Halloween Costume ideas 2015

मुखवटे

गावातल्या जत्रेत मुलांची पाळण्यात बसणे, छोट्या आगगाडीत बसणे, जादूचे प्रयोग बघणे यासाठी जशी लगबग सुरू असते, तशीच लगबग काही गोष्टींच्या खरेदीसाठीही सुरू असते. अशा खरेदीत प्रत्येक मुलाची आवडनिवड वेगवेगळी असू शकते; पण मुखवटा मात्र प्रत्येकालाच हवा असतो. वानराचा, राक्षसाचा, विदूषकाचा असे अनेक प्रकारचे मुखवटे मुलांना आकर्षित करीत असतात. आपला खरा चेहरा लपवून, थोडा वेळ का होईना, पण गम्मत म्हणून दुसरा चेहरा लावून मुलांना होणारा आनंद बघण्यासारखा असतो.
हा झाला छोट्या मुलांच्या मुखवट्यांचा विषय. त्यांचे मुखवटे हे त्यांच्यासारखेच निरागस असतात, मनोरंजनासाठी असतात; पण मोठ्या माणसांच्या मुखवट्यांचे काय? मोठया माणसांना तर समाजात वावरताना अनेकानेक मुखवटे धारण करावे लागतात. दिवसभरात माणूस इतके मुखवटे बदलतो की कधी कधी तर तो स्वतःचा मूळ चेहराच विसरून जातो! सुरुवातीला वारंवार असे मुखवटे बदलणे थोडे अवघड वाटते, पण रोजच्या सरावाने माणूस या कलेत असा काही पारंगत होतो की जणू काही पाण्यात पोहणारा मासाच! अशा वारंवार मुखवटे बदलणाऱ्या माणसांचा वेध घेणेही मनोरंजक ठरावे.
सकाळी माणूस झोपेतून उठतो तो आपल्या मूळ चेहऱ्यानेच, मात्र कामासाठी बाहेर जातांना मूळ चेहरा आपोआपच झाकला जातो आणि आपल्या नोकरी-व्यवसायाला साजेसा मुखवटा नकळतपणे चढवला जातो. या मुखवट्यावर मग्रुरी, लाचारी, समाधान यापैकी कोणता भाव असेल हे कामाच्या ठिकाणी माणूस कोणत्या हुद्द्यावर आहे यावर ठरत असते. एखादा फार मोठ्या हुद्द्यावर असलेला 'बॉस' अगदी कपड्यांच्या इस्त्रीपेक्षाही जास्त कडक इस्त्रीचा मुखवटा धारण करून कामावर जात असतांना अचानक मागून, 'ये पक्या!' अशी बालमित्राची हाक कानावर पडताक्षणी तो कडक इस्त्रीचा मुखवटा क्षणार्धात गळून पडतो आणि समोर येतो तो बालपणीचा निरागस चेहरा! मग आपले वय, पद सर्व विसरून कोपऱ्यावरच्या हॉटेलमध्ये मस्तपैकी पाव-मिसळ, चहा हादडला जातो. हा कार्यक्रम सुरू असतांना जर कार्यालयातला एखादा कर्मचारी अचानक समोर आला तर क्षणार्धात परत तोच कडक इस्त्रीचा मुखवटा चेहऱ्यावर चढतो! तो कर्मचारी नजरेआड झाला की परत आपला मूळ चेहरा! कार्यालयात पोहचल्यावर खुर्चीवर बसताक्षणी एक रुबाबदार, बेदरकारपणाचा भाव असलेला मुखवटा चेहेऱ्यावर चढलेला असतो. हाताखालच्या कर्मचाऱ्यांनी व कामासाठी आलेल्या लोकांनी वचकून असावे म्हणून धारण केलेला हा मुखवटा, 'मोठ्या साहेबांनी तुम्हाला बोलावलं आहे.' अशी वर्दी शिपायाने दिली की आपोआपच वितळू लागतो. मोठया साहेबांच्या केबिनमध्ये घुसेपर्यंत चेहऱ्यावर लाचारी आणि निरागसता यांचे मिश्रण असलेला मुखवटा चेहऱ्यावर चढलेला असतो! कार्यालयात तुमचा हुद्दा काय आहे यावरूनसुद्धा तुम्हाला कोणता मुखवटा धारण करावा लागेल हे ठरत असते. तुम्ही जर मोठे साहेब असाल तर मग्रुरी आणि बेदरकरपणा यांचे मिश्रण असलेला मुखवटा कायमस्वरूपी घालता येतो. तुम्ही जर दोन नंबरचे साहेब असाल तर मात्र दोन वेगवेगळे मुखवटे लागतील. हाताखालच्या कर्मचाऱ्यांसमोर मग्रुरी आणि बेदरकारपणा यांचे मिश्रण असलेला तर मोठ्या साहेबांसमोर जाण्यासाठी निरागसता आणि लाचारीचे मिश्रण असलेला मुखवटा घालावा लागतो. तुम्ही जर कारकून असाल तर थोडी बेदरकारी आणि थोडी नम्रता यांचे मिश्रण असलेला मुखवटा, पण कारकून असाल आणि सर्वसामान्य लोकांशी जर तुमचा संबंध येत असेल तर मात्र कायमस्वरूपी बेदरकारपणाचे भाव असलेला मुखवटा घालावा लागतो. अर्थात साहेबांसमोर जातांना तो बदलावाच लागतो!
उद्योग व्यवसाय करणाऱ्यांचेही तसेच. नोकरांशी वागतांनाचा मुखवटा गिऱ्हाईक किंवा घेणेकरी समोर आला की ताबडतोब बदलला जातो. घरात बायकापोरांसमोर वेगळा तर पाहुण्यांसमोर वेगळाच! आपल्या मुलीला बघायला येतात तेव्हा एक, तर आपण आपल्या मुलासाठी मुलगी बघायला जातो तेव्हा दुसराच मुखवटा धारण करावा लागतो. या सर्वांपेक्षाही जास्त मुखवटे बदलावे लागतात ते मुलींना आणि स्त्रियांना. शाळा, कॉलेजमध्ये, नोकरीच्या ठिकाणी थोडा करारी भाव असलेला मुखवटा लागतो. (आजूबाजूला वावरणाऱ्या द्विपाद श्वापदांपासून रक्षणासाठी तो मुखवटा फार उपयोगी पडतो.). लग्नानंतर सासु-सासऱ्यांसमोर आज्ञाधारक भाव असलेला, नवऱ्यासमोर प्रेमळ भाव असलेला तर माहेरी आल्यानंतर सासरचे दुःख, त्रास लपवणारा आनंदी, समाधानी भाव असणारा मुखवटा लीलया धारण करण्याची कला फक्त स्त्रियांनाच अवगत असते!
अनेक राजकारण्यांनी निवडणुकीसाठी आश्वासन देताना धारण केलेले लोकसेवकांचे मुखवटे निवडणूक निकालानंतर गळून पडतात. निवडून आलेले पुढील पाच वर्षे मग्रुरी, बेदरकारपणा यांचे मिश्रण असलेला आपला मूळ चेहरा घेऊन लोकशासक म्हणून वावरतात, तर पडलेले मात्र परत लोकसेवकाचा मुखवटा घालून पुढच्या निवडणुकीची वाट पाहतात! आपण मात्र आनंद आणि समाधानी भाव असलेला मुखवटा घालून जिंकलेल्यांचे सत्कार समारंभ घडवून आणायचे. लोकशाहीचा मुखवटा घालून फिरणाऱ्या हुकूमशाहीलाच लोकशाही समजून तिचे गुणगान करायचे.
जाता जाता - हल्ली जो तो पत्रकारांसमोर अश्रू ढाळतोय. जनतेला बावळट समजणाऱ्या अशा बावळटांसाठी या चार ओळी….
आता सगळीच मनं, डोळे
इतके आटलेत
म्हणून तर, अश्रूंचे मुखवटे
आम्ही बनवलेत.
घेता का घेता?
पाहिजे तो मिळेल
प्रसंगानुरूप, हवे तेवढेच,
अश्रू तो ढाळेल. -कवी सुधीर

मुकुंद परदेशी,
मुक्त लेखक,
भ्रमणध्वनी क्र.७८७५०७७७२८

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget