Halloween Costume ideas 2015

कुरआनच्या सत्यमार्गातून चालून आलेली ‘मलाला’

साहित्य क्षेत्रात ख्यातनाम एखाद्या लेखकाच्या साहित्यलेखनावर समीक्षण लिहणं म्हणजे – ‘आ बैल मुझे मार’ या म्हणीचा अनुभव घेण्यास उताविळ झालेलो असल्याचे उघड करणे होय, असे मला वाटते आहे. परंतु बाबांनी मलालावरील गोष्टरूपाने एक चमकता तारा आपणासमोर सादर केला. तो पुस्तक-पेनाचं महत्त्व सांगतो आणि तरीही आपण त्यावर समीक्षण  केवळ एका बैलाच्या भीतीने लिहित नसू तर मग... आपलं शिक्षणच वाया गेलं, असं मला प्रकर्षाने जाणवू लागलं. मी मनातल्या मनात म्हणालो, ‘‘मारशील तर मार बॉ!’’ ...येथे  मलालाचं व्यक्तिमत्व मला लिहिण्याची हिंमत देत आहे. यापेक्षा अधिक काय ती ‘बाबांची गोष्ट’ प्रभावी असावी! बाबांनी लिहिलेली ही गोष्ट काही साधीसुधी नाही. यात संघर्ष आहे. त्या  संघर्षासाठी धगधगत्या मशालीसारखे शब्द आहेत. शब्दांमध्ये अशी शक्ती आहे की वाचकाच्या हृदयाला पाझर फुटतो. पाझरलेले हृदय पेटून उठते. एक ठिणगी वनवा बनून साऱ्या जगात धगधगू लागते. त्याच्या प्रकाशात जगातील मुलींच्या शाळा उघडू लागतात. वाचन-लेखन चालू लागते. अधिकाराची जाणीव होऊ लागते. व्यक्तिस्वातंत्र्य कळू लागते. धर्माच्या नावावर  होत असलेला नंगानाच बंद पडतो. जगाच्या नजरा खऱ्याखोट्याचा शोध घेऊ लागतात. मलालाचं महत्त्व पटते. आमहालाही तिची ओळख पटते.
...‘‘अरे हो! ही तर आमच्या सावित्रीचीच लेक ...कोणी गोळी झाडली? ...कोण तो? ...प्रश्नामागून प्रश्नांची सरबत्ती आणि क्रोधाचे ढग जमू लागतात. बाबांची गोष्ट संपते पण मलालाची  गोष्ट संपत नाही. भारतीयांचं हृदय बोलू लागतं... ‘‘अरे पाकड्यांनो, तुम्हाला पौराणिक भारतखंडाचा एक भाग धर्माच्या नावाने दिला तो काय अधार्मिक कृत्ये करण्यासाठी?... लक्षात  ठेवा, जसा दिला तो काळजाचा तुकडा तसो तपरतही घेतला जाईल!’’... जवळजवळ साऱ्या जगातील आबालवृद्धांनी असंच काही बोललं, पण एवढं बोलून गोष्ट बंद झाली नाही. ती पुढे  चालतच राहिली... निरंतर! बाबांच्या या गोष्टीमध्ये डोळ्यांत बसणारे निसर्गचित्र आहे.
ते म्हणतात, ‘‘वर्षातून अधिकांश वेळेस डोंगरमाध्यावर बर्फाचा फेटा गुंडाळलेला असायचा. अंगावर काळीशार शेरवाणी घातलेला धिप्पाड पहाड जणू गावाची पाठराखण करी.’’... तर  कुठे... ‘त्या उकिड्र्याचं’ जेथून मलालाच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली होती. त्याचं बिभित्स वर्णन. इतकेच नाही तर एका विषयाच्या परिघातून दुसऱ्या विषयाच्या परिघात  गोष्टीला नेऊन सुटसुटीत बसवण्याची लेखनशैली या लेखनात पाहावयास मिळते. त्याचं उदाहरण म्हणून- ‘‘तीन-चार वर्षांची झाली नाही तोच पहिल्या वर्गात येऊन बसू लागावी. त्या  वर्गात तिच्याहून मोठ्या वयाच्या मुली असायच्या. आपल्या पाटीवर ती लेखणीनं रेषा काढू लागली. रेषांची चित्रे होऊ लागली. अक्षरांशी मैत्री सुरू झाली.’’
मलाला या गोष्टीच्या पुस्तकात मलालाच्या कर्तुत्वाची गगनभरारी मारण्यास प्रवृत्त करणारी कहाणी आहे आणि तालिबाण्यांच्या क्रूरकृत्यांचा निषेधात्मक पाढा वाचण्यात आला आहे. एकीकडे एक लहान मुलगी जगाला घडविण्यासाठी सर्वांना एकत्र घेऊन विकास साधण्यासाठी म्हणते, ‘‘एक मुल, एक शिक्षक, एक लेखणी आणि एक पुस्तक हे जग बदलवू शकतं.’’ तर  दुसरीकडे स्वात खोऱ्यातील तालिबानी नेते मौलाना फजलुल्लाह म्हणतात- ‘‘महिलांना शिक्षण द्यायचे नाही. मुलींनासुद्धा शाळेत पाठवणं बंद करा. मुलींसाठी सुरू केलेल्या मदरसाही बंद  करा. इस्लामनं महिलांच्या शिक्षणास यापूर्वी प्रोत्साहन दिले होते, असं मला दाखवून द्या. जर कोणाला ते आढळलं तर त्याने यावे आणि माझ्या दाढीवर खुशाल लघवी करावी.’’ लेखक  बाबांनी या अशा तालिबाण्यांचं बिभित्सवर्णन करताना फार प्रभावी शब्द वापरले आहेत. ते लिहितात, ‘‘डोक्यावर विस्कटलेले केस आणि तशाच वाढलेल्या दाढीतली ही हत्यारबंद माणसं  विचित्र दिसत होती. या लोकांचा पोशाख म्हणजे अपरी सलवार, वर लांब कमीज आणि डोक्यावर काळा किंवा पांढरा फेटा गुंडाळलेला असे. काहींच्या पायात मळलेले बुट होते, तर  काहींच्या पायात प्लॅस्टीकच्या चपला. रस्त्याच्या कडेला खांद्यावर बंदूक घेऊन उभे दिसायचे. मळलेल्या पटक्याच्या टोकाला नाक शिकरतांना घाणेरडा आवाज ऐकून तिला किळस  यायची. चेहरा कपड्यात झाकून घेतलेला आणि डोळ्यांच्या ठिकाणी रुपयाच्या आकाराचे छिद्र ठेवलेले होते बघायला. छातीवर काळ्या रंगाची पट्टी होती. त्यावर लिहिलं होतं- ‘शरिया लॉ  म्हणजे हौतात्मसैनिक.’ वाचकांना या गोष्टीचा नायिकेबद्दल आदर, सद्भाव वाटून त्याचं या गोष्टीमधील व्यक्तिमत्व उठावदार दिसावं यासाठी खर्च केलेले शब्द अर्थात भारदस्त उपमा वापरल्या आहेत त्या अशा- शांततेची दूत, आजच्या काळातील जोन ऑफ आर्च, सावित्रीची एक लेक, मानवतेची परी, सावित्री मलाला, पाकिस्तानच्या सावित्रीची लेक, वर्तमानातील एक   चमत्कार, वीरनायिका इत्यादी. या सर्वांमधून गोष्टीतील नायिका उभारून तर येतेच पण बाबांच्या लेखणीची धारसुद्धा जाणवते. यामागे त्यांच्या अनुभवी जीवनाचा, ध्येयवादाचा, लेखन  कौशल्याचा आणि खास म्हणजे दूरदृष्टी ठेवून मेहनतीचा-कष्टाचा-सातत्याचा वारू दौडवत नेण्याचा वाटा आहे. ते आज असे जरी सांगत असले की या गोष्टीचा लेखनकाळ आला आहे  पण त्या लेखनामागे दीर्घकालीन साधना आहे. एकशेबावन्न पानी या अमूल्य पुस्तकास दोन भागांत विभागता येते. एका भागात स्वात खोऱ्यातील नैसर्गिक वर्णनासह अमेरिकेच्या कमर्शियल टॉवरवर तालिबान्यांनी तथाकथित केलेल्या विमान आत्मघाती सफल प्रयोगाचा आणि त्याच दिवसात स्वात खोऱ्यात जन्मलेल्या मलालाच्या बालपणापासून ते बीबीसीपर्यंत जाण्याचा प्रवास शब्दांनी जसाच्यातसा जीवंत ठेवलेला आहे. दुसऱ्या भागात मलालाची डायरी ज्यामध्ये ३९ दिवसांचे मत प्रगट आहे जे बीबीसीच्या उर्दू वाहिनीवर प्रक्षेपित झाले होते. त्यात मलालाचे नाव ‘गुलमकाई’ ठेवले होते. हा तिच्या संरक्षणाचा उपाय जरी होता तरी तिच्यावर दि. ९ ऑक्टो. २०१२ रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याबाबत  जगभरातून प्रतिक्रिया, जागतिक सहकार्य आणि अनेक पुरस्कारांनी होत जाणारा या सावित्रीच्या लेकाची सन्मान अदोरेखांकित आहे. तिचा लढा तिच्या शब्दांत असा- ‘‘मुलींच्या शिक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात माझा लढा आहे.’’ ‘मलाला’ या नावाने पहिल्या भागात सादर झालेली ही विरबाला दुसऱ्या बागात ‘गुलमकाई’ या नावाने प्रगट होते. या एकाच  व्यक्तीच्या दोन नावांनी या गोष्टीचे दोन भाग पाडले, अथवा दोन भाग पाडले जाऊ शकतात.
दुसरा भाग हृदयद्रावक आहे. आसवांना वाट मोकळी करून देणारा आहे. जगभरात तिच्या जगण्यासाठी होणाऱ्या प्रार्थनेत वाचक नकळत सामील होतो, तसेच तो डोळ्यांमध्ये बदल्याची  आग उभी करणारा आहे. पण वाचक जेव्हा मलालाचे शब्द वाचतो की, ‘‘माझ्यावर गोळी झाडलेल्या तालिबानविषयी माझ्या मनात द्वेषाचा लवलेशही नाही. माझ्या हातात बंदू असली  आणि तो जर माज्यासमोर उभा राहिला तरी मी त्याच्यावर गोळी झाडणार नाही. पैगंबर मुहम्मद (स.), प्रेषित येशू खिस्त आणि गौतम बुद्धांकडून मी शिकेलली ही कणव आहे. हाच  वारसा मी मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला आणि मोहम्मद जिनांकडून घेतला आहे. महात्मा गांधी, बादशहा खान आणि मदर टेरेसांकडून शिकलेले अहिंसेचे हे तत्त्वज्ञान आहे.’’  ...आणि वाचकांच्या डोल्यांतील आसवं फुलं होऊ लागतात. त्यातच बदल्याची आग विझून जाते. बाबांनी शब्दरूपात सादर केलेली जगाच्या सर्व मुलींची प्रतिनिधी मलाला ही धैर्यवान,  क्षमाशील, विचारी, परोपकारी, मानवी कल्याणाची कास धरून जगाला... नवे जगनिर्मितीसाठी सज्ज असलेली सर्वसमावेशक शक्ती आहे. ती म्हणते, ‘‘मी एकटी नाही. मी म्हणजे अनेक  जण आहोत. मी म्हणजे जगातील सगळ्या मुली आहेत, ज्यांनी अजून शाळेचा उंबरठा ओलांडलेला नाही. त्या शाळेबाहेरच आहेत.’’ आज निम्मे जग उद्योगधंद्याच्या प्रगतीनं आधुनिकतेची आणि प्रगतीची फळं चाखत आहे; पण निम्मे जग गरिबी, भूकबळी, अन्याय आणि जगण्याचा संघर्ष करीत आहे. हे सर्व सादर करताना स्वात खोऱ्याच्या भौगोलिक व  राजकीय इतिहासाचे वर्णन, इस्लाम धर्माची महती, इस्लाविरूद्ध तालिबानी तत्त्व, स्वातची सामाजिक स्थिती याचे दर्शन घडते.
एकीकडे धर्माच्या नावावर आणि धर्माचीच आड घेऊन स्वातमध्ये रक्ताचे पाट वाहवू पाहणारा सत्तालोलूप तालिबान लेखकांनी आपल्या जीवंत शब्दांनी साकारला आणि जगकल्याणार्थ, जनकल्याणार्थ एक आदर्श जग उभं करण्यासाठी धडपडणारी बालिका खंबीरपणे उभी केली. यापैकी जगाने या बालिकेला सन्मानित केलं. ती विचारते, ‘‘बलाढ्य देश युद्धांसाठी बंदुका देऊ  शकतात, पण पुस्तकं का देऊ शकत नाही?’’
बाबालिखित ‘मलाला’ या पुस्तकाचे आकर्षक मुखपृष्ठ स्वत: मलालाचेच आहे. संतुष्ट गोळेगावकर यांनी गोळा केलेल्या फोटोंपैकी ते एक असावे, कारण मुखपृष्ठाची सजावट ही त्यांचीच  जबाबदारी होती, जी त्यांनी अतिशय खुबीने पार पाडल्याचे जिसते. अक्षरजुळणी धारा प्रिंटर्स प्रा. लि. औरंगाबाद यांचे आहे. अचूक प्रिंटिंग ही त्यांच्या कौशल्याची पावती आहे. आतापर्यंत  या पुस्तकाच्या पाच आवृत्त्या केवळ दोन वर्षांच्या काळात छापाव्या लागणे हे या पुस्तकाचे यश आहे. प्रकाशक साकेतभाऊ यांच्या औरंगाबाद येथील साकेत प्रकाशन आणि बाबांची  लेखनशैली या दोन सुगुणांचा सुवर्णसंगम या पुस्तकाच्या रूपाने अनुभवात येतो. तसे तर साकेत प्रकाशनाची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत आणि बाबांनी पण अनेक विषयांवर प्रभावी  लिखाण केलेले आहे, पण मलालाची गोष्टच न्यारी!... बालशिक्षणाचं स्वप्न पाहणारी मलाला आणि तिच्या जगभरातील मित्रमैत्रिणींना सलाम करीत लेखकांनी लेखणी उचलली आणि  वाचकांसाठी ज्ञानाचा, जीवनाचा, धोरणाचा, परोपकाराचा, संस्काराचा, सभ्यतेचा आणि इतिहासाचा एक आदर्श जगापुढे सादर केला. या पुस्तकाची मजबूत बांधणी, लिखाणाची वाचकांच्या  मनावर घेणारी मजबूत पकड, त्यातून होत जाणारे वाचकांवरील संस्कार या पुस्तकाला घरोघरी मानाचे स्थान देईल. त्यातून निश्चितच एक आदर्श माता, एक आदर्श पिता आणि अशाच  अनेक मलाला निर्माण होण्याची परंपरा सुरू राहील, कारण ही मलाला वडिलांच्या संस्कारातून, आदर्श मातेच्या ममतेतून, कुरआनच्या सत्यमार्गातून चालून आलेली आहे.
कुरआनमधील क्षमा- ‘‘माझ्याजवळ बंदूक असताना आणि माझ्यावर गोळी झाडणारा माझ्यासमोर उभा असतानाही मी त्याच्यावर गोळी झाडणार नाही.’’ ही क्षमा मलालामध्ये दिसते.  तिचे कुरआन सांगते, ‘‘एका माणसाची हत्या मानवजातीची हत्या आक्षहे.’ वडील झियाउद्दीन सतत अल्लाहला म्हणायचे, ‘‘तुझी लेक आहे. तूच आता तिला सांभाळ.’’ कुरआनच्या  आदर्शावर चालणारे हे स्वातमधील मिंगोरा गावी भाड्याच्या घरात राहाणारे गरीब कुटुंब, ज्यामधील कुटुंबप्रमुख अल्लाहवर पूर्ण विश्वास ठेवून ध्येयाकडे चालणारे. त्याच घरातील मलालाची आई, पतीची आज्ञाधारक, आदर्श पत्नी आणि म्हणून त्यांच्या पोटी मलालासारखी ‘सावित्रीची लेक’ जन्माला येऊ शकते. हा आदर्श घेण्यायोग्यतेचे हे पुस्तक आहे. याचे स्थान  पुस्तकांच्या कपटाता नाही तर वाचकांच्या हृदयात आहे, यात नवल नाही. मलाला ही गोष्ट पाकिस्तानच्या एका निसर्गरम्य पण मागासलेल्या प्रांतातील एका मुस्लिम कुटुंबातील मुलीची  आहे. तिच्या कुरबानीची आहे. ही कुरबानी हजरत इब्राहीम (अ.) यांच्या वजनाची आहे. इस्लाम कुरबानी मागतो ते सत्यासाठी, मानवी कल्याणासाठी, जगशांतीसाठी, विश्वबंधुत्वासाठी.  इस्लामने समता, स्वातंत्र्य, सभ्यता, न्याय, लोककल्याण इत्यादींची द्वारे मानवांसाठी उघडी केली आहेत त्याचाच हा परिपाठ. त्यावर चालणाऱ्यांचीच ही गोष्ट आहे. त्यामुळे संग्रही  ठेवण्यायोग्य आणि मार्गदर्शक असे हे पुस्तक आहे. त्याचा लाभ घेण्याची योग्यता मात्र वाचकात पाहिजे. हे पुस्तक परिणामकारक असल्याचा पुरावा म्हणजे मी लेखकांच्या आडनावाचा  उपयोग या समीक्षणात न करणे हो. युद्ध, बॉम्बस्फोट, गोळीबार, हत्या, जाळघपोळ, वाद उभा करणे, दहशत, भांडणतंटा या गोष्टी नकोशा झाल्या. लेखक बाबांचे आडनाव भांडणास  प्रवृत्त करणारे आहे म्हणून मी त्याचा उपयोगच केला नाही. ‘बाबा भांड... बाबा भांड’ असे लिहिल्यास भांडणास प्रवृत्त होऊन बाबा आपल्या समीक्षणातील चुकांना घेऊन आपल्यासोबत  भांडणार तर नाहीत ना!... ही माझ्या मनातील भीती.

पुस्तक : शांततेचे नोबेल पारितोषिक विजेती मलाला
लेखक : बाबा भांड

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget