Halloween Costume ideas 2015

सर्कस

आम्ही राजनाथ सिहांचे फार फार आभारी आहोत. गेले कित्येक दिवस घरात बसून टीव्हीवरच्या त्याच त्या करोनाच्या बातम्या, त्याच त्या रटाळ मालिका पाहून नुसता वैताग आला होता. नाही म्हणायला अधूनमधून कधी टाळ्या वाजव, थाळ्या वाजव तर कधी दिवे लाव असे काही विरंगुळ्याचे क्षण आमच्या परमप्रिय नमोजींंमुळे वाट्याला आले. अधूनमधून बांद्रे निवासी हिंदू हृदयसम्राट क्र. दोन उधोजीराजे दूरदर्शनच्या वेगवेगळ्या वाहिन्यांवरून दर्शन देत होते, धीर देत होते म्हणून बरे, नाहीतर सगळेच कसे कंटाळवाणे होऊन बसले होते. या कंटाळ्यातून बाहेर पडण्यासाठी एखादी सर्कस पाहून यावी असे कधीपासून मनात येत होते, पण आपली ही ' मन की बात' सांगणार तरी कोणाला आणि ती ऐकणार तरी कोण? आपली 'मन की बात' बळजबरीने कोणालाही ऐकविण्यासाठी आपण काय - - -? जाऊ द्या. फार तपास केला. सगळ्या ई- पेपरमधल्या जाहिराती पाहिल्या, गुगल करून पाहिले, मित्रांना विचारून पाहिले, पण कुठेच काही कळेना. आता कोणाला विचारावे, कुठे तपास करावा काहीच सुचेना. आता आपली सर्कस पाहण्याची इच्छा पूर्ण होण्याआधीच आपल्याला करोना ग्रासतो की काय या भावनेने मन अंधारून आले. हळूहळू आपले मानसिक संतुलन बिघडते की काय अशी भीती वाटू लागली. असे झाले तर  या
मनोविकृतीशी 'सामना' करण्यासाठी एखादया वर्तमानपत्राचे संपादक बनून, अग्रलेखातून गरळ ओकून ' कॅथरसिस' करून घ्यावे की काय असे विचारही मनात येऊ लागले ; आणि अचानक राजनाथ सिंह आमच्या मदतीला धावून आले. त्यांच्या श्रीमुखातुनच आम्हाला कळले की महाराष्ट्रात सरकार नाही तर सर्कस सुरू आहे! याला म्हणतात, ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा!' म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून चक्क आपल्या मुंबापुरीतच सर्कस सुरू आहे आणि त्याचा आम्हाला पत्ताच लागू नये? आम्हालाच काय पण कुठल्याही वर्तमानपत्राला, कुठल्याही वाहिनीला याचा पत्ता लागू नये? ही बातमी कोणीच छापू नये, कोणीच दाखवू नये? सत्तेच्या खुर्चीने एखाद्याचा स्वाभिमान गिळंकृत करावा तशी महाराष्ट्रातली शोध पत्रकारिता ‘पाकीट संस्कृती'ने गिळंकृत केली की काय? सरकारच्या जागी चक्क सर्कस चालवली जातेय? म्हणजे ‘वरून कीर्तन आतून तमाशा!'? नक्कीच ही गोष्ट राज्यपाल महोदयांनी दिल्लीला कळविली असावी, नाहीतर राजनाथ सिहांना ही गोष्ट कशी कळली?आता खुद्द राजनाथ सिहांनीच सांगितल्यामुळे विश्वास तर ठेवावाच लागणार होता, पण कोणातरी जाणकाराकडून खात्री करून घ्यावी आणि नंतरच सर्कस पाहण्यास जावे असे वाटत होते म्हणून मग एखादा ‘जाणता' शोधत असतांनाच दस्तुरखुद्द बारामतीकर साहेबांनीच घोषणा केली की, ‘आमच्या सर्कशीत सर्व प्रकारचे प्राणी आहेत, फक्त विदूषकाची कमतरता आहे.'! झाले! महाराष्ट्रात सर्कस सुरू आहे हे पक्के झाले! आमच्या मनातला साहेबांबद्दलचा आदर दुणावला. आतापर्यंत आम्ही समजत होतो की साहेबांनी महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र आणून सरकार बनविले. दगडाला शेंदूर फासला! आता साहेबांनीच सांगितल्यावर कळले की साहेबांनी तीन अभयारण्यातले प्राणी एकत्र करून महाराष्ट्रात सर्कस सुरू केली आहे. शिवाय हेही कळले की या सर्कशीत सर्व प्रकारचे प्राणी आहेत, पण विदूषकाची मात्र कमतरता आहे. आता
विदूषकाशिवाय सर्कस म्हणजे बिन दुधाचा, बिन साखरेचा चहाच की! बेचव! त्यातही म्हणे वाघोबांनाच ‘रिंगमास्टर' बनवल्यामुळे आणि या ‘रिंगमास्टर'चा ‘रिंगमास्टर' बाहेरून याला नाचवतो हे माहीत असल्यामुळे सर्कशीतले काही प्राणी त्याला अजिबात जुमानत नाहीत.
सर्कशीच्या इतिहासात पहिल्यांदाच काही
गाढवांचाही सर्कशीत समावेश करण्यात आला आहे. एकंदरीत बारामतीकर साहेबांनी सुरू केलेली ही सर्कस पाहण्यात आम्हाला काही रस नाही. त्यापेक्षा युट्युबवर ‘काळू बाळूचा तमाशा' पाहिलेला काय वाईट? आता ही सर्कस
चालविण्यात बारामतीकर साहेबांना किती दिवस रस राहतो ते पहावयाचे!
जाता जाता - या सर्कशीतल्या काही प्राण्यांचा एक गट नाराज असून, आमच्या खेळांना सर्कशीत दुय्यम स्थान दिले जाते असे त्यांचे म्हणणे असून ते सर्कसमधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत असे कळते. असे झाल्यास, बारामतीकर साहेबांची इच्छा असो की नसो, सर्कस गुंडाळली जाणार हे नक्की!

-मुकुंद परदेशी, मुक्त लेखक
भ्रमणध्वनी क्र. ७८७५०७७७२८

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget