Halloween Costume ideas 2015

भारतीय मुस्लिम समाजाला न्याय मिळणार कधी?

आपल्या देशात अनेक कारणांनी जातीय व धार्मिक हिंसाचारांच्या रक्तरंजित घटना घडतात. त्यात अनेक निरपराध मुस्लिम मारले जातात. यात गुन्हेगारांना काही राजकीय पक्ष वाचवतात. यामुळे दंगलीत सहभागी असणारे व दंगलींना खतपाणी घालणारे देशात खुलेआम फिरत असतात. या पाश्र्वभूमीवर दिल्लीतील शीख दंगल प्रकरणी काँग्रेसचे नेते  सज्जनकुमार यांना शिक्षा झाली. त्याप्रमाणे बाबरी मस्जिद, गुजरात दंगल, मुजफ्फरनगर दंगल व गोध्राकांड घडविणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा होईल काय व मुस्लिम समाजाला न्याय मिळणार का?
आपल्या देशात अनेक कारणांनी तसेच जातीय हिंसाचारांच्या घटनांमध्ये होत असलेली वाढ ही मोठी चिंताजनक बाब आहे. अशा हिंसाचारांमध्ये निरपराध नागरिकांना जीव गमवावा  लागतो. अनेक जण जायबंदी होतात, तर समाजाबरोबरच देशाचेही आर्थिक नुकसान होते. त्यामुळेच अशा प्रवृत्तींना वेळीच अटकाव करणे तसेच त्यांना खतपाणी घालणाऱ्यांवर कठोर  कारवाई होणे गरजेचे ठरते. मात्र अशा गंभीर प्रकरणांतही राजकीय हस्तक्षेप होणं त्यातून हल्लेखोरांना पाठीशी घातलं जाणं, त्यांच्यावरील कारवाईस टाळाटाळ होणं असे प्रकार समोर  येतात, ही बाब समाजासाठी व आपल्या देशासाठी हानिकारक ठरणारी असते. म्हणूनच अशा घटनांमध्ये न्यायालयाकडून संबंधितांना योग्य न्याय दिला जावा अशी अपेक्षा असते. त्या  दृष्टीने आपली न्यायव्यवस्था आपलं कर्तव्य चोखपणे बजावत आहे, ही समाधानाची बाब म्हणालयला हवी.
या पाश्र्वभूमीवरदिल्लीतील १९८४ मधील शीखविरोधी दंगल प्रकरणी काँग्रेसचे नेते सज्जनकुमार यांना दिल्ली उच्च न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोवावली. यामुळे या दंगलीतील  पीडितांना दिलासा मिळणं साहजिक असलं तरी ही न्यायालयीन लढाई इथंच थांबणारी नाही. इंदिरा गांधी यांच्या हत्येनेंतर देशभरात निरपराध शिखांचं शिरकाण करण्यात, त्यात निष्पाप शिखांचा बळी गेला. महाराष्ट्रातही श्रीरामपूर, कोपरगावला मोठ्या रक्तरंजित घटना घडल्या होत्या. दिल्लीतही जातीय दंगली झाल्या. त्यातल्या एका प्रकरणात काँग्रेसनेते सज्जनकुमार  यांना शिक्षा ठोठावण्यात आली. दिल्लीत आणि संपूर्ण भारतात जे काही घडलं ते मानवतेला काळीमा फासणारं होतं. फाळणीनंतर इतकं मोठं नृशंस हत्याकांड घडलं नाही, असं दिल्ली उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. परंतु गुजरातमध्ये गोध्रा हत्याकांडानंतर जे झालं ते नृशंस हत्याकांड नव्हतं का, असा प्रश्न पडतो. इतका नरसंहार करणाऱ्यांना मात्र उशिरा शिक्षा का  होते?
दिल्लीतील शीख हत्याकांडानंतर आरोपींना शिक्षा झाली, परंतु आपल्या देशात गुजरात दंगल, मुजफ्फरनगर, हाशिमपुरा दंगल आणि बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करण्यात आल्यानंतरची  दंगल करणाऱ्यांना व बाबरी मस्जिद पाडणाऱ्यांना शिक्षा न्यायालय कधी देणार आणि कधी मुस्लिम समाजाला न्याय मिळवून देणार आहे? अजून किती वर्षे मुस्लिम समाज न्यायाची  वाट पाहाणार? या दंगलीत हात असणाऱ्यांना शासन होईल यासाठी आवश्यक ती कारवाई न्यायालयानं करायला पाहिजे होते. अशा अनेक जातीय दंगली आपल्या देशात झाल्या आहेत  आणि असे अनेक सज्जनकुमार आपल्या देशात मोकाट फिरत आहेत. शिखांचे हत्याकांड होऊन त्यांचा निकाल लागण्यास ३४ वर्षे लागत असतील तर हा शीख समाजाला मिळालेला  न्याय नाही. या दंगलींच्या निकालाला इतकी वर्षं लागली तर ज्या दंगलीत अनेक आरोपी आहेत त्यांना शिक्षा करण्यासाठी अजून किती वर्षं लागतील, याचा विचार न्यायालय करणार  कधी? वास्तविक पाहता भारत देश स्वतंत्र झाल्यापासून हे सर्व प्रकार थांबायला पाहिजे होते. परंतु या दंगलींत वाढच होत आहे.या दंगलींमुळे देशांतर्गत सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली  आहे.
जगातील कुठलाही धर्म जातीयता, वर्णव्यवस्था यांचे समर्थन करीत नाही. परंतु काही स्वार्थी आणि अधर्मी लोक स्वत:च्या फायद्यासाठी आणि समाजात असलेले आपले वर्चस्व टिकवून  ठेवण्यासाठी जातियतेचा वणवा सर्वत्र पसरविण्याच्या प्रयत्नात असतात. आपल्या देशात कोणत्याही समाजाची प्रगती आणि विकासाची चिंता नाही. विकासापेक्षा जातियतेला भारतात  जास्त महत्त्व दिले जाते. यामुळे भारतीय मुस्लिम समाज राजकीय क्षेत्रात पिढ्यानपिढ्या मागे राहिला. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात फार मोठे योगदान असूनही समाजाला अजूनही  राजकीय भागीदारी मिळालेली नाही, याची येथील मुस्लिम समाजाला आजही खंत वाटते. देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतरही काही सामाजिक विषमतेविषयीची मानसिकता मात्र सरकार  आणि राज्यकर्त्यांची अजूनही बदललेली नाही. या जातीय व्यवस्थेमुळे जाती दंगली होतात आणि निरपराध मुस्लिम मारला जातो. त्यांना कोणत्याही पक्षाचा आमदार, खासदार, न्याय मिळवून देत नाही. अनेक जातीय दंगलींत मरणारे निष्पाप जीव व आज हयात असलेले त्यांचे कुटुंब अजूनही न्यायाची वाट पाहात आहेत. आपल्या देशात ज्या दंगली होतात त्या  मंदिर-मस्जिद विवादामुळे, यास जबाबदार म्हणजे येथील राजकारणी. भारतात सांप्रदायिक दंगली घडतील असे पोषक वातावरण तयार करणयाचे कार्य आजकाल मोठ्या प्रमाणात काही  समाजकंटक आणि राजकीय हस्तक करीत असल्याचे आपणास जाणवते. कारण जात आणि धर्माच्या नावावर हिंदू-मुस्लिमदलित- सवर्ण असे संघर्ष निर्माण करून आपणास पाहिजे ते  सर्व राजकीय फायदे हेच पुढारी करून घेतात.

- गुलाब नजीर पिंजारी
निंभोरा- रावेर (जि.जळगाव)
मो.९६८९०३५७९२

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget