Halloween Costume ideas 2015

एक प्रदुषण मुक्त नितांत सुंदर अनुभव - ईद-उल-फित्र

- एम.आय. शेख
9764000737


ईद म्हणजे आनंदाचा सोहळा. फित्र म्हणजे दान. येणेप्रमाणे ईद-उल-फित्र म्हणजे दान देण्याचा सोहळा. दान देण्यामध्ये जो आनंद असतो तो अवर्णनीय असतो. इस्लाममध्ये फक्त दोन ईद आहेत. एक ईद-उल-फित्र दूसरी ईद-उल-अजहा. या दोन्ही ईदमध्ये दान देण्यासाठी इस्लामने श्रीमंत मुस्लिमांना प्रोत्साहित केलेले आहे.
    ना डी.जे.चा कर्कश आवाज, ना टुकार चित्रपट गीतांवरील विचित्र नाच. ना आतिषबाजी ना हुल्लडबाजी. ना चंदा ना पट्टी, ना ध्वनीप्रदुषण ना वायू प्रदूषण, ना दारू ना भांग. शांतपणे ईदगाहला जाणे, शिस्तीत दोन रकात नमाज अदा करणे आणि तितक्याच शांतपणे माघारी फिरणे. मग दिवसभर आप्तस्वकीय, शेजारी-पाजारी, मित्र-सहकार्‍यांबरोबर गोड शिर्खुम्याचा आस्वाद घेणे, गरीबांना फित्रा देणे, लहान मुलांना ईदी देणे, थोडक्यात ईद-उल-फित्र म्हणजे एक प्रदुषणमुक्त नित्तांत सुंदर सणाचा अनुभव असतो. ज्याची वर्षभर वाट पाहिली जाते. प्रत्येकजण आपापल्या ऐपतीप्रमाणे ईदची खरेदी करतो. चप्पल, बूट, कपडे, कॉस्मॅटिक्स, ड्राय फ्रुट्स, साखर, सुगंध या सगळ्या खरेदीमुळे बाजार पेठेमध्ये चैतन्याची लाट पसरते, आर्थिक उलाढाला वाढते आणि व्यापार्‍यांना लाभ होतो. थोडक्यात ईद एक फायदे अनेक.
    महिनाभर उपवास करून थकलेल्या जीवांना ईदच्या दिवशी दिलासा मिळतो. खाण्या-पिण्यावरील सर्व बंधने उठलेली असतात, लोक मनसोक्त गोड-धोड खात असतात. एक महिन्याचे खडतर नैतिक प्रशिक्षण पूर्ण झालेले असते. प्रत्येक रोजाधारकाचा नैतिकतेचा निर्देशांक वाढलेला असतो व ह्या लोकांनी पुढील अकरा महिन्यात येणार्‍या मोह, माया, ईर्ष्या, काम, क्रोध, लोभ यांच्यावर मात करण्यासाठी सदाचाराने वागण्याचा निर्णय केलेला असतो.
ईदच्या निमित्ताने इस्लामी व्यवस्थेवर एक दृष्टीक्षेप
    आजच्या आधुनिक जगामध्ये सर्वकाही आहे मात्र नितीमत्तेची वाणवा आहे. चारित्र्यवान लोकांची भीषण टंचाई जाणवत आहे. जवळ-जवळ प्रत्येक देशात दुराचार्‍यांच्या हाती सत्तेची सुत्रे आहेत. जागतिक महासत्तेचा महानायक ट्रम्प एका पॉर्नस्टार (वेश्ये)ला लाखो रूपये डॉलर देऊन जगाला आपली लायकी दाखवून देतो. उच्चशिक्षित डॉक्टर किडनी चोरतो, मुलींचे गर्भ काढतो, अनेक उच्चशिक्षित लोक महिलांच्या आंतरराष्ट्रीय देह व्यापारामध्ये गुंतलेले आहेत. अनेक लोक दारू आणि ड्रगचा व्यवसाय करतात. बालकांची तस्करी होते, प्रगतीच्या नावखाली अधोगती इतकी झालेली आहे की, पुरूष-पुरूषांशी लग्न करीत आहेत. कोणतेच क्षेत्र असे शिल्लक नाही की, ज्यात भ्रष्ट लोकांची मांदियाळी नाही. मानवता विव्हळत आहे. लोक त्राहीमाम-त्राहीमाम करत आहेत. जगाने साम्यवादी आणि भांडवलवादी दोन्ही अर्थव्यवस्थांचा अनुभव घेतलेला आहे. दोहोंमध्ये शक्तीशाली लोक गरीब लोकांचे शोषण करतात, हे सत्य सिद्ध झालेले आहे. वाढत्या स्पर्धेने लोकांच्या जीवनामध्ये तणाव वाढवलेला आहे. आत्महत्येचा दर वाढलेला आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमुळे अलिकडे कोणी विचलित होत नाही. त्यात विद्यार्थी आणि महिलांचीही भर पडत आहे. घरा-घरात मनोरूग्णांची संख्या वाढत आहे. इस्पीतळाबाहेरील वेड्यांची संख्या वाढत आहे. ट्रॅफिक सिग्नलवर 40 सेकंद थांबणेही अस्वस्थ करण्यास पुरेशी ठरत आहेत.
    समाजातून नैतिकतेचे उच्चाटन झालेले आहे. सिनेमा आणि मालिकांमधून अश्‍लिलता लोकांच्या मनामध्ये ओतल्या जात आहेत. ’भाभीजी घरपे हैं’ सारख्या मुल्यहीन मालिकेमधील पात्रांनी आता समाज मनात स्थान मिळविलेले आहे. कोर्टातून फक्त निवाडे येत आहेत. न्याय फार कमी होत आहे. कायद्याची, कोर्टाची, पोलिसांची संख्या वाढत असतानाच गुन्ह्यांचीही संख्या वाढत आहे. तुरूंग अपूरे पडत आहेत. प्रत्येक तुरूंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठासून भरलेले आहेत.
    अनेक पती-पत्नींच्या नात्यातील विश्‍वास संशयाच्या भोवर्‍यात अडकलेला आहे. वरून सुखी वाटणारी अनेक कुटुंबे आतून गृहकलहाने पार पोखरून गेलेली आहेत.
    व्याजाच्या अजगरी विळख्याने गरीबांचे कंबरडे मोडलेले आहे. वृद्धाश्रमांची वाढती संख्या समाजाचे कौटुंबिक आरोग्य ठीक नसल्याची साक्ष देत आहे. समाजातील अधिकाधिक लोक चंगळवादामुळे स्वार्थी बनत आहेत. आपल्या फायद्यासाठी, ”काय पण” करावयास लोक तयार आहेत. घराबाहेर काम करणार्‍या अनेक महिलांचे पावलोपावली शोषण होत आहे. अनेक उद्योगांमध्ये कास्टिंग काऊच (कामाच्या मोबदल्यात शरीर सुखाची मागणी) हे आता उघड गुपित झालेले आहे.
    वाढत्या महागाईने चांगल्या माणसांना सुद्धा भ्रष्टाचार करण्यास विवश केलेले आहे. सरकारी धोरण अशा पद्धतीने ठरविले जात आहे की, सार्वजनिक आरोग्य केंद्रे आणि सरकारी शाळा या बकाल होत आहेत. उलट खाजगी रूग्णालये आणि खाजगी शाळा यांना प्रोत्साहन मिळत आहे. ह्या दोन्ही संस्थांनी कधीच उद्योगाचे स्वरूप घेतलेले आहे. म्हणून सामान्य माणसं यांच्या परिघाच्या बाहेर आपोआपच फेकली गेलेली आहेत. भांडवलशाहीचा नैसर्गिक परिणाम म्हणून पराकोटीची विषमता निर्माण झालेली आहे. राजकारणी लोक भ्रष्ट मार्गाने कमावलेल्या संपत्तीचे हिडीस प्रदर्शन करण्याएवढे निबर झालेले आहेत. वेश्यांचा पॉर्नस्टार म्हणून गौरव केला जात आहे. त्यांना समाजात मानाचे स्थान मिळत आहे. त्यांच्या शुभहस्ते अनेक व्यावसायिक केंद्राची उद्घाटने ’संपन्न’ होत आहेत. नाचणार्‍या-गाणार्‍यांच्या वाट्याला धन, मान, सम्मान, प्रसिद्धी व प्रतिष्ठा येत आहे. तर लेखक, विचारवंतांना फारसे कोणी ओळखत नाही. अब्जावधी लोकांनी चुकीची जीवनपद्धती अंगिकारलेली असून, त्यातून तणाव निर्माण होत आहे.
       या आणि अशा नकारात्मक बाबींनी समस्त मानवतेसमोर एक जबरदस्त आव्हान उभे केलेले आहे. अशा ह्या भितीदायक व्यवस्थेने अमेरिकेच्या नेतृत्वात अवघ्या जगाला कवेत घेतलेले आहे. या व्यवस्थेच्या अजगरी मिठीतून अखिल मानवजातीला सोडविण्याचे मोठे आव्हान जागतिक मुस्लिम उम्माह (समुदाय) समोर उभे टाकलेले आहे. युरोप आणि अमेरिकेमधूनच आता इस्लामी व्यवस्थेला एक संधी द्यावी, हा विचार जन्म घेत आहे. त्यातूनच त्या ठिकाणी  इस्लाम सर्वात वेगाने वाढणारा धर्म बनलेला आहे, असे अमेरिकेच्याच पीयू फोरमने अगदी अलिकडे घोषित केलेले आहे.
    इस्लाम पृथ्वीवरील एकमेव अशी व्यवस्था आहे की, जिच्यावर जगातील 175 कोटी लोक प्रत्यक्ष आचरण करीत आहेत. ही एक अत्याधुनिक व्यवस्था आहे. जिला फक्त 1438 वर्षे झालेली आहेत. मदिनामध्ये सातव्या शतकात साकार झालेली ही व्यवस्था पृथ्वीवर  पुन्हा कुठेही साकार झाल्यास भांडवलशाही व्यवस्था धाराशाही होईल, या भितीने ती कुठेच आकार घेणार नाही. यासाठी पराकोटीची दक्षता भांडवलदारांकडून घेतली जात आहे.
    इस्लामी व्यवस्था ही नैतिक अर्थव्यवस्था आहे. ज्यात व्याज घेण्याला हराम केलेले आहे. या अर्थव्यवस्थेचा विरोध तेच लोक पूर्ण ताकदिनीशी करत आहेत. ज्यांचा डोलारा व्याज आणि अनैतिक व्यवसायावर आधारित आहे. इस्लाम सर्व मानवतेच्या कल्याणासाठी आलेला आहे. तो कुठल्याच जातीसमुहाच्या विरूद्ध नाही. ’क्लॅशेस ऑफ सिव्हीलायझेशन ’ सारखे कृत्रिम सिद्धांत मांडून इस्लाम हा ख्रिश्‍चनांच्या विरूद्ध आहे, अशी मांडणी केली जात आहे. मात्र ही मांडणी मुळातच चुकीची आहे. उलट इस्लाम तर ख्रिश्‍चन धर्माचा विस्तार आहे. प्रत्येक मुस्लिम येशू ख्रिस्त आणि बायबलवर श्रद्धा ठेवतो. वास्तविक पाहता ख्रिश्‍चन आणि मुस्लिम यांच्यात विवाद नाही तर अनैतिक भांडवलशाही व्यवस्था आणि इस्लामी नैतिक व्यवस्था यांच्यातील हे द्वंद्व आहे.
    भारतातही अल्पसंख्यांक मुस्लिम, बहुसंख्यांक मुस्लिमेत्तर बांधवांचा द्वेष करतात, असा चुकीचा गैरसमज माध्यमांनी सर्वदूर पसरविण्यामध्ये यश प्राप्त केलेले आहे. गेल्या 70 वर्षात मुस्लिमांनी आपल्या नेतृत्वाचा गळा दाबून बहुसंख्य बंधूंच्या हाती विश्‍वासाने आपल्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवून आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे.
    शेवटी एवढेच सांगतो की, मुस्लिमांच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी येवून पडलेली आहे. ती ही की त्यांनी आपल्या वाणी आणि वर्तनातून इस्लामचा परिचय आपल्या देशबांधवांना करून द्यावा. कारण आता कोणताही प्रेषित येणार नाही ही जबाबदारी प्रेषितांचे वारस म्हणून आपल्यालाच स्विकारावी लागणार आहे. यासाठी मुस्लिमांनी सर्वप्रथम कुरआन समजून घ्यावा व नंतर इतरांना समजावून सांगावा. ईदनिमित्त एवढे जरी केले तरी पुरे आहे. ईद  मुबारक.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget