Halloween Costume ideas 2015

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि मुस्लिमांची जबाबदारी


दिल से निकलेगी न मरकर भी वतन की उल्फत

मेरी मिट्टी से भी खुशबू-ए-वतन आएगी

ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारतामध्ये चंचू प्रवेश करून आपल्या योग्यतेच्या बळावर इंग्रजांनी अल्पावधीतच अवघा भारत कवेत घेतला. टिपू सुलतानच्या मृत्यूनंतर इंग्रज कमांडरनी घोषणा केली की, ‘‘नाऊ इंडिया इज अवर्स‘‘ इंग्रजांनी सत्ता मुस्लिमांकडून हिसकावून घेतली होती म्हणून साहजिकच ती परत मिळण्याचे प्रयत्न मुस्लिमांनीच सुरू केले हे खरे, सुरूवातीला बहादूरशाह जफर यांनी स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले हे ही खरे, त्यांच्या रंगून रवानगीनंतर उलेमांनी स्वातंत्र्य लढ्याची कमान आपल्या हातात घेतली हे ही खरे, मुस्लिमांनीच गांधींना स्वातंत्र्य लढ्याचे  नेतृत्व देऊन स्वतः नेपत्थ्यात जाणे पसंत केले हे ही खरे, मुस्लिमांनी स्वातंत्र्याच्या बहुतेक घोषणा तयार केल्या हे ही खरे, लोकसंख्येच्या तुलनेत जास्त त्याग केला हे ही खरे, परंतु एका फाळणीने मुस्लिमांच्या या सर्व सद्गुणांची माती केली हे ही खरे. 

काही जमीनदार मुस्लिमांनी प्रामुख्याने फाळणीची मागणी केली होती. पण त्याचे खापर सर्व मुस्लिमांच्या डोक्यावर फोडण्यात आले. फाळणीचा विचार एक त्रुटीपूर्ण विचार होता. म्हणूनच अबुल कलाम आझाद पासून जमीयत-ए-उलेमा-ए-हिंद सारख्या उत्तूंग व्यक्ती आणि संस्थांनी त्या विचाराचा संपूर्ण ताकदीनिशी विरोध केला होता. फाळणीचा विचार सर्वसाधारण मुस्लिम नागरिकांच्या मनामध्ये कधीच आला नव्हता हे सत्य ढगाआड लपविले गेले. फाळणीचा विचार प्रामुख्याने 1940 पासून मुस्लिम लीगने पुढे रेटला, दुर्दैवाने त्यावेळी झालेल्या दंगलीमुळे या विचाराला गती मिळाली. तत्पूर्वी 1937 साली इंग्रजांच्या काळात झालेल्या प्रोव्हिन्शन इले्नशन्समध्ये मुस्लिमांनी काँग्रेसची जीव ओतून मदत केली होती. परंतु काँग्रेसने त्यानंतर मुस्लिम नेतृत्वाला त्या मानाने कमी बळ दिले. विशेषतः मोहम्मद अली जिन्नांकडे दुर्लक्ष केले. म्हणून अखंड भारताचे कट्टर समर्थक असलेले जिन्ना हे आपल्या महत्त्वाकांक्षेच्या पूर्ततेसाठी काँग्रेस सोडून लीगच्या गटात गेले. खरे तर जिन्ना हे क्षयरोगाने ग्रस्त होते म्हणून त्यांना पंतप्रधान केल्याने फारसे नुकसान होणार नव्हते, फाळणीमात्र वाचणार होती, असा विचार काँग्रेसमधूनच पुढे आला होता. परंतु स्वतंत्र भारताचा पहिला पंतप्रधान म्हणून इतिहासात आपले नाव अजरामर व्हावे या महत्त्वाकांक्षेपोटी नेहरूंनी जिन्नांची अवहेलना करत एका प्रकारे त्यांना मुस्लिम लीगमध्ये जाण्याची वाट मोकळी करून दिली. असे असतांनाही बहुसंख्य मुस्लिमांनी जिन्नांचे समर्थन न करता नेहरूंचेच समर्थन केले. जिन्नांच्या द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताला अस्विकार करत नेहरू, गांधी, पटेल यांच्या आयडिया ऑफ इंडियाच्या विचाराचा स्वीकार केला. तरी सुद्धा फाळणीचा आरोप पाकिस्तान समर्थक नसलेल्या मुस्लिमांवरही केला जातो, ही मोठी दुर्दैवाची बाब आहे. फाळणीमुळे देशाची 27 टक्के भूमी आणि 26 टक्के नागरिक पाकिस्तानच्या हिश्शात गेले. त्यातील बहुसंख्य मुस्लिम आधिपासूनच त्या भूमीत राहणारे होते. सीमावर्ती भागात राहणारे त्यातल्या त्यात प्रामुख्याने पंजाब आणि बंगालमधील मुस्लिम जनताच पाकिस्तानात गेली. मात्र प्रतिमा अशी तयार झाली की सर्व भारतीय मुस्लिमांनी पाकिस्तानची मागणी व समर्थन केले होते. आजही तीच प्रतिमा कायम आहे. किंबहुना त्यात वाढच झालेली आहे. याचेच आश्चर्य वाटते. कल्पना करा तुमच्या मुलाने चॉकलेटसाठी एवढा हट्ट धरला की तुमच्या नाकी नऊ आणले. शेवटी नाईलाजाने का होईना तुम्ही त्यास चॉकलेट आणून दिले तेव्हा त्याने ते घेतले नाही. म्हणजे चॉकलेटीची मागणीही केली व ती पूर्ण केल्यावर तीचा स्विकारही केला नाही, असे घडू शकेल का? नाही ना! मग समस्त भारतीय मुस्लिमांनी पाकिस्तानची मागणी केली असती तर ती पूर्ण झाल्याबरोबर ते तिकडे गेले नसते का? ते ही जेव्हा मुस्लिमांना तिकडे जाण्यासाठी कित्येक दिवस रेल्वेची मोफत सुविधा दोन्ही सरकारांनी मिळून केली होती. एवढेच नव्हे तर 1948 साली नेहरू-लियाकत कराराद्वारे लोकसंख्या आदली, बदलीची सवलत उशीरापर्यंत चालू होती. असे असतांना सुद्धा बहुतेक मुसलमान भारतातच का राहिले? याचा विचारसुद्धा मुस्लिम द्वेषाने पछाडलेल्या लोकांना करावासा वाटत नाही, याचेच अतीव दुःख वाटते. 

1947 साली भारताची लोकसंख्या 292164791 तर मुस्लिमांची लोकसंख्या 79055078 म्हणजे 27 टक्के इतकी होती. त्यातील बहुसंख्य मुस्लिम भारतातच राहिले. कारण कोणत्याही माणसाला निसर्गतः आपले जन्मस्थान प्रिय असते. खरे तर इंग्रजांना हुसकावून लावण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम दोघांनी मिळून स्वातंत्र्याचा जो लढा उभा केला होता. त्यावेळेस जो एकोपा दोन्ही समाजामध्ये होता तो स्वातंत्र्योत्तर काळात राहिला नाही. स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात येत असल्याचे पाहून अनेक हिंदू-मुस्लिम मुलतत्ववादी संघटनांनी स्वातंत्र्याचा लाभ आपल्याच पदरात पाडून घेण्यास सुरूवात केली होती. ही मानसिकता सुद्धा फाळणीचे एक मोठे कारण ठरले. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर पाकिस्तान एक दरिद्री राष्ट्र बनले आहे. याउलट भारताने सर्वसमावेशक अशी प्रगती केली व स्वतःला जगासमोर एक मोठ्या शक्तीच्या रूपाने स्थापित केले आहे. या शक्तीशाली भारताला बनविण्यामध्ये मुस्लिम समाजानेही आपला महत्त्वाचा वाटा उचललेला आहे. ज्या क्षेत्रात त्यांना संधी मिळाली त्या क्षेत्रात त्यांनी त्या संधीचे सोने केले आहे. 

विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये त्यांनी एपीजे अब्दुल कलाम सारखा वैज्ञानिक दिला तर क्रीडा क्षेत्रामध्ये अझहरोद्दीन, सानिया मिर्झा, इरफान पठाण, जहीर खान, युसूफ पठाण, मोहम्मद शमी, गुलाम रसूल ते निखत झरीन सारखे खेळाडू दिले. संरक्षण क्षेत्रामध्ये परमवीर चक्र विजेता शहीद अब्दुल हमीद पासून ते कारगीलचा शहीद कॅप्टन हनिफुद्दीन व ईदची सुट्टी सोडून पाकिस्तान बॉर्डरवर शत्रुशी लढतांना शहीद झालेला हैद्राबादचा सरफराज खान सारखे जिगरबाज दिले. राजकारणामध्ये अबुल कलाम आझाद, अली बंधू, झाकीर हुसैन, फकरूद्दीन अली अहमद यांच्यासारखे अनेक नेते दिले. कला क्षेत्रात मोहम्मद रफी, भारतरत्न उस्ताद बिस्मील्लाह खान पासून अनेक कलाकार दिले. सामाजिक क्षेत्रात जमियते उलेमा-ए-हिंद व जमाअते इस्लामी हिंद सारख्या कल्याणकारी संस्था दिल्या. उद्योग क्षेत्रात सिप्ला, हिमालया व विप्रोसारख्या कंपन्या दिल्या. भिवंडी (कापड),मालेगाव (कापड), अलिगढ (कुलूप), भागलपूर (तुषार सिल्क), सहारनपूर (लाकडी कलाकुसरीचे सामान), सूरत (कापड), मुरादाबाद (पितळी कलात्मक भांडी), फिरोजाबाद (बांगड्या), हैद्राबाद (कंगन आणि मोती उद्योग) च्या रूपाने देशाच्या व्यापाराला मोठ्या प्रमाणात चालना दिली. देशातील सर्वात मोठा लूलू मॉल युसूफ अली यांनी दिला. याशिवाय,  बांधकाम क्षेत्रामध्ये कोट्यावधी मुस्लिम मजुरांनी आपल्या रक्ताचे पाणी केले. 

भारतीय मुसलमान दिसायला जरी वेगळा असला, त्याला त्याच्या ‘कपड्यावरून’ जरी ओळखता येत असले तरी तो बहुसंख्य समाजामध्ये इतका समरस झालेला आहे की, त्याची दखल स्वतः बराक ओबामा यांनी खालील शब्दात घेतलेली आहे. 

"Particularly in a country like India where you have such an enormous Muslim population that is successful, integrated and thinks of itself as Indian and that is unfortunately always not the case in some other countries where a religious minority nevertheless feels a part of. I think that is something that should be cherished, nurtured and cultivated. And I think that all farsighted Indian leadership recognises that but it is important to continue and reinforce that," 

-  Barack Obama, speaking at the Hindustan Times Leadership Summit. (27 January 2015).

मात्र मागील काही वर्षांपासून भारतीय मुस्लिमांची प्रतीमा मलीन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे. त्यात मीडियाने प्रमुख भूमीका बजावलेली आहे. फाळणीच्या वेळी गांधी, नेहरू, पटेल यांच्या धर्मनिरपेक्ष भारताचा, ‘‘आयडिया ऑफ इंडिया‘‘ची जी संकल्पना स्वीकारली गेली होती ती बदलण्याचा भरपूर प्रयत्न करण्यात आलेला आहे, असे असतांनाही भाजपाला 8 वर्षे सत्ता हातात ठेऊन सुद्धा 48 टक्क्यांच्या पुढे मतदान घेता आले नाही. याचा अर्थ 52 टक्क्यांपेक्षा जास्त मतदार आजही धर्मनिरपेक्ष भारताच्या समर्थनार्थ उभे आहेत. केवळ मीडियाद्वारा रात्रंदिवस दुष्प्रचार केला जात असल्यामुळे त्यांची शक्ती अधिक असल्याचा भास होतो. परंतु हे सत्य नसून भ्रम आहे. मागच्याच आठवड्यात नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडून बिहारमध्ये राजकीय भूकंप घडवून आणला आहे. ही घटना भाजपला उतरती कळा लागत असल्याचे चिन्हही मानता येईल. 

भारतीय हिंदू समाज हा सहिष्णू समाज आहे व भारत धर्मनिरपेक्ष, राज्यघटनेमुळे नाही तर हिंदूंच्या सहिष्णू प्रवृत्तीमुळे आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. टोकाचा दक्षिणपंथी विचार करणारे स्वातंत्र्यपूर्वीपासूनच अल्पसंख्येत होते आणि आजही अल्पसंख्येतच आहेत आणि त्यांना कायम अल्पसंख्येत ठेवण्याची जबाबदारी बहुसंख्य हिंदू बांधवांची आहे. असे केले तरच देश महासत्ता होऊ शकतो. कारण देश एक शरीर आहे आणि 20 टक्के शरीराला अपंग ठेवून कोणीही कोणत्याही क्षेत्रात जागतिक मेडल जिंकू शकत नाही. चीनने जसे प्रत्येक नागरिकाचे मूल्य ओळखून त्यांच्याकडून भरपूर कष्ट करून देशाची उभारणी केली, अगदी तसेच करून देशातील प्रत्येक नागरिकाच्या कौशल्याचा वापर राष्ट्रबांधणीमध्ये केल्याशिवाय भारत महासत्ता होणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. ही बाब एव्हाना भाजपच्याही लक्षात आलेली असल्यामुळे अजित डोभाळ यांनी सुफी मुस्लिमांना सोबत घेण्याचा नव्याने प्रयत्न सुरू केलेला आहे. 

तीन ऋतू, विपुल संसाधने, उत्तरेला हिमालय, पूर्व-पश्चिम आणि दक्षिणेला पसरलेला हजारो किलोमीटरचा समुद्रकिनारा, प्रचंड जनसंख्या, जगातील सर्वात अधिक तरूणांची संख्या असलेल्या आपल्या देशाचा विकास होत आहे असे म्हणणे हास्यास्पद आहे. तो तर होणारच! पण खरा प्रश्न असा आहे की, जागतिक महासत्ता होण्यासाठी ज्या गती आणि दिशेने विकास व्हायला हवा तसा तो होत आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दुर्दैवाने या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी असेच आहे. त्याची प्रमुख कारणे तीन आहेत. 1. प्रचंड भ्रष्टाचार 2. संकीर्ण सांप्रदायिक विचारसरणी आणि 3. लोकशक्तीचा अपुरा वापर. भ्रष्टाचारासंबंधी बोलण्यासारखे काही नाही. जळी स्थळी काष्टी पाषाणी भ्रष्टाचार व्यापून आहे. याचा वेग आणि आकार देशाला आतून पोखरून टाकत आहे. विशेषतः राजकीय नेत्यांचा भ्रष्टाचार ज्या उंचीवर गेलेला आहे तो पाहता देशाच्या आम जनतेच्या सोशिकपणाचे कौतुक वाटते. जिथपर्यंत संकीर्ण सांप्रदायिक विचारसरणीचा प्रश्न आहे तर हा अभिशाप देशाला सुरूवातीपासूनच लागलेला असून, जातीय दंगलीमध्ये सरकारी मालमत्ता जाळून, झालेला विकास आपल्याच हाताने संपविण्यात जगात आपला कोणी हात धरू शकणार नाही. अगदी अलिकडे अग्नीवीर योजनेच्या विरोधात तरूणांनी जाळपोळ करून देशाच्या संपत्तीची जी हानी केेलेली आहे ती पाहता आपल्याला बाहेरच्या शत्रूची गरजच नाही असे कधी-कधी वाटून जाते. 

जातीयवादी विचारसरणीमुळे मुस्लिम, दलित, ओबीसी आणि आदिवासी समाजाच्या शक्तीला प्रत्येक क्षेत्रात डावलून उच्चवर्णीयांना मग ते पात्र असोत का नसोत संधी देण्याची जातीयवादी विचारसरणी जोपसर्यंत कमी होणार नाही आणि योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीची निवड त्याच्या जातीधर्माकडे पाहता पात्रतेनुसार केली जाणार नाही तोपर्यंत देश महाशक्ती होणार नाही. विशेषतः मुस्लिम समाजाने आपण या देशाचे अविभाज्य घटक आहोत याची जाणीव उराशी बाळगलेली आहे. त्यात अधिक प्रगल्भता आणून ज्या ठिकाणी आणि ज्या क्षेत्रात भविष्यात त्यांना संधी मिळेल त्या ठिकाणी जीव ओतून स्वबळावर देशाच्या बांधणीमध्ये आपला वाटा उचलावा व आपण या देशाची जबाबदारी नाही तर भांडवल आहोत हे सिद्ध करून दाखवावे, हाच संदेश यानिमित्ताने देतो. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा. 

- एम. आय. शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget