Halloween Costume ideas 2015

मरणावर रडायचं की धोरणावर रडायचं?

महाराष्ट्रात १८ जानेवारी २०१९ या एकाच दिवशी ४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची बातमी आली आणि पुन्हा एकदा सगळीकडे हळहळ सुरू झाली. यातील सर्वच जिल्ह्यातील  मालेगावातील ३ व बागलाण १ शेतकरी आत्महत्या होती. अस म्हणतात की; संकट आपल्या दारात आल्याशिवाय त्याची तीव्रता आपल्याला जाणवत नाही. अगदी त्याचप्रमाणे विदर्भ मराठवाड्यातील हजारो शेतकरी आत्महत्या मागील काळात झाल्या; आजही होत आहेत. त्यावेळी दु:ख निश्चितच वाटायचे मात्र आपल्याकडे किमान परिस्थिती ठीक आहे याचे समाधान देखील होते.
आता मात्र नापिकी,अस्मानीसुलतानी संकटे,फक्त भांडवलंदारांचेच पोट-खिसा भरणारे सरकारी धोरण,आम्ही शेतकऱ्यांची पोरं म्हणून सत्तेत पाठवलेल्या आमदार-खासदारांची खाऊजा वृत्ती  यामुळे संपूर्ण महाराष्ट्रच या आत्महत्येच्या गर्तेत ओढला गेलाय. घटना घडतात.क्षणभर कॅमेरे फिरतात, कुठेतरी बातमी येते आणि आपण सर्व लोक प्रतिक्रिया देण्यात काही काळ व्यस्त होतो. दोन दिवस दु:खाचा आव आणून लोकप्रतिनिधी मिरवतात. पुन्हा ही इथली प्रशासकीय राजकीय निगरगट्ट व्यवस्था इथल्या कष्टकरी, शेतकरी वर्गाला धोरणांच्या अदृश्य  शस्त्राने मारून टाकण्याचे नियोजन करत असते. आम्ही मागण्या करतो, मोर्चे काढतो, निवेदने देतो. अर्थात शेतकरी आत्महत्या थांबाव्यात हा प्रामाणिक हेतू त्यामागे असतो. मात्र पुन्हा पुन्हा तेच होत राहते. कारण आम्ही समस्यांवर बोलतो. इलाजावर बोलत नाही. जरा भाव वाढले की आम्ही मागचे सर्व विसरतो. जरा सरकारी घोषणेचे गाजर पदरात पडले की आम्ही  आनंदी होतो. आम्हाला जाणवत नाहीत हजारो विधवा शेतकरी बायकांच्या वेदना, लाखो अनाथ झालेल्या भूमीपुत्रांचे हाल, ज्या माऊलीचा पोरगा मरतोय तिचे कोरडेठाक झालेले निराश  आणि हाताश डोळे... आत्महत्येनंतर त्या कुटुंबाची परवड... हे सारंच भयानक.
यासाठी एकच करावे लागेल. आम्हाला धोरणांवर बोलावे लागेल. भांडवली व्यवस्था आमच्या पोरांना समजावून सांगावी लागेल. व्यवस्थेच्या परिवर्तनासाठी भांडावे लागेल. मुद्देसूद मांडणी  करणारे आणि विषयाचे गांभीर्य ओळखून अभ्यासू शेतकरी पुत्रांची फळी उभी करावी लागेल. अन्यथा ;बागायती असो की जिरायती, अल्पभूधारक असो की जमीनदार, प्रगत असो की  पारंपरिक या मातीत राबणाऱ्या प्रत्येक घटकाला ही व्यवस्था मातीत घातल्याशिवाय राहणार नाही. आता भांडवलशाही मातीत घालणारे बळी तयार करावे लागतील.

- शकिल शेख
येवला 
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget