Halloween Costume ideas 2015

सौ. गर्जना पोकळ, वैतागवाडी!

नको त्याच्या हाती आपला मोबाईल नंबर लागणे म्हणजे जणू ‘माकडाच्या हाती कोलीत’च लागणे! कोण केंव्हा फोन करून छळेल, आपल्या नसलेल्या अकलेचं प्रदर्शन मांडून हैराण करेल ते सांगताच येत नाही. मोबाईलवर जसे रोजचे तापमान दिसते  तसे जर समोरून बोलणाऱ्याची बौद्धिक पातळी दाखवणारा मोबाईल बाजारात आला ना तर तो कितीही महागडा असला ना तरी मी तो नक्कीच घेईन, कितीही महागडा असला तरी, त्यासाठी बँकेकडून कर्ज घ्यावं लागलं तरी! कारण-
‘हॅलो, कोण हवंय?’ मी फोन कानाला लावत अत्यंत नम्रपणे विचारणा केली. एकतर वृत्तपत्रीय स्तंभलेखक त्यात विवाहित म्हणजे आवाजात नम्रता असणारच. संपादकांशी काय किंवा बायकोशी काय नम्रपणेच वागावं, बोलावं लागतं. टिकून राहायचं  असतं ना, वृत्तपत्रातही आणि घरातही!
‘तुमचा लेख वाचला. त्याच्या खाली तुमचा नंबर होता म्हणून तुम्हाला फोन केला. तुम्हीच बोलताय ना?’ तिकडून एका भसाड्या आवाजाच्या स्त्रीने विचारणा केली.
माझ्या नंबरवर फोन केल्यावर काय तुमच्याशी अमिताभ बच्चन बोलणार आहे का, असे विचारावे असे मनात आले होते, पण राग आवरला. ‘हो बोला ना मॅडम, मीच बोलतोय. कुठे वाचला आपण माझा लेख?’ नम्रता न सोडता मी बोललो.
आम्हा स्तंभलेखकांना नम्रता सोडून चालत नाही. समोर एखादा स्तुती करणारा वाचक असला तर? एखाद्या वर्तमानपत्राचे किंवा साप्ताहिकाचे संपादक असले आणि त्यांनी स्तंभलेखनासाठी फोन केला असला तर?
‘आमच्या ग्रुपवर टाकला होता कोणीतरी तिथे वाचला. मी नाही वाचत ती पांचट वर्तमानपत्रं. पण काहो, तुम्ही काय लिहिता ते तुम्हाला तरी कळतं का?’ भसाडा आवाज माझ्या नम्रतेचा खून पाडत माझ्या कानात घुसला.
‘नाही म्हणजे लिहितांना नाही कळलं ना तरी मेल टाईप करतांना कळतं थोडंफार की काय लिहिलं आहे आणि संपादकांनाही कळत असावं थोडंफार की काय लिहिलं आहे, त्याशिवाय का ते छापतात? शिवाय मानधन देतात ते मला लिहिण्याचं,  बदामाचा दाम मोजून कोणी चणे-फुटाणे घेतं का?’ मी आपली अल्प- स्वल्प विनोदबुद्धी वापरून वातावरणातला ताण थोडा हलका करण्याचा प्रयत्न केला.
‘उगाच स्वतःच्या आणि संपादकांच्या बुद्धीचं कौतुक सांगू नका. काय कळतं त्या संपादकांना? त्यांनाही रोज ८-१० पानं छापायची असतात मग छापतात तुमच्यासारख्यांचं काहीबाही.’ भसाड्या आवाजाचा रोष माझ्यावर होता की माझा लेख छापणाऱ्या  संपादकांवर होता याचा काही अंदाज येत नव्हता.
‘बाई,’ आता त्या आपल्या कर्मानेच मॅडमच्या बाई झाल्या होत्या आणि आपणच्या तुम्ही झाल्या होत्या. ‘तुम्ही माझ्यापेक्षा आणि माझा लेख छापणाऱ्या त्या संपादकांपेक्षाही जास्त बुद्धिमान आहात हे मी मान्य करतो.’ मी सपशेल शरणागती पत्करली. ‘अहो, मान्य करता म्हणजे काय, करावंच लागेल. तुम्ही आठवड्यातून एखादा लेख लिहिता म्हणून स्वतःला फार बुद्धिवान समजता का? आणि तो पेपराचा संपादक याचे त्याचे लेख छापतो म्हणजे तो फार हुशार झाला का?’ भसाड्या आवाजाने आता  मर्यादा सोडली होती.
‘ते असू द्या, पण तुम्ही काय करता हे सांगाल का मला?’ मला बाईंच्या बौद्धिक पातळीचा अंदाज घ्यायचा होता.
‘मी किनई आमच्या व्हाट्सएपच्या गृप मधली सगळ्यात ऍक्टिव्ह मेंबर आहे. दिवसभरात २०-२५ पोस्ट्स नक्की असतात माझ्या गृपवर.’ बाईंच्या बौद्धिक पातळीचा अंदाज आल्यामुळे मी सरळच विचारून घेतलं, ‘अच्छा, पण त्या लेखात माझं काय चुकलं ते सांगाल का?’
‘काय चुकलं म्हणून काय विचारता तोंड वर करून? आमच्या नेत्याला तुम्ही अपयशी कसं ठरवलं? बोला.’
‘बाई, तुमचे नेते अपयशी आहेत हे कळण्यासाठी वर्तमानपत्रं वाचावी लागतात. ती मी नियमितपणे वाचतो. नुसतं व्हाट्सएपच्या गृपवर दिवसभर चॅटींग करून नाही कळत ते आणि जर तुम्हाला माझा लेख चुकीचा वाटत असेल तर त्याचा प्रतिवाद  करणारा लेख तुम्ही त्याच वर्तमानपत्राकडे पाठवा. छापतील ते संपादक.’ ‘आहा, वर्तमानपत्र वाचून लिहिता म्हणजे दुसऱ्याच्या बुद्धीने चालता म्हणायचे. मी माझी बुद्धी वापरते. समजलं?’ माझा घाव बाईंच्या वर्मी लागला होता.
‘जगात काय चाललं आहे ते वर्तमानपत्र वाचल्याशिवाय कळण्यासाठी मला तर कोणतीही सिद्धी प्राप्त झालेली नाही. तुम्हाला झाली असल्यास माहीत नाही. असे असेल तर तुमच्या स्वयंभू बुद्धीला मी साष्टांग दंडवत घालतो. नाव कळेल का तुमचं?’  तिकडून फोन कट झाला. माझ्या फोनचा ट्रूकॉलर सुरू होता. मी सहज नाव पाहिलं. नाव होतं ‘सौ. गर्जना पोकळ, वैतागवाडी.’
* * *
 
- मुकुंद परदेशी, 
मुक्त लेखक,
भ्रमणध्वनी क्र. ७८७५०७७७२८  

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget