अमेरिकेतील मिनियापोलिस येथे जॉर्ज फ्लॉइड नामक नि:शस्त्र कृष्णवर्णी नागरिकाला पोलिसांनी गेल्या आठवड्यात ठार केल्याच्या विरोधात उभे राहिलेले आंदोलन आता अनेक शहरांत पोहोचले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर व्हाईट हाऊसच्याच बंकरमध्ये लपण्याची वेळ आली होती. जॉर्ज फ्लॉइड या मध्यमवयीन गृहस्थाला बेड्या घातल्यानंतर, श्वेतवर्णी पोलीस अधिकारी डेरेक शॉविन याने त्याच्या मानेवर प्रचंड ताकदीने गुडघा दाबून धरला. फ्लॉइडला श्वास घेता येत नसल्याने, तो ‘आय कांट ब्रिद’ असे वारंवार म्हणत मदतीची याचना करीत होता. तब्बल आठ मिनिटे ४६ सेकंद त्याच्या मानेवर गुडघा दाबून धरल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. २०१९मध्ये अमेरिकेच्या अधिकृत जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येमध्ये आफ्रिकन अमेरिकनांचे प्रमाण १४ टक्क्यांपेक्षाही कमी होते. पण ज्या लोकांना पोलिसांनी गोळी झाडून ठार केले होते, अशांमध्ये कृष्णवर्णीय आफ्रिकन अमेरिकनांचे प्रमाण मात्र २३ टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. २०१८ मध्ये अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपैकी आफ्रिकन अमेरिकनांची लोकसंख्या होती १३ टक्के, पण तुरुंगातील एकूण कैद्यांपैकी एक तृतीयांश आफ्रिकन अमेरिकन आहेत. या तुरुंगातील कैद्यांपैकी गोऱ्यांची संख्या ३० टक्के. या गोऱ्याचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण ६० टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. आंदोलनातील हिंसाचार ही चिंतेची बाब असली तरी वर्णविद्वेषाविरोधात असंख्य अमेरिकी नागरिक रस्त्यावर उतरण्याचे धैर्य दाखवतात, हे दिलासा देणारेच म्हणावे लागेल. अमेरिकेत वर्णभेदाचा दंश अमेरिकेसाठी ऑलंपिकमध्ये सुवर्णपदक पटकविणारे जागतिक मुष्ठियोद्धा मोहम्मद अली यांनादेखील सहन करावा लागला होता. त्यांचे पूर्वीचे नाव कॅशियस क्ले होते. ते कृष्णवर्णीय असल्याकारणाने वेळोवेळी त्यांचा अपमान केला जात होता. या गोष्टीला कंटाळून त्यांनी सुवर्णपदक ओहियो नदीत फेकून दिले आणि इस्लाम धर्माचा स्वीकार केला. यानंतर जग त्यांना मोहम्मद अली या नावाने ओळखू लागले. बराक ओबामा निवडून आले त्यावेळीही त्यांना विरोध करणाऱ्यांच्या एका गटाला ते कृष्णवर्णी असल्याने नको होते. ओबामांच्याच कार्यकाळात २०१४ मध्ये फर्गसन शहरात १८ वर्षीय नि:शस्त्र तरुण मायकल ब्राऊनला पोलिसांनी आठ गोळ्या घालून ठार केले. याच वर्षी न्यूयॉर्क शहरातील एका पोलीस अधिकाऱ्याने एक कृष्णवर्णीय तरुण एरिक गार्नरची मान तो ठार होईपर्यंत गुडघ्याखाली दाबून ठेवली होती. एरिकने ‘आय कांट ब्रीद’ (मी श्वास घेऊ शकत नाही) असे ११ वेळा म्हटले होते. तरीही त्या पोलीस अधिकाऱ्यांने त्याची मान सोडली नव्हती. २०१५ मध्ये बाल्टीमोरमध्ये फ्रेडी ग्रे, २०१६ मध्ये मिनेसोटा प्रांतात फिलँडो कॅस्टिल आणि अॅल्टन स्टर्लिंन या सर्व कृष्णवर्णीय तरुणांचा पोलिसांनी बळी घेतला होता. ब्रिटिश वृत्तपत्र ‘गार्डियन’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार अमेरिकन पोलिसांनी २०१६ मध्ये दहा लाख लोकांपैकी सरासरी १०.१३ लोकांना गोळ्या घातल्या, यामध्ये कृष्णवर्णीय ६.६ तर गोऱ्यांची संख्या २.९ होती. २०१८ मध्ये अमेरिकन जर्नल ऑफ पब्लिक हेल्थ’मध्ये प्रकाशित एका सर्वेक्षणानुसार अमेरिकेत एक लाख लोकांमध्ये पोलिसांद्वारे ठार करण्यात आलेल्या कृष्णवर्णीयांचे प्रमाण १.९ ते २.४ दरम्यान आहे तर गोऱ्यांचे प्रमाण ०.६ ते ०.७ इतकेच आहे. तसेच अन्य एका अमेरिकन संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार २०१९ मध्ये १०९९ लोकांना अमेरिकन पोलिसांनी ठार मारले, यात देशाच्या एकूण लोकसंख्येत १३ टक्के असूनदेखील ठार झालेल्यांमध्ये २४ टक्के कृष्णवर्णीय होते. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जगातील सर्वांत शक्तिशाली लष्कराचे नेतृत्व करीत असले तरी आपल्याच देशातील नागरिकांद्वारा दरदिवशी होत असलेल्या वांशिकवादासमोर लाचार ठरतात. त्यांनी व्यक्त केलेली सहानुभूती उपयोगी ठरणार नाही. ट्रंप यांच्या डोळ्यांत सध्या फक्त पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनण्याचे स्वप्न आहे आणि आपल्या निर्णयाद्वारे गोऱ्या मतदारांना खूश करू शकतात, असे त्यांना वाटत आहे. जॉर्ज फ्लॉइडची घटना दरवर्षी अल्पसंख्याक, मागास व दुर्बल घटकांच्या लोकांना कधी जातीच्या नावाने तर कधी धर्माच्या नावाने मारले जात असलेल्या ‘विश्वगुरू’ भारतासाठीदेखील एक धडा आहे. आपल्या देशातदेखील अल्पसंख्यक आणि मागास समुदायाच्या लोकांना तुरुंगात डांबण्यात येते. दिल्ली दंगलीत दिल्ली पोलिसांची भूमिका सर्वश्रुत आहे. दिल्ली पोलीस अल्पसंख्यकांना वाचविण्याऐवजी एका विशिष्टविचारधारेच्या लोकांना हाताशी धरून त्यांच्यावर हल्ले करीत होते. दंगलीतील खऱ्या गुन्हेगारांना पकडण्याऐवजी सामाजिक कार्यकत्र्यांची धरपकड केली जाते यामध्ये बहुतांश मुस्लिम आहेत. सीएए विरोधी आंदोलनांदरम्यानदेखील पोलिसांचे दमन लपून राहिलेले नाही. अनेक मुस्लिम अल्पसंख्यक पोलिसांच्या अत्याचाराला बळी पडले आहेत. बहुसंख्यक समाजाबरोबरच आपल्या समाजातील सर्वांत दुर्बल व्यक्तीच्या अधिकारांचे रक्षण करण्यात पूर्णत: यशस्वी ठरलेली लोकशाहीच महान ठरू शकते. हे अधिकार भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत अतिशय गर्वाने मांडण्यात आलेले आहेत, परंतु आपण एका समाजाच्या रूपात आपल्याच लोकांना या महान संविधानाचे महत्त्व समजावून सांगण्यात यशस्वी होऊ?
-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४
मो.:८९७६५३३४०४
Post a Comment