Halloween Costume ideas 2015

‘कोरोना’नंतरचे जग

कष्टकऱ्यांच्या घामावर शहरे आणि देश उभा राहतो त्या कष्टकऱ्यांचे रक्त सांडले तरी सरकार हलत नाही ही लोकशाहीची आणि मानवतेची शोकांतिका आहे. हे सर्व  टाळणे शक्य होते. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेद्वारे मदत जाहीर करण्यात आली, जी आपल्या जी.डी.पी.च्या फक्त 0.85% एवढी आहे. इस्थर डूफ्लो आणि अभिजित बॅनर्जी या अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिक विजेत्या जोडप्यानुसार ही रक्कम किमान 5% असायला  हवी.  सरकारी  धान्य  गोदामे ओसंडून वाहत आहेत. 7.1 कोटी टन एवढा गहू आणि तांदूळ या गोदामांमध्ये 
आहे. गेले कित्येक दशके सार्वजनिक अन्न धान्य पुरवठा (रेशनिंग) यंत्रणा नियोजनबद्ध  संपवण्यात येत होती सक्षम असती तर या सर्व कष्टकऱ्यांना जगवणे सोपे झाले असते. पण अजूनही वेळ गेलेली नाही. या निमित्त पुन्हा ही व्यवस्था भक्कम करण्याची मागणी करावी लागेल. जनधन खात्यात प्रति महिना 500 रुपये जमा करणे ही गरिबांची थट्टा आहे, ही रक्कम किमान 3000 रुपये असायला हवी. या निमित्ताने आपल्याला देशात सामाजिक सुरक्षेच्या व्यापक योजना निर्माण कराव्या लागतील. संघटीत कामगार आणि शेतकरी यांचे जगणेही वेगवेगळ्या प्रकारे धोक्यात येणार आहे. अनेक वस्तूंची मागणी घटण्याची शक्यता असल्याने अनेक उत्पादने धोक्यात येतील. वाहनांची मागणी घटण्याची शक्यता राहील. बांधकाम, पर्यटन, करमणूक, सार्वजनिककार्यक्रम यांच्यावर मोठा परिणाम होणार असल्याने त्यांच्याशी संबंधित उत्पादने घटतील. यामुळे अनेक कारखाने धोक्यात येतील आणि कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळेल. पण हे संकटही स्वदेशी निर्मितीची चालना आणि आयातीवरील परावलंबित्व दूर करण्यासाठी संधी मानावी लागेल. गेली काही दशके चीनने भारताची बाजारपेठ काबीज केली होती. इतर अनेक देशही आपल्या बाजारपेठांवर राज्य गाजवत होते. या निमित्ताने आपल्या देशाने नव्या उद्योगांना चालना द्यावी लागेल. चिनी उत्पादनांना टक्कर देण्यासाठी संशोधन, नावीन्यपूर्ण उत्पादन, उत्तम दर्जा आणि कमी किंमत हे सूत्र ठेवावे लागेल. औद्योगिक क्षेत्र चिमुटभर उद्योगपतींच्या हातातून काढून उत्पादने विकेंद्रित पद्धतीने होतील हे पाहावे लागेल. जगभर चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार घातला जाण्याची शक्यता आहे. ही पोकळी मनुष्यबळामुळे आपला देश भरून काढू शकतो. अनेक सामुहिक कार्यक्रम, समारंभ, परिषदा, उपाहारगृहे, पर्यटन, बाजारपेठा हे सर्व घटणार असल्याने अन्न धान्याची मागणी, दुधाची मागणी कमी होईल. स्थलांतरामुळे शेतमजूर मिळणे कठीण होईल. पूरक व्यवसाय म्हणून किंवा स्वतंत्र व्यवसाय म्हणून होणारे पशुपालनही धोक्यात येईल. सर्वप्रथम शेतकरी आणि शेतमजूर यांना याआजाराच्या संसर्गापासून दूर ठेवणे फार महत्त्वाचे आहे. दुसरे, शेती मालाच्या विक्रीतील दलाली दूर करून तो थेट पुरवठा साखळी (सप्लाय चेन)ला उपलब्ध करण्याची यंत्रणा राबवावी लागेल. घरपोच सेवा आणि अ‍ॅपबेस्ड पुरवठा यांचा आधार घ्यावा लागेल. कोरोनाचा फार मोठा फटका हॉटेल व्यवसायाला बसणार आहे. या साथीमुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, छोटे खाद्य ठेले, हातगाड्या या सर्वांची भवितव्ये पूर्ण धोक्यात आली आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांना घरचे खाणेही चांगले आणि आरोग्यदायी असते हा शोध लागला. अनेक जण ‘वर्क फ्रॉम होम’मुळे घरच्या खाण्याची चव प्रथमच घेत आहेत. घरोघरी नवे बल्लवाचार्य निर्माण होत आहेत. बाहेरच्या खाण्याची चटक कमी होणे हे या व्यवसायाच्या मुळावर घाव घालणारे आहे. पण हा व्यवसाय मरणार नाही. पुढील दोन एक वर्षे तो खूप कठीण काळातून जाईल. कोरोनानंतरच्या काळाला सामोरे जाण्यासाठी या सर्वांच्या रचनेत, कार्यपद्धतीत अमुलाग्र बदल करावे लागतील. बैठकीची रचना बदलावी लागेल. ग्राहकांना सुरक्षित वाटेल अशी पावले उचलावी लागतील. जागेचे सतत सॅनिटायझेशन, हँड सॅनिटायझर्स, टिश्यू पेपर्स इ. वापरावे लागेल. यामुळे खर्चात भर पडेल. आसनांची संख्या कमी करावी लागेल, यामुळेही उत्पन्न घटेल. ग्राहकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी खाणे कसे देता येईल याचे नियोजन आणि विचार आता करावा लागेल, फक्त चवीचा नाही! हा व्यवसाय पर्यटन, मोठे कार्यक्रम, समारंभ यांवरही अवलंबून आहे.
कोरोनाचा सर्वांत जास्त फटका कोणत्या व्यवसायाला बसणार असेल तर तो पर्यटन व्यवसायाला. पर्यटन जगाच्या जी.डी.पी.चा 10% भाग आहे. या व्यवसायातील 5 कोटी लोकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळेल आणि यातील 3 कोटी आशिया खंडातील असतील असा प्राथमिक अंदाज आहे.  पुढील काही महिने हवाई आणि जलवाहतूक बंद राहील. हे संकट कमी झाल्यावरही लोक पर्यटनाकडे वळण्यास कित्येक महिने लागतील. पुढील अनेक वर्षे विमानांतील आसन संख्या कमी करावी लागेल,ज्यामुळे प्रवास महागेल आणि त्यामुळेही प्रवासी घटतील. पण बाहेरच्या देशांमध्ये पर्यटक जाण्यास घाबरतील, परदेश प्रवासावर अनेक देश निर्बंधही घालतील. यामुळे कदाचित देशांतर्गत प्रवास आणि पर्यटन वाढेल. आपली पर्यटनस्थळे स्वच्छ आणि आकर्षक करावी लागतील, त्यांच्या फक्त नैसर्गिक सौंदर्यावर विसंबून राहून चालणार नाही. आपला देश आयुष्यभर पाहत हिंडलो तरी पाहून होणार नाही इतका निसर्ग आणि प्राचीन ऐतिहासिक स्थळांनी समृद्ध आहे. पण तरीही आपल्या देशातील प्रवासाच्या सुविधा, रस्ते, पर्यटन स्थळांवरील गैरसोयी यामुळे पर्यटक परदेश निवडत होते. आपल्या देशातील पर्यटन व्यवसायाने ही संधी समजून पुढील नियोजन केले तर चित्र वेगळे दिसेल. सरकारला यासाठी दूरदृष्टीने धोरणे आखावी लागतील आणि या व्यवसायाला चालना द्यावी लागेल. गेले दशक भारतासाठी आय. टी. व्यवसायाच्या भरभराटीचे होते. आपले जीवन हवा, पाणी आणि अन्न याबरोबर आता इंटरनेट वर तेवढेच अवलंबून झाले आहे. कोरोनाने या व्यवसायाला मोठा धक्का दिला आहे. पण या व्यवसायात वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध आहे. त्याचबरोबर कोरोना संकटामुळे आज जग उलट इंटरनेटवर अधिक अवलंबून असणारे झाले आहे. आपल्या जगण्याच्या अनेक गोष्टी इंटरनेट, सॉफ्टवेअर, व्हिडिओ कॉन्फरंसिंग, वेबिनार्स, झूम मिटींग्ज, मोबाईल अ‍ॅप यांवर चालू लागल्या आहेत. माणसे आता एकमेकांना प्रत्यक्ष कमी भेटतील. आपले सर्व व्यवहार आता डिजिटल आणि भेटी चर्चा इंटरनेटवर आधारित माध्यमांवर होतील. याचबरोबर व्हर्चुअल रियालिटी, मशिन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलीजन्सी, रोबोटिक्स, ड्रोन हे जीवनाचा अविभाज्य भाग बनतील. भारतीय माणसाला संगणक क्षेत्रात उपजत गती असल्याने हे क्षेत्र आपल्या देशात नवे रोजगार निर्माण करेल. महात्मा गांधी यांचे एक फार उत्कृष्ट इंग्रजी चरित्र सुधेन्द्र कुलकर्णी यांनी ‘म्युझिक ऑफ दी स्पिनिंग व्हील’ (चरख्याचे संगीत) या नावाने लिहिले आहे. मूळ कम्युनिस्ट असणारे सुधेन्द्र हे भाजपाचे वरिष्ठ सदस्य असून अडवानी यांचे निकटवर्तीय आहेत. या गृहस्थांना गांधी द्वेषाच्या कोरोनाचा संसर्ग कसा झाला नाही हे एक आश्चर्यच! त्यांचे पुस्तक मात्र भन्नाट आणि जागतिक दर्जाचे आहे. या पुस्तकाचे उपशीर्षक आहे ‘महात्मा गांधीज मॅनिफॅस्टो फॉर दी इंटरनेट एज’ (इंटरनेट युगासाठी महात्मा गांधींचा जाहीरनामा). आधुनिक जगाच्या इंटरनेट नावाच्या क्रांतीचा मागमूस नसणाऱ्या महात्मा गांधींचा माहिती तंत्रज्ञान युगासाठी जाहीरनामा कसा असू शकतो असा प्रश्न पडतो. गांधींची वैचारिक वाटचाल, व्यक्ती म्हणून उत्क्रांती एखाद्या वैज्ञानिकासारखी होती. सुधेन्द्र म्हणतात की इंटरनेट हा नव्या युगाचा चरखा आहे. चरख्याने गुलामगिरीत जखडलेल्या भारतीय जनतेला स्वत्वाचे भान दिले, आत्मविश्वास दिला, स्वदेशीचा अभिमान दिला, रोजगाराचा मंत्र दिला आणि जगण्याचा स्वाभिमान दिला. कोरोनानंतर इंटरनेट आणि त्याच्या माध्यमातून घडणारे सर्व काही गांधींच्या चरख्याचे संगीत बनणार आहेत. इंटरनेटला गांधींच्या चरख्याची उपमा देण्याचा त्यांचा आणखीन एक हेतू असावा. इंटरनेट आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगाची काळी बाजूही गडद बनू शकते. गांधी म्हणजे विवेक, नैतिकता आणि मानवता. गांधींचा नव्या युगाचा चरखाही ही मुल्ये घेऊन आला पाहिजे. पण यासाठी आपल्याला पुढारलेल्या देशांची कॉल सेंटर चालविणारा आणि पाश्चात्त्य देशांना उच्च शिक्षित, स्वस्त असे आधुनिक गुलाम पुरविणारा देश या प्रतिमेतून बाहेर पडावे लागेल. आपल्याला फेसबुक, ट्विटर, यु-ट्यूब, व्हॉट्सअ‍ॅप, झूम, अमेझॉन, अलिबाबा इ. सारख्या अभिनव, जग बदलणाऱ्या गोष्टी आता या मातीत जन्माला घालाव्या लागतील. आपल्याला बिल गेट्स, मार्क झुकेरबर्ग, जॅक मा जन्माला घालावे लागतील. अंबानी, अदानी, जिंदाल हे सत्ताधाऱ्यांचे लांगूलचालन करून जगातील श्रीमंत असामी बनू शकतात पण जग बदलवणारे असे काहीही करू शकत नाहीत. आता शहरे संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक अत्याधुनिक साधने लागणार आहेत. ही साधने स्मार्ट  सिटीजचा अविभाज्य भाग बनतील. या साधनांचे संशोधन आणि उत्पादन नवे रोजगार निर्माण करेल. कोरोनाचा फटका खाणारे आणखीन एक क्षेत्र म्हणजे करमणूक क्षेत्र. गेले काही महिने जगातील अनेक देशांमधील चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि चित्रीकरणे बंद आहेत. पीव्हीआर, आयनॉक्स, कार्निव्हल सिनेमाज, सिनेपोलीस या जगभर अत्याधुनिक चित्रपटगृहे चालविणाऱ्या कंपन्या संकटात आहेत. या व्यवसायांशी संबंधित लाखो लोकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. चित्रपटगृहे सुरू झाली तरी सुरक्षेच्या कारणासाठी फक्त 25% तिकीट विक्री करावी लागेल. नेटफ्लीक्स, हॉट स्टार या घरात चित्रपट आणि जागतिक दर्जाच्या मालिका पुरवणाऱ्या गोष्टींची लोकांना सवय लागली आहे. त्यामुळे रसिकांची पावले चित्रपटगृहांकडे वळतील का हा प्रश्न निरुत्तरित आहे. हॉलीवूडमधील डिस्नीचा मुलान, फास्ट अँडफ्युरीयस 9, नो टाईम टू डाय, बॉलीवूडमधील ‘83’, सूर्यवंशी अशा अनेक तयार असलेल्या मोठ्या चित्रपटांचे  प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. सर्व चित्रीकरणे पण थांबली आहेत. ती पुन्हा केव्हा सुरू होतील हे माहीत नाही. झाली तरी विलगीकरण काही वर्षे चालू राहणार असल्याने चित्रीकरण क्रू, नट, एक्स्ट्रांचे ताफे, मॉब सीन्स हे सारे कठीण बनणार आहे.  कदाचित सर्वांना कोव्हीड निगेटिव्ह सर्टिफिकेट दर काही दिवसांनी देण्याचा उद्योग करावा लागेल. मालिकांनाही आणि नाटकांनाही हे लागू होईल. यातून काही नव्या क्रांतिकारक  गोष्टी घडू शकतात. ऑनलाईन प्लॅटफॉर्म हे नवे चलनी नाणे बनेल. ऑगमेंटेडरियालिटी, व्हर्च्युअलरियालिटी आणि मिक्स्डरियालिटी आता करमणुकीचे क्षेत्र व्यापू शकतात. करमणुकीबरोबर असाच दणका क्रीडा क्षेत्र खाणार आहे. ऑलिम्पिकपुढे ढकलावे लागणे ही ऐतिहासिक गोष्ट आहे. खेळ हा स्टेडीयममध्ये खचाखच भरलेल्या प्रेक्षकांच्या जल्लोषाशिवाय पूर्ण होत नाही. आता कदाचित 25%  प्रेक्षकांसमोर खेळ करावे लागतील. आंतरराष्ट्रीय प्रेक्षक,  दूरवरून येणारे प्रेक्षक विसरावे लागतील. खेळाडूंच्या प्रवासावरही बंधने येतील. या क्षेत्राला बाहेर काढणे सोपे नाही. कोरोनामुळे सगळ्यात होणारा मोठा बदल म्हणजे जगाच्या सत्ता समिकरणामध्ये होणारा बदल. कोरोनाच्या संकटाला पाश्चात्त्य राष्ट्रांचा प्रतिसाद हा गोंधळाचा होता आणि आहे. त्या उलट चीन, साउथ कोरिया, सिंगापूर ही पौर्वात्य राष्ट्रे या संकटाला अधिक वेगाने, नियोजनबद्ध, कार्यक्षमतेने भिडली. जगाच्या राजकीय महत्त्वाचा लंबक यापुढे पूर्वेकडे झुकण्याची शक्यता राहील. चीन या सगळ्याचा सर्वांत जास्त फायदा घेईल आणि महासत्ता म्हणून अमेरिकेची जागा हिसकावेल. या  संकटामुळे जग अधिक बंदिस्त, गरीब आणि स्वातंत्र्य गमावलेले होईल. भारत, ब्राझिल, टर्की हे देश आधीच चीन आणि रशियाच्या पावलांवर एकाधिकारशाहीकडे वाटचाल करीत होते. युरोपातही उजवे सत्तेवर येत होते. सर्व उजवे सत्ताधारी हे लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य न मानणारे आणि अनिर्बंध भांडवलशाहीवर विश्वास ठेवणारे असतात. अनेक उजवे जमातवादी असतात. आपल्या लक्ष्यांकडे जाण्यासाठी या सर्व हुकुमशाही मनोवृत्तीच्या सत्ताधाऱ्यांना कोरोना हे उत्तम निमित्त मिळाले आहे. विलगीकरण, जमावबंदी, प्रवास बंदी आणि आपत्ती कायदा हे सर्व त्यांना विरोधकांचे आवाज चिरडून टाकण्यासाठी वापरता येत आहे आणि येत राहील.
अनेक देशांमधील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अनेक देशांमध्ये आणीबाणी लागू झाली आहे आणि होत राहील. कोरोनाने जागतिकीकरणाला अंतिम हादरा दिला आहे. अनेक राष्ट्रे आपल्या सीमा बंद करीत आहेत. वाढणारी गरिबी आणि बेकारी सामाजिक अराजकता आणि गुन्हेगारी निर्माण करेल. अशा वेळी लष्करी राजवटीही आणण्यात येतील. सिरीया, अफगाणीस्तान, सोमालिया, दक्षिणसुदान, येमेन या आधीच भयानक अवस्थेत असलेल्या देशांची अवस्था तर आणखीन भयानक होईल. कोरोना हे जगावर आलेले संकट आहे. या संकटाचा उपयोग राजकीय सत्तेची पकड घट्ट करण्यासाठी किंवा आर्थिक लाभासाठी करणे अनैतिक आहे. कोरोनामुळे जगावर बंधने आली आहेत. पण उलट जगाने एकजुटीने, आंतरराष्ट्रीय सहकार्याची साखळी निर्माण करून त्याचा सामना केला पाहिजे आणि एक नवे जग निर्माण केले पाहिजे. असे करण्यातच शहाणपण आहे ! (लेखक : पुरोगामी गर्जना, पुणेचे संपादक आहेत.)

- डॉ.अभिजित वैद्य
puja.monthly@gmail.com

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget