Halloween Costume ideas 2015

तरूणांनी स्व:चे नेतृत्व उभे करावे !

भारतीय समाज आज अनेक समस्यांनी ग्रस्त झालेला आहे. यात धर्मांधता, जातीयता तसेच वर्गसंघर्ष ह्या अत्यंत ज्वलंत समस्या आहेत. या दीर्घ लेखात मी देशाची वास्तविक परिस्थिती व लोकांच्या विचारात होणारा बदल मांडला आहे. ही वास्तविकता लोकांच्या लक्षात येऊन हे लोक तरी पण याकडे दुर्लक्ष का करतात? याची चिकित्सा मी या लेखातून करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या मुठभर धर्मांध लोक दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्याच्या या जातीय राजकारणामुळे समाजाला योग्य नेतृत्व मिळत नाही. त्यामुळे आपल्या परिसराचा विकास होत नाही. हा लेख युवकांना उद्देशून लिहिला असून आजची युवा पिढी या राजकारणाला बळी पडून स्व:ची अधोगती करीत आहे. देशातील वाढत चाललेली विषमता व बेरोजगारी व युवकांचा वाढत चाललेला जातीयतेकडील कल हा चिंतेचा विषय आहे. यामुळे आजचे युवक धूर्त राजकारण्यांच्या कारस्थानाला बळी पडत आहेत. यातून युवकांचे भविष्य काय असेल? यावर प्रकाश टाकण्याचा माझा प्रयत्न आहे.
    सदरील लेख माझे समाजाप्रती असणारे चिंतन आहे. हा लेख कोणत्याही विचारधारेचे व पक्षाचे समर्थन करीत नाही. हा लेख मानवतावादी दृष्टिकोनातून लिहिला आहे. या लेखाशी वाचकांनी सहमतच व्हावेच असा माझा आग्रह नाही. परंतु या लेखात मी समाजाचे वास्तव मांडलेले आहे व समाजाच्या अधोगतीची कारणमीमांसाही केलेली आहे. त्यामुळे वाचकांनी हा लेख वाचताना धर्म, पंथ, जात, पक्ष असे भेद दूर करून प्रथम  भारतीय सुजाण नागरिक व एक माणूस म्हणून वाचावा.मी समाजाला आर्थिक मदत करू शकत नाही परंतु एक पुरोगामी वैचारिक म्हणून आपल्या लेखणीतून समाज प्रबोधन नक्कीच करू शकेन.
    आज भारताची परिस्थिती खूपच चिंताजनक आहे. भारतीय समाज दारिद्र्यात खितपत पडलेला असून समाजाला याची जाणीव होत नाही ! धर्माच्या जातीच्या  नावाखाली राजकारणी  राजकारण करून आपले स्वार्थ साध्य करीत आहेत. आज फुटाफुटीचे राजकारण होत आहे फक्त सत्ता बदलत आहे पण माणसे तीच आहेत. यांचे समर्थक व अनुयायी होऊन आपण एकमेकांची डोकी फोडत आहोत. देशाची परिस्थिती व वास्तव जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करीत नाही व आपल्याला याची जाणीवच होऊ दिली जात नाही. युवक दिवसभर मोबाईल मध्ये दंग आहेत. खरे तर युवकांनी पुढे येऊन नेतृत्व केले पाहिजे.आपण  या राजकारण्यांच्या भूलथापांना बळी  पडून आपल्या पिढ्या बर्बाद करीत आहोत.
    बुद्धी व तर्कावर आधारित विचार अंगिकारण्याचा आपण प्रयत्न करत नाही. भारताला अनेक सुधारकांची व निस्वार्थी लोकांची व नेतृत्वाची परंपरा लाभली होती. त्यांच्या स्वप्नातील भारत जो की  धर्मनिरपेक्ष, सशक्त असेल त्यात भेदभाव नसेल समता ,बंधुता, न्याय, हे मूल्य  प्राणाहून प्रिय असतील. जेथे व्यक्तिला त्याच्या गुणाहून श्रेष्ठत्व प्रदान होईल ना की घराणेशाहीतून. जेथे नैतिक मूल्य जपने प्रत्येकाला आपले कर्तव्य व जबाबदारी वाटेल. परंतु आपल्या त्या सुधारकांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करीत नाही. समाजाला योग्य दिशा व नेतृत्व देणे ही बुद्धिजीवी वर्गाची जबाबदारी आहे. परंतु आजचा बुद्धिजीवी वर्ग समाजाला वेळच देत नाही, जे देतात ते आपलेच स्वार्थ बघून राजकारण्यांनाच मदत करतात, निस्वार्थी समाजसेवा करणारे आहेत पण मोजकेच. म्हणून नेतृत्व स्वार्थी व जातीयवादी नेत्यांकडे जाते. जे समाजाची प्रगती तर करीतच नाही उलट अधोगतीकडेच नेतात. आपल्या  अधोगतीला आपण जबाबदार असून, :स्वार्थ नेतृत्वाबाबत विचार केला जात नाही परिणामी हे स्वार्थी लोक आपलेे नेतृत्व करीत असतात. देशातील युवक मोठ्या प्रमाणात जातीय राजकारणाला बळी पडत आहे. भारतीय युवा पिढीला याची जाणीवच होत नसून केवळ कुण्या राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून आम्ही भगवा, हिरवा, निळा, पिवळा करीत स्व:ची अधोगती करून त्यांचा हेतू साध्य करीत आहोत. देशाच्या वास्तविक परिस्थितीची या पिढीला जाणीव होत नाही.
    आज भारतात कोरोनाने थैमान घातले असून सामान्य लोकांची जीवन जगण्याची, उत्पादनांची साधने, त्यांचे व्यवसाय बंद होत आहेत. अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली असून कामगारांचे भांडवल त्यांचे श्रम आहे. या श्रमावरच ते आपला उदर्निवाह करतात. कोरोनामुळे त्यांना काम मिळत नाही. एकेकाळी गतिमान असलेले उद्योग, व्यवसाय बंद पडले. त्यामुळे बेकारी वाढत आहे. हा कामगार आपला घरगाडा कसा चालवत असेल याची चिंता कोणालाच नाही.
    प्रारंभी अनेकांनी आपले दातृत्व दाखविले परंतु आता कोणी गरिबाला मदतीसाठी पुढे येत नाहीये. या महामारीच्या काळातही काही लोकांना राजकारण सुचते. यावरून राजकारण्यांची मानसिकता लोकांच्या लक्षात यायला हवी होती परंतु, ती लक्षात येत नाही, असे दिसते. सरकारच्या धोरणामुळे अनेक सार्वजनिक क्षेत्र हे खाजगी होत आहेत. ह्यातील मेख सामान्यजणांना माहीत नसेलही परंतु सुजान नागरिकांना व जे स्व:ला पुरोगामी म्हणून घेतात त्यांच्या तरी लक्षात येत असेल. परंतु हे लोक मूग गिळून गप्प आहेत कारण त्यात यांचे स्वार्थ लपलेले असतील कदाचित? देशाच्या सकल घरेलू उत्पादनाची घसरगुंडी सुरू असल्याने आर्थिक संकट येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. आर्थिक विकास मंदावल्यामुळे लोकांच्या जीवनमानात नकारार्थी बदल झालेला आहे. त्यांची इतकी भयानक स्थिती असताना अर्थव्यवस्थेला उभारी देण्याबद्दल कोणी बोलत नाही. मुख्यता प्रत्येकाचा महत्त्वाचा विषय अर्थशास्त्र असतो परंतु अर्थशास्त्र आज दुर्लक्षित होऊन धर्मशास्त्र महत्त्वपूर्ण आहे असे लोकांना वाटते की काय अशी परिस्थिती आहे.
    लोक कर्जबाजारी झाले आहेत. यासाठी सरकारचे निर्णय जबाबदार आहेत. असे असतानाही आमच्या मध्यमवर्गीय युवकाला बापाचे हाल दिसत नाहीत याचे नवल वाटते. आयुष्यभर खस्ता खाणारा बाप दिसत नाही, वृद्ध बाप कामावर जातो तर तरूण मुलगा नेत्यांच्या सभेला सतरंज्या उचलायला जातो. तो दिवसभर त्यांच्यामागे विनाकारण फिरून रिकाम्या हाती घरी येतो. तरूणांना धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या, रक्ताच्या संबंधावरून मानसिक गुलाम बनवले जात आहे. युवकांनी जागे झाले पाहिजे व कुटुंबाची जबाबदारी सांभाळली पाहिजे. राजकारण्यामागे जाण्या ऐवजी स्वच्छ मनाने राजकारणात येवून नेतृत्व करावे. देशाला युवकांच्या नेतृत्वाची गरज आहे.
    इतके होऊनही भारतीय लोकांना मंदिर, मस्जिद सारख्या मुद्यात गेल्या 71 वर्षांपासून बांधून ठेवले आहे. आपल्याला शिक्षण, आरोग्य, सशक्त प्रशासकीय व्यवस्था हवी वाटत नाही तर मंदिर-मस्जिदीच्या प्रश्‍नांमध्ये आपण आपी अस्मिता शोधतो. आपल्या धार्मिक वास्तू बांधणे अत्यंत महत्त्वाचे वाटते. दारिद्र्य, विषमता, भ्रष्टाचार कमी व्हावा व चांगल्या व्यक्तींना नेतृत्व द्यावे असे वाटत नाही. आपण लोकशाहीवादी आहोत परंतु देश संविधानावर चालतो याचा आपल्याला विसर पडलेला आहे. कायद्यामध्ये पळवाटा निर्माण करायचे काम ज्याप्रकारे येथील धूर्त राजकारणी करीत आहेत त्यावरून राज्य घटनेची बेअदबी होत आहे, याची त्यांना काळजी नाही, असे वाटते. प्रशासनात तर भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. लाखो रुपये महिन्याला कमवणारा अधिकारी गरीबांकडून शे-पाचशे रूपयांची लाच घेतांना लाजत नाही. हे समाजाच्या नैतिक अ:पतनाची ही सुरुवात आहे असे असतानाही आमचा बुद्धिजीवी समाज  गप्प आहे .
    राजकारण्यांचे हे सर्व डावपेच समजूनही जर ते  विकास करतील असे ज्याला वाटत असेल तर तो मुर्खपणा ठरेल. कोण जातीयवादी आहे? कोण किती विकास करतो? कोण स्वार्थी कोण निस्वार्थी? कोण कलंकित-कोण निष्कलंकित आहे? हे लोकांना माहिती नाही असे नाही, तरी पण आपण अशा भ्रष्टाचारी नेत्यांना का निवडून देतो याचा विचार व्हावा.हे असेच सुरू राहिले तर देशाचा विकास कसा होईल?
    पुन्हा-पुन्हा त्याच जातीयवाद्यांना निवडून देऊन आपण स्व: तर जातीयवादी होत आहोतच परंतु  हेच विचार आपल्या येणार्‍या पीढितही रुजवून त्यांनाही जातीवादी बनवत आहोत, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी.
    25- 30 वर्षाचे वय होऊनही अनेक युवकांना स्वयंरोजगाराची चिंता नाही. आमचे साहेब पडतात काय? याचीच चिंता अनेकांना आहे. साहेब निवडून आल्यावर जणूकाही यांना बोलावून रोजगार देतील एवढी काळजी आजचा तरूण वर्ग घेतो. नेत्याला काही नोकरी देण्यासाठी एकच कार्यकर्ता असतो काय? असले हजारो कार्यकर्ते असतात. या लोकांना हे सत्य समजत कसे नसेल याचे आश्‍चर्य वाटते.
- क्रमश:     (भाग -1 )

- नजीर महेबूब शेख
9561991736

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget