Halloween Costume ideas 2015

समस्त देशबांधवांना ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा

- तौफिक असलम खान
अध्यक्ष - जमाअते इस्लामी हिंद, महाराष्ट्र


सर्वप्रथम मी सर्व देश बांधवांना ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. चालू वर्षाचे रमजान अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडले. रमजानचे श्रेष्ठत्व यासाठी आहे की, या महिन्यात कुरआनचे अवतरण झाले होते. रमजानच्या संदर्भात कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ” हे मार्गदर्शन आहे समस्त मानवजातीसाठी आणि यात सत्यमार्ग दाखविणारे मार्गदर्शन आहे. आणि कोणतीही गोष्ट सत्य आहे का असत्य आहे याची कसोटी यात आहे.” कुरआनमध्ये तीन गोष्टी अतिशय स्पष्टपणे सांगण्यात आलेल्या आहेत. एक तर सर्वांचा ईश्‍वर एकच आहे. कुरआनमध्ये अनेक ठिकाणी म्हटलेले आहे की, पूज्य फक्त अल्लाहच आहे व तो यासाठी पूज्य आहे की, त्यानेच समस्त विश्‍वाची निर्मिती केलेली आहे. या ब्रह्मांडात जेवढे सजीव जन्माला घातलेले आहेत ते सर्व त्यांनीच घातलेले आहेत. तोच त्यांना मृत्यू प्रदान करतो. इस्लामी जीवन व्यवस्थेची कास धरून माणूस या जीवनात आणि पारलौकिक जीवनातही यशस्वी होऊ शकतो. हाच कुरआनचा मूळ संदेश आहे. या संदेशाला मान्य करणे म्हणजेच आपल्या जीवनातील प्रत्येक बारीक सारीक गोष्टींचे नियोजन इस्लामी तत्वानुसार करणे हे होय. उदा. लग्न करावयाचे असेल इस्लामी पद्धतीने करावे लागेल, तलाक द्यायचा असेल तर इस्लामी पद्धतीने द्यावा लागेल. व्यवहारात कुठल्याही प्रकारे व्याज घेता येणार नाही. प्रत्येकाला काय खावे आणि काय खाऊ नये, याचाही निर्णय अल्लाहने दिलेल्या हलाल आणि हराम च्या परिघातच करावा लागेल.
    दूसरी गोष्ट जी कुरआनमध्ये सांगितलेले आहे ती ही की, ”मृत्यू म्हणजे सर्व काही संपले असे नाही. ते तर फक्त स्थलांतर आहे. या लोकातून परलोकात. पारलौकिक जीवनाची यशस्वीता या जीवनामध्ये केलेल्या भल्या आणि बुर्‍या कामावर आधारित आहे. माणसांनी चांगलं वागावं यासाठी अल्लाहने एक लाख चोवीस हजार प्रेषित पाठविले. शेवटचे प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. हे होत. ज्यांच्यावर कुरआन अवतरित झाले व मानवजातीला सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन मिळाले. आता कुठलाही प्रेषित येणार नाही किंवा कुठलेही ईश्‍वरीय ग्रंथ अवतरित होणार नाही म्हणून प्रेषितांची शिकवण व कुरआन यालाच अंतिम मार्गदर्शन माणून जो जगेल तोच दोन्ही लोकी यशस्वी होईल.
    आज आपण आजूबाजूला पाहतो तेंव्हा लक्षात येते की प्रत्येक क्षेत्रात वाईट प्रवृत्तींचा शिरकाव झालेला आहे. गरीब व्यापार्‍यांना पूर्ण लाभ मिळणार नाही, यासाठी बाजार पेठेतील लोक प्रयत्नशील असतात. आडत व्यापार असो की जनावरांची बाजारपेठ. (उर्वरित लेख पान 3 वर)
सगळीकडे गरीबांची कोंडी केली जाते. उदा. एक गरीब शेतकरी आपली म्हैस विकायला आणतो, कोणी कोंबडी विकायला आणतो तर ती शेतकर्‍याला फसवून कुठल्या न कुठल्या पद्धतीने कमी किमतीत घेण्याकडे सर्वांचा कल असतो. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी कुठलीही वस्तू रस्त्यात खरेदी करण्यास मनाई केलेली आहे. प्रत्येक वस्तू अगोदर बाजारपेठेत येईल आणि त्याचा योग्य भाव ठरविला जाईल. त्यानंतरच खरेदी सुरू होईल, अशी व्यवस्था दिलेली आहे. ज्यामुळे विक्री करणार्‍याला आपल्या वस्तूचा चांगला मोबदला मिळू शकेल. अन्याय प्रत्येक क्षेत्रात आहे. मग ते राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो का आर्थिक क्षेत्र. जमाअत-ए-इस्लामी हिंद हाच अन्याय प्रत्येक क्षेत्रातून नष्ट व्हावा, यासाठी कायम प्रयत्नशील राहिलेली आहे. यासाठी कुरआनचे मार्गदर्शन हेच उपयोगी ठरणार आहे, असा आमचा विश्‍वास आहे. 
    रमजानमध्ये मोठ्या प्रमाणात जकात काढली जाते. मात्र त्याची सामुहिक शिस्तबद्ध व्यवस्था उभी न करू शकल्यामुळे जकातचा हवा तेवढा उपयोग होत नाही. खरे तर जकात ही सामुहिक उपासना आहे. सर्व लोकांची जकात एका ठिकाणी गोळा करून मग त्याचे न्याय वितरण केले गेले पाहिजे. त्यापूर्वी सर्व्हेक्षण व्हायला हवे की कोण जकात घेण्यास पात्र आहे. तरच गरीबांना न्याय मिळेल व आर्थिक विषमता कमी होण्यास मदत होईल. नमाज जशी घरी अदा करणे उचित नाही ती सामुहिकरित्या मस्जिदमध्ये अदा केली गेली पाहिजे. त्यासाठी मस्जिदी तयार कराव्या लागतील. इमाम आणि मुअज्जीन यांच्या नेमणुका कराव्या लागतील. वजूसाठी पाण्याची व्यवस्था करावी लागेल.  तेव्हाच ’आकीमुस्सलात’ अर्थात नमाज कायम केली गेली असे म्हणता येईल. तसेच जकात व्यक्तीशा देणे योग्य नाही ती सुद्धा एकत्रित करूनच दिली गेली पाहिजे. त्यासाठी जकात एकत्रित गोळा करण्यासाठी लोक नेमावे लागतील. गोळा झालेली जकात सुरक्षित ठेवण्यासाठी जबाबदार व्यक्ती नेमावे लागतील, गरजवंतांचा सर्व्हे करावा लागेल व न्याय वितरण करावे लागेल, तेव्हा म्हणता येईल की ’आकीमुज्जकाता’ म्हणजे जकातची व्यवस्था उभी केली गेली आहे.
    तीसरी गोष्ट अशी की सामाजिक जीवन सुरळीत रहावे, यासाठी समाजामध्ये आपापसात निर्माण होणारे तंटे, वैवाहिक मतभेद इत्यादी सोडविण्यासाठी तुम्हाला ’दारूल कजा’ अर्थात समाज पंचायतींची व्यवस्था उभी करावी लागेल व शरई मार्गदर्शनाप्रमाणे आपसातील मतभेद मिटवावे लागतील. आर्थिक विषमता दूर करण्यासाठी बिनव्याजी पतसंस्था उभ्या कराव्या लागतील. त्यांच्या मार्फतीने पात्र गरीब लोकांनी व्यापार करण्यासाठी बिनव्याजी कर्ज द्यावे लागेल. फक्त व्याज हराम आहे म्हणून थांबता येणार नाही. त्यासाठी गावोगावी बिनव्याजी कर्ज देणार्‍या पतसंस्था उभ्या कराव्या लागतील. आवश्यक तो सेटअप उभा करावा लागेल व व्याजाधारित पतपुरवठ्या समोर एक पर्यायी व्याज विरहित पतपुरवठ्याची व्यवस्था उभी करावी लागेल. तेव्हा म्हणता येईल की अल्लाहने जे व्याज हराम केलेले आहे ते प्रत्यक्षात आम्ही समाजामध्ये लागू केलेले आहे.
    सुदैवाने भारतीय संविधान आपापल्या या सगळ्या चांगल्या गोष्टी करण्याची अनुमती देतो. सर्वधर्मीय स्वातंत्र्यसैनिकांनी इंग्रजांपासून मुक्ती मिळविण्यासाठी याचसाठीच तर लढा दिला होता. संविधान आपल्या सर्वांचे एक कॉमन ऍग्रीमेंट अर्थात सामुहिक करार आहे. संविधानामध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक समाजाला त्याच्या धार्मिक चालीरिती अर्थात पर्सनल लॉ प्रमाणे जीवन जगण्याचा संवैधानिक अधिकार मिळालेला आहे. आयकर किती लावावा, रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे की डाव्या बाजूने चालावे यासाठी तर विधीमंडळ कायदे करू शकते. परंतु, पर्सनल लॉ कसा असावा, याचा निर्णय विधिमंडळ करू शकत नाही. अलिकडच्या सरकारने त्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरणार्थ तीन तलाकच्या बाबतीत केंद्र सरकारने म्हटलेले आहे की आम्ही तीन तलाक देणार्‍याला शिक्षा देण्याची तरतूद करू. वास्तविक पाहता सरकारला हा अधिकारच नाही. याउलट ईश्‍वरीय इच्छा तर अशी आहे की, पर्सनल लॉ हा सगळ्या मानवतेचा कायदा होऊन जावा. कारण त्यातच मानवतेचे खरे कल्याण निहित आहे. जमाअत-ए-इस्लामी हिंद याचसाठीच प्रयत्नशील आहे की कुरआनच्या मार्गदर्शनाप्रमाणे सर्वांनी जीवन जगावे. जेणेकरून आपल्या देशात शांती व सद्भावना कायम होवू शकेल. पुन्हा एकदा सर्वांना ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 
                - शब्दांकन - बशीर शेख (उपसंपादक, शोधन 9923715373)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget