Halloween Costume ideas 2015

अन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(३५) आणि जर तुम्हाला पतीपत्नीचे संबंध बिघडण्याचे भय असेल तर एक पंच पुरुषाच्या नातेवाईकांपैकी आणि एक स्त्रीच्या नातेवाईकांपैकी नियुक्त करा, ते दोघे,६० सुधारणा करू  इच्छित असतील तर अल्लाह त्यांच्या मध्ये समेटाचा मार्ग काढील, अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे.६१
(३६) आणि तुम्ही सर्वजण अल्लाहची बंदगी (भक्ती) करा, त्याच्यासमवेत कोणाला भागीदार बनवू नका, आईवडिलांशी नेक वर्तणूक ठेवा, नातेवाईक आणि अनाथ व गोरगरीबांशी  चांगला व्यवहार करा आणि आप्तशेजारी, अनोळखी शेजारी, तोंडओळख असणारा साथीदार६२ व वाटसरू, आणि त्या दासी व दास जे तुमच्या ताब्यात असतील, त्यांच्याशी उपकाराचे व्यवहार करा, विश्वास ठेवा की अल्लाह एखाद्या अशा व्यक्तीला पसंत करत नाही जी आपल्या अहंभावात गर्विष्ठ असते व आपल्या मोठेपणावर अभिमान करीत असते.
(३७) आणि असे लोकदेखील अल्लाहला पसंत नाहीत जे कंजूषपणा करतात आणि दुसऱ्यांनासुद्धा कंजूषपणाचा आदेश देतात व जे काही अल्लाहने आपल्या कृपेने त्यांना दिले आहे त्यास  ते लपवितात.६३ अशा कृतघ्न अश्रद्धावंत लोकांकरिता आम्ही नामुष्की आणणारी शिक्षा तयार ठेवली आहे.
(३८) आणि ते लोकदेखील अल्लाहला नापसंत आहेत जे आपली संपत्ती लोकांना केवळ दाखविण्यासाठी खर्च करतात आणि खरे पाहता ते अल्लाहवरही ईमान बाळगत नाहीत अथवा  परलोकवरदेखील. सत्य असे आहे की शैतान ज्याचा मित्र झाला त्याला अत्यंत वाईट मैत्री मिळाली.




६०) दोघांशी तात्पर्य मध्यस्थ (हकम) आहे आणि पती पत्नीसुद्धा आहेत. प्रत्येक भांडणात समझोता होणे शक्य आहे मात्र अट आहे की दोघांनी समेट घडवून आणण्याची इच्छा बाळगावी  आणि मध्यस्थांनासुद्धा समेट घडवून आणण्याची इच्छा असावी.
६१) या आयतीत आदेश दिला गेला आहे की जेव्हा पती-पत्नी मध्ये भांडण होते तेथे संघर्ष शिगेला न पोहचता किंवा न्यायालयात जाण्यापूर्वी घरातल्याघरात सुधार केला जावा. यासाठी  उपाय आहे की पती आणि पत्नीकडून प्रत्येकाच्या परिवारातील एक एक मनुष्य या उद्देशासाठी नियुक्त केला जावा. दोन्ही मिळून मतभेदाची चौकशी करावी आणि उपाय सुचवावा. या  पंच किंवा मध्यस्थांची नियुक्ती करणारा कोण आहे? यास अल्लाहने अस्पष्ट ठेवले आहे. जर पती-पत्नी दोघांनी इच्छिले तर आपल्या घरातील एक एक मनुष्य पंच म्हणून ठेवावा  किंवा बुजुर्ग मंडळीनी ठरवावे. जर मामला न्यायालयात गेला तर न्यायालयाने पुढील कारवायी करण्यापूर्वी पारिवारिक पंच नेमून समेट घडवून आणावा. पंचाचे अधिकार काय असावेत  याविषयी मतभेद आहेत. काहींच्या मते मध्यस्थांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही परंतु प्रश्न सोडविण्यासाठीचा उचित उपाय ते सुचवू शकतात. मान्य करणे अथवा अमान्य करणे  पती-पत्नीचा अधिकार आहे. जर पती-पत्नीने त्यांना तलाक, खुलाअ किंवा इतर मामल्याचा निर्णय देण्यासाठी आपला वकील नेमले असेल तर अशा स्थितीत त्यांचा निर्णय मान्य करणे  दोघांवर बंधनकारक आहे. हे मत हनफी आणि शाफई विद्वानांचे आहे. दुसऱ्या प्रकारच्या विद्वानांजवळ पंचाना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. परंतु वितुष्ट निर्माण करण्याचा निर्णय  घेण्याचा त्यांना अधिकार नाही; हे मत हसन बसरी व कतादा इ.चे आहे. काहींना वाटते की पती-पत्नींना विलग करणे किंवा त्यांच्यात समेट करणे दोन्ही अधिकार पंचाना आहेत.  माननीय इब्ने अब्बास (रजि.), सईद बिन जुबेर, शाबी, इब्राहीम नखई, मुहम्मद बिन सीरीन इ.चे हे मत आहे. माननीय उस्मान (रजि.) आणि अली (रजि.) यांच्या निर्णयाविषयी जे  काही आमच्यापर्यंत पोहोचले आहे, त्यावरून माहीत होते की न्यायालयाकडून पंचांना याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार देत होते. माननीय अकील बिन तालिब आणि त्यांची पत्नी फातिमा बिंते उतबांचा दावा जेव्हा माननीय उस्मान (रजि.) यांच्या न्यायालयात दाखल झाला तेव्हा त्यांनी पतीकडून एक पंच माननीय इब्ने अब्बास (रजि.) आणि पत्नीकडून माननीय  मुआविया बिन अबी सुफयान (रजि.) पंच नियुक्त केले. त्या पंचाना सूचित केले की आपल्या मतानुसार दोघात फूट करणे योग्य वाटत असेल तर अलग होण्याचा निर्णय द्यावा. याचप्रकारे एका दाव्यात माननीय अली (रजि.) यांनी पंच नियुक्त केले आणि त्यांना समेट करण्याचा व न करण्याचा अधिकार दिला. यावरून माहीत होते की पंच न्यायालयीन अधिकार  ठेवू शकत नाही. जर न्यायालयाने त्यांना तसा अधिकार दिला तर अशा स्थितीत पंचाचा निर्णय वैधानिक निर्णय ठरतो.
६२) अरबीमध्ये `अस्साहिब बिल जंबी' आहे. म्हणजे नेहमी बरोबरीने उठणारा बसणारा मित्र आहे आणि असा मनुष्यसुद्धा ज्याच्याशी कधी सहवास घडावा. उदा. आपण बाजारात  जाताना एखाद्याने तुमच्याबरोबरीने सोबत चालावे तसेच एखाद्या दुकानावर तुम्ही माल खरेदी करत आहात आणि त्यावेळी दुसरा खरेदीदार तुमच्यासोबत बसलेला आहे. किंवा प्रवासात  कोणी मनुष्य आपला साथी (सहप्रवासी) असेल. हा क्षणिक संबंधसुद्धा प्रत्येक सभ्य आणि सज्जन व्यक्तीवर एक अधिकार निश्चित करतो. अपेक्षा असते की त्याने यथासंभव त्या  साथीदारबरोबर चांगला व्यवहार करावा आणि त्याला त्रास देण्यापासून वाचावे.
६३) अल्लाहच्या कृपेला लपविणे म्हणजे मनुष्याने असे राहावे की अल्लाहने त्याच्यावर कृपा केली नाही. जसे कोणाला अल्लाह धनसंपत्ती देतो आणि तो आपल्या योग्यतेपेक्षा कमी  दर्जाचे राहाणीमान ठेवत असतो आणि स्वत: वर आणि आपल्या मुलाबाळांवर खर्च करीत नाही. अल्लाहच्या दासांना मदत करीत नाही की चांगल्या कामात भाग घेत नाही. लोकांनी  पाहिल्यावर समजावे की बेचारा गरीब आहे त्रस्त आहे. ही अल्लाहची घोर कृतघ्नता आहे. हदीसकथन आहे, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ``अल्लाह जेव्हा एखाद्या दासाला  संपत्ती देतो व त्याच्यावर कृपा करतो तेव्हा अल्लाह पसंत करतो की याचा (समृद्धी) प्रभाव दासावर प्रकट व्हावा.'' म्हणजेच त्याचे खाणे पिणे, राहणीमान, कपडेलत्ते, घर आणि  त्याच्या व्यवहारातून तसेच प्रत्येक गोष्टीत अल्लाहने दिलेली संपत्ती प्रकट व्हावी.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget