Halloween Costume ideas 2015

रमज़ान आणि लहान मुलं

- नौशाद उस्मान
औरंगाबाद
9029429489

आज ज्या लोकांनी चाळीशी पार केलेली आहे, त्यांना माहित आहे की, आजपासून पंचवीस तीस वर्षांपूर्वी आजसारखे वातावरण नव्हते. सगळे मिळून मिसळून राहत होते. आजही अजिबात राहत नाही, असं नाही, पण त्यावेळचं वातावरणच वेगळं होतं. आजही अनेक गाव खेड्यात तेच वातावरण नक्कीच आहे, पण शहरी वातावरण बर्‍याच अंशी जातीय वार्‍याने प्रदुषित झालेले आहे, हे कटू सत्त्य आहे. मला आठवते माझ्या बालपणातली दिवाळी. आमच्या बच्चे कंपनीने दिवाळीच्या फराळावर मारलेला ताव! तुम्ही कोणत्याही जातीचे किंवा धर्माचे असा, पण तुमच्याही बालपणात जर तुमचा एक जरी मुस्लिम मित्र असेल तर तुम्हाला तुमच्या बालपणातला अनुभवलेला रमजान, ईद आणि शिरखुर्मा आजही आठवत असेलच.
पाटलाच्या वाड्यावर चढून आकाशात चंद्रकोर शोधत असलेले ते जुम्मनमियां ... चंद्रकोर दिसली रे दिसली की, ’चांद दिख गया ... चांद दिख गया’ करत सगळी येटाळ डोक्यावर घेणारी ती चिल्लर पार्टी अन् विजेच्या खांबावरील जुन्या दिव्याच्या त्या अंधूक प्रकाशात त्या चिमुकल्या पाखरांच्या पदन्यासाने उडालेल्या धुराळ्यातही एक अजबच चैतन्य निर्माण होत असे. येटाळीतल्या एकमेव पाटलाच्या वाड्यातून बाहेर आलेल्या काकूंच्याही चेहर्‍यावर तोच आनंद वाहत असलेला दिसायचा जो त्या बाल-गोपालांच्या चेहर्‍यावर असायचा.
    आजची ’हॅप्पी रमदान’ म्हणून सदिच्छा देणारी धीर गंभीर चेहर्‍याची कॉन्वेंटठास्त मुलं त्या निरागस गोड आनंदाला कुठंतरी पारखी झालेली दिसत आहेत. तो आनंद पुन्हा परत आणायची गरज आहे. तो भारत आपल्याला पुन्हा परत हवा आहे. लहाणपणीच वैचारिकतेची घडी बसत असते. म्हणून भविष्यात जातीयवादाच्या दुर्धर रोगाची लागण होऊ नये म्हणून धर्मसहिष्णुतेची लस लहाणपणीच देणे आवश्यक आहे. त्यासाठी काय करता येईल यावर चिंतन होणे गरजेचे आहे. विशेष करून जे लोकं रोजे ठेऊन रमजान पाळतात, त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. लहान मुलांवर रमजानचे सहिष्णुतेचे, एकात्मतेचे, समतेचे संस्कार घडवण्यासाठी इथे काही ’टिप्स’ दिल्या जात आहेत -
    आपल्या लेकरांच्या मुस्लिमेतर मुलांसाठी आपल्या घरी छोटीसी इफ्तार पार्टी घ्या. त्यात त्यांना सोप्या भाषेत इफ्तार, रोजा, रमजानविषयी माहिती द्या. त्याविषयावर छोटी छोटी मराठी पुस्तकं असतील तर ती त्यांना भेट म्हणून अवश्य द्या.
    ईदच्या दिवशीही त्यांना शिरखुर्म्यासाठी विशेष करून निमंत्रित करण्यास सांगा. ईदच्या दिवशी अनेक ठिकाणी झोके, आकाश पाळणे व इतर लहान मुलांच्या करमणुकीची साधणं येत असतात. तेंव्हा आपल्या लेकरांना तिथे नेतांना मुस्लिमेतर आणि विशेष करून तळागाळातील वंचित गोरगरीबांच्या मुलांना आपल्या लेकरांसोबत तिथे न्या. ईदगाहवर नमाज पढण्यासाठी शक्य असेल तर लेकरांनाही न्या.
    ईदच्या दिवशी भिक्षा मागणारे ईदगाहबाहेर उभे असतात. त्यांना भिक्षा देतांना आपल्या लेकरांच्या हाताने द्या. जकातची रक्कमही गोरगरीबांना देतांना आपल्या लेकरांच्या हाताने द्या. जेणेकरून त्यांच्यात दातृत्वाचे संस्कार होऊ शकावे. मुस्लिम समाजात ईदसाठी नवीन कपडे वगैरे घेतांना मुलगा - मुलगी असा भेद केला जात नाही, उलट मुलींना झुकते माप दिले जाते, हा एक चांगला गुण आजही मुस्लिम समाजात आढळतो, ही उदात्त प्रेषित परंपरा अशीच पुढेही सुरू राहिली पाहिजे.
      अशाप्रकारे आम्ही आधी बालपणी जसा भेदभावरहित सर्वधर्मसहिष्णु वातावरणात रमजान साजरा करायचो, ईद साजरी करायचो तसाच रमजान आणि तशीच ईद आताही प्रत्येक गावा-गावात शहरा-शहरात साजरी होवो आणि समाजात शांती निर्माण होऊन देश प्रगती करो, हीच अल्लाहशी प्रार्थना, आमीन!
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget