Halloween Costume ideas 2015

अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(८२) खरे पाहता शांती तर त्यांच्यासाठी आहे आणि सन्मार्गावर तेच आहेत ज्यांनी श्रद्धा ठेवली आणि ज्यांनी आपल्या श्रद्धेला अन्यायाशी जोडले नाही.’’५५
(८३) हे होते आमचे ते बोधप्रमाण जे आम्ही इब्राहीम (अ.) ला त्याच्या लोकांविरूद्ध प्रदान केले. आम्ही ज्याला इच्छितो त्याला उच्च मान मरातब बहाल करतो. सत्य असे आहे की तुमचा पालनकर्ता अत्यंत बुद्धिमान व ज्ञानी आहे.
(८४) मग आम्ही इब्राहीम (अ.) ला, इसहाक (अ.) व याकूब (अ.) प्रमाणेच संतती दिली व प्रत्येकाला सन्मार्ग दाखविला (तोच सन्मार्ग जो) त्याच्याअगोदर नूह (अ.) ला दाखविला होता. आणि त्याच्याच वंशात आम्ही दाऊद (अ.), सुलैमान (अ.), अय्यूब (अ.), यूसुफ (अ.), मूसा (अ.) आणि हारून (अ.) यांना (सन्मार्ग दाखविला). अशाप्रकारे आम्ही सदाचारी  लोकांना त्यांच्या पुण्याईचे फळ देतो.
(८५) (त्यांच्याच संततीत) जकरिया (अ.), यहया (अ.), इसा (अ.) आणि इलियास (अ.) यांना (मार्गस्थ केले). त्यांच्यापैकी प्रत्येकजण सदाचारी होता.
(८६) (त्यांच्याच वंशातून) इस्माईल (अ.), यसअ (अ.) आणि यूनुस (अ.) आणि लूत (अ.) यांना (मार्ग दाखविला). यांच्यापैकी प्रत्येकाला सर्व जगवासियांवर आम्ही श्रेष्ठत्व प्रदान केले. (८७) त्याचप्रमाणे त्यांचे वाड-वडील व त्यांची संतती व त्यांच्या भाऊबंदापैकी बहुतेकांना आम्ही उपकृत केले. त्यांना आमच्या सेवेसाठी निवडले आणि सरळमार्गाकडे त्यांचे मार्गदर्शन केले!
(८८) हे अल्लाहचे मार्गदर्शन आहे ज्याच्याद्वारे तो आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो त्याला मार्गदर्शन करतो. परंतु जर एखाद्या वेळी त्या लोकांनी अनेकेश्वरत्व स्वीकारले असते तर त्यांचे सर्व कर्मकृत्य नष्ट झाले असते.५६
(८९) ते लोक होते ज्यांना आम्ही ग्रंथ, अधिकार आणि पैगंबरत्व प्रदान केले होते.५७ आता जर हे लोक हे मान्य करण्यास नकार देत असतील तर (पर्वा नाही). आम्ही काही अन्य लोकांना हा कृपाप्रसाद सुपूर्द केला आहे जे त्याला नाकारीत नाहीत.५८
(९०) हे पैगंबर (स.)! अल्लाहकडून मार्गदर्शन प्राप्त झालेले तेच लोक होते, त्यांच्याच मार्गावर तुम्ही चला आणि सांगून टाका की मी (या प्रचार व मार्गदर्शनाच्या) कामासाठी तुमच्याकडून कोणत्याही मोबदल्याचा इच्छुक नाही, हा तर सार्वजनिक उपदेश आहे तमाम जगवासियांसाठी.




५४)    मूळ शब्द `तजक्कुर' प्रयुक्त झाला आहे. याचा अर्थ एक व्यक्ती गफलतीत आणि विसरभोळेपणात पडलेली आहे, तो अचानक  अचंबीतपणे त्या गोष्टीची आठवण करतो ज्याविषयी तो आजतागायत अज्ञानी होता. म्हणूनच आम्ही ``अ-फ़-लात-त जक्करून''चा हा अनुवाद केला आहे. आदरणीय इब्राहीम (अ.) यांच्या कथनाचा अर्थ हा होता, ``तुम्ही जे करता त्यापासून तुमचा खरा पालनकर्ता बेखबर नाही. त्याचे ज्ञान साऱ्या सृष्टीवर फैलावलेले आहे. मग काय या वास्तविकतेला जाणूनसुद्धा तुम्ही सावध होणार नाही?''
५५)    हे पूर्ण व्याख्यान या गोष्टीची ग्वाही देते की तो लोकसमुदाय जमीन व आकाशांच्या निर्माणकत्र्या अल्लाहला अमान्य करत नव्हता तर त्यांचा खरा अपराध अल्लाहसोबत इतरांना ईशगुणात आणि ईशअधिकारात सामील करणे होता. एकीकडे आदरणीय इब्राहीम (अ.) स्वत: सांगतात की तुम्ही अल्लाहसोबत इतरांना भागीदार ठरवित आहात. तर दुसरीकडे लोकांना संबोधन करून अल्लाहचे वर्णन करतात. परंतु ही वर्णनशैली त्याच लोकांविरोधात असू शकते जे अल्लाहच्या अस्तिवाला नाकारत नसावेत. म्हणून त्या भाष्यकारांचे मत योग्य वाटत नाही ज्यांनी त्या ठिकाणी इब्राहीम (अ.) यांच्याविषयी आणि दुसऱ्या ठिकाणी कुरआनच्या वर्णनाचा तपशील त्या काल्पनिकतेवर केला की इब्राहीम (अ.) यांचे राष्ट्र अल्लाहला मानत नव्हते किंवा ते त्यापासून (अल्लाहपासून) अपरिचित होते. आणि फक्त आपल्या कृत्रिम व बनावटी ईश्वरांनांच पूर्णत: सृष्टीचे स्वामी समजून होते. शेवटच्या आयतमध्ये ``ज्यांनी आपल्या ईमान व अन्यायाची मिसळ केली नाही'' (आपल्या श्रद्धेला अत्याचाराशी जोडले नाही.) त्यातील शब्द `अन्यायाचा' (अत्याचार) अर्थ काही सहाबांना असा भ्रम झाला की याने अभिप्रेत `अवज्ञा' आहे. परंतु पैगंबर मुहम्मद (स.) यांनी अन्यायाचा अर्थ शिर्क (अनेकेश्वरत्व) असा सांगितला. म्हणून त्या आयतचा अर्थ म्हणजे ``ज्यांनी अल्लाहला मानले आणि आपल्या त्या मानण्यास एखाद्या अनेकेश्वरत्व धारणेशी आणि कर्माशी जोडले नाही. शांती याच लोकांसाठी आहे आणि हेच सरळमार्गावर आहेत.''
५६)    म्हणजे ज्या अनेकेश्वरत्वात तुम्ही पडलेले आहात, त्यात इब्राहीम (अ.) अडकले असते तर हा दर्जा (पद) त्यांना मिळालाच नसता. शक्य आहे एखाद्या मनुष्याने दरोडा टाकून विजयीरूपात जगात प्रसिद्धी मिळवावी किंवा संपत्तीच्या हव्यासापोटी अतिश्रीमंत होऊन कारूनसारखे बनावे. तसेच जगातल्या सर्व दुराचाऱ्यांपैकी मोठा दुराचारी बनावे. इब्राहीम (अ.) अनेकेश्वरत्वापासून दूर राहून विशुद्ध ईशदासत्वाच्या मार्गावर अटळ राहिले नसते आणि ते अनेकेश्वरत्व आणि विशुद्ध ईशदासतेच्या मार्गावर दृढ नसते तर मार्गदर्शनांचे नेतृत्व आणि श्रद्धावंतांचा नेता म्हणून महान श्रेय, तसेच सदाचाराचा आणि कल्याणाचा स्त्रोत बनण्याची प्रतिष्ठा कधीही प्राप्त् करू शकले नसते.
५७)    येथे पैगंबरांना तीन गोष्टी प्रदान करण्याचा उल्लेख आला आहे. १) ग्रंथ म्हणजेच अल्लाहचे मार्गदर्शन. २) हुकूम, म्हणजेच त्या मार्गदर्शनाचा सत्यार्थ समजण्याची योग्यता आणि अल्लाहच्या नियमांना जीवनव्यवहारात पूर्णत: लागू करण्याची क्षमता. तसेच जीवनसमस्यांत निर्णायक मत निश्चित करण्याची अल्लाहने दिलेली योग्यता. ३) पैगंबरत्व म्हणजे ते पद ज्याच्या सहाय्याने अल्लाहच्या मार्गदर्शनानुसार अल्लाहच्या दासांना मार्गदर्शन करावे.
५८)    म्हणजे हे नकार देणारे आणि अनेकेश्वरवादी लोक अल्लाहच्या या मार्गदर्शनाचा स्वीकार करण्यास नकार देतात तर करू देत. आम्ही ईमानधारकांचा (श्रद्धावंतांचा) लोकांमधील एक असा गट निर्माण केला आहे जो या देणगीची कदर करणारा आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget