Halloween Costume ideas 2015

शरिया म्युच्युअल फंड एक लाभदायक गुंतवणूक

शरियतमध्ये व्याज घेणे आणि देणे निषिद्ध मानले आहे. मात्र आज जगात मोठ्या प्रमाणात सगळीकडे व्याजरहित अर्थव्यवस्था चालते. या व्याजरहित अर्थव्यवस्थेमुळे अनेक लोक मेटाकुटिला येवून आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. त्यामुळे या व्यवस्थेपासून जर दूर जायचे असेल आणि त्याला पर्याय उभा करायचा असेल तर शरियत आधारित अर्थव्यवस्थेला प्राधान्य द्यावे लागेल. शरियत आधारित अर्थव्यवस्थेविषयी समाजात अजूनही मोठ्या प्रमाणात अज्ञानता आहे. त्यामुळे लोक याकडे वळत नाहीत. ज्या गोष्टीत अधिक सुरक्षितता आणि फायदा असतो, त्याबद्दल लोकात जनजागृती फार कमी होते. शरियत आधारित म्युच्युअल फंड म्हणजे नेमके काय? त्या कोणत्या कंपन्या आहेत, त्याची कुठे गुंतवणूक होते? त्याची सुरक्षितता आहे काय? यासारख्या अनेक प्रश्नांची उकल होणे गरजेचे आहे. शरियत आधारित आर्थिक व्यवस्थेला सर्वापर्यंत पोहोचविणे आणि प्रत्यक्षात त्याचे लोकांना फायदा मिळवून देण्याचे ध्येय समोर ठेवून आपलं करिअर निवडले आहे शेख सलीम छोटुमियाँ यांनी.  त्यांची शरिया म्युच्युअल फंडासंबंधी शोधनचे उपसंपादक बशीर शेख यांनी घेतलेल्या मुलाखतीचा काही अंश वाचकांच्या सेवेत सादर.
        ः अल्पपरिचय ः
    शेख सलीम छोटुमियाँ हे मूळ तूळजापुरचे रहिवाशी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून लातूरला स्थायिक आहेत. त्यांच शिक्षण बी.कॉम. एमबीए फायनान्स, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद येथे झालेे. त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात एसबीआय क्रेडिट कार्ड विभाग औरंगाबाद येथून सुरू केली. त्यानंतर ते आयसीआयसीआय बँकेत इन्शुरन्स सेल्स विभागात अॅडव्हायजर म्हणून काही काळ काम पाहिले. त्यानंतर एचडीएफसी बँकेत मॅनेजर या पदावर दीड वर्षे काम केले. येथून नंतर ते बजाज अलायन्झमध्ये दाखल झाले आणि तेथून चीफ ब्रँच मॅनेजर म्हणून निवृत्ती घेतली. सध्या ते अब्बास कॉम्प्लेक्स लातूर येथून शरीयत म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीचे काम करतात.
आपण शरिया म्युच्युअल फंडाकडे कसे वळलात?
- मला इस्लामबद्दल अधिक माहिती नव्हती. मला कधी तसे वातावरणही भेटले नाही. त्यामुळे शरियत काय असते, त्याची आर्थिक व्यवस्था कशी आहे. याची काहीच माहिती नव्हती. योगायोगाने 2005 मध्ये मला काही कारणास्तव लातूरला यावे लागले. येथे आल्यानंतर समाजातील विविध लोकांशी संपर्क आला. बरेच जण म्हणायचे इस्लाममध्ये व्याज देणे आणि घेणे हराम (निषिद्ध) आहे. त्याला पर्यायी व्यवस्था म्हणजे शरियतवर आधारित गुंतवणूक. मात्र याबद्दल मलाही अधिक माहिती नव्हती. मी जमाअते इस्लामी हिंदच्या कार्यक्रमात यायचो. येथे मला इस्लामबद्दल बरीच माहिती मिळाली. या दरम्यान मध्ये माझा जमाअते इस्लामी हिंदचे प्रदेशाध्यक्ष तौफिक असलम खान यांच्यासोबत संपर्क आला. त्यांना माहित होते की माझी पदवी बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमधील आहे. त्यांनी माझ्याशी चर्चा करताना मला सांगितले की, मला टॅक्स सेव्हींग बद्दल काही ऑप्शन असतील तर सांगा, जो शरियावर आधारित असेल. शरिया आधारित व्यवस्थेत गुंतवणूक करायची आहे. याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. ते म्हणाले त्याबद्दल तुम्ही माहिती घ्या. त्यांनी मला इस्लाममध्ये आर्थिक देवाण-घेवाणीबद्दल इत्यंभुत माहिती दिली. त्यामुळे मी विचार केला की, आपणाला याबद्दल अधिक माहिती काढावी लागेल. मला कळाले की, यासंबंधी बझाज अलायन्समध्ये एक प्रोव्हीजन आहे. 
    त्यांच्यामुळे मला शरियाबद्दल अभ्यास करायची संधी मिळाली. यानंतर मी त्यांना शरियाआधारित गुंतवणूक करून दिली. त्यानंतर मला या क्षेत्रात काम करण्याची उस्तुकता वाढली. जेव्हा-जेव्हा मी लातूरला येई तेव्हा तौफिकसाहेबांची भेट घेई. माझी वारंवार चर्चा होई. गेल्या चार-पाच वर्षांपासून मनात शरियाबद्दल घोळण सुरूच होती. माझे आहे ते काम सोडून ते काम करावं असं वाटत होतं. परंतु, काही कारण सापडत नव्हतं. गेल्या वर्षापासून अशा काही घटना घडत गेल्या की मला लातूरला कायमस्वरूपी स्थायिक व्हावं लागलं आणि जॉब सोडावा लागला. माझ्या वडिलांची तब्येत अचानक खराब झाली आणि कंपनीने माझी बदली चेन्नईला केली. चेन्नईमध्ये राहून अर्धे तामिळनाडूत काम करायचं होतं.तेथे काम करण्याच्या मनस्थितीत मी नव्हतो. माझ्या मनात होतं शरियावर आधारित आर्थिक व्यवस्थेत काम करावं. त्यातही शरिया म्युच्युअल फंडमध्ये काम करावं. ज्याची आवश्यकता सर्व भारतीयांना आहे.
    आर्थिक गुंतवणुकीबद्दल समाजात फार मोठी अज्ञानता आहे. थोडी फार माहिती म्हणजे बँकेत जाणे, अकाऊंट काढणे, एफ.डी., आर.डी. अशा योजनाबद्दल माहिती असते. मात्र याच्यापुढे अधिक फायदा देणारे स्त्रोत माहित नसतात. यामध्येही शरिया बेस आहे हे ही माहित नसते.
    म्युच्युअल फंड संबंधात निपुनता यावी म्हणून मी अॅम्फी सर्टिफिकेशन कोर्स (एएमएफआय) केला. जो सरकारी आहे. हा सर्टिफाईड कोर्स केल्यानंतर आपणाला देशात जे काही म्युच्युअल फंड आहेत, त्याचे आपण अधिकृत डिस्ट्रीब्युटर बनू शकतो. आज लातूरमध्ये जवळपास 22 जण आहेत. मात्र त्यामध्ये एकही शरई म्युच्युअल फंड तज्ज्ञ नाही. ती उणीव मी भरून काढलेली आहे. लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड इत्यादी शहरात. म्युच्युअल फंड या क्षेत्रात काम करणार्या  जवळपास 38 कंपन्या आहेत. त्यांचे 7 हजार 801 फंड आहेत. मात्र या फंडात शरिया बोर्डाचे जे प्रमाणपत्र आहे ते फक्त दोन कंपन्याकडे आहे. यात विशिष्ट अशी गाईडलाईन पूर्ण करावी लागते. यामधील जे दोन फंड आहेत ते एक टाटा कंपनीकडे आहे आणि दूसरे तौरस कंपनीकडे. या दोन्ही कंपन्याकडे एक-एक शरिया फंड आहे.
    शरिया गाईडलाईन काय आहे?
    शरिया गाईड लाईन म्हणते, आपण जेव्हा पैशाची गुंतवणूक करता तेव्हा गुंतवणुकीमध्ये नफा आणि नुकसानीची शक्यता बरोबर असली पाहिजे. दूसरी गोष्ट म्हणजे, जेव्हा आम्ही गुंतवणूक करतो तेव्हा म्हणतो की व्याज हराम आहे. हे खरे आहे. कारण याबाबत कुरआन, हदीसमध्ये सांगण्यात आले आहे. या सगळ्या बेसिक गोष्टी माहित आहेत. मात्र पैसा गुंतवणुकीसाठी आपल्याकडे पर्याय नसतो. मग आपण तो पैसा मजबुरीत बँकेत ठेवतो, एलआयसीत गुंतवतो, एफडी, आर.डी. करतो जेथून व्याजाद्वारे आपल्याला अधिक फायदा मिळतो. ऑप्शन नसल्यामुळे मुस्लिम समाज तेथे गुंतवणूक करते. किंवा ऐसेही लोक आहेत जे बँकेत पैसे ठेवतात. मात्र त्याचे व्याज ते दान करतात. स्वतः वापरत नाहीत. मग याला पर्याय काय आहे. कारण आपण बोलताना सरळ म्हणतो की व्याज हराम आहे. मात्र त्याची पर्यायी व्यवस्था तुमच्याकडे असणे आवश्यक आहे जी शरियावर आधारित असावी. तर मी फक्त व्याज हराम आहे म्हणून थांबत नाही तर लोक यापासून कसे दूर राहतील आणि शरियतवर आधारित कुठे, कशी, कधी, केव्हा गुंतवणूक करावी यावर सविस्तर मार्गदर्शन करतो. त्यामुळे मी या कामाला स्वतःसाठी पुण्याचे काम समजतो. दूसरी गोष्ट म्हणजे लोक जे पण पैसे या माध्यमातून कमावतील ते हलाल असतील. मार्केटमध्ये काही लोक हलालच्या नावावर धोकेबाजी करतानाही समोर आले आहे. त्यापासूनही वाचावे लागेल. जेव्हा कोणी व्यक्ती स्वतःच्या इमानदारीचा एक रूपयाही गुंतवणूक करतो, तेव्हा विचार करत नाही की तो पैसा जातोय कुठे. त्यापासून फायदा मिळतोय मात्र तो कुठून? तर मला फायनान्समध्ये काम केल्यामुळे या सर्व गोष्टींचे अद्यायावत ज्ञान असल्यामुळे मला याची माहिती मिळाली. आणि जे ज्ञान आपल्याला मिळाले ते दुसर्यापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. म्युच्युअल फंडमधील सगळा पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतविला जातो. शेअर मार्केटची अशी हवा बनविली आहे की, शेअर मार्केटमध्ये तोच पैसा गुंतवू शकतो ज्याला त्याचे ज्ञान आहे. ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे. तेच लोक गुंतवणूक करतील. सामान्य माणूस याचा विचार करीत नाही कारण त्याला याचे ज्ञान नसते. आम्हाला जर मोठ व्हायचे असेल, गुंतवणुकीत अधिक फायदा मिळवायचा असेल तर आम्हाला भारतीय अर्थव्यवस्थेसोबत सोबत चालावे लागेल. सध्याची राजकीय परिस्थिती सोडून द्या. मेन स्ट्रीममध्ये कोण-कोण येवू शकतो? जो साधारण कामगारही आहे तो ही आणि उच्च गर्भश्रीमंतही. मला अमीर हल्का म्हणतात की, जसं नमाजमध्ये आम्ही उभे राहतो तेव्हा हे बघत नाही की आजूबाजूला गरीब आहे का श्रीमंत. येथे सगळे लोक समान आहेत. शरिया म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतही तसेच आहे. मी काही लोकांना अशी गुंतवणूक करून दिली आहे जे, पाचशे रूपये दररोज कमवतात. म्हणजेच मिस्त्री आहे. त्या लोकांचे पॅनकार्ड काढून दिले त्यांची गुंतवणूक शरिया म्युच्युअल फंडात केली आहे. म्हणजे करोडपती आणि पाचशे रूपये कमाविणाराही सोबतच. सर्वांसाठी नियम सारखे, सर्वांना त्याप्रमाणे फायदाही. दूसरी गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंडात पैसा गुंतवायचा असेल तर आवश्यक नाही की त्याचे संपूर्ण ज्ञान असावे. कारण हे काम फंड मॅनेजमेंटचे काम आहे. जे की टाटा आणि तौरसचे शरिया फंड आहेत. या सगळ्या गोष्टी कायदेशीर आहेत. ज्यांच्याकडे बँक अकाऊंट आहे, पॅनकार्ड आहे, तेच लोक गुंतवणूक करू शकतात. मी सांगितले की या गुंतवणुकीत नफा आणि नुकसान दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही की तुम्हाला एवढे टक्के जास्त पैसा मिळेल किंवा मिळणार नाही. कंपनी फायद्यात तर तुम्ही फायद्यात. कंपनी तोट्यात तर तुम्हीही तोट्यात. परंतु, आतापर्यंत शरिया गुंतवणुकीत गेल्या 30 वर्षात कोणीही नुकसानीत आलेले नाही.
    समजा तुमच्याकडे जर 10 हजार रूपये आहेत आणि तुम्हाला मार्केट मध्ये शेअर घ्यायचा आहे. तर तुम्ही एक किंवा दोन शेअर्स घ्याल. मारूती कंपनीचा एखादा शेअर घ्यायचा आहे तर त्याची किमत 9 हजार रूपये आहे. तर तुम्ही फक्त 1 शेअर घ्याल. शेअर मार्केट अप डाऊन होत राहते. जर शेअर मार्केट कोलॅप्स झाले तर तुमच्या पैशाची किंमत अर्ध्यावरही येवू शकते. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये रिस्क जास्त असते. म्युच्युअल फंडात रिस्क कमी आणि फायदा वाढत राहतो. यामध्ये सगळ्यांचे पैसे एकत्रित करून गुंतवणूक केली जाते. शेअर मार्केटमध्ये मात्र वैयक्तिक गुंतवणूक राहते. म्युच्युअल फंडातील पैसा एकाच कंपनीत जात नाही. जवळपास तो 70 ते 80 कंपन्यांमध्ये जातो. त्यामुळे एखाद्या कंपनीत नुकसान झाले तर बाकीच्या कंपन्या ह्या स्थिर असतात किंवा वाढत असतात. नुकसान अधिक होत नाही. त्यामुळे रिस्क कमी राहते. फायदा जास्त होण्याची शक्यता असते.
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची पद्धत कशी आहे?
म्युच्युअल फंड म्हणजे ”एकापेक्षा जास्त लोकांच्या समुहाने काही उद्देशपूर्ती करण्यासाठी एकत्र येवून केलेली गुंतवणूक म्हणजे म्युच्युअल फंड होय.”     यामध्ये दोन प्रकारे पैसा गुंतवू शकतो. महिनावर गुंतवणूक राहते ज्याला आम्ही एसआयपी (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान). यामध्ये महिना 500 रूपये गुंतवणूक करू शकतो. दूसरा प्रकार म्हणजे लमसम. लमसम म्हणजे एकदाच. यामध्ये कमीत कमी 5000 रूपयांपासून गुंतवणूक सुरू राहते. म्युच्युअल फंडाचा अजून एक फायदा असा आहे की, हे ओपन एंडेड स्कीम राहते. यामध्ये कुठलाही बंदीस्त काळ नसतो. जसं आपण एफ डी करतो तसं यामध्ये नसतं. तुम्ही कधीही पैसा गुंतवू शकता आणि कधीही काढू शकता. जसं दुसर्या स्कीममध्ये वेळेच्या आत पैसा काढताना मोठी कपात केली जाते. तशी शरिया म्युच्युअल फंडात तेवढी कपात होत नाहीत. हा मूळ फरक आहे.
    बँकेच्या कुठल्याही योजनेपेक्षा अधिक नफा शरियत फंडात मिळतो. मागील 20 वर्षातील शरीया फंडाची सरासरी काढली तर त्याचा परतावा 18 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. काही वेळा 35 टक्केही परतावा मिळाला आहे. यामध्ये अकाऊंट काढण्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक अकाऊंट चेक लागते. रोख व्यवहाराची परवानगी नाही.
    शरिया बेसिस फंड म्हणजे नेमके काय?
    ज्यावेळेस आम्ही पैशाची गुंतवणूक करतो त्यावेळी शरिया गाईडलाईनने चालणार्या कंपन्या या पैशाची गुंतवणूक वैध कार्यात करतात. त्या व्याजाधारित कामात गुंतवत नाहीत, त्या दारूच्या फॅक्टरीला पैसा लावत नाही, शरियतनुसार निषिद्ध फुड्स कंपन्यात गुंतवणूक करत नाहीत, तसेच मीडिया आणि इंटरटेनमेंट यातही गुंतवणूक करत नाही. त्या इस्लामिक नियमानुसार चालणार्या कंपन्यातच गुंतवणूक करतात. बाजाप्ता त्याची यादी लाभधारकाला दिली जाते.  आपला पैसा अॅटोमोबाईल सेक्टर, रिअल इस्टेट सेक्टर, कंझ्युमर ड्युरेबलचे सेक्टर, पेट्रो केमिकल , सिमेंट इत्यादी शरियानुसार वैध कंपन्यात लागतो. डेली बेसिसवर आपण आपला पैसा चेक करू शकता. 24 मे 1996 पासून टाटाचा शरिया फंड सुरू आहे. तर तौरसने 2005 मध्ये शरिया फंडाची सुरूवात केलेली आहे. येणार्या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेची गती  वाढणार आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वाढत आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून मेन स्ट्रीममध्ये येण्याचा हा ही एक मार्ग आहे. पुणे, मुंबई आणि मेट्रोसिटीचे बहुतेक लोक म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. यामध्ये गुंतवणुकदाराला शिक्षणाची काही अट नाही. मात्र माझं म्हणण आहे की, डिस्ट्रीब्युटरन त्याला याचं शिक्षण दिलं पाहिजे. तेव्हा तो याची अपडेट माहिती ठेवेल.
    मी म्युच्युअल फंडची कन्सल्टींग करतो. गुंतवणुकदाराला त्याची इत्यंभुत माहिती देतो. त्याला रोजच्या रोज अपडेटींग माहिती मागितल्यास देतो. मार्केटमधील उतार चढाव आदी सर्व माहिती देतो. मी जास्त करून सध्या शरिया म्युच्युअल फंडाबाबत अधिक जनजागृती करत आहे. कारण यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक अधिक फायदा आहे.
    जर आपणास शरीया फंडात गुंतवणूक करावयाची असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास सलीम शेख - 9860312005 यांच्याशी संपर्क करावा.

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget