Halloween Costume ideas 2015

20 कोटींची गर्दी!


लोकशाही व्यवस्थेत संख्या महत्वाची असते. असे असतानादेखील जवळपास 20 कोटी लोकसंख्या असलेला मुस्लिम समाज हा प्रभावशुन्य का झाला हा संशोधनाचा विषय आहे. मुस्लिमांचे हे मागासलेपण फक्त या समाजासच नव्हे तर संपूर्ण देशासाठी हानिकारक आहे. कारण देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व समुहांचा समान विकास अनिवार्य असतो. एखादा समूह जरी विकासापासून वंचित राहिला तर त्याचे नुकसान संपूर्ण देशाला भोगावे लागते. कारण त्या मागासलेल्या समुहाचा अतिरिक्त भार हा इतर विकसित समाजाच्या कष्टाच्या कमाईतून करावा लागतो व विकासाच्या अशा असंतुलनामुळे देश प्रगती करू शकत नाही. विकास सर्वांगीण झाला नाही तर तो विकार बनतो. म्हणून देशातील जवळपास 1/5 एवढ्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या मुस्लिम समाजाचे मागासलेपण संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय व्हायला हवा. एवढेच नव्हे तर त्यावर तात्काळ ठोस उपाय योजण्याची आवश्यकता आहे.
    भारतीय उपमहाद्विपावर ज्या मुस्लिम राज्यकर्त्यांनी जवळपास 900 वर्षे राज्य केले तसेच स्वातंत्र्य संग्रामात मोठे योगदान दिले, तो समाज भारताच्या फाळणीनंतर मानसिकदृष्ट्या जर्जर झाला, अभिजात आणि सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात पाकिस्तानात निघून गेला. जे भारतात रहिले त्यांच्याकडे पाकिस्तानात जाण्याचा पर्याय असूनसुद्धा ते स्वेच्छेने भारतातच राहिले. तसे पाहता फाळणी ही फक्त भूप्रदेशाचीच झाली नाही तर यामुळे मनं सुद्धा फाळली गेली. शेकडो वर्षे गुण्यागोविंदाने राहणार्‍या हिंदू-मुस्लिम समाजात या फाळणीने दरी निर्माण केली. त्याची सल अद्यापपर्यंत पाहायला मिळते. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात होणार्‍या नियमित दंगली ह्या त्याच दुभंगलेल्या मनाचे प्रतिक आहे. या संघर्षामुळे भारतात हा समाज नेहमीच असुरक्षिततेच्या भावनेत राहिला. किंबहुना ठेवण्यात आला.
    दुबळ्या राज्यकर्त्यांना या स्थितीचा भरपूर वापर केला व या दरीला आणखीन रूंद करण्याचे काम केले. द्वेषाच्या या अग्नित आणखी तेल ओतले व सातत्याने हिंदू-मुस्लिम वाद पेटवत ठेवण्याचे काम करून आपली राजकीय पोळी भाजून घेतली. अलीकडील काळात तर देशाच्या सर्वात प्रमुख पक्षाचे अस्तित्वच मुस्लिम विरोधावर आधारलेले आहे. विकासाच्या मुद्दयावर सपशेल अपयशी ठरलेल्या राज्यकर्त्यांच्या भात्यात शेवटचा बाण पुन्हा हिंदू-मुस्लिम वाद राहणार यात शंकाच नाही. अशा रीतीने येथील राजकारणी अल्पसंख्यांक मुस्लिमांची प्रतिमा बहुसंख्यांक जनतेसाठी किती धोकादायक आहे हे बिंबवण्यात यशस्वी झाल्याचे दिसते. विकासाच्या मुद्याला बगल देऊन फक्त ’मुस्लिम विरोध’ केंद्रस्थानी करून राजकारण करण्याचा डाव सोयीस्कररित्या चालू आहे.
    एकीकडे विद्वेषी राज्यकर्त्यांच्या षडयंत्राचा शिकार तर दुसरीकडे प्रचंड मागासलेपण अशी दोन मोठी आव्हाने देशातील मुस्लिम समाजासमोर आहेत. या समाजाच्या सातत्याने होणार्‍या अधोगतीला जेवढे बाह्य कारणं जबाबदार आहेत त्यापेक्षा जास्त अंतर्गत कारणे कारणीभूत असल्याचे निदर्शनास येते. या दोन कारणांचे निष्पक्ष विश्‍लेषण झाल्याशिवाय आपण प्रगतीच्या वाटा चोखाळू शकत नाहीत.
    वास्तविक पाहता स्वातंत्र्योत्तर काळात मुस्लिमांच्या अधोगतीला स्वतः 70 वर्षे राज्य केलेली सर्व सरकारे जबाबदार आहेत. जणू हा त्यांचा सामूहिक अजेंडाच होता. 1947 च्या तुलनेत अद्यापपर्यंत मुस्लिमांची जी सातत्याने दुर्दशा झाली हे त्याचे द्योतक आहे. कारण की भारतातील एवढा मोठा समाज सातत्याने 70 वर्षे निरंतर अधोगतीकडे जात असताना त्याची जाणीव शासकाला नसावी हे न उमजण्यासारखे आहे. म्हणून अधोगतीचा हा कार्यक्रम नियोजनबद्ध असावा अशी शंका निर्माण होते. मुस्लिम समाजाच्या विकासासाठी काँग्रेस शासित काळामध्ये सच्चर कमिटी, रगनाथ मिश्रा आयोग, महमद उर रहेमान कमिटी इत्यादी जेवढे आयोग नेमले ते सर्व देखावे मात्र होते. कारण की या सर्व आयोगाच्या अत्यंत गंभीर अशा शिफारशींना केराची टोपली दाखविण्यात आली.
    स्वातंत्र्योत्तर काळात मुस्लिमांना सरकारी नोकर्‍यांपासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे शिक्षण घेऊन करायचे तरी काय ही भावना समाजात निर्माण झाली. म्हणून माध्यमिक शिक्षणानंतर कॉलेजकडे जाण्यापेक्षा हा समाज छोट्या मोठ्या व्यवसायाकडे वळला आणि कशीबशी उपजीविकेची साधणे शोधू लागला; परंतु, फक्त संघर्षाने उदरनिर्वाहाचा प्रश्‍न मिटला असला तरी हा समाज आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती करू शकला नाही. शैक्षणिक मागासलेपणामुळे प्रशासनात त्याचे प्रतिनिधीत्व कमी होत गेले. आर्थिक मागासलेपणामुळे तो सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मागे राहू लागला आणि या दुर्बलतेमुळे तो राजकीय कसोटीत देखील मागे पडला. अशारीतीने भारतातील वीस कोटी मुसलमान आज आपल्या अस्तित्वाच्या लढाईत जीवन जगत आहेत.
    ज्याप्रमाणे शासकीय नोकरीत नियोजबद्धरित्या या समाजाला दूर करण्यात आले. त्याचप्रमाणे षडयंत्रकाराने मुस्लिम समूहात हेतूपुरस्पर सक्षम नेतृत्व उभे राहू दिले नाही. काही अपवाद वगळता स्वातंत्र्योत्तर काळात मुस्लिमांमध्ये कोणताही मास लिडर आढळत नाही. निकृष्ट लोकांना समाजावर लादण्यात आले. या नेतृत्वाने समाजाचे प्रश्‍न शासन दरबारी मांडण्याऐवजी पक्षाचे फर्मान समाजावर लादण्याचे काम केल्याचे दिसते. अधिकांश नेतृत्वाने ’लिडर’ पेक्षा ’डीलर्स’चे काम केल्याचे दिसते. सक्षम नेतृत्वाच्या अभावामुळे हा समाज संघटित होऊ शकला नाही किंबहुना त्याला संघटित होऊ दिले नाही. त्यामुळे हा समाज राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या अनाथच राहिला. कारण नेतृत्वच संघटन घडवित असते. नेतृत्व व पर्यायाने संघटनेच्या अभावामुळे तसेच या समाजाकडे रचनात्मक ठोस कृती कार्यक्रमाच्या अभावामुळे हा समाज दिशाहीन झाला. जवळपास 20 कोटींचा प्रचंड जनसमुदाय राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या अस्तित्वहीन झाला असून अफाट लोकांची गर्दी मात्र आहे आणि गर्दी कितीही मोठी असली तरी कोणतेच ’इन्क्लाब’ आणू शकत नाही. परिवर्तनासाठी गर्दीची नव्हे तर शिस्तबद्ध संघटनेची आवश्यकता असते.
    षडयंत्राची ही दोन महत्वाची कारणे असली तरी यापेक्षा महत्वाची अंतर्गत कारणांची मीमांसा केल्याशिवाय हे विश्‍लेषण पूर्ण होऊ शकत नाही आणि समस्येचा जोपर्यंत निष्पक्ष विश्‍लेषण होत नाही. तोपर्यंत समाधान निघू शकत नाही हे ही तेवढेच खरे आहे.
    अंतर्गत कारणांमध्ये सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे काही सन्माननीय अपवाद वगळता या समाजाच्या बुद्धिजीवींनी निष्पक्ष आत्मपरीक्षण केल्याचे जाणवत नाही. अनेक वर्षांपासून हे तथाकथित बुद्धिजीवी फक्त समस्यांचीच चर्चा करण्यात, मुस्लिम समाजाच्या दुर्गतीचे रडगाणे गाण्यात आणि या परिस्थितीसाठी दुसर्‍यांना दोषी ठरविण्यातच व्यस्त राहिले.
    उम्र भर गालीब, यही भूल करता रहा
    धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा
    फक्त समस्यांवर चर्चा करण्याऐवजी त्यांनी त्यातील दहा टक्के ऊर्जा जरी त्यांच्या समाधानांवर खर्च केली असती तरी आज समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक स्थितीत आमुलाग्र बदल घडला असता. ही चर्चासत्रे नशिस्तन, गुफ्तन, बर्खास्तन यापुढे जाऊ शकली नाहीत. तथाकथित विचारवंतांची डोकी समस्यांच्या चर्चेतच लॉक झाली. विरोधकांना आणि परिस्थितीला दोष देऊन मैफिल बरखास्त झाली. वास्तविक पाहता कोणत्याही समाजाला बाह्यशक्ती कधीच पराभूत करू शकत नाही. समाज जेव्हा आपले आत्मपरीक्षण थांबवितो तेव्हा त्याच्या अधोगतीची खरी सुरूवात होत असते.
    मला वाटते मुस्लिम समाजाच्या अधोगतीचे दूसरे मुख्य कारण त्यांनी ’इस्लाम’पासून ठेवलेले अंतर होय. भारतात ज्याप्रमाणे अनेक धर्म हे फक्त कर्मकांडापुरतेच मर्यादित आहेत. तसेच इस्लामला समजून बहुसंख्य मुस्लिमांनी त्याला इबादतींपुरते मर्यादित करून टाकले. वास्तविक पाहता इस्लाम फक्त धर्म नसून एक परिपूर्ण जीवनपद्धती आहे. बहुसंख्य मुस्लिमांच्या प्रत्यक्ष आचरणात इस्लाम न आल्यामुळे इतरांपेक्षा आपण आपले वैशिष्ट्य गमावून बसलो. उत्कृष्ट जीवन पद्धतीला तिलांजली दिल्यामुळे येथील बहुसंख्यांक समाजाच्या जीवनपद्धतीचा या समुदायावर आपोआप प्रभाव पडला. वैयक्तिक, सामाजिक व व्यावहारिक जीवनात याचे प्रतिबिंब सर्वत्र आपल्याला पाहायला मिळतात.     मुस्लिमांमधील एक मोठा वर्ग ऐहिक जीवनापासून उदासीन झाला. मानवसेवेसाठी आपले योगदान थांबून मरणोत्तर जीवनाच्या तयारीत मग्न झाला. अल्लाहने मुस्लिमांना या जगामध्ये यासाठी नेतृत्व दिले होते की, त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावून मानवतेची सेवा करावी. आपल्या सुरूवातीच्या काळात युरोपमध्ये मुस्लिमांनी शेकडो विद्यापीठे, रूग्णालय, अनाथालय, न्यायालये इत्यादी लोकोपयोगी वास्तू उभारल्या होत्या. आज हा समूह फक्त मोठमोठ्या अलिशान मशिदी बांधण्यातच व्यस्त आहे. निश्‍चितच यातील खर्च कमी करून अशिक्षित मुस्लिम समाजासाठी शाळा बांधता आल्या असत्या, मुस्लिम महिलांची शिक्षणाची सोय करता आली असती, मुस्लिम महिलांसाठी प्रसुतीगृह बांधण्यात आली असती; परंतु, ज्या समुहाकडे विकासाचे कोणतेच दीर्घकालीन नियोजन नसेल तर तो या व्यतिरिक्त विचार तरी काय करू शकणार?
    इस्लामने सर्व भेदभावांना समूळ नष्ट करून सर्व मानवतेला समसमान केले. विशाल जनसमुदायात सर्व घटकांसाठी आचरणास सोपे जावे म्हणून त्यात लवचिकता ठेवली; परंतु, याचा विपर्यास करीत समाजात जमातवाद निर्माण करीत धर्माच्या एकतेच्या गाभ्यालाच नुकसान पोहोचवून संघटन विस्कळीत केले गेले. जो धर्म फक्त मुस्लिमांनाच नव्हे तर संपूर्ण मानवजातीला एकसंघ करण्यासाठी आला होता त्याच्याच अनुयायांनी अगदी क्षुल्लक कारणावरून या समाजात टोकाचे मतभेद निर्माण केले. हे मतभेद एवढे विकोपाला गेले की, या समाजाला आता शत्रूंची गरजच शिल्लक राहिली नाही. ऐहिक व पारलौकिक या दोन्ही विश्‍वांसाठी सर्वात यशस्वी, सोपी आणि आधुनिक जीवनपद्धती ’इस्लाम’ आहे व तीच पद्धती सोडल्यामुळे हा समाज मागासलेल्या आणि निकृष्ट जीवनपद्धतीकडे वळला व ऐहिक जीवनाच्या आहारी गेला. दुनियेच्या प्रेमात पडल्यामुळे तो ईश्‍वरी आदेशांना आणि त्याच्या  स्वतःच्या अस्तित्वाच्या उद्देशालाच विसरला. त्याच्या अस्तित्वाचा उद्देश सत्य, शांती आणि न्याय प्रस्थापित करणे हा होता. तसेच अन्याय, अत्याचार आणि अशांती विरूद्ध संघर्ष करून संपूर्ण मानवजातीला यशस्वी आणि शांतीपूर्ण जीवन प्रदान करणे हा होता. जेव्हापासून या समाजाने आपल्याला मूळ उद्देशापासून दूर केले. विशेषतः त्यांच्यातील सुशिक्षित सधन आणि बुद्धिजीवी वर्ग आपल्या मूळ उद्देशापासून विलग झाला, तेव्हापासून हा समाज वाईटाकडे ओढला गेला व याच्या अधोगतीची सुरूवात झाली. कारण
बुराई बुरो के शर से नहीं
अच्छों के खामोशी से फैलती है.

    भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार, असमानता यासारख्या अनेक समस्येंनी जर्जर झालेल्या भारतीय समाजाला जर मुस्लिम नेतृत्वांने कुरआनाच्या मार्गदर्शनात समाधान दिले असते तर या समाजाने त्यांना डोक्यावर घेतले असते. जसे त्यांनी याच देशात अत्यंत अल्प अशा मुस्लिमांना जवळपास 900 वर्षे नेतृत्व दिले. कारण त्यावेळेस आपण मानवतेचे उद्धारक होतो, मानवसेवेचा धर्म पाळला होता. परंतू जेव्हापासून आम्ही मानवतेच्या निःस्वार्थ सेवेतून परावृत्त झालो तेंव्हापासून या मानवतेने आम्हाला निवृत्त करून वाळीत टाकले. आज अशी स्थिती आहे की हा समाज लोकांसाठी नकोसा झाला आहे.
    मुस्लिम समाजाला जर भारतात आपले पूर्व वैभव, प्रतिष्ठा आणि यश मिळवायचे असेल तर त्याला निःस्वार्थपणे मानवसेवेकडे वळावे लागेल. मानवसेवा हा फक्त त्याचा धर्म नसून कर्तव्य आहे. त्याला मागणार्‍याच्या भूमिकेतून निघून देणार्‍याच्या भूमिकेत यावे लागेल. फक्त मुस्लिम समाजाच्याच नव्हे तर संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी झटावे लागेल. येथील अन्याय, अत्याचार आणि शोषणाविरूद्ध आवाज उठवून शोषित आणि पीडित समाजालाही न्याय मिळवून द्यावा लागेल. या देशातील असमानता दूर करून सर्वांसाठी समान हक्काची लढाई लढावी लागेल. तसेच येथील भ्रष्टाचार आणि अशांती विरूद्ध एल्गार पुकारून एक शांतीपूर्ण समाजाच्या स्थापनेचे अहोरात्र प्रयत्न करून वास्तविकरित्या या देशाला कल्याणकारी राष्ट्र बनवावे लागेल आणि हे काम या देशात मुस्लिमच अग्रक्रमाने करू शकतात. कारण ही सर्व कामे त्यांचे आद्यकर्तव्य आणि इबादत आहेत.
सबक फिर पढ सदाकत का, शुजाअत का,अदालत का
दुनिया में फिर काम लिया जाएगा तुझसे इमामत का

    यासाठी समाजाच्या नेतृत्वाने निष्पक्ष आत्मपरीक्षणाची गरज आहे. अपयशाचे दोष फक्त दुसर्‍यावरच ना थोपता आपल्या चुका सुधारण्याची आवश्यकता आहे. कितीतरी मतभेद असले तरी व्यापक जनहितासाठी आम्हाला आता कॉमन मिनिमम प्रोग्राम (किमान सहमती कार्यक्रम) अंतर्गत एकत्र यावे लागेल. अशा रीतीने हा समाज मानवसेवेच्या उदात्त उद्देशाने संघटित होऊ शकेल. वास्तविक पाहता मतभेद स्वीकारून एकत्र येणाच्या कृतीलाच संघटन म्हणतात. समाजाला आपल्यामधून नेतृत्व घडवावे लागेल. उसण्या नेतृत्त्वावर अद्यापपर्यंत जगात कोणत्याही  समूहाने प्रगती केली नसल्याचा इतिहास आहे आणि जवळपास 20 कोटींचा हा समाज नेतृत्वहीन असणे ही फक्त दुर्घटना नव्हे तर ऐतिहासिक शोकांतिका आहे. समाजातून सक्षम नेतृत्व घडविण्यासाठी हेतूपुरस्पर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. नेतृत्वाचे मातीचे पाय असतात. तो सामान्य लोकांमधून आलेला असल्यामुळे सामान्य लोकांसारखे गुण-दोष त्याच्यात आपसुकच आलेले असतात. म्हणून आपल्या नेतृत्वाला परिपूर्णतेच्या कसोटीवर न पाहता त्याच्या गुण-दोषाबरोबर स्वीकारण्याची सवय झाली पाहिजे. तरच समाजात नेतृत्व निर्माण होऊ शकेल. त्याचबरोबर समाजाच्या सक्षम लोकांनी फक्त चर्चा न करता प्रत्यक्ष मैदानात येऊन समाजाच्या आणि व्यापक मानवसेवेचे काम करण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे बुद्धिजिवी आणि विचारवंतांनी एकत्र येऊन दीर्घकालीन कृती कार्यक्रम आखण्याची तीव्र आवश्यकता आहे. फेलींग टू प्लान इज प्लानिंग टू फेल. या युक्तीप्रमाणे नियोजनाशिवाय यश अशक्य आहे.
    भारतात परिस्थिती किती जरी विपरित असली तरी घोर अंधारानंतरच सूर्योदय होतो हे लक्षात ठेवले पाहिजे. द्वेषाला द्वेषाने कधीच मात देता येत नाही. द्वेषी राजकारणाविरूद्ध प्रेमाचे अस्त्र वापरावे लागेल. निःस्वार्थपणे मानवतेच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घ्यावे लागेल. कुरआनचे स्पष्ट मार्गदर्शन आहे की, ’सदाचार आणि दुराचार एकसमान नाही.तुम्ही दुराचाराचे त्या सदाचाराने निरसन करा जे अत्युत्तम असेल, तुम्ही पहाल की तुमच्याशी ज्याचे शत्रुत्व होते, तो जिवलग मित्र बनला आहे.”(कुरआन ः सुरह हा मीम सजदा आयत नं. 34)
    लोकांच्या हृदयात आपली जागा बनवावी लागेल. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतः मैदानात यावे लागेल व ही सर्व निःस्वार्थ कामे फक्त आपल्या निर्माणकर्त्या अल्लाहसाठी करावी लागतील. तसेच या मानवतेला आपल्या खर्‍या निर्माणकर्त्याची ओळख आणि शाश्‍वत यशाच्या जीवनपद्धती ’इस्लाम’शी परिचित करावे लागेल. याच गोष्टी भारतात मुस्लिमासाठी यशाचे द्योतक आहेत. असे ना झाल्यास 20 कोटींचा हा जनसमुदाय अधिक प्रभावहीन होईल व तत्कालीन इतिहास याला ’20कोटींची गर्दी’ असे संबोधेल.
ना समझोगे तो मिट जाओगे ऐ हिंदूस्तांवालो
तुम्हारी दास्तां भी ना होगी दास्तानों में!  
 

- अर्शद शेख
9422222332

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget