Halloween Costume ideas 2015

अद्भुत लेखनशैलीचे जनक मौलाना मौदूदी

जमाअते इस्लामीचे संस्थापक  मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांच्याबद्दल मराठी भाषिक वाचकांना फारशी माहिती नाही. म्हणून ती उपलब्ध करून द्यावी यासाठीचा हा एक प्रयत्न आहे.
    जमाअते इस्लामीचे संस्थापक, अंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त इस्लामी विद्वान सय्यद अबुल आला मौदूदी हे होते. त्यांचा जन्म मराठवाड्यातील औरंगाबाद येथे 25 सप्टेंबर 1903 साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अहेमद हसन होते. ते वकीली व्यवसाय करत होते. शिवाय, स्वत: एक इस्लामी विद्वान होते.  त्यांच्या पूर्वजांमध्ये एक सूफी संत होवून गेले. त्यांचे नाव ख्वाजा कुतूब मौदूद चिश्ती हुसैनी असे होते. ते अजमेरचे प्रसिद्ध सूफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती रहे. यांच्या वंशातील होते. ख्वाजा कुतूब मौदूद यांच्याशी असलेल्या नातेसंबंधातून सय्यद अबुल आला यांचे अडनाव मौदूदी असे पडले. त्यांचा परिवार एक परिपूर्ण इस्लामी परिवार होता. वयाच्या 11 वर्षापर्यंत अबुल आला यांचे शिक्षण वडिलांच्या देखरेखीखाली घरीच झाले. त्यानंतर त्यांना औरंगाबादच्या त्या काळच्या एका प्रसिद्ध शिक्षण संस्थेत म्हणजे मदरसतुल फुरकानिया मध्ये सरळ 8 व्या वर्गात प्रवेश देण्यात आला. 1914 साली त्यांनी ’मौलवी’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला. तद्नंतर त्यांचा परिवार हैद्राबाद दक्खन येथे स्थलांतरित झाला. दारूल उलूम हैद्राबाद येथे त्यांना ’आलमियत’च्या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश देण्यात आला. मदरशाचे प्राचार्य त्या काळचे आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त आलीमे दीन  मौलाना हमीदुद्दीन फराही होते. ते प्रसिद्ध आलीमे दीन अमीन अहसन इस्लाहींचेही उस्ताद (गुरू) होते. यावरून त्यांचा मर्तबा (दर्जा) लक्षात यावा.
    वडिलांच्या अचानक निधनामुळे सय्यद अबुल आला यांना सहा महिन्यातच दारूल उलूम सोडावे लागले. मात्र आपल्या अंगभूत गुणाच्या बळावर त्यांनी इस्लामचा अभ्यास करून वेगवेगळ्या विषयावर 103 पुस्तके लिहिली. त्यांची लेखन क्षमता अचंभित करणारी होती. कोणताही विषय ते लिलया हताळत. त्यांची लेखन शैली अतिशय प्रभावशाली होती. इतकी की जो कोणी त्यांचे साहित्य एकदा वाचेल त्याला ते साहित्य भुरळ पाडल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या साहित्यात भुरळ पाडण्याची शक्ती आजही कायम आहे. क्लिष्ट विषयाला सोपे करून सांगण्यात त्यांचा हतकंडा होता. दिलखेचक मांडणी, बिनतोड तर्क हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्ये होत.
    त्यांच्यात लेखन कला उपजत होती. याची जाणीव झाल्याबरोबर त्यांनी याच कलेला आपल्या उपजिविकेची साधन बनविले. अवघ्या 15 व्या वर्षी त्यांनी वर्तमानपत्रात लेख लिहिण्यास सुरूवात केली आणि अल्पावधीतच देशभर लोकप्रिय झाले. त्यातूनच त्यांना त्या काळच्या आघाडीच्या उर्दू वर्तमानपत्रातून काम करण्याची संधी मिळाली. 1918 साली ’अखबारे मदिना’ चे ते संपादक झाले. त्यानंतर जबलपूर यूपी मधून प्रकाशित होणाऱ्या ’ताज’ नावाच्या वर्तमानपत्राचे संपादक म्हणून काही दिवस काम केले.
    1921 साली त्यांनी इंग्रजीचा अभ्यास सुरू केला आणि अल्पावधीतच त्या भाषेवर प्रभुत्व मिळविले. 1922 साली जमियते उलेमा-ए-हिंदने ’मुस्लिम’ नावाचे एक वृत्तपत्र काढले होते. त्याचे ते संपादक झाले. 1923 साली ते वर्तमानपत्र बंद पडल्याने ते भोपाळला रवाना झाले आणि 1 वर्षे तेथे राहून इस्लामचा सखोल अभ्यास केला. 1924 साली पुन्हा जमियते उलेमा-ए-हिंदने ’अल-जमियत’ या नावाचे वर्तमानपत्र दिल्ली येथून सुरू केले व अबुल आला मौदूदी त्याचे संपादक म्हणून रूजू झाले. 4 वर्षे संपादक म्हणून यशस्वी काम केले. मात्र जमियत उलमा-ए-हिंदने काँग्रेसशी हातमिळवणी केल्यामुळे झालेल्या मतभेदातून त्यांनी संपादक पदाचा राजीनामा दिला.
    दरम्यान, जेव्हा ते अल जमियतचे संपादक होते त्या काळात स्वामी श्रद्धानंद नावाच्या एका धर्मगुरूंनी मुस्लिमांच्या घरवापसीचे एक आंदोलन उभे केले होते. ज्याचे नाव ’शुद्धी’ आंदोलन असे होते. स्वामीजींनी या संदर्भात एक पुस्तक लिहिलेले होते. त्यात प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित करण्यात आला होता. त्यामुळे क्षुब्ध होवून एका मुस्लिम तरूणाने स्वामी श्रद्धानंद यांची हत्या केली होती. त्यामुळे देशात तणावाची स्थिती निर्माण झाली. अनेकांनी हा आरोप लावण्यास सुरूवात केली की इस्लाममध्ये (अस्तगफिरूल्लाह) वैचारिक शक्तीच नाही. तो तर तलवारीच्या बळावर वाढलेला धर्म आहे. शिवाय इस्लामच्या जिहादच्या संकल्पनेवर चारी बाजूंनी वैचारिक एल्गार करण्यात येत होता. या सर्व परिस्थितीने व्यथित होवून त्या काळचे काँग्रेसचे एक मोठे पुढारी मौलाना मुहम्मद अली जौहर यांनी दिल्लीच्या जामा मस्जिदीमध्ये एका शुक्रवारी नमाजचा खुत्बा (संबोधन) देताना अत्यंत व्यथित अंत:करणाने एक आव्हान केले की, कोणीतरी पुढे यावे व जिहादसारख्या पवित्र संकल्पनेचे जे विकृतीकरण सुरू आहे, त्याचे खंडन करावे. जिहाद या संकल्पनेची कुरआन आणि हदीसच्या आधारे खरी माहिती देणारे पुस्तक लिहावे. त्यांचे हे आव्हान नमाजसाठी आलेले तरूण सय्यद अबुल आला मौदूदी यांनी मनोमन स्विकारले व अल जमियतचे संपादन कार्य करता-करता त्यांनी रात्रंदिवस अभ्यास करून ’अल-जिहाद-फिल-इस्लाम’ नावाचे भले मोठे ऐतिहासिक पुस्तक लिहून काढले. त्यावेळेस त्यांचे वय अवघे 24 वर्षे होते. हे पुस्तक प्रकाशित झाल्याबरोबर एकच खळबळ उडाली. मुस्लिमांकडून या पुस्तकाचे जोरदार स्वागत झाले. या पुस्तकाचे वैशिष्ट्ये म्हणजे यात फक्त जिहादचीच संकल्पना मांंडलेली नाही तर जगातील इतर प्रमुख धर्मामध्ये हिंसेसंबंधी काय विचार आहेत, याची अगोदर मांडणी करून नंतर त्याची तुलना जिहादशी करून, जिहादसंबंधी इत्यंभूत माहिती अतिशय तार्किक पद्धतीने स्पष्ट केलेली आहे. या पुस्तकासंबंधी डॉ. अल्लामा इक्बाल सारख्या कवीने आपले मत खालील शब्दात व्यक्त केले होते. ’इस्लामके नजरिया-ए-जिहाद और उस के कानून सुलह व जंग पर ये एक बेहतरीन किताब है और मैं हर -जी- इल्म (अभ्यासू) आदमी को मश्‍वरा दूंगा के वो उसका मुतालेआ (वाचन) करे’. यावरून या पुस्तकाचे महत्त्व कळावे. असे असतांनाही आश्‍चर्य म्हणजे, आजही बहुसंख्य मुस्लिमांनी हे पुस्तक वाचलेले नाही. जिहादबद्दल जेवढे गैरसमज त्या काळी होते त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त गैरसमज आज आहेत. तरीपण कोणाला हे तयार पुस्तक वाचावे असे वाटत नाही, हे या समाजाचे दुर्देव आहे.
    अलजमियतचा राजीनामा दिल्यानंतर सय्यद अबुल आला मौदूदी हैद्राबादला परत आले व स्वत:ला इस्लामच्या अभ्यासासाठी वाहून घेतले. याच काळात त्यांनी तर्जुमानुल कुरआन नावाचे एक साप्ताहिक सुरू केले व त्यातून नियमितपणे आपले विचार जनतेपर्यंत पोहोचवू लागले. 1935 साली त्यांनी ’परदा’नावाचे पुस्तक लिहिले व या पुस्तकामुळे पुन्हा एकच खळबळ उडाली. मुस्लिम समाजमन ढवळून निघाले. या पुस्तकामध्ये त्यांनी परदा महिलांसाठीच नव्हे तर सर्व समाजासाठी कसा आवश्यक आहे, याचे वैज्ञानिक पद्धतीने विश्‍लेेषण करून, अशी काही मांडणी केली की, पाश्‍चात्य प्रभावाखाली येवून जे लाखो मुस्लिम आपल्या महिलांना परदा करण्यापासून परावृत्त करत होते, ते पुस्तक वाचल्यावर त्यांनीच त्यांना परदा करण्यासाठी प्रवृत्त करण्यास सुरूवात केली. येणेप्रमाणे परदा व्यवस्थेचे महत्व भारतीय मुस्लिम समाजात नव्याने अधोरेखित झाले. आजही या पुस्तकाच्या शेकडो प्रती रोज विकल्या जातात. याचे हिंदी आणि मराठीमध्ये भाषांतर सुद्धा उपलब्ध आहे.
    20 व्या शतकाच्या प्रारंभी भारतातील  काही बुद्धिवादी मुस्लिम हे साम्यवादाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षिले जात होते. शिवाय, पश्‍चिमी जीवन शैलीचे नव्याने आकर्षण निर्माण झालेले होते. एवढेच नव्हे तर जीवनात यशस्वी होण्याचा हमखास मार्ग म्हणजे पाश्‍चिमात्य जीवनशैली होय, अशी खात्री बाळगणारा सुशिक्षित मुस्लिमांचा एक मोठा वर्गही या काळात अस्तित्वात आला होता.  कलमा, रोजा, नमाज, जकात, हज व थोडेसे दान पुण्य केले की झाले, बाकी जीवनामध्ये इस्लामची आवश्यकता नाही (अस्तगफिरूल्लाह) इस्लाम हा आऊट डेटेड झालेला धर्म आहे, एवढेच नव्हे तर धर्म हा नितांत खाजगी विषय आहे, त्याला घराच्या बाहेर आणण्याची गरज नाही, असे त्यांचे मत होते.
    परंतु, सय्यद अबुल आला मौदूदी यांनी इस्लामची नव्याने अशा पद्धतीने व्याख्या करत दावा केला की, इस्लाम काही कर्मकांडापुरता मर्यादित धर्म नसून अवघ्या जगाला यशस्वी जीवन जगण्याचा तोच एकमेव मार्ग आहे. तसेच इस्लाम हा तलवारीच्या नव्हे तर मजबूत विचारधारेे व चांगल्या अख्लाक (आचरण) च्या बळावर जगभर पसरला. त्यांच्या या नव्या मांडणीची भुरळ सुशिक्षित मुस्लिमांवर मोठ्या प्रमाणात पडली व पश्‍चीमी संस्कृतीला जे तारक समजत होते, तेच तिला मारक समजू लागले. अल्पावधीतच मुस्लिम समाजामधील बुद्धिवादी वर्गात त्यांचा हा दावा लोकप्रिय झाला. व पाहता-पाहता लाखो लोक इस्लामी आचरण करण्यास प्रवृत्त झाले. अनेकांच्या लक्षात आले की, खरी शक्ती ब्रँडेड कपड्यात, चमकणाऱ्या बुटात, उंची सुगंधात नसते तर चांगल्या चारित्र्यात असते. शिवाय, त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसला की ’टेलर अँड बार्बर डिड नॉट मेक मेन जेंटलमेन बट हाय मॉरल अँड कॅरेक्टर मेक मेन जेंटलमेन’.
    आणि पाहता-पाहता अनेक तरूणांनी दारू पिणे, तंबाकू खाणे, व्याज घेणे बंद केले. बँकेच्या आणि फायनान्सच्या नोकऱ्या सोडल्या आणि इस्लामची स्वच्छ व तणावविरहित जीवनशैली अंगीकारली. एवढेच नव्हे तर या तरूणांनी मौ. अबुल आला मौदूदी यांच्या इस्लामच्या नव्याने केलेल्या व्याखेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी स्वत:ला वाहून घेतले व जमाअते इस्लामी, एसआयओ, जीआयओ च्या माध्यमातून आजही घेत आहेत.
    सय्यद अबुल आला मौदूदी यांनी तब्बल 103 पुस्तके लिहिली. विशेष म्हणजे जीवनाला स्पर्श करणाऱ्या सर्वच विषयांवर त्यांनी विपुल लिखाण केले. त्यांनी तफहिमुल कुरआन नावाने सहा खंडाचे भाष्य लिहून कुरआनला एवढे सहज आणि सोपे करून टाकले की, अठरा-वीस वर्षाचे तरूणही ते वाचून कुरआनचा मतीतार्थ समजू लागले. इस्लामचा अभ्यास स्वत: करू लागले. याचा परिणाम असा झाला की, कुरआनचे शिक्षण देणारे परंपरागत इदारे आणि त्यांना चालविणारे लोक मौलाना मौदूदी यांच्यावर नाराज झाले व आज मितीलाही त्यांची नाराजी पूर्णपणे गेलेली नाही.
    सय्यद अबुल आला मौदूदी यांच्या काही पुस्तकांचे भाषांतर जगातील सर्वच प्रमुख भाषेत झालेले आहे. विशेष करून अरबी भाषेमध्ये झालेल्या भाषांतरांमुळे मध्यपुर्वेतील मुस्लिम देशांमध्ये सुद्धा त्यांची लोकप्रियता एवढी वाढली की, सऊदी अरबने त्यांचा पहिला ’शाह फैसल ऍवॉर्ड’ व काबातुल्लाहची चावी देवून सन्मान केला. मदीना इस्लामी विद्यापीठाच्या उभारणीमध्ये त्यांना महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी दिली. एवढेच नव्हे तर मदीना आणि इजीप्तची राजधानी काहीराच्या जामे अजहर या इस्लामी विद्यापीठांमध्ये त्यांच्या पुस्तकांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आला.
    सय्यद अबुल आला मौदूदी हे हिंदू राष्ट्रवादचे जेवढे विरोधक होते तेवढेच विरोधक मुस्लिम राष्ट्रवादाचे होते. त्यातूनच त्यांनी बॅ.जिन्ना आणि मुस्लिम लीगवर कडाडून टिका केली होती. ते एक मानवतावादी होते. त्यांचा विश्वास होता की, अवघे जग एक स्त्री आणि एका पुरूषापासून निर्माण झालेले आहे. त्यामुळे मुस्लिम या नात्याने फक्त हिंदू आणि मुसलमान यांचेच नाही तर अवघ्या जगातील लोकांच्या कल्याणाची काळजी मुस्लिमांनी घ्यावी हे त्यांचे  धार्मिक कर्तव्य आहे. त्यांच्या या विचारामुळे ते सगळ्यापासून वेगळे पडले. काही लोकांचा समज आहे की, त्यांनी पाकिस्तानमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. मात्र हा समज चुकीचा आहे. सत्य परिस्थिती अशी आहे की, 19 व्या तिसाव्या दशकामध्ये पठाणकोट येथे डॉ. इक्बाल यांच्या प्रेरणेने नियाज अली खान नावाच्या एका अभियंत्याने पठाणकोट पंजाब येथे एका मोठ्या इस्लामच्या अभ्यास केंद्राची निर्मिती केली होती. त्या ठिकाणी डीन म्हणून इक्बाल यांनी अबुल आला मौदूदी यांना रूजू होण्याची विनंती केली होती. त्यावरून सय्यद अबुल आला मौदूदी हे 8 एप्रिल 1938 रोजीच पठाणकोटला स्थलांतरित झाले होते व तेथूनच त्यांनी जमाअते इस्लामी या संघटनेची बांधणी करण्याचे काम सुरू केले होते. या कामासाठी त्यांना वारंवार लाहोरला जावे लागत होते. म्हणून त्यांनी लाहोरलाच राहण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा भारताची फाळणी झाली तेव्हा त्याच्या पूर्वीपासूनच ते लाहोरला राहत होते. फाळणीनंतर लाहोरचा भाग पाकिस्तानमध्ये गेला म्हणून त्यांना तेथे रहावे लागले. त्यांनी भारतातून फाळणीनंतर पाकिस्तानला स्थलांतर केले ही धारणा चुकीची आहे. मात्र हे खरे की, 28 ऑगस्ट 1948 रोजी पठाणकोटमध्ये मोठी दंगल झाली. तेव्हा जीव वाचविण्यासाठी त्यांच्या सोबत्यांनी इस्लामकेंद्र सोडून लाहोरला स्थलांतर केले होते.
    येणेप्रमाणे सय्यद अबुल आला मौदूदी यांनी स्वत:च्या अद्भूत लेखन शैलीच्या बळावर भारतामध्ये ज्या काळात प्रिंट मीडिया पौंगडावस्थेत होता लाखो लोकांना प्रभावित केले होते. त्यांनी मुस्लिमांच्या मनामध्ये इस्लामबद्दलचा न्यूनगंड नष्ट करून त्यावर त्यांचा नव्याने विश्वास बहाल केला होता. त्याकाळी पूर्णपणे इंग्रजाळलेल्या मुस्लिम लोकांना ज्यांच्या नसानसातून पाश्‍चिमात्य संस्कृतीचे प्रेम रक्तासारखे वाहत होते. त्यातूनच अनेकांनी आपली नावे सुद्धा बदलली होती. जे जन्माने मुस्लिम होते पण वृत्तीने ब्रिटिश झालेले होते. त्यातील बहुतेकांना परत इस्लाममध्ये आणण्याचे मोठे कार्य मौलाना अबुल आला मौदूदी यांनी केले. दुर्देवाने सोशल मीडिया (समाज माध्यमां) च्या या काळामध्ये परत मुस्लिमातील एक मोठा गट पाश्‍चिमात्य संस्कृतीच्या प्रेमात अकंठ बुडालेला आहे, त्यांना परत इस्लाममध्ये आणण्याचे कठिण आव्हान जमाअते इस्लामी हिंद व इतर मुस्लिम धार्मिक संस्था व संघटनांसमोर आहे.
    पाकिस्तानमध्ये त्यांना, त्यांच्या शुद्ध इस्लामी विचारांमुळे भरपूर त्रास झाला. जवळ-जवळ दोन वर्षाचा तुरूंगवास सहन करावा लागला. एकदा त्यांच्यासभेवर गोळीबार सुद्धा झाला. त्यात त्यांच्या बाजूला उभा असलेला एक रूक्ने जमात ठार झाला. त्यांना फाशीची शिक्षाही ठोठावण्यात आली. परंतु, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय दबावामुळे ती मिलिट्री शासनाला रद्द करावी लागली.     रात्रं-दिवस एकाच ठिकाणी बसून वाचन, चिंतन, मनन, लेखन केल्याने शेवटी-शेवटी त्यांचे हृदय आणि मुत्रपिंड खराब झाले. बफोले अमेरिका येथे त्यांचे एक चिरंजीव डॉक्टर होते. त्यांनी त्यांना उपचारासाठी बोलावून घेतले. परंतु, 22 सप्टेबर 1979 साली बफेलोमध्येच त्यांचा मृत्यू झाला. ता.का.- मौलाना अबुल आला मौदूदी यांचे साहित्य विसाव्या शतकात जेवढे रिलेव्हंट (लागू) होते आज एकेविसाव्या शतकातही त्यापेक्षा जास्त रिलेव्हंट आहे. वाचकांनी आवर्जुन त्यांचे साहित्य वाचून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास स्वत: घडवून आणावा. 

 - एम.आय.शेख
 9764000737

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget