Halloween Costume ideas 2015

संवाद मुलाखतीपूर्वीचा

उधोजी राजे आपल्या महालात भिंतीवरील  घड्याळीकडे पाहत अस्वस्थपणे येरझाऱ्या घालीत आहेत. थोडा थकवा आला की मध्येच व्याघ्रासनावर बसून थोडी विश्रांती घेत आहेत. जरा वेळाने दारावरचा रोबोट येऊन दै. हमरीतुमरीचे संपादक  भेटायला आल्याची वर्दी देतो. पाठोपाठ संपादक महालात प्रवेश करतात. प्रवेश करताच ते उधोजीराजेंना कमरेत वाकून मुजरा करतात.
उ.रा. - (वैतागून दरडावत) एवढे लाचारासारखे काय वाकतायं आमच्या समोर? आम्ही काय राज्यपाल आहोत की काय?
संपादक - (मनातल्या मनात) सालं त्या बारामतीकरांसमोर तोंडातून शब्द फुटत नाही आणि आमच्यावर मात्र खेकसणार! (उघडपणे) त्यांच्या समोर नाईलाजाने वाकावं लागतं. आपल्या समोर कोणीही आदराने वाकतो. आपण देशातले सर्वोत्कृ ष्ट  मुख्यमंत्री आहात! ते कुठे सर्वोत्कृ ष्ट राज्यपाल आहेत? उधोजी राजे खांदे उडवत हसतात.
संपादक - (आश्चर्याने) आणि हे काय राजे, दारावरचा सेवक कुठे गेला? आणि हा रोबोट कसा आला?
उ.रा.- (संपादकांकडे जळजळीत कटाक्ष टाकत) तुम्ही आमच्याकडे घोड्यावर बसून आलात की कारने?
संपादक - (गोंधळून) मला लक्षात आलं नाही राजे.
उ.रा. - (चिडून) तुम्ही त्या तुमच्या ‘ठोकाठोक’ सदरात काय लिहिता ते लोकांना कळत नाही आणि आम्ही काय बोलतो ते तुम्हाला कळत नाही. अहो, इतकी नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, तिचा वापर नको का करायला? अवश्य करायला हवा. का नको  करायला? आम्ही आता दारावरचा सेवक काढून तिथे रोबोट उभा केला आहे. हळूहळू सगळंच बदलून टाकणार आहोत आम्ही. 
संपादक - आपण खरंच ग्रेट आहात राजे.
उ.रा. - ते असू द्या, पण इतका उशीर कसा केला? त्या भिंतीवरच्या घड्याळीकडे बघून बघून मान दुखायला लागली आमची.
संपादक - राजे, आता भिंतीवरच्या घड्याळीकडे कशाला बघायचं? आता तर आपल्या हातावरच घड्याळ बांधलं गेलं आहे ना? आता त्याच्याकडेच पाहायचं. एकवेळ हाताकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल, पण घड्याळीच्या शिस्तीने वागायचं म्हणजे सगळं  कसं व्यवस्थित पार पडेल.
उ.रा. - पुरे, पुरे. आम्हांला अक्कल शिकवू नका. त्या आमच्या मुलाखतीचं काय करता ते सांगा आधी?
संपादक - पूर्ण तयारी झाली आहे. मी प्रश्नोत्तरे लिहूनसुद्धा आणली आहेत. आपण एकदा वाचून घ्या म्हणजे आपण सुरुवात करू.
संपादक खिशातून एक कागद काढून उधोजीराजेंना देतात. उधोजीराजे त्या कागदावर नजर फिरवत असतांना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलू लागतात.
उ.रा. - आता तुमच्या जागेवरसुद्धा एखादा रोबोटच बसवावा लागेल असं वाटायला लागलं आहे.
संपादक - (ओशाळून) काही चुकलं का माझं?
उ.रा. - नाही तुमचं कसं चुकणार? आमचंच चुकलं तुम्हाला मुलाखत तयार करायला सांगून. अहो, हे काय लिहून आणलं आहे? काय विचारणार आहात तुम्ही? राज्याच्या अर्थव्य वस्थेची स्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न, उद्योगक्षेत्राची परिस्थिती, छोट्या  व्यापाऱ्यांच्या अडचणी, बेरोजगारी, कोविडबाबतचे नियोजन? या सर्व प्रश्नांची उत्तरं हवी असतील ना तर त्या अजोय मेहतांची मुलाखत घ्या. मी काय सांगणार? सांगूच शकत नाही. किंबहुना मी तर म्हणीन की तुम्ही असलं काही मला  विचारायलाच  नको. हे सगळं तर रोज टीव्हीवर पाहतात ना लोक? आपणही परत तेच सांगायचं?
संपादक - (ओशाळून) खरंच चुकलं माझं. काय विचारू ते सांगाल का जरा?
उ.रा. - असं बघा, माझ्या अंगी किती गुण आहेत, माझा होमिओपॅथीचा किती अभ्यास आहे, मी किती नशीबवान आहे, मला भाषण देता येत नसलं तरी मी किती छान भाषण देतो आणि लोक टाळ्या वाजवतात, मी घरात बसून आधुनिक तंत्रज्ञानाचा  वापर करून कसा राज्यकारभार संभाळतोय, मी घरातच असतो तरी देशातला सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री झालोय, उद्या जर मी खरोखरच काम करायला लागलो तर कदाचित जगातलासुद्धा सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री बनेल! तीन महिन्यांनंतर मी पहिल्यांदाच केसं  कापलीत ना त्यामुळे समोरचे थोडे कमी झाल्यासारखे दिसतात. तीनचाकी रिक्षाचं स्टेअरिंग माझ्याच हातात आहे. अशा सर्व गोष्टी लोकांना नको का कळायला? कळायलाच हव्यात. किंबहुना त्यासाठीच तर आपल्याला मुलाखत घ्यायची आहे. उद्या या.  मी सर्व उत्तरं लिहून ठेवतो, मग तुम्ही प्रश्न तयार करून घ्या. समजलं? तसा माझ्यात भरपूर आत्मविश्वास आहे. तुम्ही ऐन वेळी काहीही विचारलं, माझ्यातल्या गुणांबद्दल तरी मी उत्तर देऊ शकतो.
संपादक - (मनातल्या मनात) तुमचा आत्मविश्वास तुमच्या चेहऱ्यावर आणि वागण्यात केव्हा दिसेल? 
उ.रा. - अरेच्चा, अजून ते एक राहिलंच की, मी कुठेही गेलो तरी माझ्या आई-वडिलांचा मुलगा म्हणून माझं स्वागतच होतं.
संपादक - (मनातल्या मनात) सांगे वडिलांची कीर्ती --- (उघडपणे) आलं लक्षात. येतो मी उद्या.
उ.रा. - (काहीतरी आठवून) अरे हो, आपल्या बारामतीकर साहेबांना विचारलं होतं का माझ्या मुलाखतीबद्दल?
संपादक - हो, ते म्हटले की, मुख्यमंत्र्यांची मुलाखत  तल्यामुळे जर करोना जाणार असेल तर घ्यायला
हरकत नाही.

-मकुंद परदेशी, मुक्त लेखक,
भ्रमणध्वनी क्र. ७८७५०७७७२८

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget