समाजामध्ये एकोपा, प्रेम व शांती निर्माण करणारा उपक्रम
कल्याण (शाहजहान मगदुम)-
इस्लाम धर्मातील रूढीपरंपरांची अन्य धर्मीयांना माहिती व्हावी आणि मुस्लिम समाजाबाबत असणारी नकारात्मक धारणा बदलावी, या मस्जिदीत नेमके काय चालते? तसेच मस्जिद आणि इस्लाम धर्माबाबतचे गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीने जमात-एइस्लामी- हिंदतर्फे 'मस्जिद परिचय' हा उपक्रम १० फेब्रुवारी २०१९ रविवारी राबवण्यात आला. या माध्यमातून इस्लाम धर्म आणि मस्जिदीतील प्रार्थनांची माहिती देण्यात आली.
कल्याणमध्ये १६८ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या दूधनाक्यावरील जामा मस्जिदीत झालेल्या या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात मुस्लिमेत्तर समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सर्व समाजाला एकत्र आणतो, एकत्र घेऊन चालतो तो खरा धर्म, असे म्हटले जाते. या तत्त्वाला समोर ठेवून जमाअत- ए-इस्लामी-हिंद संस्थेच्या कल्याण विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मस्जिद पाहण्यासाठी अन्य धर्मांचे येऊ लागताच अकील शेख, मोइन डोन, अॅड. फैसल काझी इत्यादी इस्लामी विचारवंतांनी उपस्थितांना गटागटांनी माहिती दिली. आत प्रवेश केल्यावर हातपाय धुऊन नमाज पठणापूर्वी स्वच्छता बाळगली जाते, त्यास वुजू म्हटले जाते. त्याकरिता पाण्याचा हौद बांधण्यात आला असून नळासोबत वुजूसाठी बैठकव्यवस्थादेखील करण्यात आलेली आहे. पाण्याच्या हौदात मासेही सोडण्यात आलेले आहेत. मस्जिदीच्या आतल्या भागात महिरपीसमोर नमाजपठणाचे नेतृत्व केले जाते. नमाजपठण काबाच्या दिशेने केले जाते. नमाजपठण सूर्योदयापूर्वी, दुपारी, सूर्यास्तापूर्वी, सूर्यास्तनंतर व झोपण्यापूर्वी असे पाच वेळा केले जाते. मस्जिदीमध्ये त्याच्या वेळा नमूद केलेल्या असतात. शुक्रवारी दुपारच्या नमाजानंतर मस्जिदीतील मौलाना १५ मिनिटांचे प्रवचन देतात. त्यात प्रथम अल्लाची महती विशद केली जाते. त्यानंतर, आसपासच्या समस्यांवर भर दिला जातो. नमाजपठण सामूहिक व वैयक्तिक स्वरूपात केले जाते. हे सगळे अन्य धर्मीयांनी या वेळी समजून घेतले.
खास औरंगाबादहून आलेले मुस्लिम धर्माचे विचारवंत प्रा. वाजिद अली खान यांच्या उपस्थितीत उपक्रमाविषयी माहिती दिली गेली. त्यांनी मस्जिद, नमाज, वुजू, शुक्रवारची नमाज तसेच इस्लामची मूळ शिकवण आणि मरणोत्तर जीवनाविषयी आपले विचार मांडले. जमाअत- ए-इस्लामी हिंद या संस्थेतर्फे हा उपक्रम देशभरात सुरू आहे. यापूर्वी नागपूर, औरंगाबाद, मुंब्रा, पुणेसह संपूर्ण महाराष्ट्रात येथे हा उपक्रम घेण्यात आला. कल्याणमध्ये त्याची सुरुवात प्रथमच होत आहे.
काही विघातक प्रवृत्ती इस्लामविषयी जाणीवपूर्वक द्वेष व गैरसमज पसरवत आहेत. त्यांना मस्जिददर्शन हा उपक्रम एक प्रकारचे चोख प्रत्युत्तर आहे. मस्जिदीद्वारे अनेक सामाजिक कामे केली जातात. त्याचा प्रचार व प्रसार केला जात नाही. ज्येष्ठ वकील फैजल काजी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. वाजिद अली खान यांच्या व्याख्यानापश्चात सायंकाळचे नमाजपठण कसे केले जाते, याचेही दर्शन अन्य धर्मीयांना घडले. त्यापश्चात अन्य धर्मीयांनी खान यांना काही प्रश्न विचारले. त्याचेही समाधान खान यांनी चांगल्या प्रकारे केले. या ‘मस्जिद परिचय' कार्यक्रमात सुमारे १२० हून अधिक मुस्लिमेत्तर बांधवांनी भाग घेतला. ९ जणांनी मुस्लिमांसोबत मगरीब या सूर्यास्तावेळीच्या सामूहिक नमाजमध्ये सामील होऊन नमाजचा अनुभव घेतला. शेवटी आमच्या अन्य धर्मीय बंधुंनी पाठीमागे व वर गॅलरीत बसून प्रत्यक्ष सामूहिक नमाज बघण्याचा अनुभव घेतला.
प्रथमच मस्जिदीत आल्यामुळे अनेक जण भावूक झाल्यामुळे त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि काहींनी स्वत:ला सावरून आपले अभिप्राय दिले. देशात स्फोटक वातावरण असताना मस्जिदीविषयी असलेला गैरसमज दूर करण्यासाठी मस्जिद परिचय हा उपक्रम नक्कीच प्रशंसनीय आहे. आयोजकांनी त्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असे मत साहित्यिक डॉ. गिरीश लटके यांनी या वेळी व्यक्त केले. देशमुख म्हणाले, ‘‘हे माझ्या जीवनातील सर्वोत्तम क्षण आहेत.’’ अॅडव्होकेट संकेत सरावते यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘‘मी या मस्जिदीसमोरून पाचशे वेळा गेलो असेन पण आज मला ही उत्तम संधी मिळाली.’’ राजेंद्र यांनी मुस्लिम बांधवांना विनंती केली की ‘‘निदान प्रत्येक सहा महिन्यानंतर असा कार्यक्रम आयोजित करा. हा कार्यक्रम समाजात, एकोपा, प्रेम आणि शांती निर्माण करणारा आहे.’’
या कार्यक्रमाला डॉ. गिरीश लटके, कल्याण आयएमएचे सचिव डॉ. प्रशांत पाटील, अनंत हलवाईचे अमृत गवळी, कोनगावचे प्रा. विनोद पाटील, अॅड. संदेश सरावते, गणेश अण्णा पाटील माजी कोनगाव भाजपा अध्यक्ष, स्वाध्याय परिवारचे भास्कर भोईर, यांच्यासह जमात-ए-इस्लामी हिंद कल्याणचे प्रमुख मिशल चौधरी, मोईन डोन, शरफुद्दीन कर्ते, जामा मस्जिदीचे इमाम जोहेर डोन, अॅड. फैसल काझी तसेच कोनगावमधून आलेले स्थानिक जमाअत- ए-इस्लामी हिंदचे अध्यक्ष इंतेखाब आलम, शोधनचे कार्यकारी संपादक शाहजहान मगदुम, अफसर खान, आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मानवामानवांमध्ये एकोपा घडवून आणण्याचे एक उत्तम प्रतीक म्हणजे मस्जिद! अशीच भावना या वेळी अनेक अन्य धर्मीय बांधवांनी व्यक्त केली.
Post a Comment