Halloween Costume ideas 2015

मस्जिद परिचय – स्तुत्य उपक्रम

आपल्या देशातील सध्याचे वातावरण अतिशय संवेदनशील आणि सांप्रदायिकतेला खतपाणी घालणारे बनू पाहात आहे. केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाल्यापासून देशाच्या सहिष्णुतेला  धोका निर्माण करण्याचे काम येथील काही असामाजिक तत्त्वांनी मोठ्या जोमाने सुरू केले आहे. देशात अनेक राज्यांमध्ये मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली. अनेक ठिकाणी महिलांवरील बलात्कार व लैंगिक अत्याचारांचे प्रमाण वाढले. हिंदुत्वाच्या पाठिराख्यांचा विशिष्ट समाजाविरूद्धचा द्वेष उफाळून येऊ लागला. मुस्लिम आणि इस्लामविरूद्ध जे अभियान  गेल्या ७० वर्षांपासून सतत या संघटनांनी चालू ठेवले आहे त्याचे परिणाम उमटले नाहीत, हे मुस्लिमांच्या संयमी धोरणामुळेच. देश आणि महाराष्ट्रातील सांप्रदायिक सौहार्द अबाधिक  राखण्याच्या उद्देशाने जमाअत-ए-इस्लामी हिंद या सामाजिक संघटनेतर्फे संपूर्ण देशात तसेच महाराष्ट्रात मस्जिद परिचयाचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. या उपक्रमास  समाजातील विविध धर्मीयांकडून उत्तम प्रतिसादही मिळत असून त्यांना मस्जिदबरोबरच इस्लाम धर्माबद्दल सखोल माहिती उपलब्ध करून दिली जात आहे. मस्जिद हे समाजात एकोपा  निर्माण करण्याचे उत्तम ठिकाण आहे आणि एकतेचे संरक्षणाद्वारेच ईश्वरीय लक्ष्य पूर्ण होऊ शकते.
पवित्र कुरआनमधील  तिसरा अध्याय आलिइमरानच्या आयत १०३ मध्ये ईश्वराने स्पष्टपणे सांगितले आहे की सर्वजण मिळून अल्लाहच्या (ईश्वराच्या) दोरीस घट्ट धरून असा आणि आपसात मतभेद बाळगू नका. हाच संदेश मस्जिद परिचय या उपक्रमाद्वारे विविध मस्जिदींमध्ये अन्य धर्मीयांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सध्या सर्वत्र सुरू आहे.
मस्जिदमध्ये अदा करण्यात येणाऱ्या नमाजव्यतिरिक्त या पवित्र स्थानाचे महत्त्व आणि त्याचे अनेक पैलूदेखील समजावून सांगण्यात येतात. यामध्ये सामाजिक पैलूदेखील आपणास  आढळून येतो. इस्लामी संस्कृती आणि विचारधारेनुसार मस्जिद हे उपासनेचे पवित्र स्थान आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे समाजविघातक व आक्षेपार्ह कार्य अजिबात पार पाडले जात  नाही. मस्जिद हा इस्लामचा अविभाज्य भाग आहे. मात्र अज्ञानतेने काही मंडळी याला इस्लाममध्ये मस्जिदीला स्थान नसल्याचे निर्वाळे देतात, तर काही सामाजिक द्वेषभावना  बाळगणारे लोक मस्जिदीला दहशतवादाचे उगमस्थान म्हणतात, ही अतिशय चुकीची विचारसरणी आहे. मस्जिद हे इस्लामी संस्कृती, कला व सभ्यतेचे केंद्र असते. या ठिकाणी लोकांमध्ये एकता व सहकार्याची भावना निर्माण होते आणि त्यांच्या सामाजिक बाबींवरदेखील चर्चा केली जाते. धार्मिक उपासना पार पाडण्यासाठी विशिष्ट स्थळाचे नियोजन असते तोच  विधी पार पाडण्यासाठी म्हणजे निर्मात्याशी संपर्क साधण्याचे ठिकाण म्हणजे मस्जिद होय. इमस्जिदमध्ये नमाज अदा करणे ही इस्लाममधील सर्वांत महत्त्वाची उपासना आहे.  नमाजमध्ये ईशदास नतमस्तक होतो (सजदा करतो) म्हणजेच ईश्वरासमोर समर्पित होतो. हीच गोष्ट कुरआनमध्ये अध्याय अन्नहल आयत ४९ मध्ये ईश्वर म्हणतो की पृथ्वी व  आकाशांत जितक्या प्रमाणात सजीव निर्मिती आहे आणि जितके दूत, सर्व अल्लाहसमोर नतमस्तक होत आहेत, ते कदापि घमंड करीत नाहीत. यावरून मस्जिदीचा अर्थ हादेखील होतो  की ते सजदा करण्याचे ठिकाण आहे. म्हणूनच मस्जिदीला धार्मिक संस्कृतीत ईश्वराचे घरसुद्धा म्हटले जाते. मस्जिदीमधील उपासनेमुळे मनुष्यास आत्मशुद्धी प्राप्त होते. ईश्वराची  निकटता प्राप्त होते. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एकदा असे म्हटले आहे की ईश्वर म्हणतो की जमिनीवरील लोकांना आकाशातील तारे जसे चमकताना दिसतात त्याप्रमाणे  जमिनीवरील माझे घर म्हणजे मस्जिदी अस्मानवाल्यांना चमकताना दिसतात. एकतेचे प्रतीक असलेली मस्जिद समाजासाठी मागे उरणाऱ्या मूलभूत गरजांपैकी एक आहे. मस्जिदीत  महिला, पुरुष, आबालवृद्धांसहित अनेक प्रकारचे लोक आणि विविध विचारांचे लोक एकत्र येतात. एक मन एका दिशेसह खांद्याला खांदा लावून नमाजसाठी रांगेत उभे राहातात.  मस्जिदीमध्ये महिलांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात येते. आपल्या देशात किंबहुना महाराष्ट्रातदेखील अशा अनेक मस्जिदी आहेत ज्यामध्ये महिलांसाठी नमाज अदा करण्याकरिता  वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
मस्जिदमध्ये जाण्याने मनुष्य एकांताची भावना आणि दु:खापासून मुक्त होतो. तसेच जीवनाबाबत सकारात्मक दृष्टिकोन, प्रार्थनेची स्वीकारोक्ती, विश्वासाची भावना व ईश्वरावरील श्रद्धा,  सामूहिक स्वरूपात ईशयाचनेद्वारे ईशकृपेस पात्र होणे, परस्पर संपर्काद्वारे मैत्री व चांगुलपणाची भावना दृढ होते. खरे तर मस्जिदीत लोकांदरम्यान उपस्थित राहिल्याने त्यांच्याप्रती  आत्मिक व भावनात्मक लगाव निर्माण होतो. त्यामुळे मनुष्यास मानसिक समाधान आणि शांततेचा आभास होतो. एका मस्जिदीमध्ये विविध मत आणि संप्रदायाचे लोक एकत्र येणे हे त्यांच्या दरम्यान आस्था व मताच्या दृष्टिकोनातून असलेले अंतर त्यांना विभक्त करू शकत नसल्याचे द्योतक आहे. म्हणूनच की काय जमाअत-ए-इस्लामी हिंद या संघटनेने अन्य  धर्मीयांना मस्जिदमध्ये बोलावून या पवित्र स्थानाचा परिचय करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यात या संघटनेला यशही लाभत आहे. त्याचबरोबर देशात व समाजात  सांप्रदायिक सौहार्दाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होत आहे.

-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget