Halloween Costume ideas 2015

मन करा रे प्रसन्न - - -

रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अनेकानेक चांगले वाईट प्रसंग घडत असतात. चांगल्या प्रसंगांमुळे आपण आनंदित होणे जसे स्वाभाविक म्हणावे लागेल, तसेच वाईट प्रसंगांमुळे आपल्याला नैराश्य येणेही स्वाभाविकच म्हणावे लागेल. आपल्या या आनंदित मनःस्थितीचे, निराश मनःस्थितीचे चांगले वाईट परिणाम फक्त आपल्यावरच होत नसतात तर ते आपल्या कुटुंबियांवर, आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांवर म्हणजेच एकंदरीत सर्व समाजावरच होत असतात. माणूस आनंदित असला की त्याची शारीरिक, मानसिक तसेच बौद्धिक क्षमता वाढते आणि तो नैराश्याने घेरलेला असला की त्याच्या या सर्व क्षमतांवर विपरीत परिणाम होतो हे आता तर मानसशास्त्रीय प्रयोगांनीसुद्धा सिद्ध झालेले आहे. म्हणूनच प्रत्येक माणूस जर प्रसन्न मनाने वावरू लागला तर त्याच्या वाढलेल्या कार्यक्षमतेचा त्याला, समाजाला आणि पर्यायाने संपूर्ण देशाला किती फायदा होईल याचा एकदा गांभीर्याने अभ्यास व विचार झाला पाहिजे.
असे असले तरी समाजातला प्रत्येक माणूस प्रसन्न कसा राहू शकतो? त्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा प्रत्येकाने स्वतःपासूनच सुरुवात केली तर? अशी स्वतःपासूनच सुरुवात करण्यासाठी आम्हांला थोडा आमच्या बुद्धीचा वापर करावा लागेल आणि थोडा संत वचनांचा आधार घ्यावा लागेल.आपण आयुष्यात कोणतंही काम हे आपलं आयुष्य सुखात जावं निदान सुसह्य तरी व्हावं म्हणूनच करीत असतो, मग ती नोकरी असो, व्यवसाय असो की लग्न असो! असे असले तरी अनेकदा आपली काही एक चूक नसतांना (असे प्रत्येकालाच वाटत असते!) माणसं आपल्याशी चुकीचं वागतात आणि आपल्याला मनःस्ताप सहन करावाच लागतो. असं बऱ्याचदा होतं. रस्त्याने जातांना कधीतरी आपल्या पायात काटा मोडत नाही का, अगदी आपल्या पायात चप्पल असली तरी? त्या वेळी आपण काय करतो? अलगदपणे काटा बाजूला काढून आपल्या कामाला लागतो की, त्या काट्यावर संतापून, त्याचा राग आपल्या कुटुंबातील माणसांवर, आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांवर काढून वातावरण बिघडवून टाकतो? मग निष्कारण आपल्याला मनःस्ताप देणाऱ्या माणसांना असेच काट्यासारखं बाजूला काढून टाकलं तर आयुष्यातले अर्धेअधिक मनस्ताप टळू शकतात. असे असले तरी मनःस्ताप देणाऱ्या काही गोष्टी, काही प्रसंग कोणालाच टाळता येत नाहीत. आपल्या वैयक्तिक आयुष्यात आपण कितीही शिस्तबद्ध असलो, निर्व्यसनी असलो तरी या धावपळीच्या जीवनात काही आजारांना तोंड द्यावेच लागते. आपला स्वभाव, आपले वागणे कितीही चांगले असले तरीही निष्कारण मनःस्ताप देणारी काही माणसं आपल्या आयुष्यात येतातच. ते सहजपणे दुर्लक्षित करणेच शहाणपणाचे असते. राष्ट्रीय महामार्गावरून भरमसाठ टोल देऊन वाहन चालवितांनाही काही खड्डे, चुकीच्या पद्धतीने बनविलेले गतिरोधक लागतातच ना? तसलाच हा न टाळता येणारा प्रकार असतो.
आपल्या आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगी, कटू प्रसंगी तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांच्यासारखे महान संत तर अवघ्या मानव जातीचे कल्याण करणारे आईन्स्टाईन, ग्यालिलीओ यांच्यासारखे शास्त्रज्ञ, सॉक्रेटिससारखे तत्त्वज्ञ यांना आयुष्यात किती अपमान, किती त्रास सहन करावा लागला, याचा थोडा विचार करावा म्हणजे मग किरकोळ गोष्टींचा मनःस्ताप होत नाही. आता काही गोष्टी जसे की, आजारपण, नोकरी -धंद्यातले त्रास, भाऊबंधकीतले वाद, सतत येणारे अपयश हे सर्व माझ्याच वाट्याला का येते असा प्रश्न पडल्यास, त्याचे उत्तर, 'जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर.' हे आहे, हे लक्षात असू द्यावे. आपलीच कर्मे भोग बनून (चांगले किंवा वाईट सुद्धा!) आपल्या समोर येतात आणि ती आपल्याला भोगावीच लागतात, हे मान्य करावे, म्हणजे सर्व सहन करण्याची ताकद येते. शुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून, 'पेरावे तेच उगवते.' हे मान्य करून समोर आलेल्या प्रसंगाला, माणसांना तोंड द्यायलाच हवे. थोडक्यात, कोणत्याही दृष्टीने विचार केला तरी आपल्या आजच्या परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत हे मान्य करावेच लागेल. असे जर आहे तर निष्कारण मनःस्ताप करून घेण्यापेक्षा दररोज सकाळी प्रसन्न मनाने जागे होऊन, प्रसन्न मनानेच दिवस घालवणे कधीही चांगलेच. प्रसन्न मनाने रोजची कामे केली तर त्याचा आपल्या शरीरावर, आरोग्यावर नक्कीच सकारात्मक परिणाम होतो, हे मानसशास्त्रीय परीक्षणातूनही सिद्ध झालेले आहे. आपण सकारात्मक राहिलो तर सर्व सकारात्मक गोष्टी आपल्याकडे आकर्षित होऊ लागतात आणि आपले संपूर्ण जीवनच सकारात्मकतेने भरून जाते, म्हणून तर तुकाराम महाराजांनी म्हटले आहे की,
'मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण.'

- मुकुंद परदेशी, धुळे
मुक्त लेखक,
१९/दत्त कॉलनी,
विद्यानगरी, देवपूर,
धुळे ४२४००५
भ्रमणध्वनी क्र. ७८७५०७७७२८

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget