Halloween Costume ideas 2015

अन्न सुरक्षा प्रत्येकाचा अधिकार


अन्न सुरक्षा हे आरोग्याचे प्रमुख निर्धारक आहे. त्याचा परिणाम व्यक्ती आणि अखेरीस समाजाच्या जगण्यावर, कल्याणावर, उपजीविकेवर आणि उत्पादकतेवर होतो. पुरेशा प्रमाणात सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळणे ही जीवन टिकवून ठेवण्यासाठी आणि चांगले आरोग्य वाढवण्याची गुरुकिल्ली आहे. उत्पादन ते कापणी, प्रक्रिया, साठवणूक, वितरण, तयारी आणि वापरापर्यंत अर्थात अन्न साखळीच्या प्रत्येक टप्प्यावर अन्न सुरक्षित राहावें याची खातरजमा करण्यात अन्न सुरक्षेची महत्त्वाची भूमिका आहे. हानिकारक जीवाणू, विषाणू, परजीवी किंवा रासायनिक पदार्थ असलेल्या असुरक्षित अन्नामुळे अतिसारापासून कर्करोगापर्यंत २०० हून अधिक रोग होतात. हे रोग आणि कुपोषणाचे दुष्टचक्र देखील तयार करते, विशेषत: लहान मुले, वृद्ध आणि आजारी लोकांना प्रभावित करते. दूषित अन्न आणि पाण्याच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांकडे जागतिक लक्ष वेधण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने ७ जून रोजी “जागतिक अन्न सुरक्षा दिवस” हा विशेष दिवस घोषित केला आहे. २०२२ या वर्षीची थीम 'सुरक्षित अन्न, उत्तम आरोग्य' ही आहे. 

जगातील अविकसित देशांप्रमाणे भारतातही अशा लोकांची संख्या मोठी आहे ज्यांना जगण्यासाठी पुरेसे अन्न मिळत नाही. एवढेच नाही तर त्यांना मिळणाऱ्या अन्नातही पोषक तत्वांचा अभाव असतो. अन्नाची ही समस्या देशाच्या मोठ्या लोकसंख्येच्या गंभीर संकटाचे कारण बनलेली आहे. आजही लहान मुलांपासून वयोवृद्ध पर्यंत लोक भुकेने जीव गमावतांना आढळतात, अशी बातमी नेहमीच येत असते. अन्न आणि कृषी संघटनेच्या (एफएओ) अहवालानुसार, भारतातील सुमारे १४.८ टक्के लोकसंख्या कुपोषित आहे. प्यू रिसर्च सेंटरने अहवाल दिला होता की, गेल्या एका वर्षात भारतात दिवसाला १५० रुपये (खरेदी शक्तीवर आधारित उत्पन्न) मिळवू न शकणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड वाढली आहे. वर्षभरात अशा लोकांच्या संख्येत सहा कोटींनी वाढ झाली असून त्यामुळे गरिबांची एकूण संख्या आता १३.४ कोटींवर पोहोचली आहे. १९७४ नंतर प्रथमच देशातील गरिबांची संख्या तर वाढलीच पण ४५ वर्षांनंतर भारत पुन्हा मोठ्या प्रमाणात दारिद्र्य असलेला देश बनला आहे. नीति आयोगाने अलीकडेच बहु-आयामी गरीबी निर्देशांक (एमपीआई) जारी केला ज्यामध्ये असे म्हटले आहे की प्रत्येक चार भारतीयांपैकी एक बहुआयामी गरीब आहे.

जागतिक स्वास्थ संगठन च्या मते, अन्न सुरक्षा, पोषण आणि अन्न बचाव यांचा अतूट संबंध आहे. अंदाजे ६०० दशलक्ष अर्थात जगातील १० पैकी जवळजवळ १ माणूस दूषित अन्न खाल्ल्यानंतर आजारी होवून ४,२०,००० लोक दरवर्षी मृत्युमुखी पडतात, परिणामी ३३ दशलक्ष निरोगी जीवन वर्षे गमावतात. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये असुरक्षित अन्नामुळे उत्पादकता आणि वैद्यकीय खर्चामध्ये दरवर्षी ११० अब्ज गमावले जातात. ५ वर्षांखालील मुलांना अन्नजन्य रोगाचा ४०% भार सहन करावा लागतो, त्यामुळे दरवर्षी १,२५,००० मुलांचे जीव दगावतात. अन्नजन्य रोग आरोग्य सेवा प्रणालींवर ताण आणून आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्था, पर्यटन आणि व्यापाराला हानी पोहोचवून सामाजिक-आर्थिक विकासात अडथळा आणतात. 

११६ देशांमधील ग्लोबल हंगर इंडेक्स २०२१ मध्ये, भारत २०२० च्या ९४ व्या स्थानावरून आता १०१ व्या स्थानावर घसरला आहे. भारत बहुतेक शेजारी देशांच्या मागे आहे. पाकिस्तान ९२, नेपाळ ७७, बांगलादेश ७६ आणि श्रीलंका ६५ व्या क्रमांकावर आहे. निर्देशांकानुसार, भारतापेक्षा फक्त १५ देश वाईट स्थितीत आहेत. २०१४ च्या क्रमवारीत भारत ५५ व्या स्थानावर होता. द स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड २०१९ नुसार, अनेक दशकांच्या सतत घसरणीनंतर, २०१५ पासून जागतिक उपासमारी हळूहळू वाढत आहे. २०१८ मध्ये जगातील अंदाजे ८२१ दशलक्ष लोक उपासमारीने ग्रस्त होते. ऑक्सफॅम या गरिबी निर्मूलनासाठी काम करणाऱ्या संस्थेने म्हटले आहे की, जगभरात भुकेने दर मिनिटाला ११ लोकांचा मृत्यू होतो. गेल्या एका वर्षात संपूर्ण जगात दुष्काळासारख्या परिस्थितीचा सामना करणाऱ्यांची संख्या सहा पटीने वाढली आहे. अहवालात म्हटले आहे की जगातील सुमारे १५५ दशलक्ष लोक अन्न असुरक्षिततेच्या तीव्र संकटाचा सामना करत आहेत आणि हा आकडा मागील वर्षाच्या आकडेवारीपेक्षा २० दशलक्ष अधिक आहे.

संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम च्या अन्न कचरा निर्देशांक अहवाल २०२१ प्रमाणे भारतात, घरगुती अन्न कचऱ्याचा अंदाज दरवर्षी ५० किलो आहे, किंवा देशभरातील वर्षाला एकूण ६८,७६०,१६३ टन इतका आहे. यूएनईपी च्या अहवालानुसार, २०१९ मध्ये अंदाजे ९३१ दशलक्ष टन अन्न वाया गेले. अहवालात नमूद केले आहे की, २०१९ मध्ये, ६९० दशलक्षाहून अधिक लोक उपासमारीने प्रभावित झाले. आपल्याकडे आणखी एक चिंताजनक गोष्ट आहे म्हणजे देश कमकुवत कोल्ड चेन पायाभूत सुविधेचा अभावामुळे आपल्या शेतातील उत्पादनाचा महत्त्वपूर्ण भाग दरवर्षी १६% फळे आणि भाज्या (शीतगृह सुविधा अभावी) वाया घालवतो. भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) गोदामांमध्ये दरवर्षी धान्याचे डोंगर सडत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ३८,००० मेट्रिक टन पेक्षा जास्त अन्नधान्याचे नुकसान झाल्याचे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने उघड केले आहे. भारताने आर्थिक वर्ष २०२२ मध्ये आतापर्यंत ६१०.२२ अब्ज डॉलर किमतीच्या वस्तूंची आयात केली, जी त्याच्या मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ५४.७१ टक्क्यांनी वाढली आहे. पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाच्या अहवालात सांगितले की सर्व अकाली मृत्यूंपैकी ८० टक्के मृत्यू दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतात. भारतातील अन्न भेसळ हे शेतातूनच सुरू होते जिथे खते आणि कीटकनाशकांचा अतिवापर होतो. 

आज इतक्या मोठ्या प्रमाणावर गरिबी, महागाई, बेरोजगारी, आर्थिक असमानता वाढली असतांना प्रत्येक माणसाला पोषक आहार घेणे कितपत शक्य आहे, अन्न सुरक्षा तर दूर पण गरिबांना शुद्ध प्राणवायू किंवा शुद्ध पाणी सुध्दा मिळत नाही. मोठ्या कष्टाने दोन वेळच्या भाकरीची व्यवस्था करण्यात गरिबांचे जीवन संपून जाते, तर पोषक तत्वाने भरपूर अन्न कुठून कमविणार. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अनेक पोषक तत्वांची गरज असते, त्यांच्या कमतरतेमुळे आपण अनेक प्रकारच्या आजारांना बळी पडू शकतो. कार्बोहायड्रेट, प्रथिने, चरबी, जीवनसत्त्वे, खनिजे हे पोषक घटक आहेत ज्यांची शरीराला सर्वात जास्त गरज असते. 

अन्न सुरक्षेमुळे मानवांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यास मदत होते. देशाचा विकासासाठी नागरिकांचे अन्न सुरक्षेसंबंधी नियोजन व अंमलबजावणी योग्यरीत्या हाताळणे खूप गरजेचे आहे. अन्न सुरक्षेचा दुष्परिणाम समाजाचा प्रत्येक घटकांवर होतो, समाजात असमतोलपणा वाढतो, कुपोषण, दारिद्र्यता, उपासमार, आजार, मुत्यूदर वाढतात. ह्या समस्या इतर समस्यांना जन्म देतात. देशाचा विकासात मोठा अडथळा निर्माण होतो, आर्थिक ताण वाढतो, मानवी जीवनाचा ह्रास होतो. देशाचा प्रत्येक नागरिकापर्यंत शासनाने अन्न सुरक्षेच्या गॅरंटी सह युद्धस्तरावर कार्य करणे गरजेचे आहे. कुपोषण, गरिबी, महागाई, बेरोजगारी, आर्थिक असमानता, उपासमार, अन्नाची नासाडी सारख्या समस्यांवर नियंत्रण करणे आवश्यक आहे. जेणेकरून प्रत्येक नागरिकाला त्याचा हक्काचे पोषण आहार मिळू शकेल, त्यामुळे सर्वांना जीवनात विकासाचा संधी मिळतील, आयुष्यमान वाढेल, रोगराई कमी होईल, आजारावरील खर्च कमी होईल, आयात कमी होवून निर्यात वाढेल, देश आत्मनिर्भर होईल, देशाचे उत्पन्न वाढेल आणि देशाच्या सुखी समृद्धि होण्यास हातभार लागेल.


- डॉ. प्रितम भी. गेडाम

भ्रमणध्वनी क्र.- 82374 17041


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget