Halloween Costume ideas 2015

कोरोनाचे संकट : आपत्ती की ईष्टापती

Corona
मागील वर्षी निसर्गाच्या अवकृपेचा अनुभव संपूर्ण महाराष्ट्राने घेतला. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र पुराच्या पाण्यात वाहून गेला. शेतकर्र्‍यांचे अतोनात नुकसान झाले, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. महापुराच्या संकटातून बाहेर पडतोय तोवर यंदा कोरोनाच्या जागतिक संकटामुळे देश आर्थिकदृष्ट्या खाईत लोटला, महाराष्ट्र राज्यात तर कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे. महाराष्ट्र राज्य कोरोनामुळे हडबडून गेले आहे.
    गतसालच्या महापुराच्या कटू आठवणी विसरून आपण सरत्या वर्षाला निरोप दिला होता, नव्या दमाने व नव्या जोमाने 2020 या नूतन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले होते, पण नूतन वर्षाच्या सुरुवातीलाच पहिल्या महिन्यांनंतर कोरोनाची चाहूल लागली, आणि बघता बघता कोरोनाचं संकट दिवसेंदिवस बिकट होत गेलं. सुरवातीला कोरोनाविषयी फारसं कुणीच गांभीर्यानं पाहिलं नाही; मात्र जसजसा कोरोनाचा संसर्ग  वाढू लागला आणि रूग्णांचे व मृतांचे आकडे वाढत चालले, तसतसे प्रत्येकाच्या मनात एक अनामिक भीती, हुरहूर व धास्ती वाढू लागली, मला काय होतंय असा अनेकांचा समज होता, त्याला जबरदस्त धक्का बसू लागला. देश, राज्य, जिल्हा, तालुका ते गावागावांत कोरोनाचे रूग्ण वेगाने वाढत चालले, बघता बघता कोरोनाचे हे भयानक संकट आपल्या दारात कधी येऊन ठेपले, हे समजले देखील नाही. मला काय होतंय असा टेंभा मिरवणार्‍या अनेकांच्या थेट घरात आलेल्या या संसर्गामुळे त्यांचा आविर्भाव बघता बघता गळून पडला.
     सरकारने 22मार्च रोजी एक दिवस राज्यभर संचारबंदी जारी केली. मात्र कोरोनाने देशभरात धुमाकूळ घातला आहे हे लक्षात आले आणि केंद्र सरकारने 25 मार्च पासून संपूर्ण देशात  लॉकडाऊनचा आदेश काढला. तरीही कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे हे ओळखून लॉकडाऊनला मुदतवाढ देण्यात आली. गेल्या पाच महिन्यांपासून संपूर्ण देशात लॉकडाऊनच्या प्रदीर्घ काळात देशवासीयांची परिस्थिती अतिशय बिकट झाली. अनेकांना याची प्रचंड झळ बसली आहे. अर्थव्यवस्था कोलमडून पडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. उद्योगधंदे बंद आहेत. रेल्वे, बस, विमान वाहतूक, मालवाहतूक ठप्प झाली आहे. नोकर्‍यांमध्ये कपात केली आहे, अनेकांना घरीच बसावे लागले आहे. सर्व थरातील लोकांना कोरोनाच्या जागतिक संकटामुळे  असुरक्षित वाटत आहे, आर्थिकदृष्ट्या अनेक जण खचले आहेत,तर मानसिक रुग्णांची संख्या कमालीची वाढली आहे. अनेकांनी मिळेल त्या वाहनाने प्रवास करत आपल्या घरी जाणे पसंत केले आहे. उद्योगधंदे बंद असल्याने  लाखो कामगारांच्या हाताला काम नाही. त्यामुळे पोटाचा बिकट प्रश्‍न आ वासून उभा राहिला. कसेही करून आपण आपल्या गावी जावे,व आपल्या घरच्या माणसांच्या सहवासात जाऊन राहावे असे प्रत्येकाला मनापासून वाटू लागले. गावाच्या ओढीने हजारो मैल दूर चालत जाऊन आपले गाव गाठण्यासाठी अनेकांना पायपीट करावी लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर देशाबाहेरील लोकांना देशात आणण्यासाठी प्रवासी विमान वाहतूक व्यवस्था केली,तर देशातील लोकांना आपापल्या घरी जाणेचा आदेश दिला. महाराष्ट्रातील विविध महानगरात कामानिमित्त स्थायिक झालेले चाकरमानी आपापल्या घरी परतले आहेत. काहीजण अजूनही नोकरीच्या आशेने तिथेच थांबले आहेत. मात्र कोरोनाचे संकट अधिकाधिक गडद होत चालले तसतसे महानगरात खाण्यापिण्याची ददात होऊ लागली, घराचं भाडं देणं सुध्दा अशक्य झाले,मग काही दिवसांसाठी लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यावर उरल्यासुरल्या चाकरमान्यांनी ही आपल्या गावाकडे जाणे पसंत केले.   शहरांप्रमाणेच खेडोपाड्यात ही कोरोनाने हातपाय पसरलेले आहेत. शहरातील मोकाट वारे प्यायलेले चाकरमानी यापूर्वी केवळ कारणाकारणी गावाकडे जाणे पसंत करीत असत. मात्र आता त्यांना आपल्या गावी जाण्याशिवाय पर्याय नव्हता. गाववाल्यांनीही त्यांचे स्वागत केले. पंधरा दिवसांच्या क्वॉरंटाईनच्या काळात जेवणखाण देऊन त्यांना मायेची ऊब दिली. चाकरमान्यांना स्वप्नात ही वाटले नव्हते, तेवढे प्रेम, जिव्हाळा, आत्मियता त्यांना त्यांच्या जीवलगांकडून अनुभवायला मिळाली. बळिराजाची उदात्त आणि उदार अंत:करणाची संस्कृती आजही टिकून आहे हे या कोरोनाच्या निमित्ताने अधोरेखित झाले.
      चाकरमानी आपापल्या गावी आले आहेत, त्यांनी ही महानगरातला आपला नोकरदार किंवा अधिकार पदाचा रूबाब न दाखवता मायेच्या ओलावलेल्या मनाने मिळेल ती भाजी भाकरी गोड मानून घेतली आहे. महानगरात रहायला असल्यामुळे एक प्रकारे शहरीपणा व पुढारलेपणा आलेला असतो,तो संपूर्ण विसरून आलेल्या परिस्थितीला जुळवून घेत आहेत. ते पूर्णपणे शेतकर्‍यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. गावातील सामाजिक कामातही मदत करत आहेत. सामाजिक जाणिवा जिवंत ठेवण्यासाठी ते गावकर्‍यांच्या सुखदुःखात सहभागी होत आहेत, माणसातलं माणूसपण काय असतं हे या निमित्ताने ठळक होत आहे. जाती जातीतील अंतर सुध्दा कमी होणार आहे, देवच सीलबंद झाले आहेत, त्यामुळे धर्माची खरी व्याख्या आता सर्वांनाच समजणार आहे. शेतकरी हाच खरा सर्वांचा पोशिंदा आहे, शेतकरी जगला तर जग टिकणार आहे, हे सुद्धा या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. हाच शेतकरी देशावर किती ही संकट आले तर देश चालविण्यासाठी जिवाचे रान करतो. गावाकडे आलेल्या चाकरमान्यांना ते पुरते कळून चुकले आहे.त्यामुळेच सध्या हा नोकरदार पुर्णवेळ शेतकरी झाल्याचे गावोगावी पहावयास मिळत आहे. हा नोकरदार सकाळी लवकर उठून जनावरांना वैरण आणतो. शेतातील कामे जमेल तेवढी तरी करतो. खरं तर नोकरदार नोकरीच्या निमित्ताने महानगरांत जरी स्थायिक झालेला असला तरी मुळचा तो शेतकरी कुटुंबातील असतो. नोकरीमुळे तो घरापासून आणि शेतांपासून लांब राहीला. पुढे त्यांची शेतीची आणि पर्यायाने ग्रामीण जीवनाची नाळ तुटली गेली, त्यामुळे दुरावा निर्माण झाला व नाती सुद्धा संपुष्टात आली. मात्र कोरोना सारख्या महाभयंकर अस्मानी संकटामुळे ही दुरावलेली नाती एकत्रित आली. पुन्हा कौटुंबिक जिव्हाळा निर्माण होऊ लागला. खंबीरपणे कोरोनाला तोंड देण्यासाठी एकीचे सामर्थ्य निर्माण झाले. या निमित्ताने का असेना माणसातलं माणूसपण जागं झालं; त्यामुळे कोरोनाची आपत्ती ही त्या अर्थाने ईष्टापत्ती ठरली आहे, हे मात्र खरे...!

- सुनिलकुमार सरनाईक
9420351352

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget