Halloween Costume ideas 2015

सरकारला क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर नको

भारत देश हा एक प्राचीन देश असून या देशावर परकिय शत्रूंनी मोठी आक्रमणे करून येथील निसर्ग संपदा, अमूल्य संपत्ती लुटली आहे. आपआपसातील मतभेद, द्वेष, कुटुनिती, फुटीरवृत्ती, अज्ञान, अंधश्रद्धा, आक्रमकधर्मवाद, समाजातील विषमता वंशवाद, प्रांतवाद, भाषावाद, आणि अतिस्वार्थ, देशाविषयी प्रेम नसणे, संरक्षण यंत्रणेकडे दूर्लक्ष, कमीदर्जाचे सैनिकी प्रशिक्षण, सैनिकांची उदासीनता, अयोग्य व कुचकामी युद्धनिती, प्रगतशस्त्राचा अभाव, राजेशाही, कर्तबगार व शुरविर राजाचा अभाव, कुटनितीचा अभाव, शस्त्रप्रबळ व बुद्धस्थितीचा सखोल आढावा व सुसज्ज तयारी, योग्य निर्णय क्षमता यामुळे परकिय शत्रूंनी भारतीयांच्या अकार्यक्षमतेचा पूरेपूर फायदा घेवून भारतातील निष्क्रीय, विलासी, अतिस्वार्थी, राजांना पराभूत केले. काही परकिय शत्रूचा उद्देश भारतातील अमाप संपत्तीची लूट करणे हा होता तर काही परकियांनी येथे आपली सत्ता प्रस्थापित करून राजकीय यंत्रणा स्थापन केली. मुख्यत्वे मूघल राजवटीतील राजांनी भारतावर सत्ता प्रस्थापित केली. कालांतराने मुघलांचा शेवटचा बादशहा बाहदूर शहा जफर याला इंग्रजांनी कैद करून दिल्ली काबीज केली. ज्याचे शस्त्र प्रबळ तसेच युद्धनिती, लढण्याची क्षमता व आत्मविश्वास, सैनिकी क्षमता, शस्त्राताचा मोठा साठा, कुशल सैनिक, तत्कालीन लालची भारतीय राजाची सत्तेसाठी फितूरी याचा वापर करून इंग्रजांनी भारतावर सत्ता प्रस्थापित केली. सुमारे १५० वर्षे इंग्रजांनी भारत देशावर सत्ता गाजवली. त्यामध्ये काही भारतीय राजांनी इंग्रजांचे मांडलिकत्व स्विकारून इंग्रजापुढे शरणांगती पत्करली. तर काहींना इंग्रजांनी पराभूत करून त्याचा प्रदेश हस्तगत केला. अशा स्थितीत भारतीय जनता ही मोठ्या गुलामगिरीत अडकली होती. भारतीय जनता ही पारतंत्र्यात आपले जीवन जगत होती त्यात इंग्रजांची सत्ता अधिक मजबूत होवून भारतीयांवर अन्याय अत्याचार, करत होती. मोठ्या प्रमाणावर जुलमी राजवट प्रस्थापित झाली होती. त्यांना प्रजेविषयी कोणतीही आस्था नव्हती कारण भारतीय नागरीकांमधील अज्ञान, अंधश्रद्धा, लाचारी, फुटीरवृत्ती, अनिष्ठप्रथा, कालबाह्य पंरपरा, चालिरीती यामुळे भारतीय जनतेतील स्वाभिमान नष्ट झाला होता व त्याचबरोबर इंग्रजांचे अन्याय अत्याचार भारतीयांवर अधिकाधिक वाढत होते. अशास्थितीत इंग्रजीसत्ता उलथून टाकण्याच्या उद्देशाने क्रांतीकारकांनी इंग्रज विरुद्ध मोठा लढा दिला. ब्रिटीशांमध्ये एक प्रकारची दशहत निर्माण करण्याचे कार्य क्रांतीकारकांनी केले. त्यासाठी प्रसंगी काहींना त्यांच्या प्राणाची आहूती द्यावी लागली. त्यांनी अत्यंत निर्भिडपणे त्यागी वृत्तीने, शौर्याने इंग्रजांशी झुंज दिली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तत्कालीन वृत्तपत्रांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात जनजागृती केली.  राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रभक्ती यासाठी भारतीय नागरिकांमध्ये संघटीत भावना जागविण्याचे काम वृत्तपत्रांनी केले. शिवाय क्रांतीकारक विचारांची पेरणीसुद्धा केली. त्यातून प्रांत, जाती, धर्म, वंश यांचा विचार न करता हजारो लाखो युवक राष्ट्रासाठी एकत्र आले आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करण्यासाठी पुढे आले. अर्थात राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम जागृत करण्यात भारतीय वृत्तपत्रांनी मोठे योगदान दिले. विचारातून क्रांती निर्माण करून राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारी वृत्तपत्रे व त्यांचा वाढता वाचकवर्ग पाहून ब्रिटीशांनी अनेक वृत्तपत्रांवर बंदी घालण्यास सुरुवात केली. पण त्याचा परिणाम अधिककाधिक सकारात्मक होवून अनेक भारतीय युवक या क्रांतीकारी चळवळीत सहभागी झाले. छातीवर बंदूकीच्या गोळ्या झेलून इंग्रजांना भारतीयांनी आपले शूरत्व दाखवून दिले. राष्ट्रासाठी प्राण हातावर घेवून स्वातंत्र्य चळवळी अग्रभागी असणाऱ्या युवकांनी ब्रिटीशांना सळो की पळो करून सोडले. देशासाठी बलिदान देणारे कोवळे तरुण युवक पाहून ब्रिटीशांनाही नवल वाटले. त्यातूनच अनेक स्वातंत्र्यसैनिक स्वत:च्या घरावर तुळशीपत्रक ठेवून स्वातंत्र्याच्या होमकुंंडात आहुती द्यायला पुढे सरसावले. मात्र अलिकडे याच क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर पडत असून राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रभक्ती व उच्च मुल्यांचा मोठ्या प्रमाणात -हास होताना दिसतो आहे. ही बाब खचितच राष्ट्रासाठी योग्य नाही. राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रप्रेम पुन्हा एकदा चेतवण्यासाठी अशा क्रांतीकारी हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण होणे अगत्याचे आहे. शासनाने त्यादृष्टीने सकारात्मक पावले उचलून राष्ट्रभक्ती वाढविण्यासाठी प्रतीवर्षी ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त  विविध उपक्रम आयोजित करून क्रांतीकारकांच्या त्यागाची व शौर्याची माहिती नव्या पिढीला करून दिली पाहिजे.याकरिता माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावतीने प्रसार माध्यमांना क्रांती दिनानिमित्त विशेषांक प्रकाशित करण्यासाठी अर्थ सहाय्य केले जावे, जेणेकरून स्वातंत्र्याच्या होमकुंडात आहूती दिलेल्या क्रांतीकारक आणि तत्कालीन वृत्तपत्र संपादकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाईल.

- सुनीलकुमार सरनाईक
भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच दर्पण पत्रकार पुरस्कारने सन्मानित असून पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget