राहत इंदौरी यांच्या शेवटच्या अपूर्ण गजलेचे जे चार शेर त्यांच्या मुलाने समाजमाध्यमांवर शेअर केलेले आहेत. ते खालीलप्रमाणे -
नये सफर का जो एलान भी नहीं होता
तो जिंदा रहने का अरमान भी नहीं होता
तमाम लोग वही फूल तोड लेेते हैं
जिनके कमरों में गुलदान भी नहीं होता
खामोशी ओढके सोयी हैं मस्जिदें सारी
किसी की मौत का एलान भी नहीं होता
वबा ने काश हमें भी बुला लिया होता
तो हम पर मौत का एहसान भी नहीं होता
ह.प्रेषित मुहम्मद सल्ल.म्हणतात, ”अल्लाह श्रद्धावंताच्या गुमान (अपेक्षे) प्रमाणे परिस्थिती निर्माण करतो.” येथेच पहा ना! या गझलेच्या शेवटच्या शेरमध्ये राहत यांनी ’वबा’ म्हणजे कोविड ने मृत्यूची अपेक्षा केली आणि 24 तासाच्या आत कोविडने त्यांचा जीव घेतला.
कोविड-19 ने जगात थैमान घातलेले असून, भारतासह जगात लाखो लोक यामुळे मृत्यू पावलेले आहेत. त्यात उलेमा, राजनेता, शायर, खेळाडू, मुले, स्त्रिया, पुरूषापासून ते या रोगाशी झूंज देणारे अनेक तरूण डॉक्टर्स सुद्धा सामील आहेत. एका अंदाजाप्रमाणे देशात 100 पेक्षा जास्त डॉक्टरांचा या जीवघेण्या साथीने बळी घेतलेला आहे. आज देशात 27 लाखापेक्षा जास्त कोविडचे रूग्ण असून, त्यात देशाचे गृहमंत्री अमित शहा पासून आरोग्य सचिव डॉ. लव अग्रवाल पर्यंत सर्वस्तरातील लोक सामील आहेत. आतापावेतो 51 हजार 797 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालेला असून, रोज 800 ते 1000 च्या दरम्यान देशात मृत्यू होत आहेत.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोना लवकर नष्ट होईल अशी चिन्हेही दिसत नसून उलट अनेक साथीच्या रोगतज्ज्ञांनी अशी भीती व्यक्त केलेली आहे की, फ्ल्यू परिवारातील इतर फ्ल्यूप्रमाणे कोविडसुद्धा येत्या ग्रिष्म ऋतूमध्ये वाढला तर देशाची परिस्थिती आणखीन बिकट होईल. यावरून स्पष्ट आहे की, कोरोनाने कोणाचाही आणि केव्हांही मृत्यू होऊ शकतो. हे सत्य माहित असूनसुद्धा प्रत्येकजणाने अशी समजूत करून घेतलेली दिसते की, ”मला कोरोना होणारच नाही.”
हा गोड गैरसमज आहे. कोविडवर लस उपलब्ध नाही, निश्चित उपचार उपलब्ध नाहीत, त्यात वैद्यकीय सुविधांची वाणवा आहे, अशा परिस्थितीत ’योग्य ती खबरदारी’ घेण्यामध्ये मृत्यूची मानसिक तयारी सुद्धा सामील करणे गरजेचे आहे असे मला वाटते. तसे केल्यास अचानक कोरोनामुळे मृत्यू डोळ्यासमोर दिसल्यास गोंधळ उडणार नाही व शांतपणे मृत्यूला सामोरे जाता येईल.
इस्लाममध्ये मृत्यूची संकल्पना
इस्लाममध्ये माणसाला मृत्यू कधीही येऊ शकतो याची स्पष्ट कल्पना अगोदरच देऊन ठेवलेली आहे. नमाज संपल्यानंतर उजवीकडचा सलाम अदा केल्यानंतर मान फिरवून डावीकडचा सलाम अदा करण्यापूर्वीसुद्धा मृत्यू येऊ शकतो, अशी सूचना देऊन ठेवलेली आहे.
’मृत्यू नजरेसमोर ठेवा तो कुठल्याही क्षणी येऊ शकतो.’ या अर्थाच्या अनेक हदीस, हदीस संग्रहामध्ये उपलब्ध आहेत. एवढेच नव्हे तर प्रेषित सल्ल. यांनी कब्रस्तानला वारंवार भेट देण्याची श्रद्धावंतांना सूचना केलेली आहे. त्या मागचा हेतू हाच की, माणसाने मृत्यूला सतत नजरेसमोर ठेवावे. या सूचनेमागचा उद्देश स्पष्ट आहे, ज्या माणसाला मृत्यूची सातत्याने आठवण राहते तो चुकीची कामे करत नाही, कोणावर अत्याचार करत नाही, कोणाच्या अधिकारांचे हनन करत नाही, लोकांची देणी योग्य वेळेस देऊन टाकतो, व्यवहार चोख ठेवतो, मोह, माया, मत्सर आदी षडरिपूनपासून लांब राहतो. थोडक्यात तो अतिशय सभ्य आणि चांगले जीवन जगतो. इस्लामचा मूळ उद्देश हाच आहे की, प्रत्येकाने सभ्य आणि चांगले जीवन जगावे. आदर्श समाज रचनेची यापेक्षा चांगली योजना दूसरी असूच शकत नाही.
मृत्यूला सामोरे कसे जाल?
कोविडने होणारा प्रत्येक मृत्यू आपल्यासाठी एक रिमांयडर आहे. जणू कोविड हा इसराफिल अलै. यांच्या रूपाने रोज येऊन आपल्या परिसरातील इतरांना सोबत घेऊन जातांना आपल्याला स्मरण करून देत आहे की, ”तयार रहा ! याला पोहोचवून आलो की तुम्हाला घेऊन जातो.” अशा परिस्थितीत एक श्रद्धावान मुस्लिमाची वर्तणूक कशी असावी? याचा उहापोह करणे अनाठायी होणार नाही.
आजूबाजूला जरा काळजीपूर्वक पाहिले तर लक्षात येईल की, समाजामध्ये काही लोक असे आहेत जे कोविडमुळे अत्यंत घाबरलेले आहेत, इतके की मनोरूग्ण झालेले आहेत. याउलट काही लोक असे आहेत की, जे अत्यंत बिनधास्त आहेत. हे दोन्ही अॅप्रोच चुकीचे आहेत. खरा अॅप्रोच इस्लामी अॅप्रोच आहे. तो कसा? याचे उत्तर असे आहे की, कोविडच काय कुठलाही आजार होणार नाही यासाठी आरोग्याचे सर्व नियम पाळत अल्लाहकडे सातत्याने दुआ करून अपेक्षा करणे की, कोविडच नव्हे तर इतर सर्व आजारापासून हे अल्लाह मला सुरक्षित ठेव. मला विश्वास आहे एवढी दक्षता घेऊन संपूर्ण समर्पणाने दुआ करून अल्लाहकडून केलेली ही अपेक्षा तो पूर्ण करेल आणि आपला मृत्यू होणार नाही.
दुआ श्रद्धावानाचे विश्वासार्ह हत्यार आहे. इबादती व दुआमुळे मुस्लिमांना मनःशांती लाभते. अल्लाहवरचा विश्वास दृढ होतो. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. प्रत्येक श्रद्धावान मुस्लिम हे जाणून असतो की, नमाज म्हणजे अल्लाहशी प्रत्यक्ष भेट. नमाजच्या या सोप्या व सरळ वाटणार्या अद्भूत प्रक्रियेमध्येच आपला मृत्यू कसा होणार, याचे रहस्य लपलेले आहे. ते असे की, जर तुम्हाला पाचही वेळेस नमाज अदा करताना आनंद होत असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष मृत्यूच्या वेळेससुद्धा आनंद होईल. जर का नमाज अदा करताना तुम्हाला जीवावर येत असेल, सामाजिक किंवा अन्य दबावामुळे तुम्ही नमाज अदा करत असाल तेव्हा नमाज अदा करताना तुम्हाला ज्या वेदना होतात अगदी तशाच वेदना तुम्हाला मृत्यूसमयीही होतील, याची खात्री बाळगा. कारण नमाजमध्ये अल्लाहशी भेट आनंददायक नसेल तर प्रत्यक्ष भेट कशी आनंददायी होऊ शकेल?
अनेक लोकांचा असाही गैरसमज आहे की, ते शारीरिक दृष्ट्या तंदुरूस्त आहेत म्हणून त्यांना कोरोना होणार नाही. पण ज्याचे उभे आयुष्य मैदानावर गेले अशा तंदुरूस्त चेतन चव्हाणांना सुद्धा कोविडने सोडले नाही. तर इतर तंदुरूस्त लोकांची काय बिसात?
या संदर्भात कुरआनमध्ये एक सुंदर आयत आलेली आहे, ती खालीलप्रमाणे - ”तो म्हणेल की मी आपल्या ह्या जीवनासाठी पूर्वतयारी केली असती !” (संदर्भ ः सुरह अल फज्र आयत नं. 24). या आयातीत अल्लाहने श्रद्धावानांकडून अपेक्षा केलेली आहे की प्रत्येकाने मृत्यूनंतर येणारे जीवन सुसह्य व्हावे, यासाठी याच जीवनात तयारी करावी. म्हणजे मृत्यूनंतर वर संदर्भात नमूद आयातीमध्ये जी हताशा माणसाकडून व्यक्त केली जाईल, त्यापासून आपला बचाव करता येईल. कोविडमुळे निर्माण झालेल्या मृत्यूजन्य परिस्थितीमध्ये या आयतकडून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने असे वागले पाहिजे की, कुठल्याही क्षणी मृत्यू आला तरी त्याला आत्मविश्वासाने सामोरे जाता आले पाहिजे. त्यासाठी आपला प्रत्येक दिवस उत्तम दिवस असायला हवा. त्यात आपल्याकडून केली जाणारी प्रत्येक कृती ही सर्वोत्कृष्ट कृती असावी, प्रत्येक दिवशी मानवी कल्याणासाठी काही तरी चांगले काम आपल्या हातून घडावे याची दक्षता घ्यावी.
कोविडपूर्वी जगातील परिस्थिती अतिशय विदारक अशी होती. माणसाने वाममार्गाच्या सर्वच क्षेत्रांतील लक्ष्मणरेषा ओलांडल्या होत्या. अतिव्यावसायिकतेने प्रत्येक क्षेत्रातील मानवी मुल्यांचा र्हास केला होता. गुन्हेगारी परमोच्च स्तरावर पोहोचली होती. महिलांवरील अत्याचारांची कुठलीच सीमा शिल्लक राहिलेली नव्हती. दारू, ड्रग, नशेने समाजाच्या तरूणाईला पोखरून टाकले होते. व्याजाच्या फंद्याने शेतकरीच नव्हे तर शहरी भागातील गरीबांचाही गळा आवळण्यास सुरूवात केली होती. त्यांच्याकडे लक्ष देण्याची समाजातील श्रीमंत माणसे आणि सरकार यापैकी कोणाचीही तयारी नव्हती. कदाचित म्हणूनच अल्लाहने मानवतेच्या सेवेचे हे विसरलेले काम माणसांना परत आठवण करून देण्यासाठीच ही साथ अवतरित केली असावी. कारण मानवाच्या इतिहासात जागतिक स्तरावर अशी साथ कधीच आलेली नव्हती.
सदाचाराने वागल्यास व इस्लामी इबादतीचे गांभीर्याने पालन केल्यास कोविडनेच नव्हे तर कुठल्याही कारणाने कधीही मृत्यू आल्यास आपल्याला अस्वस्थ वाटणार नाही आणि हसत-हसत आपण अल्लाहच्या प्रत्यक्ष भेटीसाठी जाण्यासाठी तयार असू. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, अल्लाहने प्रत्येक श्रद्धावानाला त्याच्या मृत्यू समयी असाच शानदार मृत्यू प्रदान करावा. आमीन.
- एम.आय.शेख
Post a Comment