Halloween Costume ideas 2015

तो कुठे हरवला...?

- साहिल शेख
कुरूंदवाड (कोल्हापूर) 9923030668

 
तो कुठे हरवला कोण जाणे ? हल्ली त्याची चर्चा बंद झाली, आता गल्लीच्या स्मृतीत तो उरला नाही. रोजच्या धडपडीच्या प्रपंचरहाटयात कांही गोष्टीचं विस्मरण सहज होत. हे होणं चांगलं की वाईट? पण त्याची आठवण आता त्याच्या आई शिवाय कुणीच काढत नाही. म्हणजे आईच्या मायेचं अथांग आभाळ भरून येतं आणि आसवांनी ती बरसत रहाते. त्याचा थांगपत्ता नाही. कुठेय तो ??
    असो, आपल्याला काय त्याचे? जूनचा महिना, त्यात माझ्या मुलाच ऍडमिशन वशिल्यानी कुठं होतयं का ते महत्वाचं ? आणि हो माहे रमजानचे मुबारक दिवस, ईदची तयारी करायचीय शफिक टेलरला झुब्बे द्यायचे शिवायला. शिवाय एखाद वर जॅकीट, सलीम अत्तारला सांगायल हवं ‘इत्र’ च्या चांगल्या परवडेल अशा कांही छोटया बाटल्या आपल्यासाठी ठेवायला, सादिक खाटीककडे मटण चांगलं मिळतचं, बागवान भाई भाजीपाल्यापासून सगळा किराणा व्यवस्थित पोहचतीलच, सुक्यामेव्यासाठी अस्लम किराणा मर्चर्ंट फेमसचं ! चला उत्तम तयारी यावर्षी .... बायकोसाठी उत्तम डिझाईनचा
बुरखा तीने डिझाईनरला सांगून बुक केलाय, सिरिअल्सवाल्या कपडयांच्या फैशनने मुलगी-मुलगा सजेल ... आई बिचारी सफेद पेहराव्यात असते. छोटा भाऊ जुन्या घरात प्लॅस्टिक वस्तुंचा व्यापार करतोय. त्याला थोडीफार पैशांची मदत केली की मग कर्तव्य संपलं ! सगळं ओके ओके.
    काल तराबीह नंतर निवांत बसून बाजाराची यादी काढली. सहरीसाठीचे सगळे योग्य पदार्थ फ्रिजमध्ये, आई अजून शांत तसबिह पढत होती. फकिर-भिकारी दारी येतील मागायला तेव्हा खपली गहूच्या ऐवजी साधे गहू देऊ, बायकोनं मलाच ईशार्‍याने सांगितलं. ‘हो’ म्हणणे हा एकच पर्याय. अम्मी आपल्या खोलीकडे जावून झोपली. बराच वेळ एफबीवर, वॉटसऍपवर चॅटींग करत उद्याच्या मिटींग्ज बद्दल डिटेल्स टायपून मी झोपी गेलो. उद्या जायला हव लवकर. विमेन इम्पावरमेंट वर मोटिवेशन स्पीच द्यायला. सुबहच्या नमाजाशिवायच मी बाहेर पडलो. नवीन आलेल्या फोरव्हीलरची मजाच कांही और! ... गाणी गुणगुणत ऑफिस गाठलं. कलीग्ज सोबत मोठया सोशल वर्कसाठी फायनान्स करणार्‍या
कंपनीतील कर्मचारीवर्गाशी अस्खलीत मराठीत पीपीटी टाईप भाषण देवून मोठा झाल्याचा फिल करीत, अधिकार्‍यांशी बोलत बसलो. उच्चविद्या विभुषित वगैरे लोक, कॉर्पोरेट क्षेत्रात किती भारी फॉर्मल राहायला लागत, मला तरी तेच आवडत. गप्पा रंगल्या, कसलीही घडी न विस्कटता, लंच बे्रक नंतर निरोप दिला ... दुपारचं जेवण ... व्वा
सुपर्ब टेस्टी- हे कुणी बनवलं ?
    ‘आमच्या इथे एक मुस्लिम बाई काम करते कॅन्टीनमध्ये’ वेटरने उत्तर दिले. चव ओळखीची, आपली वाटली. स्वयंपाकिण बाईंना भेटण्यासाठी उठलो.
    अरे, या तर आपल्या शेजारच्या आपल्या परिसरातल्या भाभी.. यांचाच मुलगा हरवलाय.. मघाशीच्या ‘ महिला सबलीकरण’ सेशनला या नव्हत्याच हजर....
    फकीराच्या कटोर्‍यात चिल्लर पटपट पडावी, जुम्मा दोपहरनंतर तसा आठवणींचा खणखणाट डोक्यात घुमू लागला. माझी अम्मी आणि या भाभी साधारण एकाच वयाच्या, गाव तुरळक वस्तीचे होते तेव्हाच्या मैत्रीणी जणू .. पण आता सगळ बदललं... आई घरात असते. माझा छोटा बंगला गाडी, सुखवस्तू आणि या ‘भाभी’ ....?
    मला त्यांनी ओळखून आदबीनं सलाम केला ‘बेटा, बडा हुवा है तू ...’ जरा दुवा कर मेरे बेटे के वास्ते’ एवढं बोलून मागे फिरल्या.
    तिथून परतताना मलाच कांहीतरी ओझे झाल्यासारखे वाटले, घरी पोहचलो. निवांत विश्रांती सगळयांची, मी ही पडलो. बाहेर आभाळ भरून आलेलं. पावसाच्या कांही सरी चिंब करतील.. उन्हाचा तडाखा कमी होईल... तेवढाच गारवामस्त, डोळा लागेना. आतल्या आत कांही अस्वस्थशी खळबळ जाणवत होती. हल्ली मटण-चिकनने जास्त ऍसिडीटी होतेय बहुतेक.... डॉ. कलीम ना दाखवूया आज होय! माझे घरचे सगळे व्यवहार मी समाजबांधवाशीच जोडून करतो, सध्यातरी माझी हीच सामाजिक बांधिलकी या शहरी उपनगरात. आपलं वजन राखून रहायला हवं ना... सोशली ऍटच्ड !!
    झोप येत नव्हती म्हणून टीव्ही ऑन केला. बातम्यांचे चॅनेल्स बदलत राहिलो. औरंगाबादेत तुरळक दंगलीच्या बातम्या, कुठे मिरज सांगलीतला समर्थन मोर्चा, कुठे कर्नाटक सरकारच्या बेटींग-सेटींग, अरबाज-सलमान खमंगता, आमिर खानचं पाणी फौडेंशन, राणा अयुबला धमक्या, पीएमची दर्गाभेट, मलालाची इंटरनॅशनल स्तुती, सिरियाची चर्चा, पाकिस्तान राष्ट्राचा दिवाळखोरपणा, मध्येच सोनू निगम, लता मंगेशकर अशा गोड गळयाच्या गायकांची मुस्लिमांविषयी ब्रेकिंग न्युज सारखी ठळक विधाने, पक्षपार्टीच्या माध्यमातून फुललेल्या सेलिबे्रटी इफ्तार पाटर्या, टिका, बहस-चर्चा ... दहशतवादी .... बेगुनाह कैदी.
    टीव्ही चॅनल्स तसाच बदलत राहिलो... आणि सगळीकडेच मला मी अनुभवत राहिलो. पण मघाशीच्या त्या भाभींचा चेहरा नजरेसमोरून हटत नव्हता. माझं स्पीच देखणं सजवून केलेलं होत.टाळयांचा आणि मानधनाच्या नादात खुप कांही सुंदर श्‍लोक, कोटेशन उदाहरणे देवून मी पॉझिटीव्हीटी जागविली होती, पण काय
कुणास ठाऊक मी आता उदासल्यासारखा जरा...
    भाभी रोजा असतील का? इफ्तार कसे होईल ? सहरी कशी झाली असेल ? त्यांची कांही व्यवस्था असेलही कदाचित पण
हरवलेल्या मुलाशिवायची ईद ....? त्यांची अजून माहिती घ्यायला हवी होती म्हणजे त्या काय करतात, कुठे राहतात? कमावते कोण परिस्थिती काय, वगैरे... असो....
    समोस्यांचा बेत आहे, थोडे कोपर्‍यावरच्या मस्जिदीत पाठवायचे आहेत. मुलगा जातो रोज मगरीबला .... टु व्हीलरवरून ! तिला उठवायला हवं ... नको आज अम्मीच्या हातचं कांहीतरी खाऊया. एकाच हाकेने अम्मी जागी झाली. तिच्या हातचा चहा घेतला बाकी बायको उठेल तेव्हा करेल स्वयंपाक... मुलगी दुपारच्या एक्स्ट्रा क्लासला गेलीय. मी चहा घेवून लोळत राहिलो, उद्या “शिक्षण व्यवस्थेवर” बोलायचयं, गेस्ट लेक्चरर म्हणून मोठ्या विद्यापीठात जायचंय, चला नोट्स काढूयात. टेबलजवळ बसून लॅपटॉप ऑन केला. असरच्या अजानचा आवाज आज कमी येत होता ऐकू. लॅपटॉपवर मी माझेही नकळत शिक्षणातून मध्येच हरवलेली मुले, विद्यार्थी शोधत होतो. सर्च करताना विद्यापीठातून हरविलेले विद्यार्थी असं कांहीस टाईप केलं. भांडवलदारी जिओ नेटवर्कनं बरीच नांवे माहितसकट लगेच ओपन केली. उदा. रोहित, नजीब वगैरे, भाभीच्या मुलाच काय झालं ?
त्याचा रोहित झाला की नजीब... ?
. . . .. . . . . .. . .. .
. . . .. . . . . .. . .. .
. . . .. . . . . .. . .. .
हम आह भी भरते हैं, तो हो जाते है बदनाम,
वो कत्ल भी करते है.... चर्चा नही होता.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget