Halloween Costume ideas 2015

संत तुकाराम महाराज आणि इस्लाम

स्वातंत्र्य, समता, बंधूता आणि न्याय ही भारतीय राज्यघटनेची मूलतत्वे भगवान बुद्धांशी निगडित असली तरी बुद्धानंतर पैगंबर येशू ख्रिस्तांनी आणि त्यांच्या पश्‍चात पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी घडविलेल्या महान क्रांतीची मूलतत्वे देखील हीच आहेत. मध्ययुगीन काळात भारतात अठरापगड जातीच्या संतांची परंपरा जी एकाएकी उदयास आली तिच्या मागेदेखील तत्कालीन मुस्लिम राजवटीचा आधार होताच. अन्यथा जेथे देवाचे नाव घेण्याचाही अधिकार नव्हता तेथे ’संत’ होण्याचा काय प्रश्‍न?
    संत तुकाराम महाराजांनी तत्कालीन सामाजिक ज्वलंत समस्यांविरूद्ध बंड पुकारले. ते आपल्या किर्तनातून आणि प्रबोधनातून समतेचा, बंधुत्वाचा, न्यायाचा आणि नीतिचा संदेश देऊ लागले. अंधश्रद्धांविरूद्ध प्रखर भूमिका घेऊ लागले. सकल चराचर सृष्टीचा निर्माता अर्थात ईश्‍वर एकच असल्याचे ठामपणे सांगू लागले. उदा.
‘आपुला तो एक देव करूनी घ्यावा, तेणे, वीण जीवा सुख नव्हे’, का रे नाठवीसी कृपाळू देवासी, पोसीतो जगासी एकला तो.’ इ.त्यांच्या अभंगातील चरणे प्रमाण आहेत, आपल्या काही अभंगांतून तुकोबांनी अनेक वेळा प्रत्यक्ष ’अल्लाह’ या शब्दाचा उल्लेख केलेलाही आढळतो. उदा. ’अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारू अल्ला खिलावे’ अल्ला बगर नहीं कोये अल्ला करे सो ही होये..’
    एकेश्‍वरवादाबरोबरच तुकोबांनी समता आणि बंधुत्वाचे जोरदार समर्थन केले आहे. उदा.
‘अवघी एकाचीच वीण तेथे कैचे भिन्नभिन्न’ ’भेदाभेद भ्रम अमंगल’ ‘कायबा करीशी सोवळे ओवळे’ मन नाही निर्मळ वाऊगेची. समस्त मानवजात एकाच माता-पित्याची संतान असल्यामुळे सर्व आपापसात बंधूभगिनी व समान आहेत. ही इस्लामची भूमिका संत तुकाराम महाराज अभंगातून मांडतात.
“ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनि म्हणती साधू
अंगा लावुनिया राख, डोळे झाकुनी करिती पाप”
    असे अनेक अभंग तुकोबांच्या अंधश्रद्धा विरोधी भूमिकेची आणि माणसाला विचार, चिकित्सा, समीक्षा करण्यावर प्रवृत्त करण्याची साक्ष देतात. दिव्य कुरआनात अनेक ठिकाणी या आयाती आढळतात. ’अफलाताकेलून’, ’तुम्हाला अक्कल नाही काय?’
    ’अफला तुलसीरून’, तुम्हाला डोळे नाहीत काय? ’अफला तदब्बरून’ तुम्ही विचार, चिंतन का करत नाही?
    अशाप्रकारे तुकोबा आणि इस्लाम मानवी आचारविचारांच्या स्वातंत्र्याचे समर्थन करतात. मृत्यू अटळ आहे आणि माणसाला आपल्या बर्‍यावाईट कर्माची फळे मृत्यूपश्‍चात भोगावीच लागतील. हा ’आखिरत’चा इस्लामी संदेश तुकोबांच्या गाथेत अनेक अभंगांतून प्रत्ययास येतो. उदा.
’कठिण हे दुःख यम जाचतील, कोण सोडवील तसे ठायी’, राहतील दूर सज्जन सोयरी, आठवे श्रीहरी लवलाही” ’ मायबाप सवे न ये धनवित्त करावे संचित भोगावे ते.’
    अर्थात प्रत्येक माणसाला मृत्यू पश्‍चात ईश्‍वरासमोर आपल्या तमाम कर्माचा जाब द्यावा लागेल आणि ज्याचे जसे कर्म असेल तसाच त्याला मोबदला भेटेल. या बाबतीत तुकोबा आणि इस्लामच्या शिकवणीत जबरदस्त साम्य आहे.
    इस्लामी उपासनेची संकल्पना जीवनव्यापी आहे. जीवनातील प्रत्येक काम उपासना आहे. मात्र ते अल्लाहच्या आज्ञेनुसार असावे. संसार करणे, कमावणे, मुलाबाळांचे संगोपन करणे, समाजसेवा, राजकारण इ. सर्व उपासना, भक्ती, इबादतच आहे. मात्र ते ईश आदेशानुरूप केले तर.
    तुकोबांनासुद्धा भक्तीची हीच व्यापक व्याख्या अभिप्रेत आहे. असे त्यांच्या अनेक अभंगातून स्पष्ट होते. उदा. ’जोडोनिया धन उत्तमची व्यवहारे, उदास विचारे वेच करी,’ जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा.
    माता पित्यांच्या सेवेची कुरआन आणि पैगंबरांनी सक्त ताकीद केली आहे. ’आईच्या चरणांखाली स्वर्ग आहे’ असे पैगंबर (सल्ल.) म्हणतात तर तुकोबा म्हणतात, ‘माय बापे केवळ काशी, तेणे नवजावे तीर्थासी’ तुकोबांनी आपल्या प्रबोधन कार्याची सुरूवात वडिलोपार्जित सावकारकीची कागदपत्रे इंद्रायणीत बुडवून केली. त्यांनी कर्जदारांना व्याजही माफ केले आणि मुद्दलही सोडून दिले. इस्लाममध्ये व्याज घेण्या- देण्याला हराम (निषिद्ध) म्हटले आहे हे जगजाहीर आहे.
    उपरोक्त संक्षिप्त विवरणावरून स्पष्ट होते की, तुकोबा महाराजांची शिकवण आणि इस्लाममध्ये जबरदस्त साम्य आहे. ही बाब आणखी भक्कम करणारा इतिहास आहे. तो हा की तत्कालीन सूफी संत हजरत अनगढशाह फकीर (रहे.) आणि संत तुकाराम महाराज यांचे घनिष्ठ संबंध होते. अर्थात वैचारिक देवाणघेवाण ही होती. अनगढशाह फकीर (रहे.) तुकोबांना भेटण्यासाठी पुण्याहून देहूला जात असत. या दोन महापुरूषांची प्रथम भेट जेथे झाली ते ठिकाण देहूपासून पुण्याकडे साधारणतः एक कि.मी. अंतरावर आहे. आजही तेथे अनगढशाह बाबांचे ठाणे (अस्ताना) आहे आणि तुकोबांची पालखी पंढरपूरला प्रयाण करते तेव्हा प्रथम अनगढशाह बाबांच्या ठाण्यावर सलामीसाठी थांबते. तद्वतच अनगढशाह बाबांच्या रास्ता पेठ, पुणे स्थित खानकाह (मठ) मध्ये तुकोबांची किर्तने होत असत. छत्रपती शिवाजी महाराजही येथे किर्तन ऐकण्यासाठी येत असत. तुकोबांच्या कीर्तनाचे जे चित्र आज उपलब्ध आहे त्यात तुकोबा महाराज कीर्तन करताना दिसतात तर श्रोत्यांमध्ये अनगढशाह बाबा व शिवाजी महाराज शेजारी बसून अत्यंत तन्मयतेने कीर्तन श्रवण करताना दिसतात. हजरत अनगढशाह बाबा आणि तुकोबांची ही मैत्री आजही अबाधित आहे.
    अद्यापही दरवर्षी देहूहून पंढरपूरला जाणारी तुकोबांची पालखी पहिला मुक्काम पुण्यामध्ये रास्ता पेठेत अनगढशाह बाबांच्या दर्ग्याच्या प्रांगणात करते. अनगढशाह फकीर बाबांना सलामी देऊन तुकोबांची दिंडी पंढरपूरकडे प्रयाण करते.
    हेच प्रेम, हीच सद्भावना, हाच एकोप्याचा वारसा जोपासण्याची आज देशाला आणि महाराष्ट्राला नितांत गरज आहे. इतिहासकारांनी यासंबंधी संशोधन करून हा माणसे जोडणारा इतिहास समाजासमोर आणणे अत्यंत गरजेचे आहे.

 - डॉ. सय्यद रफिक पारनेरकर, अहमदनगर

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget