Halloween Costume ideas 2015

कोब्रापोस्टद्वारे माध्यमांचा पर्दाफाश

वृत्तपत्र हा लोकशाही चा चौथा स्तंभ आहे. हे म्हणतात ते उगाच नाही. विविध भाषांतील राष्ट्रीय दर्जाची आणि प्रादेशिक वृत्तपत्रे ही समाजभान घडविण्याचे काम करतात. जगण्याच्या  संघर्षाशी जोडलेला आपला भारतीय समाज शिक्षणामूळे सुबुध्द होण्यात उणा पडत असला तरी दैनिक वृत्तपत्रे दररोज त्याचे सामान्य माणसाने वाचन केल्याने प्रबोधन करीत असतात.  मात्र काही दिवसांपूर्वी ‘कोब्रापोस्ट’ या वेबसाईटने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये देशभरातील प्रमुख माध्यमसमूह पैसे घेऊन कुणाच्याही बाजूने किंवा विरोधात बातम्या चालवण्यासाठी  तयार असल्याचे उघड झाले आहे. ‘ऑपरेशन १३६: पार्ट २’ या नावाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनने माध्यमसमूहांचे वस्त्रहरण करतानाच आगामी काळात बातम्यांच्या नावाखाली काय  काय दाखवले जाणार आहे, याची झलकही पाहायला मिळाली आहे. माध्यमजगतात खळबळ उडवून देणाऱ्या या स्टिंग ऑपरेशनची बातमी देण्याचे धारिष्ट्य मात्र कोणत्याही माध्यमाने  दाखवलेले नाही. टाइम्स ऑफ इंडिया, इंडिया टुडे, हिंदुस्थान टाइम्स, झी न्यूज, नेटवर्क १८, स्टार इंडिया, एबीपी न्यूज, दैनिक जागरण, रेडिओ वन, रेड एफएम, लोकमत,  एबीएनआंध््राा ज्योती, टीव्ही ५, दिनामलार, बिग एफएम, के न्यूज, इंडिया व्हॉइस, द न्यू इंडियन एक्सप्रेस, एमव्हीटीव्ही आणि ओपन मॅगझीन या माध्यमसमूहांनी पैसे घेऊन हव्या  तशा बातम्या छापण्यासाठी तयारी असल्याचे मान्य केले आहे. देशातील प्रमुख माध्यमसमूह निवडणुकीच्या तोंडावर पैशाच्या बदल्यात स्वत:ला विकण्यास तयार असल्याचे यातून स्पष्ट  झाले. याचाच अर्थ आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रचंड पैसा असलेल्या भारतीय जनता पक्षासाठी माध्यमांमध्ये मोठी संधी असल्याचेच या ऑपरेशनने दाखवून दिले आहे. ‘ऑपरेशन १३६: पार्ट २’ या स्टिंग ऑपरेशनमध्ये संबंधित माध्यमसमूहामधील जबाबदार पदाधिकाऱ्यांनी पैशांच्या मोबदल्यामध्ये अतिरेकी हिंदुत्वाचा अजेंडा राबवण्याबरोबरच विरोधकांचे  चारित्र्यहनन करण्यासही तयार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी हजारो कोटी रुपये काळे पैसे घेण्याचीही तयारी दर्शवली आहे. स्टिंग ऑपरेशनचे नाव ‘ऑपरेशन १३६’ असे ठेवण्याचे कारण म्हणजे काही महिन्यांपूर्वी आलेल्या ‘वल्र्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स’द्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात भारताचा क्रमांक १३६ वा आहे. या सर्वेक्षणातील निष्कर्षावरूनच कोब्रापोस्टने  आपल्या स्टिंग ऑपरेशनचे नाव १३६ असे ठेवले आहे. कोठला विचार राष्टवादी आहे व कोणता राष्ट्रद्रोही आहे हे अतिशय कर्कश्य पणे जाहीर करणाऱ्या संघटना आहेत व त्यांना  राजसत्तेचे अभय आहे, हिंदुत्ववादी राजकारणावर टीका करणारांस सोशल मीडियावर धमक्या देणे, फोन करून जीवे मारण्याच्या धमक्या देणे हे प्रकार नित्याचे झाले आहेत. अशा परिस्थितीत भारतीय वृत्तसंस्थांमधील पत्रकारांनी स्वत:वर आपणहून अभिव्यक्ती मर्यादा घालून घेतल्याचे दिसून येते, असे हे सर्वेक्षण नोंदवते. कोब्रा पोस्टचे रिपोर्टर पुष्प शर्मा यांनी  आपण आचार्य अटल नामक धार्मिक कार्यकर्ता आणि एका गुप्त हिंदुत्ववादी संघटनेचे प्रतिनिधी असल्याचे सांगून माध्यम समूहांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. आचार्य अटल यांनी  बहुतेकांसमोर असा प्रस्ताव मांडला की, धार्मिक स्वरुपाच्या बातम्यांच्या अनुषंगाने भाजपला फायदेशीर ठरतील, अशा बातम्या प्रसिद्ध करायच्या, त्याचबरोबर विरोधकांचे चारित्र्यहननही  करायचे. जेणेकरून धार्मिक ध्रुवीकरण होऊन आगामी निवडणुकीत भाजपला फायदा होऊ शकेल. धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध करण्याच्या आचार्य अटल यांचा  प्रस्ताव बहुतेकांनी कॅमेऱ्यासमोर मान्य केला आहे. वैशिष्ट्य म्हणजे या स्टिंगमधील व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसते आहे की, काळ्या पैशाविरोधातील लढाईतले शिपाई असल्याचा टेंभा  मिरवणारे हे माध्यमसमूह संबंधित मोहिमेचा मोबदला रोख रकमेच्या स्वरुपात देण्याची मागणी करीत आहेत. माध्यमसमूहांबरोबरच मोबाइल पेमेंट अ‍ॅप आणि पेमेंट बँक पेटीएमच्या  वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही स्टिंग करण्यात आले आहे. पेटीएमच्या या मंडळींनी आपले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी घनिष्ठ संबंध असल्याचे पुन्हा पुन्हा सांगितले आहे. पेटीएमचा डाटा  आपण पंतप्रधान कार्यालयाला देत असल्याचेही त्यांनी मान्य केले आहे. त्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली असून पेटीएम म्हणजे ‘पे टू पीएम’ असल्याचा निशाणा  साधला आहे. आम आदमी पक्षाचे नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही पेटीएम प्रकरणावरून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. माध्यमे स्वतंत्र असल्याने त्यांच्यावर  कोणाचा अंकुश नसतो. पण ती नि:पक्ष असली पाहिजेत. वृत्तपत्रातून येणारी त्यांची भूमीका निर्भीड आणि सडेतोड असली पाहिजे. कोब्रापोस्टचे हे स्टिंग ऑपरेशन जर खरे असेल, तर  राजकीय नेत्यांच्या, सरकारी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे वेशीवर टांगणारा आपला मीडिया, स्वत: किती स्वच्छ आहे याची प्रचिती ‘कोब्रापोस्ट’च्या ‘ऑपरेशन १३६’ने  आपल्याला दिली आहे.
-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget