Halloween Costume ideas 2015

‘राहत’यांची उर्दूवरील बादशाहत संपली...

Rahat Indori
उर्दू ही अस्सल हिन्दुस्थानी भाषा आहे. अनेकजण आपल्या देशात भारत म्हणा असा आग्रह करत असतांना सुद्धा आजही उर्दू भाषेत भारताला हिन्दुस्थान असेच म्हटले जाते आणि या भाषेचे चालते बोलते विद्यापीठ या आठवड्यात 11 ऑगस्ट रोजी कोरोना आणि हृदयविकाराने निवर्तले. त्यांचे मूळ नाव राहत रफतुल्लाह कुरेशी असे होते. मात्र उर्दू शायरीमध्ये बहुतेक शायर आपली ओळख मूळ गावाशी जोडतात, त्याच परंपरेचे वाहक राहत कुरेशी होते. म्हणून त्यांनी आपल्या नावासमोर कुरेशी ऐवजी इंदोरी हा शब्द निवडला व इंदोरचे नाव अक्षरशः जागतिक पटलावर नेऊन ठेवले.
    त्यांचा जन्म 1 जानेवारी 1950 रोजी इंदौरमध्ये एका कापड गिरणी कामगाराच्या घरात झाला. त्यांचे प्रारंभिक शिक्षण नूतन स्कूल इंदौर येथे झाले. इस्लामिया करीमिया महाविद्यालयातून त्यांनी उर्दू भाषेमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी बरकतुल्लाह विद्यापीठ भोपाळमधून उर्दू साहित्यात पीएच.डी. केली. काही वर्षे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. मुशायर्‍याचे फड गाजवणार्‍या या हरहुन्नरी कलाकाराचा कोरोनाने बळी घेतला. येणेप्रमाणे 1 जानेवारी 1950 रोजी उर्दूच्या क्षितीजावर उगवलेला हा तारा या आठवड्यात निखळला.         मानवी भावनांच्या अभिव्यक्तीचे सशक्त साधन म्हणून कोणत्याही भाषेतील काव्य प्रकार ओळखला जातो मात्र उर्दू भाषा व त्यातील काव्य हे भावनांच्या अभिव्यक्तीपुरते मर्यादित नाहीत हे या भाषेने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात बजावलेल्या भूमिकेचा अभ्यास करणार्‍यांच्या चटकन लक्षात येते. एकीकडे स्त्री पुरूष प्रेमाच्या नित्तांत खाजगी भावना अतिशय हळुवारपणे व्यक्त करत असतांना दुसरीकडे स्वातंत्र्याचा एल्गार करण्याची उर्दूची कठोरता अचंभित करणारी म्हणावी लागेल. जेव्हा जाम-व-मिना, मय आणि मयकदा, सुबू आणि जाम इत्यादी शब्दांच्या माध्यमातून दारूचे जे गुणगाण उर्दू  शायरीतून केले जाते तेव्हा ते इतकी प्रभावशाली असते की न पिणार्‍यालासुद्धा नशा झाल्याची अनुभूती होईल. मिर्झा असदुल्लाखान गालिब पासून ते राहत इंदोरीपर्यंत  दारू संबंधी गुणगाण करणारी दमदार अभिव्यक्ती उर्दूतून झालेली आहे. ’आई’ या एका शब्दाभोवती शेकडो शेर लिहून मुनव्वर राना यांनी उर्दूची श्रीमंती आपल्या काव्यातून  जगापुढे मांडलेली आहे. कुठल्याही प्रकारचे राजाश्रय नसतांना उर्दू भाषेने स्वतःच्या अंगभूत गुणांच्या माध्यमातून जीवंत राहून हे सिद्ध केलेले आहे की, तिचा खानदारी पोत अक्षून असा आहे.

राहतचे काव्य
    तसे पाहता अनेक शायर असे आहेत जे त्यांच्या विशिष्ट शैली आणि विषयांच्या निवडीवरून सहज ओळखले जातात. राहत इंदौरी यांना मात्र कुठल्याही खाच्यात बसविता येण्यासारखी परिस्थिती नाही. कधी प्रेम, कधी विलाप, कधी नशा, कधी देशप्रेम तर कधी देशाला नुकसान पोहोचविणार्‍या शक्तींवर शाब्दिक यल्गार करणारे त्यांचे काव्य गालिब, इक्बाल, दाग आणि प्रेमचंद यांच्यासारखेच अजरामर आहे यात वाद नाही. त्यांच्या मृत्यूनिमित्ताने लिहितांना त्यांच्या काव्याचा आढावा न घेणे हा त्यांच्यावर अन्याय ठरेल. तर चला त्यांच्या काव्याचा संक्षिप्त आढावा घेऊया.
स्त्री सौंदर्याचे वर्णन करतांना अगदी सामान्यातील सामान्य व्यक्तीच्याही लक्षात येईल अशी शब्दांची जुळवणी करून जादू करणारे त्यांचे हे शेर पहा.
    उसकी कत्थई आँखों में है जंतर-मंतर सब
          चाकू-वाकू छुरियाँ-उरियाँ खंजर-वंजर सब
मुझसे बिछडकर वो भी कहाँ अब पहले जैसी है
फिके पड गए कपडे-वपडे ज़ेवर-वेवर सब

राजकीय व्यंग करतांना अगदी साध्या शब्दात ते श्रोत्यांना प्रश्‍न विचारतात,
    सरहद पर तनाव है क्या,
    जरा देखो तो चुनाव है क्या

दांभिक लोकांच्या दांभिकतेवर आसूड ओढताना ते म्हणतात,
दिलों में आग लबों पर गुलाब रखते हैं
सब अपने चेहरों पर दोहरा नकाब रखते हैं
    ये मयकदा है वो मस्जिद है वो बुतखाना
    कहीं भी जाओ फरिश्ते हिसाब रखते हैं
कभी दिमाग कभी दिल कभी नजर में रहो
ये सब तुम्हारे ही घर हैं किसी भी घर में रहो   
    किसी को ज़ख्म दिए हैं किसी को फुल दिए
    बुरी हो चाहे भली हो मगर खबर में रहो

जीवन जगण्यामध्ये ज्या काही अडचणी गरीबांच्या वाट्याला येतात त्यांना अगदी साध्या शब्दात राहतनी खालीलप्रमाणे शब्दबद्ध केले आहे.
तूफानों से आँख मिलाओ सैलाबों पर वार करो
मल्लाहों का चक्कर छोडो तैर के दरिया पार करो
    अंधेरे चारों तरफ साएं-साएं करने लगे
    चराग हाथ उठाकर दुआएं करने लगे
झुलस रहे हैं यहाँ छाँव बांटनेवाले
वो धूप है की शजर इल्तजाएं करने लगे
      अजीब रंग था मजलिस का खूब महेफिल थी
      सफेद पोश उठे काएं-काएं करने लगे.
देशाच्या राजकीय नेत्यांचे ढोंग व व्यवस्थेमध्ये बसलेल्या झारीतील शुक्राचार्यांना उघडे पाडण्यासाठी त्यांनी अतिशय कठोर शब्द असलेल्या अनेक रचना सादर केल्या. या संदर्भात त्यांची एक अतिशय गाजलेली रचना याप्रमाणे
    अगर खिलाफ है होने दो, जान थोडी है
    ये सब धुवाँ हैं कोई आसमान थोडी है
लगेगी आग तो आएंगे कई घर जद में
यहां पे सिर्फ अपना मकाम थोडी है
    मैं जानता हूं के दुश्मन भी कम नहीं लेकिन
    हमारी तरह हथेली पे जान थोडी है.
हमारे मूँह से जो निकले वही सदाकत
हमारे मूंह में तुम्हारी जबान थोडी
    जो आज साहेबे मस्नद हैं कल नहीं होंगे
    किराएदार है जाती मकान थोडी है.
सभी का खून है शामिल यहाँ के मिट्टी में
किसी के बाप का हिंदुस्थान थोडी है.
  
या रचनेने एकाच वेळेस तीन गोष्टी साध्य केल्या. एक सामाजिक अत्याचाराने ग्रासलेल्या सामान्य लोकांना धीर देण्याचे काम केले. दुसरीकडे अत्याचार करणार्‍यांच्या डोळ्यात सत्त्याचे झणझणीत अंजन लावले. तिसरी महत्त्वाची गोष्ट या रचनेने केली ती म्हणजे आत्मविश्‍वास गमावलेल्या लोकांमध्ये आत्मविश्‍वास पुन्हा निर्माण केला.
भारताच्या गंगा जमनी फॅब्रिकचा हवाला देऊन मिश्र वस्त्यांमध्ये आगी लावलाणार्‍यांची घरे सुद्धा घृणेच्या आगीपासून सुरक्षित राहणार नाही, असा संदेश दिला. पाकिस्तानला निघून जा म्हणून काही विकृत राष्ट्रवादी लोक मुसलमानांना उठसूठ धमक्या देत असतात. अशांना उत्तर देतांना राहतनी म्हटले होते,
    अब के जो फैसला होगा वो यहीं पे होगा
    हम से अब दूसरी हिजरत नहीं होनेवाली
  
राष्ट्रप्रेम राहतच्या रक्तात होते. याचा पुरावा म्हणून त्यांचे शेकडो शेर उधृत करता येतील. मात्र येथे फक्त दोन शेर नमूद करणे पुरेसे आहे.
1. ऐ ज़मीं एक रोज तेरी खाक में खो जाएंगे
सोजाएंगे मरके भी रिश्ता ना टूटेगा हिन्दुस्तान से, ईमान से.
2. जब मैं मर जाऊं तो अलग से पहेचान लिख देना
लहू से मेरी पेशानीपर हिन्दुस्थान लिख देना.

अशा या अस्सल हिन्दुस्थानी शायरच्या मृत्यूने काही लोकांना आनंद झाला व तो त्यांनी समाज माध्यमांवर व्यक्तही केला. घृणेच्या सध्याच्या वातावरणात हे वास्तवही स्विकारावेच लागेल. पण काही असो राहत इंदौरी यांनी आपल्या विशिष्ट अशा शैलीतून भारताचे नाव जगातल्या प्रत्येक कानाकोपर्‍यात जेथे-जेथे उर्दू बोलली जाते तेथे-तेथे पोहोचविले व भारत एक स्वतंत्र धर्मनिरपेक्ष गणराज्य असल्याची अनुभूती जगाला करून दिली. अशा या महान कवीला अखेरचा सलाम. राहत जरी शरीराने आपल्यात नसले तरी त्यांचे काव्य आपल्यात सदैव प्रेरणा देत राहील. अल्लाह त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget