Halloween Costume ideas 2015

ईद : मानवप्रेमाचे निमंत्रण

- शाहजहान मगदुम 
८९७६५३३४०४

मुस्लिम! जगभरातील विविध धार्मिक समुदायांपैकी एक – इस्लाम धर्मानुयायी समुदाय. सध्याच्या युगात विविध कारणांवरून जागतिक पातळीवरील प्रसारमाध्यमांसाठीची ब्रेकिंग न्यूज. मग ते राजकारण असो की समाजकारण, शैक्षणिक क्षेत्र असो की उद्योग, राष्ट्रीय असो की आंतरराष्ट्रीय. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले असता जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या या मुद्द्याला अनेक देशांमध्ये दबावाखाली जीवन जगणे भाग पडत आहे. पन्नासहून अधिक मुस्लिम राष्ट्रे असूनदेखील या समुदायाची प्रतिमा मलीन करण्याचा विविध स्तरांवर प्रयत्न केला  जात आहे. आनंदोत्सव साजरा करणे मानवी जीवनाचा एक भागच आहे, किंबहुना आपल्या दैनंदिन जीवनातील दु:ख, क्लेश व कटुता विसरून कधी तरी आनंद लुटणे हा जणू प्रत्येक  स्त्री-पुरुषाचा, मग तो धनवान असो की गरीब असो; जन्मसिद्ध हक्कच आहे. पवित्र रमजान महिन्याच्या शेवटी चंद्रदर्शन झाल्यावर 'ईद-उल-फित्र'चा आनंददायी सण साजरा केला जातो. या दिवसी कोणीही माणूस आनंदापासून वंचित राहता कामा नये, मग तो गरीब व दरिद्री का असेना. आनंदोत्सवात सहभागी होण्याचा त्याचा वाटा त्याला मिळायलाच हवा. इस्लाम  आपल्या अनुयायांना अशी समाजनिर्मिती करण्याची प्रेरणा देतो, ज्यात कसलाही उच्चनीचतेचा, श्रीमंत-गरिबीचा भेदभाव नाही. तेथे शांती व सुख-समाधानाचा प्रचार व प्रसार केला जातो,  इतकेच नव्हे तर संपूर्ण समाजाची जडणघडण व उभारणीच सामाजिक न्याय व समतेच्या पायावर केली जाते. तेथे सुख-समृद्धीत आणि आनंदात सर्वांचा हिस्सा असतो. खरे तर रमजान  महिन्याच्या शेवटी येणाऱ्या या आनंद ओसंडणाऱ्या सणाची मुळ नाव 'ईद-उल-फित्र' असे आहे. म्हणजे गोरगरिबांना दान करून त्यांना जीवनात आनंदाचे काही क्षण निर्माण करण्याचा व  दान-पुण्य मिळविण्याचा सण म्हणून संबोधला जातो. मनाच्या औदार्याची काही कृत्ये, ज्याला दान किंवा भिक्षा म्हणता येणार नाही, केली जातात. आपल्यापाशी खाद्यपदार्थ व पेये  तसेच धन-द्रव्य समाजातील गरजूंना वाटणे, हे एक पवित्र कर्तव्य ठरविण्यात आले आहे. मुस्लिम बांधवांच्या मूलभूत गरजा भागवून झाल्यानंतर जे उरते ते पुण्यकार्यात धन खर्च करण्याचा उपदेश केला जातो. स्वत:च्या गरजांना मर्यादा घातलेल्या नाहीत, तसेच खर्च करण्यावरही काही मर्यादा घातलेली. संपूर्ण महिनाभर दरदिवशी रोजा पाळण्यात आला आणि  विविध प्रकारे इस्लामी पद्धतीनुसार उपासनाविधी पार पाडल्या आणि या महिन्यास पॅलेस्टिनीवर बेतलेल्या दु:खासह निरोप दिला जात आहे. एका सच्चा मुस्लिम अनुयायीची अशी उत्कट  इच्छा असते की हे कृपावर्षावाचे व क्षमाशीलतेचे दिवस आणखी पुढे चालू राहावेत. म्हणजे आपल्या त्रुटींबद्दल, चुकांबद्दल आणि अपराधांबद्दल क्षमायाचना करून अल्लाहची मर्जी म्हणून  महिनाभर मुस्लिम उपासक भूक, तहान व शारीरिक त्रास सहन केला. आता त्या पालनकत्र्याचाच असा आदेश आहे की 'ईद'चा आनंदोत्सव करावा. आनंद यासाठी की पुन्हा एकदा  'ईद'चा दिवस इनाम मिळवून देणारा. पॅलेस्टिनी मुस्लिम बांधवांवर कोसळलेल्या दु:खाचे गालबोट वगळता या आनंदात जगातील मुस्लिम सहभागी आहेत. ‘ईदगाह'मध्ये जाण्याआधी  'फित्र'चे दान काढून ते गरजूंना आणि गोरगरिबांना वाटणे आवश्यक आहे. ही कृती इस्लामी बंधुप्रेमाचे तत्त्व आठवण करून देते. मानवाबद्दल कळवळ व आस्था दर्शविण्याचे हे दृश्य असते. जेव्हा श्रीमंत व धनवान माणूस महिनाभर रोजे (उपवास) करतो तेव्हा त्याला गोरगरिबांच्या तहानभुकेची अनुभूती मिळते, त्याचाच हा परिपाक असतो. भुकेच्या त्रासाचा अनुभव  त्याला उपाशीपोटी असणाऱ्यायबद्दल कणव व दया बाळगण्यास भाग पाडतो. त्याचप्रमाणे तहानेची व्याकुळता त्याला तहानलेल्याची तहान भागविण्यास विवश करते. गोरगरिबांना आपले  धनद्रव्य दान करून तो द्रव्यप्रेमातून मुक्त होतो. समाजातील दुसऱ्या माणसाला आपल्या आनंदात सहभागी करून घेतल्याशिवाय खराखुरा आनंद माणसाला उपभोगता येत नाही. ईदचा खराखुरा आनंद तेव्हाच मिळतो, जेव्हा सर्व जगभरचे मुस्लिम त्यात सहभागी होतात. पॅलेस्टाईनवर इस्रायलद्वारा करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे या ईदचा आनंद काहीसा फिका पडलेला  आहे. जगाच्या कोणत्याही भागात, मग ते भारत असो की पॅलेस्टीन असो, बोस्निया असो की फिलिपाइन, यूक्रेन असो की  इजिप्त, इरान असो की सीरिया, अफगाणिस्तान असो की  अल्जिरिया असो, जर तेथील मुस्लिम ईदच्या आनंदाला मुकले असतील तर ही 'ईद'सुद्धा त्यांच्या भग्न हृदयातून ठिबकणाऱ्या रक्ताच्या थेंबानी रक्ताळून जाते. इस्रायल-पॅलेस्टीन संघर्षाच्या बाबतीत सऊदीअरेबियासह अनेक मुस्लिम देश सध्या मूग गिळून बसलेले पाहून याची प्रचिती आल्याशिवाय राहात नाही. त्यांच्यातील बंधुत्वभावनेत कसलीही हालचाल होत  असताना दिसत नाही. याचे मूळ कारण असे की आपण एक ‘उम्मत' (समुदाय) आहोत ही गोष्टच मुस्लिमांच्या मस्तकातून निघून गेली आहे. या सणाचा आनंद लुटत असताना  देशातील संपूर्ण मुस्लिम समाजावर भीतीचे, हलाखीचे व वैफल्याची वातावरण टांगलेले आहे. ईदचा सोहळा पुन्हा एकदा विश्वबंधुत्वाचे स्वरूप धारण करण्याचे सर्वांना निमंत्रण देत आहे.  आपणा सर्वांना ही ईद आनंदाची जावो अशी शुभेच्छा व्यक्त करतो. ईद मुबारक!



Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget