक्रिया आहे ती सारखीच आहे. त्या दोघांच्या निर्मितीमध्ये ईश्वरीय आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून काहीच फरक नसतो. त्यांच्या सवयी वेगळ्या असतात, त्यांची पसंद ना पसंद वेगळी असते. मात्र त्या दोघांच्या वाढीसाठी मुलभूत जीवनावश्क वस्तू ह्या सारख्याच असतात. क्वचितच अपवादात्मक फरक असतो. मात्र त्या दोघांची जसजशी वाढ होते. त्यांच्या मेंदूवर कोरले जाणारे जे विचार असतात आणि तो जो समाज बघतो त्यातून त्याची पुढील जडणघडण ठरते. मात्र दोघांना समाजात वाईट आणि चांगल्या दोन्ही गोष्टी पहावयास मिळतात. त्यासाठीच ईश्वराने प्रत्येकाला एक विवेक दिलेला आहे की तो चांगल्या आणि वाईटातील फरक त्याचा मनाला दाखवून देतो. यामधील जो सत्य मार्गाचा अवलंब करतो भविष्यात तोच नावारूपाला येतो आणि आपली एक ओळख निर्माण करतो. त्याच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोण बदलतो. सत्यमार्गावर चालताना कधी-कधी अतीवाईट गोष्टींचा सामनाही करावा लागतो. मात्र यावेळी जो धैर्याने त्या गोष्टींचा सामना करतो तोच यशस्वी ठरतो. जो व्यक्ती सत्य मार्गावर चालतो तो कधीच एकटा नसतो तर त्यासोबत ईश्वराची कृपा असते. त्यामुळे तो कितीही मोठे संकट आले तरी लिलया त्यामधून बाहेर पडतो. असत्याच्या मार्गावर कित्येक लोकांना मोठे होताना आपण पाहतो. ते गुन्हे करतात, लोकांना त्रास देतात तरी त्यांचे नुकसान होत नसल्याचे आपणाला दिसून येते. मात्र त्या लोकांचे अनंतकालीन नुकसान होत राहते. त्यांच्या हातून ज्या लोकांवर अत्याचार होतो त्या पीडितांना ऐहिक जीवनात न्याय नाही मिळाला तरी ईश्वराच्या दरबारात त्यांना निश्चित न्याय मिळणार आहे आणि त्या गुन्हेगाराला शिक्षा होणार आहे, यासाठीच तर आखिरत (मरणोप्परांत जीवन) आहे.

- बशीर शेख (उपसंपादक)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget