(१३८) सांगतात की ही जनावरे व ही शेते सुरक्षित आहेत, यांना फक्त तेच लोक खाऊ शकतात ज्यांना आम्ही खाऊ द्यावे. वस्तुत: हे निर्बंध त्यांचे स्वनिर्मित आहेत.१११ मग काही जनावरे आहेत ज्यांच्यावर स्वार होणे व ओझे लादणे निषिद्ध केले गेले आहे आणि काही जनावरे आहेत की ज्यांच्यावर हे अल्लाहचे नामोच्चारण करीत नाहीत११२ आणि हे सर्व काही त्यांनी अल्लाहवर मिथ्या रचले आहे.११३ लवकरच अल्लाह त्यांना यांच्या कुभांड रचण्याचा बदला देईल.
(१३९) आणि सांगतात की जे काही या जनावरांच्या पोटांत आहे हे पुरुषांकरिता वैध आहे आणि आमच्या स्त्रियांसाठी निषिद्ध आहे, परंतु जर ते मृत असेल तर ते खाण्यात दोघे सामील होऊ शकतात.११४ या गोष्टी ज्या त्यांनी रचल्या आहेत त्याचे फळ अल्लाह त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही, नि:संशय तो बुद्धिमान आहे व सर्व गोष्टींची त्याला खबर आहे.
(१४०) खचितच नुकसानीत आले ते लोक ज्यांनी आपल्या मुलांना अज्ञानाने व नादानपणे ठार केले आणि अल्लाहच्या दिलेल्या उपजीविकेला अल्लाहवर थोतांड रचून निषिद्ध मानले. निश्चितच ते मार्गभ्रष्ट झाले व कदापि ते सरळमार्ग प्राप्त करणाऱ्यांपैकी नव्हते.११५
(१४१) तो अल्लाहच आहे ज्याने तऱ्हेतऱ्हेच्या बागा व वेलीचे लता मंडपी११६ उद्यान व पाणथळी (ओयासिस) निर्माण केल्या....
१११) अरब लोकांचा नियम होता की काही जनावरांविषयी आणि शेतीच्या धान्य-उत्पादनासाठी नवस करीत की हे अमुक बाबासाठी, पीरासाठी आहे. तो चढावा (नैवेद्य) प्रत्येकजण खाऊ शकत नव्हता, परंतु त्यांच्या येथे यासाठी विशिष्ट नियम होते. त्यानुसार विशिष्ट लोकच खात असत. अल्लाहने त्यांच्या या कृतीला केवळ अनेकेश्वरवादीच ठरविले नसून याविषयी येथे सचेत करीत आहे की हे नियम त्यांचे स्वत:चीच कारस्थाने आहेत. अल्लाहने दिलेल्या उपजीविकेतून हे नवस करतात व चढावे दाखवितात, तसा आदेश तर अल्लाहने दिलेला नाही िंकवा त्यांच्या त्या खाण्याविषयी त्या मर्यादा निश्चित केल्या नाहीत. हे सर्व त्या विद्रोही दासांनी आपल्या अधिकारात स्वत: घडलेले आहे.
११२) कथनांवरून माहीत होते की अरब लोकांत काही विशिष्ट नवस आणि आहुतीसाठीची जनावरे अशी होती की ज्यांच्यावर अल्लाहचे नाव घेणे वैध समजले जात नसे, त्यांच्यावर स्वार होऊन हज करण्याची मनाई होती कारण हजच्यावेळी `लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक' (हजर आहे हे अल्लाह मी हजर आहे) म्हणावे लागत असे. याचप्रमाणे त्यांचे दूध काढताना, त्यांच्यावर स्वार होताना िंकवा त्यांना जुबह (कापणे) करताना तसेच त्यांना खाताना अल्लाहचे नाव घेतले जाणार नाही याची व्यवस्था केली जात असे.
११३) म्हणजे हे नियम अल्लाहने बनविलेले नाहीत, परंतु ते त्या नियमांचे पालन अल्लाहच्या नियमांसारखे करतात आणि त्याविषयी अल्लाहचा आदेश असल्याचे प्रमाण त्यांच्याकडे नाही. पूर्वजांपासून हे होत आलेले आहे हेच त्यांचे एकमेव प्रमाण!
११४) अरब लोकांत नवस आणि मन्नतच्या जनावरांविषयी स्वत: घडविलेल्या प्रथा होत्या. त्यात एक ही होती की त्या जनावरांपासून जी पिल्ले होतात त्यांचे मांस फक्त पुरुषच खाऊ शकतात, स्त्रियांसाठी ते वैध नाही.परंतु ते पिल्लू मेलेले जन्माला आले िंकवा मरून गेले तर स्त्री आणि पुरुष दोघेही त्याचे मांस खाऊ शकतात.
११५) म्हणजे ते लोक ज्यांनी या परंपरा व रूढी निर्माण केल्या होत्या ते तुमचे बाप-दादा होते, तुमचे धार्मिक गुरु होते तुमचे सरदार व नेता होते. परंतु सत्य हे सत्यच आहे. या चुकीच्या पद्धती तुमच्या पूर्वजांनी आणि वडीलधाऱ्यांनी निर्माण केलेल्या आहेत म्हणून चांगल्या आहेत असे मुळीच नाही. ज्या अत्याचारींनी संततीला ठार मारण्याची िंहसक परंपरा कायम केली, ज्यांनी अल्लाहच्या उपजीविकेला अनावश्यक हराम ठरविले, ज्यांनी धर्मात नवनवीन गोष्टी सामील केल्या आणि त्या गोष्टींना अल्लाहशी जोडले; तर असे लोक सफल आणि सन्मार्गी कसे असतील? मग ते तुमचे पूर्वज िंकवा वडीलधारी का असेनात! ते तर सर्व मार्गभ्रष्ट होते आणि त्याची शिक्षा त्यांना मिळणारच.
११६) म्हणजे ``जन्नातीम मअरूशातिन्व व गैरमअरूशातिन'' हा शब्दप्रयोग झाला आहे. याचा अर्थ दोन प्रकारच्या बागा आहेत. एक म्हणजे ज्यांची वेल लाकडांवर चढविली जाते आणि दुसरी बाग ज्यात झाडे स्वत:च्या खोडावर उभे राहिलेली आहेत. बाग म्हणजे सामान्यत: दुसऱ्या प्रकारची असते. म्हणून ``जन्नातिनगैरमअशुरातिन'' चा अनुवाद बाग केलेला आहे आणि ``जन्नातिन मआरूशातिन''साठी ``द्राक्षबाग'' हा शब्द प्रयुक्त केला आहे.
Post a Comment