Halloween Costume ideas 2015

सोशल मीडियातून लेखनाकडे...!

लेखन कला
आज तंत्रज्ञान शिक्षित लोकांनी सोशल मीडियाचा चांगल्या अर्थाने ताबा मिळवला आहे. सोशल मीडियामुळे भाषेचा अडथडा दूर होत प्रत्येकांना आपली एक अभिव्यक्तीची स्वतंत्र भाषा  सापडली आहे. सरकारला प्रश्न विचारणारी एक मोठी जमात आता उभी राहिली आहे. खऱ्या अर्थाने सोशल मीडियाविरोधी राजकीय पक्ष म्हणून कार्य करू लागला आहे. बातम्या मांडणे,  त्यांचे विश्लेषण करणे, क्रॉस चेक करणे, तथ्य उलगडून दाखविणे आदी प्रकार सोशल मीडियावर होत असतात. त्यातून लिहिणारा एक मोठा वर्ग तयार झालेला आहे. राजकीय कोट्या,  चारोळ्या, किस्से, कविता, कथा, ललित लेखन, प्रवास वर्णन, ब्रेकअप स्टोरी, विनोद असे लिखाणाचे विविध प्रकार सोशल मीडियाची मोठी जागा बळकावते.
कुणी पीएमटी-लोकल रेल्वेचा किस्सा लिहितो, तर कुणी प्रशासकीय यंत्रणाची अरेरावी दाखवतो. एक मोठी जमात नागरी समस्यावर लिहीत असते. काहीजण लिखाणातून गुन्हेगारीवर  प्रश्न उपस्थित करतात. काहीजण जनसमूहाच्या प्रश्नांवर बोलतात. कुणी नळाला पाणी आलं नाही म्हणतो, कुणी म्हणतो जाम पाऊस पडतोय, काही जण अपरात्री लाईट गेल्यावर कसा   निवांत झोपले याचं वर्णन करतो. कुणी काय वाचतो ते सांगतो. बरेच जण आयुष्यात काय मिळवलं यांची यादी टाकतो. आज कुठला सन्मान मिळाला, लांबचा व्यक्ती भेटला, जुना मित्र  भेटला म्हणत सेल्फी काढून टाकतो.
काहींना सेल्फी कढण्यासाठी किंवा फेसबुक वॉलवर लिहिण्यासाठी काहीतरी हवं म्हणून बातमी शोधायला जातात. काही जण पर्यटन करतात. काहीजण जाडजूड पुस्तके वाचून संदर्भ जमा  करतात. अनेक जण पुस्तके खरेदी केल्याचे फोटो टाकतात. पलीकडून ती वॉल बघणारी व्यक्ती किमान त्या पुस्तकाला झूम वरून वारंवार बघते तरी. आपल्याकडे ते असावं वाचू का  नाही, ते नंतर बघू पण ते पुस्तक माझ्याकडे हवंय, असं वाटू लागतं. कुणी चांगल्या सिनेमावर बोलतो-लिहितो. अनेक वॉलवरून दुर्मिळ सिनेमांची माहिती मिळते. कुणी गाणं गाऊ  लागतं. तर काहीजण गाणे रेकॉर्ड करून सोशल मीडियावर अपलोड करतो. काहीजण मोबाईल कॅमेऱ्याचा वापर करून शॉर्टफिल्म बनवतात. काही डॉक्युमेंटरी बनवतात. काहीजण  फोटोग्राफी करायला लागतात.
सोशल मीडियावर लिहिण्यासाठी अनेकजण नवनवी पुस्तके वाचतात. ते संग्रही ठेवतात. कमेंट बॉक्समधून प्रतिक्रियावादी गट वाढला असला तरी विचार करण्याची पद्धत बाळावलेली  आहे. काही प्रमाणात तिथे चिंतन दिसून येतं. अनेकदा प्रभावी कमेंट करता यावी म्हणून भाष्यकार, अभ्यासक, संशोधकांशी मैत्री ठेवतात. त्यांच्याशी चर्चा करतात. या ऐकीव माहितीवर  कमेंटमधून अनेकांची तोंड बंद केली जातात. किंवा व्यक्तिमत्वाची छाप पाडली जाते. थोडक्यात काय सोशल मीडियामुळे लेखनकलेचा विकास झालेला आहे. फेसबुकसारख्या सोशल  मीडियाने कल्पक व नरेटिव्ह लिखाणाला गती दिली आहे. विनोद व राजकीय कोट्यातून बाहेर येऊन व्यावसायिक क्रियटिव्ह रायटिंगला चालना मिळाली आहे. आज अनेकजण सोशल  मीडियावर वेगवेगळ्या ह्यूमरसाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येकांची एक स्वतंत्र शैली आहे. प्रत्येकांची एक स्वतंत्र अशी भाषा आहे. फेसबुकवर लिहिणाऱ्या अनेक क्रियटिव्ह लेखकांना रोजगाराच्या  चांगल्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. अनेकांनी सोशल मीडियातून मोठा व्यवसाय मिळवला आहे.
पोलिटिकल पीआर नावाची एक वेगळं
व स्वतंत्र क्षेत्र उदयास येऊन रोजगाराच्या संधी निर्माण झालेल्या आहेत. अभ्यासकांना फेसबुक व ट्विटरसारखा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्याने त्यांच्या अभ्यासाला दिशा मिळाली आहे.  त्यातून अनेक लेखक व राजकीय भाष्यकार तयार झालेले आहेत. त्यातून अनेक दर्जेदार कसदार लेखन करणारे लेखकाची एक मोठी जमात तयार झालेली आहे. चार-पाच वर्षापूर्वी  आम्ही पुण्यातली मित्रमंडळी ‘सुंबरान’ नावाचे एक यूथ मासिक काढत असू. त्यात आम्ही फेसबुकवरच्या अनेक मित्रांना लिहायला सांगितलं. अनेकांची प्रतिभा व अभ्यास बघून तो-तो  विषय आम्ही त्यांना दिला. त्याने त्या विषयावर केलेलं मंथन आम्ही प्रकाशित केलं. असा प्रकारे आम्ही अनेक लोकांना लिहिते केले. आज त्यातले बरेचजण मुख्य प्रवाही माध्यातून सदरलेखन करतात.
पाच वर्षांपूर्वी फेसबुकवर किस्से लिहिणारे आज कथाकार झाले आहेत. त्यांची कथासंग्रह प्रकाशित झालेली आहेत. राजकीय कोट्या व प्रवास वर्णन लिहिणाऱ्या अनेकांनी रविवारच्या  पुरवणीत जागा मिळवली आहे. आज अनेक दैनिकाने फेसबुक सेलिब्रटी व लेखकांचे सदरे सुरू केलेली आहे. वेबसाईट तर याच फेसबुक लेखकांच्या जोरावर उभ्या आहेत. हिंदीतले दि  लल्लनटॉप, ऑडनारी, दखल कि दुनिया, नेशनल दस्तक, मीडिया व्हिजिल अशा इत्यादी वेबसाईटनं फेसबुकवरील लेखकांना संधी देऊन त्यांना तयार केलं आहे. दि लल्लनटॉप नावाची पॉप्युलर वेबसाईट फेसबुकच्या चार मित्रांनी येऊन सुरू केली होती. आज त्याचा वार्षिक टर्नओव्हर लाखोंच्या घरात आहेत. वीस एक लोकांना त्यांनी रोजगार दिलाय. मराठीतही असे  अनेक प्रयोग झाले आहेत. आमच्या सुंबरान वेबसाईटसाठी आम्ही अनेकांना लिहिते केलेलं होतं. राम जगताप यांचा अक्षरनामा फेसबुकच्या लेखकांना संधी देते. फेसबुवरील लेखकांना  विषय देऊन अनेक फेसबुकर्सना अक्षरनामानं लिहिते केलेले आहे. मुकेश माचकर यांचे बिगुल तर फक्त सोशल फेसबुकवरील लिखाणासाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी अनेक फेसबुकर्सना  लेखक म्हणून तयार केलेलं आहे. सॅबी परेरा सारखा उत्तम लेखक बिगुलमुळे महाराष्ट्राला मिळाला आहे. अक्षरनामामुळे आनंद शितोळे सारखा जाणकार लेखक तयार झालेला आहे.  अक्षरनामामुळेच अक्षय शेलारसारखा तरूण सिनेसमीक्षक आज महाराष्ट्राला परिचीत झालेला आहे. दिव्य मराठीने तर अनेक फेसबुक लेखकांना मान्यवर लेखक म्हणून परिचित करून  दिलं आहे. संपत मोरे सारखा सामान्य माणूस आमच्या सुंबरानमुळे लिहिता झालेला आहे. दिव्य मराठीला ह्यूमन इटरेस्ट स्टोरी देण्याचा संपत मोरेंचा मोठा वाटा राहिला आहे. मध्यंतरी मटाने श्रीरंजन आवटेचं ‘सोशल भान’ नावाचे सदर सुरू केलं होतं. सोशल मीडियातून लेखक व भाष्यकार झालेला श्री आज महाराष्ट्राला परिचित आहे. नुकतेच लोकसत्तानं समीर गायकवाड व सॅहबी परेराचे सदर लेखन सुसू केले आहे. हे दोघेही सोशल मीडियात उत्तम लिहिणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. असेच अनेक दर्जेदार ब्लॉगर सोशल मीडियाने मीडियाला  दिलेले आहेत. या ब्लॉगरनं राजकीय सत्तांतर घडविणारे लिखाण केलेलं आहे. मध्यंतरी मी व माझा मित्र कुणाल गायकवाड एका न्यूज चॅनलमध्ये होतो. तिथे आम्ही अनेक  फेसबुकर्सना आणून पॅनलवर बसविलं होतं. विनायकच्या ‘टॉक शो’ला आम्ही अनेक सोशल मीडियावरची मुले बसवलेली होती. त्यांनी उत्तमपणे अनेकदा आपली बाजू मांडलेली आहे.
सोशल मीडियामुळे वैचारिक लेखनाची एक मोठी फळी तयार झालेली आहे. अनेक दिवाळी अंकाच्या संपादकांनी फेसबुकर्सना असाईन्टमेंट देऊन लिहितं केलेलं आहे. मीदेखील विविध  विषयावर सत्याग्रहीसाठी बऱ्याच फेसबुकर्सना लिहितं करत असतो. मध्यंतरी वंदे मातरम वादावर मी फेसबुकला एक चांगलं स्टेटस वाचलं. त्यात आनंदमठ कांदबरीचा उल्लेख आलेला  होता, मी ते प्रकरण वाचलं असल्यानं ते मला माहीत होते. लागलीच मी त्याचा नंबर मिळवून त्याला फोन केला. सुरुवातीला लिहिणे जमणार नाही, मला लिहिता येत नाही म्हणत  त्याने टाळलं. पण मी त्याला आग्रह केला. दोन दिवस मागे लागल्यानंतर त्याने एक टिपण लिहून दिलं. पुन्हा ते टिपण त्याच्याकडे पाठवून काही एलेमेंट जोडण्याची विनंती केली,  त्याने अशा तीन टप्प्यात तो लेख लिहून मला दिला. तो लेख संपादन करून मी प्रकाशित केला. नवी माहिती त्यातून बाहेर आली होती. वाचकांनी ती आवडली. लेख प्रकाशित झाल्यावर त्याच्या उत्साह वाढला तो आणखी लिहू लागला. त्याने नंतर त्याचा ब्लॉग सुरू केला. असे बरेच लेखक मी अक्षरनामा व सत्याग्रहीसाठी तयार केलेले आहेत.
फेसबुकमुळे विविध भाषांमध्ये तुमचे लिखाण अनुवाद केले जातात. माझे बरेच लेख हिंदीतून उर्दूत अनुवाद करून प्रकाशित केले जातात. आम्हीदेखील इंग्रजी व हिंदीतले बरेच लेख  मराठीत अनुवाद करून प्रकाशित करतो. फेसबुकमुळे लेखक सीमापार गेलेला आहे. मध्यंतरी मी लोकमतसाठी पाकिस्तानच्या एका स्ट्रीट स्कूलची स्टोरी केली होती. महापालिका  अतिक्रमण ठरवून पुलाखलाची गरीब मुलांसाठी असलेली ती शाळा उधवस्त करू पाहात होती. त्या संचालक महिलेला मी लिंक पाठवली, तिने ती स्टोरी गुगलच्या मदतीने ती अनुवाद  करून संदर्भासाठी स्थानिक महापालिकेत सादर केली होती. हे केवळ फेसबुकमुळे शक्य झालं आहे. अनेकजणांनी मला उत्तम बातम्यांची लिंक पाठवलेल्या आहेत. फेसबुकच्या याच  मदतीच्या जोरावर मी लोकमतचा कॉलम ‘जगभर’ वर्षभर चालवू शकलो.
थोडक्यात काय तर फेसबुकनं अनेक लोकांना लिहिते केलेलं आहे. तसंच त्यांच्या रोजगाराची साधनेदेखील त्यांना मिळवून दिलेली आहेत. फेसबुकमुळे अनेक क्रियटिव्ह लेखक तयार  झालेले आहेत. अनेकजणांनी टित्रपटात संवाद लेखकांची स्पेस मिळवली आहे. पोलिटिकल पीआर व कंटेट रायटिंगच्या क्षेत्रात फेसबुक लेखकामुळे नवी जाण आलेली आहे. त्यामुळे  सोशल मीडियाचे क्षेत्र येत्या काळात प्रचंड विस्तारणार असून तो फक्त अभिव्यक्तीचं माध्यमच नव्हे तर रोजगाराचे एक प्रमुख साधन म्हणून पुढे येणार आहे.
(उत्तरार्ध)

- सौजन्य: kalimajeem.blogspot.in
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget