Halloween Costume ideas 2015

‘सेक्युलॅरीज़्म’ संबंधी इस्लामनिष्ठ मुस्लिमांची भुमिका

Secularism
विद्यमान घडोमोडींवर पुन्हा एकदा सोशल मीडियावर हिंदू - मुस्लिम वाद सुरू आहेत. यात नेहमी ‘सेक्युलर’ पक्षांना पाठिंबा देणार्‍या मुस्लिम समाजातील काही लोकांनी स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेणार्‍यांची समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांसंबंधी बोटचेपी भुमिका किंवा मुद्दामून ढिसाळपणाची भुमिका घेतल्याचे आरोप होत आहेत. तर त्याचा प्रतिवाद करतांना मुस्लिम समाज हा ‘सेक्युलॅरीज़्म’ला फक्त एक राजकीय गरज म्हणूनच समर्थन देतो, वास्तविकत: मुस्लिम समाजातील बहुसंख्य लोकं ‘सेक्युलरीज़्म’ला एक विचारधारा म्हणून आपल्या वैयक्तिक जीवनात कधीही आनत नसल्याचा आरोप होत आहे. यानिमित्ताने मूळात ‘सेक्युलरीज़्म’ नेमकं आहे तरी काय याची नव्याने उजळणी करण्याची गरज आहे.
    ‘सेक्युलर’चा इंग्रजी शब्दकोशामध्ये शाब्दिक अर्थ ‘आऊट ऑफ चर्च’ किंवा मराठीत ‘मठाबाहेरचं’ असा करण्यात आला आहे. म्हणजे नेमका याचा खरा भावार्थ जाणून घेण्यासाठी यामागील थोडा इतिहास माहित असणे आवश्यक आहे. पाश्‍चात्त्य देशांत ज्या काळात ‘पोपवाद’ सुरू होता त्या काळात विज्ञानवादी, निरीश्‍वरवादी, बुद्धीजीवी लोकांंनी चर्चच्या विरोधात मोहिम राबवली होती. त्या काळात तात्कालीन पोपकडून बायबलच्या प्रचलित गृहितकांविरूद्ध नवीन वैज्ञानिक तथ्यांना मानणार्‍यांना शिक्षा सुनावण्यात आल्याचाही इतिहास सापडतो. त्यामुळे चर्चविरोधी अभियानाला जास्तच खतपाणी मिळाले. सॉक्रेटिसला विष देऊन देहदंडाची शिक्षा दिली गेली. तर पृथ्वी गोल असल्याचा बायबलविरोधी सिद्धांत मांडल्यावरून गॅलीलीयोला सुनावलेली शिक्षा होता होता वाचली होती. त्यामुळे पाश्‍चात्य देशांत कमी प्रमाणात का होईना पण त्या काळात चर्चच्या विरोधात एक मजबूत अशी वैचारिक भूमी तयार झाली होती. याचा परिणाम म्हणून काही धार्मिक लोकांनी अशी पळवाट काढली की, धर्म ही सर्वंकष जीवन व्यवस्था नाही आणि ही फक्त उपासना, व्रत वैकल्यापुरती मर्यादीत गोष्ट असून सर्वसामान्य दैनंदिन जीवनात त्याचा हस्तक्षेप नको. त्यामुळे हे भांडण हळू-हळू बोथट होत गेले. पण याचा परिणाम असा झाला की, शैक्षणिक, राजकीय व जीवनाच्या जवळपास प्रत्येक क्षेत्रातून धर्म बाद होत गेला आणि सेक्युलरीज़्मच्या नावाखाली लोकांमध्ये वाट्टेल तशी धोरणं राबविण्याची पद्धत सुरू झाली. परिणामी चंगळवाद व स्वैराचार वाढला. हे लोण जगभरात पसरले, त्याला मुस्लिमबहुल देशही अपवाद राहिले नाही. तुर्कस्थान व इजिप्तमध्ये इस्लामनिष्ठांविरोधात सेक्युलरीज़्मच्या
नावाखाली दमनचक्र चालविले गेले. तुर्कस्थानात कमाल पाशा अतातुर्कने तर सेक्युलरीज़्मविषयी     इतकी टोकाची भुमिका घेतली की, त्याने सार्वजनिक ठिकाणी दाढी, टोपी, बुरखा वगैरे धार्मिक प्रतिकांच्या वापरावरच बंदी आणली. भविष्यात जो कुणी शासक तुर्कस्थानच्या या कट्टर सेक्युलर व्यवस्थेविरूद्ध भुमिका घेईल, त्याचे सरकार उलथवण्याची जबाबदारी त्या हुकूमशाहने लष्करावर सोपवली. आज अनेक सेक्युलरवादीही त्या तानाशाहीचं समर्थन करतांना दिसतात.
    इजिप्तमध्येही अब्दुल नासेरनं उदारवादी इस्लामनिष्ठ चळवळ ‘ मुस्लिम ब्रदरहूड’च्या सामाजिक कार्यकर्त्यांविरूद्ध दमनचक्र चालविले. महिला, आबालवृद्धांनाही सोडलं नाही. त्या दमनचक्राच्या रक्तरंजित आठवणी जैनब उल ग़जाली नावाच्या महिला क्रांतीकारींनी ’जिंदान के शब ओ रोज़ (तुरुंगातील दैंनंदिनी)’ नावाने आत्मचरित्रात मांडल्या आहेत.
    सेक्युलरीज़्मच्या नावाखाली चालविलेल्या या दमनचक्राच्या अनुभवावरून एकंदर धर्मनिष्ठ मुस्लिम समाजाची ही खात्री पटली की, सेक्युलरीज़्म म्हणजे दुसरं- तिसरं काही नसून मुस्लिमांचे निधर्मीकरण करून त्यांच्यावर भांडवलवादी किंवा साम्यवादी विचार थोपवून त्या आधारे चंगळवादीप्रवण राज्यव्यवस्था चालविण्याचा हा छुपा अंजेडा आहे. याचे उर्दूत भाषांतर ‘लादिनीयत’ म्हणजे ‘निधर्मीता’ असे केले जाते. अशाप्रकारे ‘सेक्युलरीज़्म’ म्हणजे ‘दीन (धम्म)’ सोडून देणे, कलमा, नमाज़, रोज़ा, जकात, हज, कुरबानी वगैरे सोडून देणे, ही भावना वाढीस लागली. त्यामुळे आजही काही अतिपुरोगामी जेंव्हा पशु कुरबानी किंवा हज वगैरेला पर्याय म्हणून दुसरं काही समाजसेवेचा पर्याय सुचवितात, तेंव्हा  मुस्लिम समाजाला त्यांच्या याच छुप्या अंजेड्याची आठवण होते की, काही गोंडस शब्दांचा वापर करून आम्हाला अल्लाह व त्याच्या प्रेषितांनी दिलेल्या कल्याणकारी शिकवणीच्या, प्रेषित परंपरांपासून दूर नेण्याचा प्रयत्न होतोय. याला आणखी खतपाणी म्हणून सोशल मीडियावर काही अतिपुरोगामी सेक्युलर मंडळी प्रत्येक रमज़ान महिन्यात ‘अल्लाहला प्रसन्न करण्यासाठी स्वत:ला उपाशी ठेवण्याची, त्रास करून देण्याची काय गरज आहे, लहान मुलांना रोज़ा ठेवण्यास सांगण्याची काय गरज आहे’ किंवा ‘ईद उल अज़हा’ आल्यावर ‘पशुंच्या कुरबानीऐवजी अथवा हज करण्याऐवजी तेच पैसे गरीबांना वाटले तर चालत नाही का? आर्थिक कुरबानी का करत नाही?”  वगैरे प्रश्‍न विचारून इस्लामनिष्ठांना डिवचण्याचा प्रयत्न करतात. पण याच अतिपुरोगाम्यांनी स्वत: शेवींग करणे जरी थांबवले तर बराच पैसा वाचतो आणि तो गरीबांना देता येऊ शकतो, याचा कधीही विचार केलेला नसतो.
    हे फक्त मुसलमानांसोबतच होते असं नाही तर इतर धर्मीयांच्या उत्सवाच्या वेळीही ’तुम्ही अमुक उत्सव इको फ्रेंडली साजरा करा ना, असं कशाला, असं का साजरा करत नाही’, वगैरे फुकटचे सल्ले देत असतात. त्यामुळे त्या धर्मनिष्ठांमध्ये एक असुरक्षिततेची भावना उत्पन्न होऊन ते अधिकच कट्टरतेकडे वळतात. परिणामी कट्टरवादी राजकीय तत्त्वांना खतपाणी मिळून आज तेच या सेक्युलरवाद्यांच्या मानगुटीवर बसले आहेत, यासाठी दोन्ही बाजुचे लोकं जबाबदार आहेत, फक्त एकट्या कट्टरवाद्यांनाच दोष देऊन चालणार नाही, सेक्युलर टवाळखोरही तितकेच जबाबदार आहेत. माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधींच्या काळात जेंव्हा घटनेत ‘सेक्युलर’ हा शब्द टाकण्यात आला, तेंव्हा त्याचा अर्थ ‘निधर्मीता’ म्हणून नव्हे तर ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणून टाकण्यात आला होता. म्हणजे स्टेट (राज्य व्यवस्था) ही कोणत्याही नागरिकासोबत त्याच्या जाती धर्माला आधार बनवून भेदभाव करणार नाही, असा त्या शब्दाचा मतितार्थ घेण्यात आला. ही सेक्यलरीज़्मची भारतीय आवृत्ती आहे. सर्वधर्मीयसहिष्णुता किंवा जातीय सलोखा या अर्थाने तो भारतात वापरला जातो. मात्र जातीय सलोख्याच्या अर्थाने चंचुप्रवेश करून हा सिद्धांत उद्या तुर्कस्थान किंवा इजिप्तसारखं आपल्याच मानगुटीवर बसु नये, म्हणून बरेच इस्लामनिष्ठ सेक्युलरीज़्मचा तत्त्वत: विरोध करत असतात. पण हेच लोकं उदारवाद या अर्थाने धोरण राबविणार्‍या सेक्युलर राजकीय पक्षांना एक राजकीय गरज म्हणूनच पाठिंबा देत असतात अन् हे डाव्या विचारसरणीच्या किंवा इतर आंबेडकरवादी विचारसरणीच्या लोकांबाबतीतही होते की, त्यांचं या मोठ्या सेक्युलर पक्षांच्या एकंदर विचारधारेशी मतभेद असले तरी एक राजकीय गरज म्हणूनच ते काही ठिकाणी त्यांना पाठिंबा देतात. एवढंच नव्हे तर खुद्द सेक्युलर पक्षदेखील शिवसेनेसारख्या पक्षाला एक राजकीय गरज म्हणूनच पाठिंबा देत असतात अन् यात वावगं असं काहीच नाही, हे स्वाभाविक आहे. पण हेच धोरण मुसलमान राबवित असतील तर त्यातही कुणी आक्षेप घेण्यासारखं काहीही नाही.
    सेक्युलरवाद्यांना खरंच जर भारत देशात फक्त एक सहिष्णु व जातीय सलोखा म्हणून सेक्युलरीज़्म एका नव्या स्वरूपात परिचय करून द्यायचा असेल तर त्यांनी सर्वात आधी आपल्या नेत्यांचं प्रबोधन करावं. एका धर्मस्थळाचं कुलूप तोडून त्यात दुसर्‍या धर्मातील काही प्रतिके कुणी ठेवत असेल तर आपली सत्ता असतांनाही यथास्थिती कायम न राखता, पीडीत पक्षालाच उपासनेपासून परावृत्त करणे, काही वर्षांनंतर पीडीत पक्षाच्याच धर्मस्थळाचं कुलूप उघडायला लावणं, त्याच्या आणखी काही वर्षांनंतर ते धर्मस्थळ दिवसांढवळ्या उद्ध्वस्त होऊ देणं अन् मग तोंड वर करून स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेणं अन् त्यावर कुणी प्रश्‍न उपस्थित केले तर त्यांना ‘तुम्ही सेक्युलर नाही म्हणजेच तुम्ही जातीयवादी आहात,  फॅसिस्टांचे हस्तक आहात, ’ अशी उलट मुजोरी करणे, हाच जर सेक्युलरवाद असेल, तर त्याला कोणताही विवेकी धर्मनिष्ठ समुदाय स्वीकारच करणार नाही. यासोबतच कलम 370, ट्रिपल तलाक व सी.ए.ए. कायद्यांसंदर्भात कधी वॉकऑऊट करून तर कधी मत फोडायची मोकळीक देऊन अल्पसंख्याकविरोधी निर्णयांना छुपे समर्थन देण्याची चालबाजी बंद करायला हवी.
    सेक्युलरवाद्यांना खरंच जर जातीयवाद्यांना प्रत्येक क्षेत्रात निष्प्रभ करायचं असेल तर भूतकाळात केलेल्या सर्व चुकांसाठी देशाची माफी मागितली पाहिजे, जशी माफी 1984 च्या शिखविरोधी नरसंहारासाठी मागितली होती तशी. त्यासाठी त्या चुका झाल्यात, हे प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे. त्यानंतर धार्मिक उत्सव, धार्मिक परंपरांची टर उडवणार्‍या आपल्या आयटीसेलवाल्यांना लगाम घातला पाहिजे. त्यांच्यामुळेच जातीयवाद्यांना खतपाणी मिळतेय.
    तिसरी अन् महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘सेक्युलर’ या शब्दाऐवजी त्याचाच भारतीय जनमानसाच्या पाश्वभूमीवर अर्थ सांगणारा एखादा दुसरा शब्द जसं सहिष्णुता किंवा उदारवाद अथवा जातीय सलोखा वगैरे शब्द वापरले पाहिजे. जेणेकरून ‘सेक्युलरीज़्म’ म्हणजे धर्मद्रोह, या भीतीपायी जे कुणी धर्मनिष्ठ लोकं कट्टरतेकडे वळत आहेत, त्यांनीही उदारवादी भुमिकेवर ठाम राहू शकावे. मूळात प्रेषित मुहम्मद सल्लम यांची शिकवणच धर्मस्थळापेक्षा धर्मस्थळाबाहेरच्या बाबतीत जास्त मार्गदर्शन करते. एक नमाज सोडली तर जवळपास इतर सर्व धार्मिक सोपस्कार जसे रोज़ा, जकात, पशु कुरबानी वगैरे धर्मस्थळाबाहेर केले जाऊ शकतात. कुरआनात संपूर्ण मानवतेला एकाच माता पित्याची संतती मानले आहे, म्हणजेच सर्व मानव जात आपसात बांधव असल्याची ही शिकवण परस्पर जातीय सलोखा किंवा सहिष्णुतेलाच पोषक आहे. यावरून सहिष्णुता या अर्थाने तर इस्लामच सेक्युलर धर्म आहे, पण निधर्मीता या अर्थाने तो सेक्युलरविरोधी धर्म आहे, असे कुणी म्हणू शकेल, पण हा शब्द आता द्विअर्थी झाल्याने ठामपणे इस्लामला सेक्युलर धर्म म्हणता येत नाही.
    कोणत्याही देशातील एक न्यायपूर्ण राज्य व्यवस्था ही नागरिकांसोबत भेदभाव करूच शकत नाही. म्हणजेच सहिष्णुता या अर्थाने ती सेक्युलरच असते. आपल्या देशातीलही राज्य व्यवस्था ही न्यायपूर्ण असावी, अल्पसंख्यांकांसहीत सर्वच जनतेशी सरकारने न्यायपूर्ण व्यवहार करावा, न्यायपालिका, कार्यपालिका व सरकारच्या अख्त्यारीत असलेल्या किंवा नसलेल्या सर्वच संस्थांनी न्यायपूर्ण धोरण राबवावे, बहुसंख्यकवाद्यांच्या दबावाला बळी पडू नये, म्हणजेच एक सहिष्णु उदार भुमिका घ्यावी, मग त्याला कुणी सेक्युलर हे नाव का देईना, त्या अर्थाने  मुस्लिम समाजाची ही अपेक्षा आहे, भुमिका आहे. तात्पर्य असे की, फक्त नमाजची जाळीदार टोपी डोक्यावर चढवून इफ्तार पार्टित एखाद्या मौलवीला खजूर भरविला अन् फोटो काढला किंवा एखाद्या दर्गाहवर चादर चढविली किंवा भाषणाची सुरूवात सलाम करून केली म्हणजे माणुस सेकुलर होतो अन् मग  मुस्लिमांना आरक्षण, संरक्षण नाही दिले तरी चालते, असा सेकुलरवाद मुसलमानांना नकोय, तर न्याय महत्त्वाचा आहे.
    न्याय हे तत्त्व प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्या शिकवणीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असल्याचं प्रसिद्ध लेखक मुंशी प्रेमचंद यांनी सांगितलेलं आहे. प्रेषितांनंतर शासनप्रमुख म्हणून ज्या खलिफांनी राज्यकारभार चालविला, त्यातही हे न्याय तत्त्व प्रखरतेने अधोरेखीत होते. उदाहरणार्थ एकदा खलिफा आदरणीय अली यांचा हरवलेला अंगरखा त्यांनी एका पारस्याकडे पाहिला. त्यांनी त्यांचा अंगरखा त्याला परत मागितल्यावरही त्याने तो दिला नाही. शेवटी हा वाद न्यायालयात पोहोचला. न्यायाधिशाने आदरणीय अलींना पुरावा मागितला. आदरणीय अलींनी त्यांच्याकडे पुरावा नसल्याचं सांगितलं. त्या  मुस्लिम न्यायाधिशाने त्या पारस्याकडून निर्णय दिला. तो निर्णय आदरणीय अलींनी मान्य केला. त्या पारसी गृहस्थाने बघितले की, स्वत: शासनप्रमुख असून अन् अंगरखा हा माझा नसल्याचं माहित असुनही खलिफांनी निर्णय मान्य केला होता. त्याने विचार केला की, ही न्यायपूर्ण व्यवस्था ज्या शिकवणीचा परिणाम असेल, ती शिकवण नक्कीच सत्त्य असेल, असा विचार करून त्याने आदरणीय अली यांच्याकडून इस्लामची दिक्षा घेतली अन् तो अंगरखा त्यांचाच असल्याचं मान्य करून तो त्यांना परत दिला. अशाप्रकारे इस्लामी खिलाफत ही राज्य प्रणाली असतांना, शासनप्रमुख एक  मुस्लिम  असतांना, न्यायाधिशही एक मुस्लिम असतांना एका मुस्लिमेतर अल्पसंख्याकावर कोणताही न्यायबाह्य (एक्स्ट्रा ज्युडिशियल) व्यवहार होऊ नये, याची काळजी घेतली जात होती.
    सेक्युलरीज़्मचा काही भारतीय लोकं आणखी एक अर्थ लावतात, तो म्हणजे सर्वधर्मसमभाव. याचा तसा अर्थ लावणार्‍यांची ही अपेक्षा असते की, सर्वच धर्माला मानणार्‍या लोकांचा एक माणुस म्हणून सम्मान केला जावा. त्यासोबतच सर्वच धर्मातील धर्मग्रंथ व श्रद्धेय महापुरूषांचा तसेच त्यांनी सांगितलेल्या धर्मतत्त्वे व परंरपरांचा सम्मान केला जावा. या भुमिकेमागे त्यांचा एक गैरसमज कारणीभूत आहे की, सर्वच धर्मांची धर्मतत्त्वे ही शंभर टक्के सारखीच आहे. वास्तविकता मात्र यापेक्षा वेगळी आहे. सर्व धर्मांत थोडं थोडं काही ना काही साम्य आहे, हे मान्य, पण दोन धर्मातच नव्हे तर एकाच धर्मातील दोन सांप्रदायांच्या तत्त्वांतही मतभेद आहेत. ठीक आहे, समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून सार्वजनिकपणे कुणीही कोणत्याही धर्माचा, धर्मग्रंथाचा किंवा कोणत्या समाजाला श्रद्धेय असणार्‍या महापुरूषांचा अपमान किंवा विटंबना करू नये, ही अपेक्षा रास्त आहे, घटनेलाही ते मान्य आहे. पण एक समतामूलक तत्त्वांच्या धर्माला मानणारी व्यक्ती ही जाती-जातीत विषमता पेरणार्‍या तत्त्वप्रणालीचा अन् ती तत्त्वे सांगणार्‍या पुस्तकांचा मनापासून का म्हणून सम्मान करेल? पटत नसलं तरी सम्मान कराच, ही काही बहुसंख्यकांची सांस्कृतिक दडपशाहीच नव्हे का?
    इतर धर्मीयांना श्रद्धेय असणार्‍या उपास्यांचा सम्मान जरी शक्य नसला तरी मात्र अपमान करण्याची परवानगी अल्लाह आणि त्याचे अंतिम प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी दिलेली नाहीये. कुरआनाचा लेखक अल्लाह सांगतो -
“अन् (हे मुसलमानांनो), हे (अनेकेश्‍वरवादी मुस्लिमेतर) लोकं अल्लाहव्यतिरीक्त ज्यांचा (त्यांच्या देवतांचा) धावा (जप) करतात, त्यांना अभद्र बोलू नका, नाहीतर त्यांना ज्ञान नसल्यानं ते अल्लाहची निंदा करतील.” - कुरआन (6:108)

“प्रेषित (सल्लम) एका ठिकाणी बसलेले असतांना त्यांच्या समोरून एक प्रेतयात्रा जात होती, तेंव्हा प्रेषित (सल्लम) उठून उभे राहिले. त्यांना जेंव्हा सांगण्यात आले की, हा एक ज्यू धर्मीय होता. त्यावर त्यांनी उत्तर दिलं की, ‘काय तो माणुस नव्हता?”’
- संदर्भ: हदिसग्रंथ सहिह अल-बुखारी (अध्याय-24, हदिस क्र. 1312)

अशाप्रकारच्या उदात्त परंपरेचे संस्कार असलेला मुस्लिम समाज हा जातीयवादी असूच शकत नाही, अर्थातच काही मोजके अज्ञानी अपवाद वगळता. परंतु सेक्यलरीज़्मच्या नावासोबत त्याची ऐतिहासिक व धोरणात्मक पार्श्‍वभूमी असल्याने तत्त्वत: त्याला हा समाज नाकारत असतो पण आधुनिक काळात एक राजकीय गरज म्हणून सेक्युलर राजकीय पक्षांचं समर्थन करत असतो. मात्र सेक्युलरीस्टांनी याचा गैरफायदा घेतल्याचं आता त्यांच्या लक्षात येत असतांना न्यायावर आधारित व्यवस्थेसाठी हा समाज  स्वत:च आपलं राजकारण उभं करण्याचा आता प्रयत्न करतोय. कारण सेक्युलरीज़्मबाबतीत या समाजाची भुमिका स्पष्ट असली तरी सेक्युलरीस्टांची भुमिका त्याला संदिग्ध वाटते.

- नौशाद उस्मान

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget