Halloween Costume ideas 2015

मीडियाचे आव्हान स्विकारायला हवे!

इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की, ट्रुथ इज नॉट ट्रुथ बट परसेप्शन ऑफ ट्रुथ इज ट्रुथ’ अर्थात सत्य हे सत्य नसते तर जनमानसात सत्याबद्दल जी धारणा तयार झालेली असते ती सत्य असते. उदा. मुसलमान चार बायका करतात, डझनवारी मुले जन्माला घालतात, क्रुर असतात, आतंकवादी असतात, पाकिस्तान समर्थक असतात, हे सर्व आरोप चुकीचे आहेत. याची जाणीव आपल्यालाच नाही तर आरोप करणार्यांनाही आहे. परंतु हे सर्व आरोप खरे आहेत, अशी धारणा बहुसंख्य समाज बांधवांपैकी अनेकांची झालेली आहे. ही धारणा कोणी तयार केली? स्पष्ट आहे मीडियाने.
    अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील कुठल्यातरी हॉलमध्ये 1938 पासून बॅ. जिन्नांचा फोटो लटकलेला होता. याची माहिती किती लोकांना होती? बहुतेक लोकांना नाही. मात्र मीडियाने त्या संबंधी बातम्या अशा पद्धतीने दिल्या की आज समस्त देशाला समजून चुकले आहे की, जिन्नांचा फोटो अलिगढ मुस्लिम विद्यापीठात लावलेला आहे. एवढेच नव्हे तर भारतीय मुस्लिम तो फोटो आहे तसाच आणि आहे तेथेच राहू देण्याच्या समर्थनात आहेत, असे चित्र उभे केले. खरे तर तो फोटो काढणे किती सोपे होते? स्थानिक खासदारांनी तक्रार केल्यानंतर, मानव संसाधन मंत्रालयाचे एक पत्र विद्यापीठ प्रशासनाला गेले असते, तरी तो फोटो त्या ठिकाणाहून निघाला असता. परंतु मीडियाने त्या फोटोचा असा गवगवा केला की मुस्लिमांच्या भूमिकेला जनमाणसात संशयास्पद करून टाकले.
    प्रत्येक बुद्धिमान माणसाला माहित आहे की, भारतीय मुस्लिमांनी बॅ. मुहम्मद अली जिन्ना आणि त्यांच्या विचारांना स्वातंत्र्यापूर्वीच नाकारले होते. दारूल उलूम देवबंद, मौलाना अबुल कलाम आझाद, खान अब्दुल गफ्फारखान, मुहम्मद अली जौहर, शौकत अली जौहर, डॉ. जाकीर हुसैन, हसरत मोहानी, युसूफ मेहरअलीच नव्हे तर लाखो सामान्य मुस्लिमांनीही जिन्नांना नाकारत काँग्रेसला साथ देत भारतात राहणे पसंत केले होते. असे असतांनासुद्धा मीडियाने फाळणीला मुस्लिमांना जबाबदार ठरविण्यात यश मिळविले आहे. भारतात विश्वासाने राहिलेल्या मुस्लिमांची प्रतीमा मलीन करण्यात व त्यांना पाकिस्तान समर्थक ठरविण्यात मीडियाला कमालिचे यश प्राप्त झालेले आहे. भारतीय मुस्लिम भारताशी एकनिष्ठ आहेत हे गेल्या सत्तर वर्षातील आपल्या आचरणाने जरी सिद्ध झालेेले आहे. तरी ही गोष्ट ठासून सांगण्यात आपण आज सत्तर वर्षानंतरही कमी पडलेलो आहोत. याचे कारण एकच, आपण मीडियाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालो आहोत. मेन स्ट्रिम मीडियामध्ये आपल्या आचार आणि विचारांचे प्रतिनिधीत्व तर सोडा प्रतिबिंब सुद्धा उमटत नाही, याची खात्री होवूनही भारतीय मुसलमान गाफिल राहिले. परिणामी, एकतर्फी प्रचार होवून बहुसंख्य बांधवांच्या मनात मुस्लिमांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाला.
    खलील जिब्रान म्हणतात, जेव्हा झाडाचे एक पान गळून पडते तेव्हा त्याला संपूर्ण झाडाची मूक सम्मती असते. ठीक याच पद्धतीने भारतीय मुस्लिमांवर आरोप होत असतांना जर का समाज गप्प राहिला तर देशात संदेश जातो की, त्यांच्यावर लावले जाणारे आरोप खरेच असावेत. कारण खामोशी रजामंदी की अलामत होती है.
मुस्लिम गप्प का राहतात?
    मुस्लिमांवर होत असलेले आरोप सहन करत मुस्लिम गप्प राहतात, असा एक समज अनेक लोकांच्या मनामध्ये खोलपर्यंत रूजलेला आहे. वास्तविकपाहता हा समज चुकीचा आहे. मुसलमान व्यक्त होतात. परंतु, उर्दूतून व्यक्त होतात. त्यांच्या संवेदनांना मुख्य धारेच्या माध्यमामध्ये स्थान मिळत नसल्याने, नाईलाजाने त्यांच्या हाती असलेल्या उर्दू वर्तमानपत्रातून त्यांच्या संवेदनांची अभिव्यक्ती होत असते. दुर्देवाने बहुसंख्य हिंदू बांधवांनाच नव्हे तर बहुसंख्य मुस्लिम बांधवांनासुद्धा उर्दू लिहिता, वाचता येत नसल्याने बहुतेकांचा असा गैरसमज होतो की, मुस्लिमांवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर आरोप होवून सुद्धा ते उत्तर देत नाहीत, म्हणजे आरोप खरे असावेत.
    आता एकेक करून माध्यमांमध्ये मुस्लिमांचा सहभाग किती आहे? हे पाहूया. सुरूवात इलेक्ट्रॉनिक्स मीडियापासून करूया. इलेक्ट्रॉनिक्स मीडिया हा अत्यंत प्रभावशाली मीडिया आहे, यात दुमत नाही. देशात असलेल्या शेकडो वृत्त वाहिन्यांमधून दिल्या जाणार्या बातम्या आणि केले जाणारे विश्लेषण यातूनच जनमत तयार होत असते. यातही वाद नाही. याचे उत्कृष्ट उदाहरण 2014 मधील काँग्रेसचा पराभव आणि भाजपचा विजय होय?
    या वाहिन्यांमध्ये मुस्लिमांचा वाटा शुन्य आहे. ई टिव्ही उर्दू, झी सलाम वगैरे वाहिन्या ह्या मुस्लिमांच्या जनभावनेचे प्रतिनिधीत्व करीत नाहीत. त्या शुद्ध व्यावसायिक मनोरंजनाला वाहून घेतलेल्या वाहिन्या आहेत. वाहिन्यांच्या मालकीमध्ये मुस्लिमांचा सहभाग नाही इथपर्यंतही ठीक होते. परंतु, अलिकडे बहुतेक वाहिन्यांवर एखाद्या नॉन इश्यु (गैरलागू मुद्दा) ला इश्यु (मुद्दा) बनवून त्यात चार-पाच जाणकार लोकांचे पॅनल बसवायचे व मुद्दामहून चर्चा तापवायची. त्यातून टीआरपी वाढवायचा, असा एक नवीनच खेळ सुरू झालेला आहे.
जहाँन-ए-ताजा की अफकार-ए-ताजा से है नमूद
के रंगो खिश्त से होते नहीं जहान पैदा
    याची सुरूवात तारीक फतेह नावाच्या एक मुस्लिम सदृश्य नाव असलेल्या विदेशी व्यक्तीच्या ’फतेह-का-फतवा’ या तद्न भीकार कार्यक्रमापासून झाली. हे सद्ग्रस्थ मूळचे पाकिस्तानचे. पण आपल्या वादग्रस्त व्यक्तीमत्त्व व इस्लामविषयी असणार्या तस्लीमा नसरीन छाप विचारांमुळे पाकिस्तानमधून हकालले गेले. तेथून ते सऊदी अरबला पोहोचले. अल्पावधीत तेथूनही त्यांना गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतर कॅनडा सारख्या पुरोगामी देशात स्थायिक झाले व तेथील नागरिकत्वही घेतले. मात्र आपल्या स्वभावामुळे तेथेही वादग्रस्त झाल्याने, भारतात येवून स्थायिक होण्याच्या उद्देशाने आले व फतेह का फतवा हा कार्यक्रम सुरू केला. त्यात हे महाशय मुद्दामहून एखादा मुद्दा उचलायचे. त्यात चार पाच लोक बोलावून चर्चा घडवून आणायचे. चर्चेत भाग घेणार्या पॅनलमध्ये पारंपारिक शिक्षण घेतलेल्या एखाद दुसर्या मुस्लिम व्यक्तीला आवर्जुन बोलवायचे. कार्यक्रमात सहभागी झालेली मुस्लिम व्यक्ती अशा अभिनिवेशात बोलायची जणू ती समस्त भारतीयांचे प्रतिनिधीत्व करत होती. या कार्यक्रमाची स्क्रिप्ट अगोदरपासून तयार असायची. सर्वजण त्या मुस्लिम व्यक्तीवर तुटून पडायचे. इतके की, अनपेक्षित हल्ल्यांत त्या व्यक्तीचे स्वतःवरील नियंत्रण सुटायचे व ती व्यक्ती नको ते बोलून जायची. अनेकवेळा अशा अनेक व्यक्तींना कार्यक्रमातून अक्षरशः हाकलले जायचे. ’ निकलना खुल्द से आदम का सुनते आये थे लेकिन, बडे बेआबरू होकर तेरे कूंचेसे हम निकले’ अशी त्यांची अवस्था होवून जायची. तरी परंतु, प्रसिद्धीची हाव अशा लोकांना पुन्हा-पुन्हा त्या कार्यक्रमात घेवून जायची.
    तारीक फतेह ने भारतीय इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या पत्रकारितेमध्ये एक नवीन शैली जन्माला घातली. येथील काही लोकांना आनंद मिळेल अशा वादग्रस्त कार्यक्रमाची आखणी करून, ते यशस्वी करून दाखविण्याची नवीन पद्धत यानिमित्ताने रूढ झाली. ’फतेहचा फतवा’ वादग्रस्त झाल्यानंतर जेव्हा मोठ्या प्रमाणात विरोध झाला तेव्हा तारीक फतेहला हा कार्यक्रम गुंडाळून भारत सोडावा लागला. मात्र त्यांनी जन्माला घातलेली शैली चार दोन वाहिन्या सोडल्यास बाकी वाहिन्यांनी उचलली. आज परिस्थिती अशी आहे की, कुठल्याही वाहिनीवर नियमितपणे असे चर्चासत्र चालू असतात. त्यात पुन्हा-पुन्हा विशिष्ट असे मुखदुर्बल मुस्लिम व्यक्ति वेचून बोलाविल्या जातात आणि दाढी, टोपी, तीन तलाक, औरंगजेब, अल्लाउद्दीन खिल्जी, पद्मावती, चार बायका, आतंकवाद, मुहम्मद अली जीन्ना सारख्या अनावश्यक विषयावर चर्चा घडवून आणली जाते. इस्लामची कल्याणकारी शिकवण उदा. व्याजमुक्त अर्थव्यवस्था, महिलांना वारसा हक्क, नैतिक शिक्षण इत्यादी विषयावर कधीच चर्चा घडवून आणली जात नाही किंवा मुस्लिमांची बेरोजगारी, गरीबी, आरक्षण सारख्या आवश्यक विषयांवर फारशी चर्चा होतांना दिसत नाही.
    टीव्हीवरील वाहिन्यांच्या चर्चासत्रामध्ये मोठमोठ्या विद्यापीठातून भौतिक शिक्षण घेतलेले तज्ज्ञ व मास मीडियाच्या आधुनिक शस्त्रांस्त्रांनी लैस अँकर हे पॅनलमधील मुस्लिम व्यक्तीवर असे काही तुटून पडतात की, त्या मुस्लिम व्यक्तीची होत असलेली केविलवाणी परिस्थिती पहावत नाही. पाहणार्यांना डिप्रेशनची भावना होईल इथपर्यंत त्यांचा अपमान केला जातो. इस्लाम सत्य आणि इस्लामची शरियत सत्य असतांनासुद्धा फक्त योग्य पद्धतीने मांडणी न करता येत नसल्यामुळे जवळ-जवळ प्रत्येक चर्चासत्रामध्ये सहभागी मुस्लिम प्रतिनिधींना अपमानास्पद पद्धतीने माघार घ्यावी लागते. नियमितपणे होणार्या या अपमानाला टाळण्यासाठी दारूल उलूम देवबंद यांनी 2017 मध्ये एक निर्देश जारी करून उलेमांना अशा चर्चासत्रामध्ये सहभागी न होण्याचे आवाहन केले. मात्र प्रसिद्धी लोलूप काही तथाकथित उलेमा अजूनही या निर्देशाची परवा न करता अशा चर्चासत्रामध्ये जातात व आपला मुखभंग करून घेतात. या लोकांना आपलीही गेलेली कळत नाही व समाजाचीही जात असलेली कळत नाही.
    खरेतर कुठल्याही क्षेत्रात कमाल दाखविण्यासाठी कष्ट आणि गुणवत्ता दोहोंची गरज असते. आपल्या कष्टाच्या बळावर खेळाडू गोलपोस्टपर्यंत तर जावू शकतो परंतु, गोल करण्यासाठी गुणवत्ता हवी असते. अनेकवेळा अशा चर्चासत्रांमध्ये काही मोजक्या मुस्लिम व्यक्ती गोलपोस्टपर्यंत जातात मात्र गोल करण्यामध्ये सफल होत नाहीत. म्हणून आता वेळ आलेली आहे की, मुस्लिम तरूणांनी स्वतःपुढे येवून इस्लामचा सखोल अभ्यास करावा आणि त्यासोबतच माध्यम क्षेत्रातील बी.जे., एम.जे व मास मीडिया आदींचे  उच्चशिक्षण घ्यावे व अगदी काही सेकंदामध्ये चपळाईने प्रभावशालीरित्या आपल्या विचारांची मांडणी करण्याची कला आत्मसात करावी.
समाज माध्यमे
    सोशल मीडिया आजचे वास्तव आहे. वास्तविक पाहता समाज माध्यमांनी विश्वासर्हतेच्या बाबतीत इलेक्ट्रॉनिक्स मीडियाला कधेच मागे टाकलेले आहे. आज कोणती वाहिनी, कोणत्या पक्षाशी निगडीत आहे, हे जनतेच्या लक्षात आलेले आहे. बोटावर मोजण्याइतक्या वाहिन्या स्वतंत्र व निष्पक्ष राहिलेल्या आहेत. शिवाय, वाहिन्यांमधून होणार्या चांगल्या वाईट जाहिरातींचा भडीमार, इत्यादीमुळे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाच्या उपयोगीतेवर प्रश्नचिन्ह लागलेले आहेत. आज टी.व्ही.मध्ये जे-जे दाखविले जाईल ते-ते पाहण्याशिवाय गत्यंतर नसते. मात्र सोशल मीडियामध्ये ज्याला जे पहायचे आहे तेच पाहण्याची सोय असते. आज टी.व्ही. न ठेवताही अद्यावत राहता येते, हे अनेक लोकांनी सिद्ध केलेले आहे. समाजमाध्यमात काय पहावे? किती पहावे? केव्हा पहावे? याचे स्वातंत्र्य सर्वांना प्राप्त आहे. एवढेच नव्हे तर स्वतःला आवडलेल्या विषयावर लेख, व्हिडीओ तयार करून अपलोड करण्याची सवलतही उपलब्ध आहे. येणेप्रमाणे ही टू वे कम्युनिकेशन पद्धती अल्पावधीतच अतिशय लोकप्रिय झालेली आहे. ट्विटर, फेसबुक आणि व्हॉटस्अॅप हे समाज माध्यमाचे सर्वमान्य प्रकार आहेत. मुस्लिमांची उपस्थिती ट्विटरमध्ये कमी असली तरी फेसबुक आणि व्हॉटस्अॅपमध्ये भरपूर आहे. मात्र या ठिकाणीही आपली उपस्थिती उपस्थिती फारशी उत्साहवर्धक नाही. मुठभर लोक सोडले तर बाकी सर्व लोक नैतिक अधःपतनाकडे नेणार्या गोष्टींमध्येच जास्त सक्रीय असल्याचे दिसून येते.
प्रिंट मीडिया
    महाराष्ट्रामध्ये एकूण 11 कोटींच्या पुढे लोक राहतात. त्यात 2011 च्या जणगणनेप्रमाणे 13 टक्के मुस्लिम जरी गृहित धरले तरी जवळ-जवळ दीड कोटी मुस्लिम राहतात. परंतु, दुर्देवाने या दीड कोटी जनसंख्येचा एकही मराठी दैनिक नाही जो या लोकांच्या भावना शासनापर्यंत किंवा बहुजन बंधूपर्यंत पोहोचू शकेल. वेगळे दैनिक कशासाठी? असा प्रश्न विचारला जावू शकतो. त्याचे उत्तर असे की, मराठी भाषेतून प्रकाशित होणार्या आघाडीच्या दैनिकांमध्ये मुस्लिम समाजाच्या बातम्यांना, विचारांना नगन्य स्थान दिले जाते, हे सर्वांनाच माहित आहे. महाराष्ट्रात अनेक अल्पसंख्यांक समाज असे आहेत ज्यांचे स्वतःचे दैनिक आहेत, त्यातून ते आपले विचार शासन व जनसामान्यापर्यंत पोहोचवितात. त्यांची दखलही घेतली जाते. सच्चर समितीचा अहवाल येईपर्यंत मुसलमानांची परिस्थिती वाईट आहे, याबद्दल सुद्धा देशात एकमत नव्हते.
    स्वतःचे दैनिक नसल्यामुळे मराठी मुस्लिमांची अवस्था बोलता न येणार्या त्या लहान बालकासारखी झालेली आहे, जे की रडत आहे, त्याला माहित आहे की, आपण का रडतो आहोत. परंतु, तो आपल्या रडण्याचे कारण कोणाला सांगू शकत नाही. त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या अंदाजाप्रमाणे त्याच्या रडण्याची कारणमिमांसा करीत असतात. काही मराठी दैनिकांमधून ठरवून मुस्लिमांविषयी विपर्यस्त मजकूर नियमितपणे छापून येतो. स्वतःचे दैनिक नसल्यामुळे त्याचे खंडन करता येत नाही. सत्यस्थिती मांडता येत नाही. असेही नाही की, मराठी मुस्लिमांमध्ये गुणवत्तेची कमी आहे. अस्खलितपणे मराठी बोलणारे, लिहिणारे विचारवंत मोठ्या संख्येने महाराष्ट्रात आहेत. फक्त इच्छाशक्ती नाही आणि माध्यमांचे महत्त्व कळालेले नाही.
    महाराष्ट्राच्या मुस्लिमांनी सर्व काम सोडून प्राधान्याने एक राज्यस्तरीय व्यावसायिक मराठी दैनिक सुरू करण्याची गरज आहे जेणेकरून शासन दरबारी तसेच बहुसंख्य बंधूंकडे या दैनिकाच्या माध्यमातून मुस्लिमांचे विचार आणि समस्या मांडता येतील. इस्लाम संबंधीचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करता येईल. तसेच मुस्लिम समाज महाराष्ट्रच नव्हे तर देशासाठी भांडवल आहे, फक्त जबाबदारी नाही. हे यशस्वीपणे दाखवून देता येईल. शेवटी अल्लाहकडे प्रार्थना करतो की, हे आव्हान स्वीकारण्याची अल्लाह आपल्या सर्वांना समज देओ. आमीन.
अंदाज-ए-बयां गरचे बहूत शूख नहीं है
शायद के उतर जाए किसी दिल में मेरी बात

- एम.आय.शेख
9764000737

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget