Halloween Costume ideas 2015
June 2018

- शाहजहान मगदुम 
८९७६५३३४०४

मुस्लिम! जगभरातील विविध धार्मिक समुदायांपैकी एक – इस्लाम धर्मानुयायी समुदाय. सध्याच्या युगात विविध कारणांवरून जागतिक पातळीवरील प्रसारमाध्यमांसाठीची ब्रेकिंग न्यूज. मग ते राजकारण असो की समाजकारण, शैक्षणिक क्षेत्र असो की उद्योग, राष्ट्रीय असो की आंतरराष्ट्रीय. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले असता जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या या मुद्द्याला अनेक देशांमध्ये दबावाखाली जीवन जगणे भाग पडत आहे. पन्नासहून अधिक मुस्लिम राष्ट्रे असूनदेखील या समुदायाची प्रतिमा मलीन करण्याचा विविध स्तरांवर प्रयत्न केला  जात आहे. आनंदोत्सव साजरा करणे मानवी जीवनाचा एक भागच आहे, किंबहुना आपल्या दैनंदिन जीवनातील दु:ख, क्लेश व कटुता विसरून कधी तरी आनंद लुटणे हा जणू प्रत्येक  स्त्री-पुरुषाचा, मग तो धनवान असो की गरीब असो; जन्मसिद्ध हक्कच आहे. पवित्र रमजान महिन्याच्या शेवटी चंद्रदर्शन झाल्यावर 'ईद-उल-फित्र'चा आनंददायी सण साजरा केला जातो. या दिवसी कोणीही माणूस आनंदापासून वंचित राहता कामा नये, मग तो गरीब व दरिद्री का असेना. आनंदोत्सवात सहभागी होण्याचा त्याचा वाटा त्याला मिळायलाच हवा. इस्लाम  आपल्या अनुयायांना अशी समाजनिर्मिती करण्याची प्रेरणा देतो, ज्यात कसलाही उच्चनीचतेचा, श्रीमंत-गरिबीचा भेदभाव नाही. तेथे शांती व सुख-समाधानाचा प्रचार व प्रसार केला जातो,  इतकेच नव्हे तर संपूर्ण समाजाची जडणघडण व उभारणीच सामाजिक न्याय व समतेच्या पायावर केली जाते. तेथे सुख-समृद्धीत आणि आनंदात सर्वांचा हिस्सा असतो. खरे तर रमजान  महिन्याच्या शेवटी येणाऱ्या या आनंद ओसंडणाऱ्या सणाची मुळ नाव 'ईद-उल-फित्र' असे आहे. म्हणजे गोरगरिबांना दान करून त्यांना जीवनात आनंदाचे काही क्षण निर्माण करण्याचा व  दान-पुण्य मिळविण्याचा सण म्हणून संबोधला जातो. मनाच्या औदार्याची काही कृत्ये, ज्याला दान किंवा भिक्षा म्हणता येणार नाही, केली जातात. आपल्यापाशी खाद्यपदार्थ व पेये  तसेच धन-द्रव्य समाजातील गरजूंना वाटणे, हे एक पवित्र कर्तव्य ठरविण्यात आले आहे. मुस्लिम बांधवांच्या मूलभूत गरजा भागवून झाल्यानंतर जे उरते ते पुण्यकार्यात धन खर्च करण्याचा उपदेश केला जातो. स्वत:च्या गरजांना मर्यादा घातलेल्या नाहीत, तसेच खर्च करण्यावरही काही मर्यादा घातलेली. संपूर्ण महिनाभर दरदिवशी रोजा पाळण्यात आला आणि  विविध प्रकारे इस्लामी पद्धतीनुसार उपासनाविधी पार पाडल्या आणि या महिन्यास पॅलेस्टिनीवर बेतलेल्या दु:खासह निरोप दिला जात आहे. एका सच्चा मुस्लिम अनुयायीची अशी उत्कट  इच्छा असते की हे कृपावर्षावाचे व क्षमाशीलतेचे दिवस आणखी पुढे चालू राहावेत. म्हणजे आपल्या त्रुटींबद्दल, चुकांबद्दल आणि अपराधांबद्दल क्षमायाचना करून अल्लाहची मर्जी म्हणून  महिनाभर मुस्लिम उपासक भूक, तहान व शारीरिक त्रास सहन केला. आता त्या पालनकत्र्याचाच असा आदेश आहे की 'ईद'चा आनंदोत्सव करावा. आनंद यासाठी की पुन्हा एकदा  'ईद'चा दिवस इनाम मिळवून देणारा. पॅलेस्टिनी मुस्लिम बांधवांवर कोसळलेल्या दु:खाचे गालबोट वगळता या आनंदात जगातील मुस्लिम सहभागी आहेत. ‘ईदगाह'मध्ये जाण्याआधी  'फित्र'चे दान काढून ते गरजूंना आणि गोरगरिबांना वाटणे आवश्यक आहे. ही कृती इस्लामी बंधुप्रेमाचे तत्त्व आठवण करून देते. मानवाबद्दल कळवळ व आस्था दर्शविण्याचे हे दृश्य असते. जेव्हा श्रीमंत व धनवान माणूस महिनाभर रोजे (उपवास) करतो तेव्हा त्याला गोरगरिबांच्या तहानभुकेची अनुभूती मिळते, त्याचाच हा परिपाक असतो. भुकेच्या त्रासाचा अनुभव  त्याला उपाशीपोटी असणाऱ्यायबद्दल कणव व दया बाळगण्यास भाग पाडतो. त्याचप्रमाणे तहानेची व्याकुळता त्याला तहानलेल्याची तहान भागविण्यास विवश करते. गोरगरिबांना आपले  धनद्रव्य दान करून तो द्रव्यप्रेमातून मुक्त होतो. समाजातील दुसऱ्या माणसाला आपल्या आनंदात सहभागी करून घेतल्याशिवाय खराखुरा आनंद माणसाला उपभोगता येत नाही. ईदचा खराखुरा आनंद तेव्हाच मिळतो, जेव्हा सर्व जगभरचे मुस्लिम त्यात सहभागी होतात. पॅलेस्टाईनवर इस्रायलद्वारा करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे या ईदचा आनंद काहीसा फिका पडलेला  आहे. जगाच्या कोणत्याही भागात, मग ते भारत असो की पॅलेस्टीन असो, बोस्निया असो की फिलिपाइन, यूक्रेन असो की  इजिप्त, इरान असो की सीरिया, अफगाणिस्तान असो की  अल्जिरिया असो, जर तेथील मुस्लिम ईदच्या आनंदाला मुकले असतील तर ही 'ईद'सुद्धा त्यांच्या भग्न हृदयातून ठिबकणाऱ्या रक्ताच्या थेंबानी रक्ताळून जाते. इस्रायल-पॅलेस्टीन संघर्षाच्या बाबतीत सऊदीअरेबियासह अनेक मुस्लिम देश सध्या मूग गिळून बसलेले पाहून याची प्रचिती आल्याशिवाय राहात नाही. त्यांच्यातील बंधुत्वभावनेत कसलीही हालचाल होत  असताना दिसत नाही. याचे मूळ कारण असे की आपण एक ‘उम्मत' (समुदाय) आहोत ही गोष्टच मुस्लिमांच्या मस्तकातून निघून गेली आहे. या सणाचा आनंद लुटत असताना  देशातील संपूर्ण मुस्लिम समाजावर भीतीचे, हलाखीचे व वैफल्याची वातावरण टांगलेले आहे. ईदचा सोहळा पुन्हा एकदा विश्वबंधुत्वाचे स्वरूप धारण करण्याचे सर्वांना निमंत्रण देत आहे.  आपणा सर्वांना ही ईद आनंदाची जावो अशी शुभेच्छा व्यक्त करतो. ईद मुबारक!



- एम.आय. शेख
9764000737


ईद म्हणजे आनंदाचा सोहळा. फित्र म्हणजे दान. येणेप्रमाणे ईद-उल-फित्र म्हणजे दान देण्याचा सोहळा. दान देण्यामध्ये जो आनंद असतो तो अवर्णनीय असतो. इस्लाममध्ये फक्त दोन ईद आहेत. एक ईद-उल-फित्र दूसरी ईद-उल-अजहा. या दोन्ही ईदमध्ये दान देण्यासाठी इस्लामने श्रीमंत मुस्लिमांना प्रोत्साहित केलेले आहे.
    ना डी.जे.चा कर्कश आवाज, ना टुकार चित्रपट गीतांवरील विचित्र नाच. ना आतिषबाजी ना हुल्लडबाजी. ना चंदा ना पट्टी, ना ध्वनीप्रदुषण ना वायू प्रदूषण, ना दारू ना भांग. शांतपणे ईदगाहला जाणे, शिस्तीत दोन रकात नमाज अदा करणे आणि तितक्याच शांतपणे माघारी फिरणे. मग दिवसभर आप्तस्वकीय, शेजारी-पाजारी, मित्र-सहकार्‍यांबरोबर गोड शिर्खुम्याचा आस्वाद घेणे, गरीबांना फित्रा देणे, लहान मुलांना ईदी देणे, थोडक्यात ईद-उल-फित्र म्हणजे एक प्रदुषणमुक्त नित्तांत सुंदर सणाचा अनुभव असतो. ज्याची वर्षभर वाट पाहिली जाते. प्रत्येकजण आपापल्या ऐपतीप्रमाणे ईदची खरेदी करतो. चप्पल, बूट, कपडे, कॉस्मॅटिक्स, ड्राय फ्रुट्स, साखर, सुगंध या सगळ्या खरेदीमुळे बाजार पेठेमध्ये चैतन्याची लाट पसरते, आर्थिक उलाढाला वाढते आणि व्यापार्‍यांना लाभ होतो. थोडक्यात ईद एक फायदे अनेक.
    महिनाभर उपवास करून थकलेल्या जीवांना ईदच्या दिवशी दिलासा मिळतो. खाण्या-पिण्यावरील सर्व बंधने उठलेली असतात, लोक मनसोक्त गोड-धोड खात असतात. एक महिन्याचे खडतर नैतिक प्रशिक्षण पूर्ण झालेले असते. प्रत्येक रोजाधारकाचा नैतिकतेचा निर्देशांक वाढलेला असतो व ह्या लोकांनी पुढील अकरा महिन्यात येणार्‍या मोह, माया, ईर्ष्या, काम, क्रोध, लोभ यांच्यावर मात करण्यासाठी सदाचाराने वागण्याचा निर्णय केलेला असतो.
ईदच्या निमित्ताने इस्लामी व्यवस्थेवर एक दृष्टीक्षेप
    आजच्या आधुनिक जगामध्ये सर्वकाही आहे मात्र नितीमत्तेची वाणवा आहे. चारित्र्यवान लोकांची भीषण टंचाई जाणवत आहे. जवळ-जवळ प्रत्येक देशात दुराचार्‍यांच्या हाती सत्तेची सुत्रे आहेत. जागतिक महासत्तेचा महानायक ट्रम्प एका पॉर्नस्टार (वेश्ये)ला लाखो रूपये डॉलर देऊन जगाला आपली लायकी दाखवून देतो. उच्चशिक्षित डॉक्टर किडनी चोरतो, मुलींचे गर्भ काढतो, अनेक उच्चशिक्षित लोक महिलांच्या आंतरराष्ट्रीय देह व्यापारामध्ये गुंतलेले आहेत. अनेक लोक दारू आणि ड्रगचा व्यवसाय करतात. बालकांची तस्करी होते, प्रगतीच्या नावखाली अधोगती इतकी झालेली आहे की, पुरूष-पुरूषांशी लग्न करीत आहेत. कोणतेच क्षेत्र असे शिल्लक नाही की, ज्यात भ्रष्ट लोकांची मांदियाळी नाही. मानवता विव्हळत आहे. लोक त्राहीमाम-त्राहीमाम करत आहेत. जगाने साम्यवादी आणि भांडवलवादी दोन्ही अर्थव्यवस्थांचा अनुभव घेतलेला आहे. दोहोंमध्ये शक्तीशाली लोक गरीब लोकांचे शोषण करतात, हे सत्य सिद्ध झालेले आहे. वाढत्या स्पर्धेने लोकांच्या जीवनामध्ये तणाव वाढवलेला आहे. आत्महत्येचा दर वाढलेला आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमुळे अलिकडे कोणी विचलित होत नाही. त्यात विद्यार्थी आणि महिलांचीही भर पडत आहे. घरा-घरात मनोरूग्णांची संख्या वाढत आहे. इस्पीतळाबाहेरील वेड्यांची संख्या वाढत आहे. ट्रॅफिक सिग्नलवर 40 सेकंद थांबणेही अस्वस्थ करण्यास पुरेशी ठरत आहेत.
    समाजातून नैतिकतेचे उच्चाटन झालेले आहे. सिनेमा आणि मालिकांमधून अश्‍लिलता लोकांच्या मनामध्ये ओतल्या जात आहेत. ’भाभीजी घरपे हैं’ सारख्या मुल्यहीन मालिकेमधील पात्रांनी आता समाज मनात स्थान मिळविलेले आहे. कोर्टातून फक्त निवाडे येत आहेत. न्याय फार कमी होत आहे. कायद्याची, कोर्टाची, पोलिसांची संख्या वाढत असतानाच गुन्ह्यांचीही संख्या वाढत आहे. तुरूंग अपूरे पडत आहेत. प्रत्येक तुरूंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठासून भरलेले आहेत.
    अनेक पती-पत्नींच्या नात्यातील विश्‍वास संशयाच्या भोवर्‍यात अडकलेला आहे. वरून सुखी वाटणारी अनेक कुटुंबे आतून गृहकलहाने पार पोखरून गेलेली आहेत.
    व्याजाच्या अजगरी विळख्याने गरीबांचे कंबरडे मोडलेले आहे. वृद्धाश्रमांची वाढती संख्या समाजाचे कौटुंबिक आरोग्य ठीक नसल्याची साक्ष देत आहे. समाजातील अधिकाधिक लोक चंगळवादामुळे स्वार्थी बनत आहेत. आपल्या फायद्यासाठी, ”काय पण” करावयास लोक तयार आहेत. घराबाहेर काम करणार्‍या अनेक महिलांचे पावलोपावली शोषण होत आहे. अनेक उद्योगांमध्ये कास्टिंग काऊच (कामाच्या मोबदल्यात शरीर सुखाची मागणी) हे आता उघड गुपित झालेले आहे.
    वाढत्या महागाईने चांगल्या माणसांना सुद्धा भ्रष्टाचार करण्यास विवश केलेले आहे. सरकारी धोरण अशा पद्धतीने ठरविले जात आहे की, सार्वजनिक आरोग्य केंद्रे आणि सरकारी शाळा या बकाल होत आहेत. उलट खाजगी रूग्णालये आणि खाजगी शाळा यांना प्रोत्साहन मिळत आहे. ह्या दोन्ही संस्थांनी कधीच उद्योगाचे स्वरूप घेतलेले आहे. म्हणून सामान्य माणसं यांच्या परिघाच्या बाहेर आपोआपच फेकली गेलेली आहेत. भांडवलशाहीचा नैसर्गिक परिणाम म्हणून पराकोटीची विषमता निर्माण झालेली आहे. राजकारणी लोक भ्रष्ट मार्गाने कमावलेल्या संपत्तीचे हिडीस प्रदर्शन करण्याएवढे निबर झालेले आहेत. वेश्यांचा पॉर्नस्टार म्हणून गौरव केला जात आहे. त्यांना समाजात मानाचे स्थान मिळत आहे. त्यांच्या शुभहस्ते अनेक व्यावसायिक केंद्राची उद्घाटने ’संपन्न’ होत आहेत. नाचणार्‍या-गाणार्‍यांच्या वाट्याला धन, मान, सम्मान, प्रसिद्धी व प्रतिष्ठा येत आहे. तर लेखक, विचारवंतांना फारसे कोणी ओळखत नाही. अब्जावधी लोकांनी चुकीची जीवनपद्धती अंगिकारलेली असून, त्यातून तणाव निर्माण होत आहे.
       या आणि अशा नकारात्मक बाबींनी समस्त मानवतेसमोर एक जबरदस्त आव्हान उभे केलेले आहे. अशा ह्या भितीदायक व्यवस्थेने अमेरिकेच्या नेतृत्वात अवघ्या जगाला कवेत घेतलेले आहे. या व्यवस्थेच्या अजगरी मिठीतून अखिल मानवजातीला सोडविण्याचे मोठे आव्हान जागतिक मुस्लिम उम्माह (समुदाय) समोर उभे टाकलेले आहे. युरोप आणि अमेरिकेमधूनच आता इस्लामी व्यवस्थेला एक संधी द्यावी, हा विचार जन्म घेत आहे. त्यातूनच त्या ठिकाणी  इस्लाम सर्वात वेगाने वाढणारा धर्म बनलेला आहे, असे अमेरिकेच्याच पीयू फोरमने अगदी अलिकडे घोषित केलेले आहे.
    इस्लाम पृथ्वीवरील एकमेव अशी व्यवस्था आहे की, जिच्यावर जगातील 175 कोटी लोक प्रत्यक्ष आचरण करीत आहेत. ही एक अत्याधुनिक व्यवस्था आहे. जिला फक्त 1438 वर्षे झालेली आहेत. मदिनामध्ये सातव्या शतकात साकार झालेली ही व्यवस्था पृथ्वीवर  पुन्हा कुठेही साकार झाल्यास भांडवलशाही व्यवस्था धाराशाही होईल, या भितीने ती कुठेच आकार घेणार नाही. यासाठी पराकोटीची दक्षता भांडवलदारांकडून घेतली जात आहे.
    इस्लामी व्यवस्था ही नैतिक अर्थव्यवस्था आहे. ज्यात व्याज घेण्याला हराम केलेले आहे. या अर्थव्यवस्थेचा विरोध तेच लोक पूर्ण ताकदिनीशी करत आहेत. ज्यांचा डोलारा व्याज आणि अनैतिक व्यवसायावर आधारित आहे. इस्लाम सर्व मानवतेच्या कल्याणासाठी आलेला आहे. तो कुठल्याच जातीसमुहाच्या विरूद्ध नाही. ’क्लॅशेस ऑफ सिव्हीलायझेशन ’ सारखे कृत्रिम सिद्धांत मांडून इस्लाम हा ख्रिश्‍चनांच्या विरूद्ध आहे, अशी मांडणी केली जात आहे. मात्र ही मांडणी मुळातच चुकीची आहे. उलट इस्लाम तर ख्रिश्‍चन धर्माचा विस्तार आहे. प्रत्येक मुस्लिम येशू ख्रिस्त आणि बायबलवर श्रद्धा ठेवतो. वास्तविक पाहता ख्रिश्‍चन आणि मुस्लिम यांच्यात विवाद नाही तर अनैतिक भांडवलशाही व्यवस्था आणि इस्लामी नैतिक व्यवस्था यांच्यातील हे द्वंद्व आहे.
    भारतातही अल्पसंख्यांक मुस्लिम, बहुसंख्यांक मुस्लिमेत्तर बांधवांचा द्वेष करतात, असा चुकीचा गैरसमज माध्यमांनी सर्वदूर पसरविण्यामध्ये यश प्राप्त केलेले आहे. गेल्या 70 वर्षात मुस्लिमांनी आपल्या नेतृत्वाचा गळा दाबून बहुसंख्य बंधूंच्या हाती विश्‍वासाने आपल्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवून आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे.
    शेवटी एवढेच सांगतो की, मुस्लिमांच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी येवून पडलेली आहे. ती ही की त्यांनी आपल्या वाणी आणि वर्तनातून इस्लामचा परिचय आपल्या देशबांधवांना करून द्यावा. कारण आता कोणताही प्रेषित येणार नाही ही जबाबदारी प्रेषितांचे वारस म्हणून आपल्यालाच स्विकारावी लागणार आहे. यासाठी मुस्लिमांनी सर्वप्रथम कुरआन समजून घ्यावा व नंतर इतरांना समजावून सांगावा. ईदनिमित्त एवढे जरी केले तरी पुरे आहे. ईद  मुबारक.

- शकील शेख
येवला


रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम धर्मात फार महत्व दिले गेलेले आहे. रमजान हा महिना फारच उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद स.अ. यांचा सर्वात प्रिय महिना म्हणून रमजान महिना ओळखला जातो.
    इस्लामिक महीने चान्द्रिक काल गणनेवर आधारित असल्याने अन्य महिन्यांच्या सुरुवातीप्रमाणेच या महिन्याची सुरूवात देखील चंद्र दर्शनाने होते. चंद्र दर्शन ज्या दिवशी होते याचा अर्थ रमजान महिना सुरू झाल्याचे द्योतक आहे, म्हणूनच त्याच्या दुसर्‍या दिवसापासुन मुस्लिम बांधव रोजा (उपवास) करतात. या दिवसापासून जन्नत चे दार उघडले जातात व जहन्नम (नरक) चे दार बंद केले जाते. आणि त्यानंतर सुचना होते की, ज्या लोकांना पुण्य हवे आहे. त्यांनी पुढे व्हावे. आणि जे लोक वाईट कृत्य करणारी आहेत त्यांनी त्यापासुन लांब थांबावे.
    या महिन्यातील प्रमुख गोष्टी :
1. रोजा, 2. नमाज, तराविहची विशेष नमाज, 3. कद्रची रात्र 4. कुरआन 5. जकात आणि फित्र
1. रोजा (उपवास) - रोजा म्हणजे पहाटे सुर्येदयापासून अगोदरच न्याहारी करून संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळी जेवण केले जाते. मध्यंतरीच्या काळात अन्न - पाण्याचे एक कण सुध्दा खाणे-पिणे वर्ज्य असते, असे पुर्ण महिनाभर 30 दिवस चालते.
    या मागेही शास्त्रीय कारण आहे. वैज्ञानिक दृष्टीने जसे आपण वर्षानुवर्ष चाणार्‍या मशीनला/गाडीला वर्षातून एकदा का होईना सर्व्हिसिंग करून घेतो. जेणेकरून गाडीचे/मशीनचे आयुष्य वाढते. तशाच प्रकारे आपल्या शरीराच्या अन्न प्रक्रियेला आराम मिळावा व आपले शरीर रूपी मशीन सर्व्हिसिंग होऊन आणखीन चांगले कार्य करावे म्हणुन रोजा केला जातो. यामुळे शरीराची पचन व्यवस्था आणखीन चांगल्या प्रकारे कार्य करते. व शरीराचे आयुष्य वाढण्यास मदत होते.
    1. रोजा ठेवलेल्यांच्या पोटात काही नसल्याने पोटात एक प्रकारची उर्जा तयार होऊन पोटाची चरबी नैसर्गिक रित्या कमी होते. म्हणजेच रोजामुळे पोटावरची ढेरी कमी होते. रोजा हा श्रीमंताला गरीबीची जान करून देतो. एखादा गरीब जेव्हा दोन वेळेचे जेवन न करता एक वेळ जेवुन उपाशी राहतो व त्याला ज्या वेदना सहन कराव्या लागतात त्या वेदनांची जाण श्रीमंताला या रोजामुळे होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या माहितीप्रमाणे दररोज लाखो लोक उपाशी झोपतात, श्रीमंत लोकांच्या मनात गरीबाबद्दल आदर, दया, आस्था व करूणेची भावना या रोजामुळे निर्माण होते, याचा परिणाम अन्न धान्य, दान धर्माची इच्छा प्रबळ होऊन ती गरिबांच्या पदरात पडून बर्‍याच आर्थिक समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा होतो. तसेच इतरांबद्दल चांगल्या वागणुकीची सवय रोजादारांना या रमजानच्या रोजामुळे होते.
    रोजा हा गर्भवती महिला, मोठा आजार असलेली व्यक्ती (उदा. कॅन्सर, हार्ट पेशन्ट, शुगर आदी), रोजा ठेवल्याने ज्यांचा जीवन-मरणाचा प्रश्‍न उदभवु शकतो. अशा व्यक्ती, प्रवासी, कमीत-कमी सात वर्षे/अकरा वर्ष वयाच्या आतील (समज नसलेला) लहान बालक यांच्यावर माफ करण्यात आला आहे.
    2. तराविह (रात्रीची विशेष नमाज) : मुस्लिम धर्मात पाच वेळा नमाज फर्ज करण्यात आलेली आहे. पहाटे फजर ची नमाज, दुपारी जोहर ची नमाज, दुपारी असरची नमाज (सुर्यास्ताच्या अगोदर), सायंकाळी मगरीब ची नमाज, आणि रात्री इशाची नमाज असे एकुण पाच नमाज आहेत.
    नमाज हाही एकप्रकारे शास्त्रीय प्रकारच म्हणावा लागेल. कुरआनातील आयतींचे पठण नमाजमध्ये केले जाते. आपल्याला नमाज ची वेळ कळण्यासाठी विविध मस्जिदीत अजान दिली जाते. ज्यामुळे मुस्लिम बांधव मस्जिदीकडे धाव घेतात. अजानमध्ये उच्चारण्यात येणारे शब्द अल्लाहु अकबर याचा अर्थ होतो की, तो सर्व श्रेष्ठ अल्लाह आहे. आणि त्याच्या प्रार्थनेची, नमाजची वेळ झालेली आहे. मस्जिदीत यावे. गोरा असो वा काळा, राजा असो वा गरीब सर्वजण त्या पवित्र ठिकाणी सर्व भेदभाव विसरून एका रांगेत नमाजसाठी उभे असतात. दिवसातून पाच वेळा नमाज व्यतिरीक्त रमजान महिन्यात रात्री नमाजनंतर तराविहची विशेष अशी नमाज पूर्ण महिनाभर होते.
    3. शब-ए-कद्र (पवित्र रात्र) : सर्वात पवित्र मानली गेलेली रात्र. याच पवित्र रात्री दिव्य कुरआनचे अवतरण सुरू झाले. ’आम्ही याला (कुरआनला) कद्रच्या रात्री अवतरले आहे. ’(दिव्य कुरआन 97:1)
    या रात्रीची प्रार्थना, मग ती नमाजच्या स्वरूपात असो, कुरआन पठण असो किंवा अल्लाहची स्तुती असो इतर दिवसांच्या तुलनेत उत्तम ठरते. किंबहुना इतर दिवसांच्या 1000 महिन्यांच्या तुलनेत देखील या रात्रीची महत्ता फार जास्त आहे.
    कद्रची रात्र हजार महिन्यांपेक्षा अधिक उत्तम आहे.
(दिव्य कुरआन 97:3)
    या पवित्र रात्री एखाद्या गुन्ह्याची माफी मागण्याचे विशेष महत्व आहे जो कोणी खर्‍या भक्ति भावाने भूतकाळात घडलेल्या गुन्ह्यांवर पश्‍चाताप करून अल्लाह दरबारी माफी मागितली तर नक्कीच गुंह्यांची माफी मिळते परंतु अट ही असते की एखाद्याचे हक्क त्याला परत करणे आणि भविष्यकाळात गुन्हे न करण्याची हमी त्याने द्यावी लागते.
    4. कुरआन : इस्लाम धर्माचा सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ, प्रेषित हजरत मोहम्मद (स.अ.) यांच्या वर अल्लाहकडुन उतरलेला आसमानी संदेश, कुरआन हा धर्मग्रंथ होय. जो समस्त मानव जातीला अनुसरून मार्गदर्शन आहे. रमजान महिन्याच्या पवित्र कद्रच्या रात्री हा ग्रंथ अवतरीत झाला.
    जो संपूर्ण सृष्टीचा निर्माता आहे तोच या ग्रंथाला अवतरीत करणारा आहे. या पवित्र धर्मग्रंथाची विभागणी 30 खंड, 114 अध्यायामध्ये करण्यात आलेली आहे. यात 6000 पेक्षाही जास्त आयती आणि विशेष म्हणजे 1000 पेक्षा जास्त आयती आधुनिक विज्ञानाशी निगडित आहेत.
    कुराण हा पवित्र ग्रंथ असून तो कयामत (अंतिम निवाड्याचा दिवस) पर्यंत हयात आणि कायम राहणार आहे, ज्यात प्रलयापर्यंत फेरफार शक्य नाही. पृथ्वीच्या अंतापर्यंत सर्व लोकांना मार्गदर्शन आहे. या पवित्र ग्रंथाच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वतः अल्लाहने स्विकारलेली आहे. व याच प्रमुख कारणामुळे आज 1438 वर्षे लोटली तरी या पवित्र ग्रंथाच्या काना-मात्रात कोणताही बदल झालेला नाही. आणि इन्शाअल्लाह कयामत पर्यंत होणारही नाही.
    ’उरले हे स्मरण, तर हे आम्ही अवतरले आहे आणि आम्ही स्वतः याचे संरक्षक आहोत.’ (दिव्य कुरआन 15:9)
    5. जकात- फित्र (दानधर्म) - हा या महिन्याचा फार महत्वाचा भाग आहे. जकातूल फित्र म्हणजे ते दान जे प्रत्येक श्रीमंत आणि कमीतकमी चांगली आर्थिक परिस्थिती असणार्‍या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिमागे 1.75 किलो धान्य वा तेवढी रक्कम हलाकीची परिस्थिती असणार्‍या अत्यंत गरीब कुटुंबाला दान म्हणून रमजान महिन्यात द्यावयाचे असते. जेणेकरून त्या गरीब कुटुंबाला देखील ईदच्या सणामध्ये सामील होता यावे.
    फित्र्याशिवाय, प्रत्येक सधन व्यक्तीला त्याच्याकडे असलेल्या एकूण नगदी आणि सोनेनाणे धरून 7.5 तोळे सोने किंवा 52.5 तोळे चांदी. यापैकी कोणताही एक संपत्ती असेल व त्यावर एक वर्षे पूर्ण झालेले असेल तर त्याला 2.5 टक्के जकात द्यावी लागेल.
    संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार लाखो कुटूंब दररोज उपाशी झोपतात अशा परिस्थितीत या जकात व फित्रचे महत्व अधिकच स्पष्ट होते. या पवित्र महिन्यामध्ये जकात व सदकतुल फित्रचे दान म्हणून मिळालेले धान्य वा रक्कम एका एका कुटुंबाकडे इतके जमा होते की त्या कुटुंबाचे वर्षभराची जेवणाची अत्यंत महत्त्वाची गरज पूर्ण होते.
    वरील सर्व बाबीवरून आपल्या असे लक्षात येते की, रमजानचा रोजा म्हणजे केवळ खाणे-पिणे सोडणे एवढेच नाही तर रोजा, तराविह ची विशेष नमाज, शब-ए-कद्र (कुरआन अवतरीत झालेली रात्र), कुरआन, जकात आणि फितरा या सर्वांचा योग्य असा मेळ आहे. जो व्यक्ती हे आचरण योग्य प्रकारे करेल तोच खर्‍या अर्थाने बक्षिसास पात्र ठरेल, अन्यथा रोजा असून देखील वाईट कृत्य, निंदा नालस्ती, शिवीगाळ, दारू, जुगार या अनैतिक गोष्टींपासून वाचत नसेल तर प्रेषितांनी सांगितल्याप्रमाणे त्या रोजेदाराची अल्लाहला अजिबात गरज नाही.
    महिनाभराच्या उपवासानंतर चंद्र दर्शन होते. त्याच्या दुसर्‍या दिवशी सकाळी मुस्लिम बांधव यात पुरूष, महिला, लहान-मोठे सर्वच जण सुवासिक तेल, अत्तर (इत्तर) लाऊन, नवीन कपडे परिधान करून ईदच्या विशेष नमाजसाठी ईदगाह मैदान, मस्जिद मध्ये जातात. या विशेष नमाजला ईद-ऊल-फित्रची नमाज असे म्हणतात. सर्व मुस्लिम बांधव ईदच्या नमाजनंतर ऐकामेकांना अलिंगण (गळाभेट) देतात. त्यानंतर घरोघरी शिरखुरमा-शेवय्यांचा गोड आहार घेतला जातो.

- सीमा देशपांडे
7798981535


रमजानच्या एक आठवड्यापूर्वी मी खूप बेचैन झाले होते. माझे मन अशांत होते. तितक्यात बाबांचा फोन आला व ते म्हणाले बेटा,रमजान जवळ आला आहे, बाजारात खूप छान खजूर आलेली आहेत, घेवुन ये! अचानकपणे माझे बेचैन मन ’रमजान’ या शब्दाकडे वळले व डोक्यात असंख्य प्रश्‍न उत्पन्न झाले. खरंच! काय असतील रमजान? मुस्लिम लोक एवढे कडक उपवास कसे करत असतील?  माझी कुतुहुलता त्या उपवासाकडे जास्त होती, कारण मी जे उपवास पाहिले होते ते तर भरपूर खावुन-पिऊन होते. ज्यावर माझे आईसोबत नेहमी वाद व्हायचे.  माझ्या मते उपवास म्हणजे स्वईच्छांवर नियंत्रण ठेवणे व त्या भुकेची जाणीव होणे जे लोक पैशाअभावी कित्येक दिवस उपाशी राहतात. ह्या विचाराने मी रमजान महिन्यातील उपवासाची माहिती इंटरनेटद्वारे गोळा केली व माझे अशांत मन प्रफुल्लित झाले; हे वाचून कि उपवासाची व्याख्या तीच होती जी माझ्या मनात रचलेली होती. त्याशिवाय माझी नजर कुरआनच्या एका आयातवर पडली. ज्यात अल्लाह कुरआनमध्ये म्हणतो, ”रमजान महिन्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले- मानवजाती-करिता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी. ज्या कुणाला ह्या महिन्याचा लाभ होईल त्याने ह्या महिन्यांत पूर्ण उपवास करावेत. आणि जे आजारी असतील किंवा प्रवासांत असतील त्यांनी उपवास काळानंतर उरलेल्या उपवासांची संख्या पूर्ण करावी. अल्लाह तुमच्यासाठी सुविधा इच्छितो अडचणी इच्छित नाही. ही पद्धत ह्यासाठीच सांगितली जात आहे की तुम्ही उपवासांची संख्या पूर्ण करावी व ज्या सरळ मार्गावर अल्लाहने तुम्हाला आणले आहे आणि जे मार्गदर्शन अल्लाहने तुम्हाला प्रदान केले आहे त्यावर तुम्ही अल्लाहची थोरवी वर्णावी तसेच तुम्ही अल्लाहचे ऋण व्यक्त करावे. आणि जेव्हा माझे भक्त तुम्हाला माझ्याबद्दल विचारतील तर (त्यांना सांगा की) मी तर सदैव निकट आहे. धावा करणारा जेव्हा माझा धावा करतो तेव्हा मी त्याच्या हाकेला प्रतिसाद देतो. तेव्हा त्याने माझ्या प्रतिसादाचा शोध घ्यावा व माझ्यावर श्रद्धा ठेवावी जेणेकरून ते सन्मार्गावर येतील.”(कुरआन ः सुरे अल बकरा, आयत क्र. 185-186)
    हे वाचुन माझे मन खुप आनंदी झाले. ह्या विचाराने की जर मी उपवास केले तर आपणास ईश्‍वर भेटेल. खरच तो कसा असेल या कुतुहलतेने मी मनाशी निश्‍चय केला की मी उपवास करेन. पण त्यासोबत द्विधा मनःस्थिती झाली होती की मी पूर्ण 30 दिवस उपवास करु शकेन की नाही. कारण असंख्य अडचणींचे जाळे समोर उभे होते. जसे सासरचे उपवास करु देतील की नाही?, कॉलेजचे कलीग काय म्हणतील? पण माझे मन या अडचणीना दुय्यम स्थान देत होते व एका आध्यात्मिक प्रेरणेकडे ओढावत होते. मग मी ठरविले की, जे होईल ते होईल मी उपवास करेनच. रमजानच्या दोन दिवस आधी मी खजूर आणले व एका रॅकमध्ये लपवून ठेवले, जेणेकरून कोणाला संशय येवू नये. मला वेळा माहिती नसल्यामुळे मी जवळच्या मस्जिद बाहेर लावलेल्या वेळेचा फोटो काढून आणला व रमजानची सुरुवात केली. माझा पहिला दिवस पहाटे उठून मी आंघोळ केली व दोन खजूर व एक लोटा पाणि पीऊन मी सैरी केली व फज्र च्या नमाजासाठी रूजू झाले.  मी नमाज माझ्या भाषेत पढली. कारण मला एवढीच माहिती होती की, ईश्‍वर हे पाहत नाही की तुम्ही कुठल्या भाषेत प्रार्थना करता, उलट तो हे पाहतो की तुम्ही त्याला किती मनापासून हाक मारता. नंतर कुरआन वाचायला सुरुवात केली. खरंतर याआधी मी कुरआनचे थोडे अध्याय वाचले होते परंतु रमजानचा पहिला दिवस मला कुरआनची नवीन ओळख करुन देत होता. मी कुरआन वाचत असताना अचानक माझ्या पोटात गोळा आला जेव्हा मी काफिर व मुनाफिकची आयात वाचली. मला याची जाणिव झाली की मी ज्या मूर्तीला पूजत होते तो ईश्‍वर नाही,  मी लहान मुलीसारखी हुंदके देवून रडत होते आणि माथा टेकवून ईश्‍वराला विणवणी करत होते, हे ईश्‍वरा!  मी तुला आत्तापर्यत ओळखू शकले नाही. माझे विचार तुला सतत टाळत गेले, माझे कृत्य तुझे आज्ञाभंग करत गेले परंतु, तू एक क्षणभर मला विसरला नाही.  खरंच तू किती दयाळू आहेस. हे अल्लाह! माझे मन बदलून टाक व मला तुझा मार्ग दाखव.”
    संध्याकाळी उपवास सोडला व मगरिब व ईशाची नमाज लपुन पढली. अशाप्रकारे पहिला रोजा तर पुर्ण झाला पण त्याचबरोबर त्या पहिल्या रोजाने सीमा देशपांडे चा नविन जन्म झाला. दूसरा रोजाला मी अजून धीट झाली व माझे मन, शरीर आत्मा भुकेपेक्षा ईश्‍वराच्या जवळ जाण्याच्या शोधात होते. मला एकीकडे खुप दुःख वाटत होते की मी आत्तापर्यंत किती गुन्हे केले आहेत व त्यासोबत आनंद ही झाला की मी ईश्‍वराला जाणले. मी ईश्‍वराची खुप माफी मागितली व मनाशी ठरविले मी आता ह्या मार्गापासुन मागे हटणार नाही, ज्या सत्याच्या शोधात मी कित्येक दिवसापासून होते. कुरआन ने माझ्या जीवनाला कलाटणी दिली व मला अनुभूती झाली की मी हे तीस दिवस उपवास करणारच. कुरआन मधे ईश्‍वर म्हणतो, ”हे पैगंबर (स.), तुम्हाला जो हवा आहे त्याला तुम्ही मार्गदर्शन करू शकत नाही परंतु अल्लाह ज्याला इच्छितो त्याला मार्गदर्शन करतो आणि तो त्या लोकांना चांगल्याप्रकारे जाणतो, जे मार्गदर्शन स्वीकारणारे आहेत.(कुरआन - सुरे अल्कसस आयत क्र. 56)
    पहिले तीन दिवस सुरळीतपणे गेले मात्र नंतर हळूहळू प्रत्येकाचे डोळे माझ्याकडे संशयरूपी नजरेने पाहत होते. सासूचा चेहरा प्रश्‍न करत होता परंतु विचारण्याचे धाडस त्यांच्यात होत नव्हते. कारण घरच्यांना हे उपवास अमान्य होते. असेच एकदा सासू व नवर्‍याने मुद्दामहून माझे आवडते पदार्थ खायला घेवुन येवून मला जबरदस्ती ने उपवास तोडायला सांगितले, पण मी  ठामपणे नाकारत होते व मनात ईश्‍वराला विणवनी करत होते, ’हे अल्लाह माझे उपवास तोडू नकोस अणि एकच स्मरण करत होते, ला ईलाहा इलल्लाह मुहम्मदुर्रसुलुल्लाह!’ घरची वेळ टळली नाही तोच कॉलेजमधे संकटाचे जाळे सुरु झाले. माझे कलिग मला सतत प्रश्‍न करत होते की, तू रोजे का करत आहेस? मी ठामपणे उत्तर दिले ईश्‍वरासाठी! त्यावर ते म्हणाले मुस्लिमांचा ईश्‍वर आपला नाही त्यावर मी हसत म्हणाली त्यांचा आपला सर्वांचा ईश्‍वर एकच आहे, जो आपल्याला जन्म देतो व मृत्यु पण. मला माझी आध्यात्मिक प्रेरणा ईतकी मजबूत करत होती की त्यांच्या असंख्य प्रश्‍नांची उत्तरे मी सडेतोडपणे देत होती व ते निरुत्तर होत होते. जणूकाही मला वाटत होते की ईश्‍वर मला प्रेमाने हात धरून घेवून जात आहे व म्हणतोय, ’मी तुला निवडलेले आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे.’ जसे-जसे मी कुरआन वाचत गेली तसेतसे माझे मन,आशा व बुद्धी आकांक्षा लावून होती ईश्‍वराच्या जवळ जाण्यासाठी.
    संकटे तर येत होती पण अगदी सहजपणे टळतही होती. जणूकाही वार्‍याची थंड झुळुक आली अन् क्षणात निघून गेली. असेच एकदा सुट्टीचा दिवस होता. माझ्या पतीने मुद्दामहून सत्यनारायणाची पूजा आयोजित केली व तिकडे सासूने पाहुण्याना जेवायला बोलाविले व पतीने अट्टाहास केला की, मी पूजेला बसावे. माझ्यासाठी हा सर्वात अवघड क्षण होता. माझे ते सुकलेले ओठ पाणी मागत नव्हते तर ते ईश्‍वराला हाक मारत होते व  मनाशी एकच ध्यास घेवून होते, ”हे ईश्‍वरा माझे उपवास तोडू नकोस, मला तुझ्या मार्गापासुन दूर करु नकोस.” पाहणार्‍याला ही परिस्थिती अत्यंत अवघड दिसत होती परंतु माझ्यासाठी ते दुय्यम होते. कारण प्रत्येक जण माझ्या  विरोधात असूनही काहीच प्रहार करत नव्हते. हे पाहून मला असे वाटत होते की ईश्‍वराचे फरिश्ते मला सुरक्षा देत आहेत. उपवासासोबत माझी नमाजची कसरत होत होती. मला प्रत्येक नमाज लपून पढावी लागत होती. असेच एकदा कॉलेजमध्ये जुम्माची नमाज पडायला हातात एक स्कार्फ घेवून लेडिज रुममध्ये गेले. तेव्हा माझ्या एका कलिगने माझा पाठलाग केला व तिने मला नमाज पडताना पाहिले व काही क्षणात तिने पूर्ण कॉलेजमध्ये बातमी पसरवली की सिमा देशपांडे  रोझा करत आहे परिणामतः प्रत्येकजण माझ्याकडे संशयरुपी नजरेने पाहत होते. मात्र मी त्यांच्या नजरेला नजर लावून संभाषण करत होते. म्हणतात ना, जेव्हा ईश्‍वर तुमच्या पाठीशी असतो तेव्हा कुणीही काहीच करु शकत नाही आणि जेव्हा ईश्‍वर तुम्हाला सोडून देतो तेव्हा कोणीही तुम्हाला वाचवू शकत नाही. माझे हे अनुभव मला ईश्‍वराच्या चमत्काराची जाणीव करुन देत होते, ज्याने माझे ईश्‍वराशी नाते घट्ट होत होते. मला प्रत्येक क्षण मोलाचा वाटत होता, मी काय-काय करावे जेणेकरून मी ईश्‍वराचे मन जिंकू शकेन? एकदा अशी वेळ आली की असरची अजान होत होती पण कुठेही जागा नव्हती जिथे मी नमाज पढू शकेन.कुणाच्या समोर पढू शकत नव्हती. ह्याच भीतीने की ते मला पुर्ण उपवास करु देणार नाहीत. कानात एकच कुरआनचे शब्द गुंजत होते नमाज कायम करा! नाईलाजाने मी बाथरूम मध्ये नमाज पढली. म्हणतात ना कडक उन्हानंतर गारवा पण येतो अगदी तसेच. ईश्‍वराने पंधराव्या रोजी माझे पूर्ण स्टेज बदलून टाकले. त्या माझ्या पालनकर्त्याने प्रत्येकाचे मन बदलून टाकले जी सासू उपवास तोडण्याचे कट रचत होती तीच माझ्या इफ्तार साठी जेवण बनवून ठेवायची. तिने मला नमाज पढताना पाहिली पण ती अबोल झाली. जणुकाही ईश्‍वराने तिच्या डोळ्यांवर पडदा पाडला होता. तिकडे कॉलेजमध्ये माझे कलिग राग न करता माझ्या कामात मदत करत गेले. खरंच ईश्‍वर कुरआनमध्ये म्हणतो,
”जेव्हा अल्लाहची मदत आली आणि विजय प्राप्त झाला आणि (हे पैगंबर सल्ल.) तुम्ही पाहिले की लोक झुंडी झुंडीने अल्लाहच्या धर्मात प्रवेश करीत आहेत. तेव्हा आपल्या पालनकर्त्याच्या स्तुतीबरोबरच त्याचे पावित्र्य गान करा, आणि त्याच्याकडे क्षमेची प्रार्थना करा. निःसंदेह तो मोठा पश्‍चात्ताप स्वीकारणारा आहे.” (कुरआन ः सुरे अन्नस्र - आयत नं.1-3).
    खरंच कुरान हा एका मित्रासारखा आहे जेवढा वेळ तुम्ही त्याच्यसोबत घालवाल तेवढा तो त्याच्या गुप्तगोष्टींचा उलगडा करतो. असेच पंधरावा रोजा होता. त्यादिवशी कॉलेजमधे एक मावशी स्वतःच्या मुलीची फीस भरण्यासाठी मंगळसूत्र विकायला निघाली होती. त्याच क्षणी मला अनुभूती झाली की ईश्‍वराने कुरआनमधे आज्ञा दिली आहे की, गरूजूंना जकात द्या. मी काहीच विचार न करता तिला 5000/- रुपये काढून दिले. त्या स्त्रीच्या चेहर्‍यावरच्या आनंदापेक्षा कित्येकपट आनंद माझ्या मनाला झाला. याच भावनेने की मी हे दान ईश्‍वरासाठी केले आहे व हे पाहून माझा अल्लाह माझ्यावर किती खुष झाला असेल. त्याचबरोबर मी अनेक अनाथालयाला दान केले, मोलकरीणी ला नवीन कपडे दिले, गरिबांना जेवण दिले. मी प्रत्येक काम हे ईश्‍वरासाठी करत होते आणि त्यात मला इतके समाधान वाटत होते ज्याची मी भुकेली होती. अखेरीस ईश्‍वराच्या कृपेने मी पूर्ण तीस रोजे पूर्ण केले आणि ईदच्या दिवशी अल्लाहला वचन दिले, की, मी मरेपर्यंत मूर्तिपूजा करणार नाही! माझ्यासाठी हा पहिला रमजान एका दुर्मिळ फुलाप्रमाणे वाटला. ज्यात फुल एकदाच उमलते परंतु त्याचा सुगंध पूर्ण वर्षभर दरवळत राहतो. माझी ईश्‍वराकडे एवढीच प्रार्थना आहे की, त्याने माझे संपूर्ण आयुष्य त्याच्या मार्गाने जीवन व्यतीत करण्याची प्रेरणा द्यावी व एक चांगली मोमीना बनण्याची माझ्यात क्षमता प्रदान करावी. आमीन!

- सरफराज शेख

भारतीय समाज हा उत्सवप्रिय मनोभुमिकेत जगत आला आहे. उत्सवाच्या माध्यमातून भारतीय समाजाने जगण्यातील वेदना विसरण्याचा प्रयत्न केला आहे. उत्सवाच्या माध्यमातून एकात्मीक रचनेच्या बळकटीकरणासाठी समाजाने नेहमी प्रयत्न केले आहेत. सण हिंदू धर्मीय असो वा इस्लामी, भारतीय समाजाने त्याचे रुप सामाजिक सौहार्दाच्या अधिष्ठानावर आकाराला आणले आहे. होळी, रक्षाबंधनसारखे सण भारतीय समाजाची एकात्मीक रचना मजबूत करत आले आहेत. मध्ययुगीन काळापासून ईदच्या माध्यमातून भारतीय समाजातील काही समाजघटकांनी एकामेकांच्या जवळ येण्यासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न केले आहेत. मोहम्मद तुघलकाच्या काळात ईदच्या दिवशी व त्याच्या आधी हिंदु बांधवासाठी ईद साजरी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असत. सुफींच्या खानकाह मधील लंगर असो वा इफ्तारसाठी वाटसरुंना उपलब्ध करुन दिलेल्या सुविधा असो, हिंदू-मुस्लीमांसाठी सारख्याच पध्दतीने उपलब्ध असत. मानवी मुल्यांची उद्घोेषणा या माध्यमातून केली जात असे. सुफींनी मानवकल्याणाची जाणीव रमजान महिन्यात देखील जपली होती. वस्त्रभांडार त्यांनी रमजान महिन्यात गरीबांच्या सहाय्यासाठी खुले केल्याचे अनेक संदर्भ इतिहासाच्या साधनात उपलब्ध आहेत. रमजानच्या महिन्यात जकातच्या माध्यमातून आर्थिक समन्वयातून सामाजिक समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मध्ययुगीन काळात हा कर शासनाच्या एका विशिष्ट विभागामार्फत वसूल केला जात असे. त्या माध्यमातून समाजोपयोगी कामे केली जात असत. औरंगजेबाने ब्रम्हपुरी मुक्कामी असताना रमजानच्या काळात विहिरी व कालव्यांचे बांधकाम करुन घेतले होते. काही बागा निर्माण केल्या होत्या. जहांगीरच्या काळात देखील मोठ्या प्रमाणात सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी ईदचा माध्यम म्हणून वापर करण्यात आल्याचे संदर्भ ’तुज्क इ जहांगीरी’ मध्ये उपलब्ध आहेत. सेतू माधव पगडी यांनी भाषांतरीत केलेल्या काही फारसी बातमीपत्रांच्या माध्यमातून अशा अनेक नोंदी समोर आल्या आहेत. ईदच्या माध्यमातून सामाजिक सौहार्द जपण्याची ही प्रेरणा भारतीय समाजाने घेतली. आजही अनेक मुस्लीम बांधव जकात च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतात. अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्था ह्या जकातच्या माध्यमातून विधायक कार्य करत आहेत. ईदच्या माध्यमातून अनेक भारतीय समाजबांधवांना एकमेकांना समजून घेण्यासाठी जवळ येण्यासाठी एक माध्यम उपलब्ध होते. त्यामुळे ईदचे सामाजिक महत्व आधिक आहे.

- डॉ.रफिक पारनेरकर
अहमदनगर


रोजा आणि कुरआन ही रमजान महिन्याची दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. रोजासंबंधी कुरआनात म्हटले आहे, ’ हे ज्ञानधारकांनो, तुम्हावर रोजे (उपवास) अनिवार्य आहेत. त्याप्रमाणे पूर्वीच्या लोकांवर ही अनिवार्य होते. यासाठी की तुमच्यात ’तक्वा’ निर्माण व्हावा” (2-182).
    ’तक्वा’ हाच रोजांचा उद्देश आहे. म्हणूनच तक्व्याचा अर्थ जाणून घेणे आवश्यक आहे. पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांचे रोजासंबंधीचे काही उपदेश यासाठी पुरेसे आहेत. ते एकदा म्हटले, ’जो रोजा ठेवूनही खोटे बोलने व खोटे वागणे सोडत नाही, त्याच्या निव्वळ उपासमारीची अल्लाहला काही एक गरज नाही.’ अर्थातच माणसाच्या वागण्यात, बोलण्यात परिवर्तन होऊन त्याने सत्य बोलावे व सत्य वागावे हाच रोजांचा खरा उद्देश आहे. पैगंबर (सल्ल.) एकदा म्हटले, ’रोजा म्हणजे फक्त पहाटे पासून ते सायंकाळपर्यंत अन्न-पाणी सोडणे नव्हे! रोजा जिभेचापण आहे, डोळ्यांचा पण आहे. कानांचा देखील व हाता पायांचा सुद्धा रोजा आहे!” या पैगंबरी उपदेशातून स्पष्ट होते की माणसाचे संपूर्ण चारित्र्यसंवर्धन हा खरा रोजांचा उद्देश आहे. जर कोणी रोजा ठेवूनही निंदा-नालस्ती, शिवीगाळ करीत असेल, डोळ्यांनी अश्‍लीलता, नग्नता पाहात असेल, कुणाकडे वाईट नजरेने पाहत असेल, भ्रष्टाचार करत असेल, अन्याय-अत्याचार करत असेल तर त्याच्या रोजाची, त्याच्या अन्न-पाणी सोडण्याची अल्लाहला काडीमात्र गरज नाही. आदरणीय उमर (र.) यांंनी आपले ज्येष्ठ व जाणकार सहकारी मा. उबई बिन कअब (र.) यांनी ’तक्वा’ विषयी विचारणा केली असता ते म्हटले, हे उमर (र.)! कधी आपणांवर अत्यंत काटेरी जंगलातून जाण्याचा प्रसंग झाला? उमर (र.) म्हटले, ’हो! एकदा असे घडले!’ ’मग काय केलं?’  उमर (र.) म्हटले, एक-एक पाऊल अत्यंत दक्षतेने पुढे टाकून , की एखादा काटा टोचू नये, अशा सावधानतेेने मी ते पार केले. उबई बिन कअब म्हटले, ” उमर (र.)! हाच तक्वा आहे!” अर्थात माणसाने संपूर्ण जीवन अशा सावधानतेने जगावे की त्यांच्याकडून ईश-अवज्ञा अर्थात अन्याय-अत्याचार घडू नये हाच तक्वा आहे. हाच रोजांचा खरा हेतू आहे. थोर इस्लामी विद्वान मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी (रहे.) यांनी ’ रोजा आणि वासनांवर नियंत्रण’ या पुस्तकात तक्वाचे स्पष्टीकरण करतांना दोन घोडेस्वारांचे सुंदर उदाहरण दिले आहे. पैकी एकाच्या हाती घोड्याचा लगाम आहे तर दूसर्‍याच्या हातातून तो सुटलेला आहे. लगाम हाती असल्याने पहिल्याचे घोड्यावर पूर्ण नियंत्रण आहे. मात्र लगाम हाती नसल्याने दुसर्‍या घोडेस्वाराचे घोड्यावर नियंत्रण नाही. उलट तो घोड्याच्या नियंत्रणात आहे. हे उदाहरण देऊन मौलाना लिहितात की, घोडे म्हणजे वासना (ख्वाहिशाते नफ्स) आहेत आणि जगातील प्रत्येक माणूस वासनारूपी घोड्यावर स्वार असलेल्या प्रवाशासमान आहे. रोजाचा उद्देश अर्थातच तक्वा हा आहे की वासनांरूपी घोड्याचा लगाम रोजेदाराच्या हाती यावा व त्याला वासनांवर नियंत्रण प्राप्त व्हावे. वासनांची गुलाम बनलेली माणसं अल्लाहची अर्थात सत्याची गुलामी कदापि करू शकत नाहीत. रोजानंतर रमजानचे दूसरे वैशिष्ट्ये कुरआन आहे. कुरआनची ओळख स्वतः कुरआननेच अशी करून दिली आहे, ” रमजान तो पवित्रा महिना आहे, ज्यात कुरआनचे अवतरण झाले. कुरआन समस्त मानवजातीसाठी मार्गदर्शन आहे, सुस्पष्ट असे मार्गदर्शन, कुरआन सत्य-असत्याची कसोटी (अलफुर्कान) आहे.” जीवनाविषयी जे मार्गदर्शन माणसासाठी कुरआन ने सांगितले ते संक्षिप्तपणे असे आहे.
    1) दुनिया अंधेर नगरी नव्हे आणि मोकळे रान (चरण्याची) ही नाही. सफल चराचर सृष्टिचा व तुझा निर्माता अल्लाह तुला सदा सर्वदा पाहात आहे. तू सार्‍या जगाला फसवशील मात्र त्याच्या नजरेतून वाचू शकत नाहीस, ही दुनिया तुझ्यासाठी परीक्षा गृह (एक्झाम हॉल) आहे. त्यासाठीच तुला आचार-विचारांचे स्वातंत्र्य दिलेले आहे. मात्र मृत्यू येताच तुला या परीक्षा गृहामधून बाहेर पडावे लागेल. आणि मग एक दिवस तो उजाडलेला असेल जेव्हा या परीक्षेचा रिझल्ट लागेल. जो सर्वस्वी तुझ्या कर्मावर (कृत्यावर) अवलंबून असेल. आज तू सत्याच्या न्यायाच्या नीतिच्या मार्गाने जगलास तर जीवनरूपी या परीक्षेत उत्तीर्ण होशील. मात्र जर असत्य, अन्याय, अनीतिच्या मार्गाने जगलास तर घोर निराशा तुझ्या पदरी येईल! मग पश्‍चाताप करून काहीच उपयोग होणार नाही. म्हणून वेड्या आजच शहाणा हो! सत्य जाणून घे, जीवनाचा वास्तविक उद्देश जाणून घे! चंगळवादाच्या आहारी जाऊ नकोस! ही संपूर्ण मानवजात अल्लाहने एकाच जोडप्यापासून निर्मिली आहे. म्हणून तुम्ही सर्व आपापसात बंधू भगिनी आहात. समान आहात. कोणी श्रेष्ठ नाही. की कोणची नीच नाही. म्हणून वेड्या, जीवनात भेदभाव करू नकोस. सर्वांशी बंधू भावाने, प्रेमाने, आपुलकीने वाग! कुणाचे स्वातंत्र्य हिराऊन घेऊ नकोस. कुणाला स्वतःपेक्षा हीन लेखू नकोस कोणाचा द्वेष-मत्सर करू नकोस.
    3) हरामाच्या कमाईवर पोसलेल्या व्यक्तीचे कोणतेही सत्कर्म अल्लाह स्विकारत नाही. म्हणून अर्थार्जन कर पण कष्टाने, न्यायाने, नीतिने, भ्रष्टाचार करू नकोस, बेईमानी धोकेबाजी करू नकोस.
    4) माता-पिता, भाऊ-बहिणी, पत्नी, मुले व इतर आप्तेष्टांचे तुझ्यावर हक्क आहेत. त्यांना पायदळी तुडवू नकोस, माय-बापाशी अत्यंत आदराने, सन्मानाने वाग. त्यांच्याशी कृतघ्नता करणे, अल्लाहशी कृतघ्नता करण्यासमान आहे. याची जाणीव ठेव. पैगंबर (सल्ल.) यांनी म्हटले, आईच्या चरणाखाली (स्वर्ग) जन्नत आहे. माता-पिता प्रसन्न तरच अल्लाह प्रसन्न! माता-पिता नाराज तर अल्लाह नाराज. हे सारं जग अल्लाहच कुटुंब आहे असे जाणून जो सार्‍या जगाच भलं इच्छितो तोच खरा सज्जन आहे.
    5) मृत्यू अटळ आहे! तुझी इच्छा असो वा नसो, मृत्यू पश्‍चात तुझी गाठ शेवटी अल्लाहशीच आहे हे वास्तव कधी नजरेआड होऊ देऊ नकोस. मृत्यूचे स्मरण तुला मार्गभ्रष्ट होऊ देणार नाही आणि कुरआनचे अध्ययन कर! ते तुला खर्‍या सन्मार्गाची ओळख करून देईल. पैगंबरांचा हा उपदेश सतत ध्यानी-मनी असू दे की अंत्येयात्रा जेव्हा निघते (जनाजा) तेव्हा तीन गोष्टी तिच्याबरोबर निघतात. दुनिया (संपत्ती), आप्तेष्ट आणि कर्म. पैकी पहिल्या दोन गोष्टींना एक मर्यादा आहे. मृत्यू आला की ही सारी दौलत वारसांची होईल. आप्तेष्ठ तुझा विधी करून परत जातील. तीसरी गोष्ट तुझे कर्म तुझ्या विधीपश्‍चातही तुझ्या संगती येतील आणि तुझ्या कर्मावरच तुझ्या मृत्यू पश्‍चातच्या जीवनाची धुरा आहे. ते चांगले असले तरच तुझ्या मरणोत्तर जीवनाच ’चांगभलं’ होईल! याची जाणीव ठेव!

- नौशाद उस्मान
औरंगाबाद
9029429489

आज ज्या लोकांनी चाळीशी पार केलेली आहे, त्यांना माहित आहे की, आजपासून पंचवीस तीस वर्षांपूर्वी आजसारखे वातावरण नव्हते. सगळे मिळून मिसळून राहत होते. आजही अजिबात राहत नाही, असं नाही, पण त्यावेळचं वातावरणच वेगळं होतं. आजही अनेक गाव खेड्यात तेच वातावरण नक्कीच आहे, पण शहरी वातावरण बर्‍याच अंशी जातीय वार्‍याने प्रदुषित झालेले आहे, हे कटू सत्त्य आहे. मला आठवते माझ्या बालपणातली दिवाळी. आमच्या बच्चे कंपनीने दिवाळीच्या फराळावर मारलेला ताव! तुम्ही कोणत्याही जातीचे किंवा धर्माचे असा, पण तुमच्याही बालपणात जर तुमचा एक जरी मुस्लिम मित्र असेल तर तुम्हाला तुमच्या बालपणातला अनुभवलेला रमजान, ईद आणि शिरखुर्मा आजही आठवत असेलच.
पाटलाच्या वाड्यावर चढून आकाशात चंद्रकोर शोधत असलेले ते जुम्मनमियां ... चंद्रकोर दिसली रे दिसली की, ’चांद दिख गया ... चांद दिख गया’ करत सगळी येटाळ डोक्यावर घेणारी ती चिल्लर पार्टी अन् विजेच्या खांबावरील जुन्या दिव्याच्या त्या अंधूक प्रकाशात त्या चिमुकल्या पाखरांच्या पदन्यासाने उडालेल्या धुराळ्यातही एक अजबच चैतन्य निर्माण होत असे. येटाळीतल्या एकमेव पाटलाच्या वाड्यातून बाहेर आलेल्या काकूंच्याही चेहर्‍यावर तोच आनंद वाहत असलेला दिसायचा जो त्या बाल-गोपालांच्या चेहर्‍यावर असायचा.
    आजची ’हॅप्पी रमदान’ म्हणून सदिच्छा देणारी धीर गंभीर चेहर्‍याची कॉन्वेंटठास्त मुलं त्या निरागस गोड आनंदाला कुठंतरी पारखी झालेली दिसत आहेत. तो आनंद पुन्हा परत आणायची गरज आहे. तो भारत आपल्याला पुन्हा परत हवा आहे. लहाणपणीच वैचारिकतेची घडी बसत असते. म्हणून भविष्यात जातीयवादाच्या दुर्धर रोगाची लागण होऊ नये म्हणून धर्मसहिष्णुतेची लस लहाणपणीच देणे आवश्यक आहे. त्यासाठी काय करता येईल यावर चिंतन होणे गरजेचे आहे. विशेष करून जे लोकं रोजे ठेऊन रमजान पाळतात, त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. लहान मुलांवर रमजानचे सहिष्णुतेचे, एकात्मतेचे, समतेचे संस्कार घडवण्यासाठी इथे काही ’टिप्स’ दिल्या जात आहेत -
    आपल्या लेकरांच्या मुस्लिमेतर मुलांसाठी आपल्या घरी छोटीसी इफ्तार पार्टी घ्या. त्यात त्यांना सोप्या भाषेत इफ्तार, रोजा, रमजानविषयी माहिती द्या. त्याविषयावर छोटी छोटी मराठी पुस्तकं असतील तर ती त्यांना भेट म्हणून अवश्य द्या.
    ईदच्या दिवशीही त्यांना शिरखुर्म्यासाठी विशेष करून निमंत्रित करण्यास सांगा. ईदच्या दिवशी अनेक ठिकाणी झोके, आकाश पाळणे व इतर लहान मुलांच्या करमणुकीची साधणं येत असतात. तेंव्हा आपल्या लेकरांना तिथे नेतांना मुस्लिमेतर आणि विशेष करून तळागाळातील वंचित गोरगरीबांच्या मुलांना आपल्या लेकरांसोबत तिथे न्या. ईदगाहवर नमाज पढण्यासाठी शक्य असेल तर लेकरांनाही न्या.
    ईदच्या दिवशी भिक्षा मागणारे ईदगाहबाहेर उभे असतात. त्यांना भिक्षा देतांना आपल्या लेकरांच्या हाताने द्या. जकातची रक्कमही गोरगरीबांना देतांना आपल्या लेकरांच्या हाताने द्या. जेणेकरून त्यांच्यात दातृत्वाचे संस्कार होऊ शकावे. मुस्लिम समाजात ईदसाठी नवीन कपडे वगैरे घेतांना मुलगा - मुलगी असा भेद केला जात नाही, उलट मुलींना झुकते माप दिले जाते, हा एक चांगला गुण आजही मुस्लिम समाजात आढळतो, ही उदात्त प्रेषित परंपरा अशीच पुढेही सुरू राहिली पाहिजे.
      अशाप्रकारे आम्ही आधी बालपणी जसा भेदभावरहित सर्वधर्मसहिष्णु वातावरणात रमजान साजरा करायचो, ईद साजरी करायचो तसाच रमजान आणि तशीच ईद आताही प्रत्येक गावा-गावात शहरा-शहरात साजरी होवो आणि समाजात शांती निर्माण होऊन देश प्रगती करो, हीच अल्लाहशी प्रार्थना, आमीन!

- तौफिक असलम खान
अध्यक्ष - जमाअते इस्लामी हिंद, महाराष्ट्र


सर्वप्रथम मी सर्व देश बांधवांना ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. चालू वर्षाचे रमजान अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडले. रमजानचे श्रेष्ठत्व यासाठी आहे की, या महिन्यात कुरआनचे अवतरण झाले होते. रमजानच्या संदर्भात कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ” हे मार्गदर्शन आहे समस्त मानवजातीसाठी आणि यात सत्यमार्ग दाखविणारे मार्गदर्शन आहे. आणि कोणतीही गोष्ट सत्य आहे का असत्य आहे याची कसोटी यात आहे.” कुरआनमध्ये तीन गोष्टी अतिशय स्पष्टपणे सांगण्यात आलेल्या आहेत. एक तर सर्वांचा ईश्‍वर एकच आहे. कुरआनमध्ये अनेक ठिकाणी म्हटलेले आहे की, पूज्य फक्त अल्लाहच आहे व तो यासाठी पूज्य आहे की, त्यानेच समस्त विश्‍वाची निर्मिती केलेली आहे. या ब्रह्मांडात जेवढे सजीव जन्माला घातलेले आहेत ते सर्व त्यांनीच घातलेले आहेत. तोच त्यांना मृत्यू प्रदान करतो. इस्लामी जीवन व्यवस्थेची कास धरून माणूस या जीवनात आणि पारलौकिक जीवनातही यशस्वी होऊ शकतो. हाच कुरआनचा मूळ संदेश आहे. या संदेशाला मान्य करणे म्हणजेच आपल्या जीवनातील प्रत्येक बारीक सारीक गोष्टींचे नियोजन इस्लामी तत्वानुसार करणे हे होय. उदा. लग्न करावयाचे असेल इस्लामी पद्धतीने करावे लागेल, तलाक द्यायचा असेल तर इस्लामी पद्धतीने द्यावा लागेल. व्यवहारात कुठल्याही प्रकारे व्याज घेता येणार नाही. प्रत्येकाला काय खावे आणि काय खाऊ नये, याचाही निर्णय अल्लाहने दिलेल्या हलाल आणि हराम च्या परिघातच करावा लागेल.
    दूसरी गोष्ट जी कुरआनमध्ये सांगितलेले आहे ती ही की, ”मृत्यू म्हणजे सर्व काही संपले असे नाही. ते तर फक्त स्थलांतर आहे. या लोकातून परलोकात. पारलौकिक जीवनाची यशस्वीता या जीवनामध्ये केलेल्या भल्या आणि बुर्‍या कामावर आधारित आहे. माणसांनी चांगलं वागावं यासाठी अल्लाहने एक लाख चोवीस हजार प्रेषित पाठविले. शेवटचे प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. हे होत. ज्यांच्यावर कुरआन अवतरित झाले व मानवजातीला सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन मिळाले. आता कुठलाही प्रेषित येणार नाही किंवा कुठलेही ईश्‍वरीय ग्रंथ अवतरित होणार नाही म्हणून प्रेषितांची शिकवण व कुरआन यालाच अंतिम मार्गदर्शन माणून जो जगेल तोच दोन्ही लोकी यशस्वी होईल.
    आज आपण आजूबाजूला पाहतो तेंव्हा लक्षात येते की प्रत्येक क्षेत्रात वाईट प्रवृत्तींचा शिरकाव झालेला आहे. गरीब व्यापार्‍यांना पूर्ण लाभ मिळणार नाही, यासाठी बाजार पेठेतील लोक प्रयत्नशील असतात. आडत व्यापार असो की जनावरांची बाजारपेठ. (उर्वरित लेख पान 3 वर)
सगळीकडे गरीबांची कोंडी केली जाते. उदा. एक गरीब शेतकरी आपली म्हैस विकायला आणतो, कोणी कोंबडी विकायला आणतो तर ती शेतकर्‍याला फसवून कुठल्या न कुठल्या पद्धतीने कमी किमतीत घेण्याकडे सर्वांचा कल असतो. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी कुठलीही वस्तू रस्त्यात खरेदी करण्यास मनाई केलेली आहे. प्रत्येक वस्तू अगोदर बाजारपेठेत येईल आणि त्याचा योग्य भाव ठरविला जाईल. त्यानंतरच खरेदी सुरू होईल, अशी व्यवस्था दिलेली आहे. ज्यामुळे विक्री करणार्‍याला आपल्या वस्तूचा चांगला मोबदला मिळू शकेल. अन्याय प्रत्येक क्षेत्रात आहे. मग ते राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो का आर्थिक क्षेत्र. जमाअत-ए-इस्लामी हिंद हाच अन्याय प्रत्येक क्षेत्रातून नष्ट व्हावा, यासाठी कायम प्रयत्नशील राहिलेली आहे. यासाठी कुरआनचे मार्गदर्शन हेच उपयोगी ठरणार आहे, असा आमचा विश्‍वास आहे. 
    रमजानमध्ये मोठ्या प्रमाणात जकात काढली जाते. मात्र त्याची सामुहिक शिस्तबद्ध व्यवस्था उभी न करू शकल्यामुळे जकातचा हवा तेवढा उपयोग होत नाही. खरे तर जकात ही सामुहिक उपासना आहे. सर्व लोकांची जकात एका ठिकाणी गोळा करून मग त्याचे न्याय वितरण केले गेले पाहिजे. त्यापूर्वी सर्व्हेक्षण व्हायला हवे की कोण जकात घेण्यास पात्र आहे. तरच गरीबांना न्याय मिळेल व आर्थिक विषमता कमी होण्यास मदत होईल. नमाज जशी घरी अदा करणे उचित नाही ती सामुहिकरित्या मस्जिदमध्ये अदा केली गेली पाहिजे. त्यासाठी मस्जिदी तयार कराव्या लागतील. इमाम आणि मुअज्जीन यांच्या नेमणुका कराव्या लागतील. वजूसाठी पाण्याची व्यवस्था करावी लागेल.  तेव्हाच ’आकीमुस्सलात’ अर्थात नमाज कायम केली गेली असे म्हणता येईल. तसेच जकात व्यक्तीशा देणे योग्य नाही ती सुद्धा एकत्रित करूनच दिली गेली पाहिजे. त्यासाठी जकात एकत्रित गोळा करण्यासाठी लोक नेमावे लागतील. गोळा झालेली जकात सुरक्षित ठेवण्यासाठी जबाबदार व्यक्ती नेमावे लागतील, गरजवंतांचा सर्व्हे करावा लागेल व न्याय वितरण करावे लागेल, तेव्हा म्हणता येईल की ’आकीमुज्जकाता’ म्हणजे जकातची व्यवस्था उभी केली गेली आहे.
    तीसरी गोष्ट अशी की सामाजिक जीवन सुरळीत रहावे, यासाठी समाजामध्ये आपापसात निर्माण होणारे तंटे, वैवाहिक मतभेद इत्यादी सोडविण्यासाठी तुम्हाला ’दारूल कजा’ अर्थात समाज पंचायतींची व्यवस्था उभी करावी लागेल व शरई मार्गदर्शनाप्रमाणे आपसातील मतभेद मिटवावे लागतील. आर्थिक विषमता दूर करण्यासाठी बिनव्याजी पतसंस्था उभ्या कराव्या लागतील. त्यांच्या मार्फतीने पात्र गरीब लोकांनी व्यापार करण्यासाठी बिनव्याजी कर्ज द्यावे लागेल. फक्त व्याज हराम आहे म्हणून थांबता येणार नाही. त्यासाठी गावोगावी बिनव्याजी कर्ज देणार्‍या पतसंस्था उभ्या कराव्या लागतील. आवश्यक तो सेटअप उभा करावा लागेल व व्याजाधारित पतपुरवठ्या समोर एक पर्यायी व्याज विरहित पतपुरवठ्याची व्यवस्था उभी करावी लागेल. तेव्हा म्हणता येईल की अल्लाहने जे व्याज हराम केलेले आहे ते प्रत्यक्षात आम्ही समाजामध्ये लागू केलेले आहे.
    सुदैवाने भारतीय संविधान आपापल्या या सगळ्या चांगल्या गोष्टी करण्याची अनुमती देतो. सर्वधर्मीय स्वातंत्र्यसैनिकांनी इंग्रजांपासून मुक्ती मिळविण्यासाठी याचसाठीच तर लढा दिला होता. संविधान आपल्या सर्वांचे एक कॉमन ऍग्रीमेंट अर्थात सामुहिक करार आहे. संविधानामध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक समाजाला त्याच्या धार्मिक चालीरिती अर्थात पर्सनल लॉ प्रमाणे जीवन जगण्याचा संवैधानिक अधिकार मिळालेला आहे. आयकर किती लावावा, रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे की डाव्या बाजूने चालावे यासाठी तर विधीमंडळ कायदे करू शकते. परंतु, पर्सनल लॉ कसा असावा, याचा निर्णय विधिमंडळ करू शकत नाही. अलिकडच्या सरकारने त्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरणार्थ तीन तलाकच्या बाबतीत केंद्र सरकारने म्हटलेले आहे की आम्ही तीन तलाक देणार्‍याला शिक्षा देण्याची तरतूद करू. वास्तविक पाहता सरकारला हा अधिकारच नाही. याउलट ईश्‍वरीय इच्छा तर अशी आहे की, पर्सनल लॉ हा सगळ्या मानवतेचा कायदा होऊन जावा. कारण त्यातच मानवतेचे खरे कल्याण निहित आहे. जमाअत-ए-इस्लामी हिंद याचसाठीच प्रयत्नशील आहे की कुरआनच्या मार्गदर्शनाप्रमाणे सर्वांनी जीवन जगावे. जेणेकरून आपल्या देशात शांती व सद्भावना कायम होवू शकेल. पुन्हा एकदा सर्वांना ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 
                - शब्दांकन - बशीर शेख (उपसंपादक, शोधन 9923715373)

- साहिल शेख
कुरूंदवाड (कोल्हापूर) 9923030668

 
तो कुठे हरवला कोण जाणे ? हल्ली त्याची चर्चा बंद झाली, आता गल्लीच्या स्मृतीत तो उरला नाही. रोजच्या धडपडीच्या प्रपंचरहाटयात कांही गोष्टीचं विस्मरण सहज होत. हे होणं चांगलं की वाईट? पण त्याची आठवण आता त्याच्या आई शिवाय कुणीच काढत नाही. म्हणजे आईच्या मायेचं अथांग आभाळ भरून येतं आणि आसवांनी ती बरसत रहाते. त्याचा थांगपत्ता नाही. कुठेय तो ??
    असो, आपल्याला काय त्याचे? जूनचा महिना, त्यात माझ्या मुलाच ऍडमिशन वशिल्यानी कुठं होतयं का ते महत्वाचं ? आणि हो माहे रमजानचे मुबारक दिवस, ईदची तयारी करायचीय शफिक टेलरला झुब्बे द्यायचे शिवायला. शिवाय एखाद वर जॅकीट, सलीम अत्तारला सांगायल हवं ‘इत्र’ च्या चांगल्या परवडेल अशा कांही छोटया बाटल्या आपल्यासाठी ठेवायला, सादिक खाटीककडे मटण चांगलं मिळतचं, बागवान भाई भाजीपाल्यापासून सगळा किराणा व्यवस्थित पोहचतीलच, सुक्यामेव्यासाठी अस्लम किराणा मर्चर्ंट फेमसचं ! चला उत्तम तयारी यावर्षी .... बायकोसाठी उत्तम डिझाईनचा
बुरखा तीने डिझाईनरला सांगून बुक केलाय, सिरिअल्सवाल्या कपडयांच्या फैशनने मुलगी-मुलगा सजेल ... आई बिचारी सफेद पेहराव्यात असते. छोटा भाऊ जुन्या घरात प्लॅस्टिक वस्तुंचा व्यापार करतोय. त्याला थोडीफार पैशांची मदत केली की मग कर्तव्य संपलं ! सगळं ओके ओके.
    काल तराबीह नंतर निवांत बसून बाजाराची यादी काढली. सहरीसाठीचे सगळे योग्य पदार्थ फ्रिजमध्ये, आई अजून शांत तसबिह पढत होती. फकिर-भिकारी दारी येतील मागायला तेव्हा खपली गहूच्या ऐवजी साधे गहू देऊ, बायकोनं मलाच ईशार्‍याने सांगितलं. ‘हो’ म्हणणे हा एकच पर्याय. अम्मी आपल्या खोलीकडे जावून झोपली. बराच वेळ एफबीवर, वॉटसऍपवर चॅटींग करत उद्याच्या मिटींग्ज बद्दल डिटेल्स टायपून मी झोपी गेलो. उद्या जायला हव लवकर. विमेन इम्पावरमेंट वर मोटिवेशन स्पीच द्यायला. सुबहच्या नमाजाशिवायच मी बाहेर पडलो. नवीन आलेल्या फोरव्हीलरची मजाच कांही और! ... गाणी गुणगुणत ऑफिस गाठलं. कलीग्ज सोबत मोठया सोशल वर्कसाठी फायनान्स करणार्‍या
कंपनीतील कर्मचारीवर्गाशी अस्खलीत मराठीत पीपीटी टाईप भाषण देवून मोठा झाल्याचा फिल करीत, अधिकार्‍यांशी बोलत बसलो. उच्चविद्या विभुषित वगैरे लोक, कॉर्पोरेट क्षेत्रात किती भारी फॉर्मल राहायला लागत, मला तरी तेच आवडत. गप्पा रंगल्या, कसलीही घडी न विस्कटता, लंच बे्रक नंतर निरोप दिला ... दुपारचं जेवण ... व्वा
सुपर्ब टेस्टी- हे कुणी बनवलं ?
    ‘आमच्या इथे एक मुस्लिम बाई काम करते कॅन्टीनमध्ये’ वेटरने उत्तर दिले. चव ओळखीची, आपली वाटली. स्वयंपाकिण बाईंना भेटण्यासाठी उठलो.
    अरे, या तर आपल्या शेजारच्या आपल्या परिसरातल्या भाभी.. यांचाच मुलगा हरवलाय.. मघाशीच्या ‘ महिला सबलीकरण’ सेशनला या नव्हत्याच हजर....
    फकीराच्या कटोर्‍यात चिल्लर पटपट पडावी, जुम्मा दोपहरनंतर तसा आठवणींचा खणखणाट डोक्यात घुमू लागला. माझी अम्मी आणि या भाभी साधारण एकाच वयाच्या, गाव तुरळक वस्तीचे होते तेव्हाच्या मैत्रीणी जणू .. पण आता सगळ बदललं... आई घरात असते. माझा छोटा बंगला गाडी, सुखवस्तू आणि या ‘भाभी’ ....?
    मला त्यांनी ओळखून आदबीनं सलाम केला ‘बेटा, बडा हुवा है तू ...’ जरा दुवा कर मेरे बेटे के वास्ते’ एवढं बोलून मागे फिरल्या.
    तिथून परतताना मलाच कांहीतरी ओझे झाल्यासारखे वाटले, घरी पोहचलो. निवांत विश्रांती सगळयांची, मी ही पडलो. बाहेर आभाळ भरून आलेलं. पावसाच्या कांही सरी चिंब करतील.. उन्हाचा तडाखा कमी होईल... तेवढाच गारवामस्त, डोळा लागेना. आतल्या आत कांही अस्वस्थशी खळबळ जाणवत होती. हल्ली मटण-चिकनने जास्त ऍसिडीटी होतेय बहुतेक.... डॉ. कलीम ना दाखवूया आज होय! माझे घरचे सगळे व्यवहार मी समाजबांधवाशीच जोडून करतो, सध्यातरी माझी हीच सामाजिक बांधिलकी या शहरी उपनगरात. आपलं वजन राखून रहायला हवं ना... सोशली ऍटच्ड !!
    झोप येत नव्हती म्हणून टीव्ही ऑन केला. बातम्यांचे चॅनेल्स बदलत राहिलो. औरंगाबादेत तुरळक दंगलीच्या बातम्या, कुठे मिरज सांगलीतला समर्थन मोर्चा, कुठे कर्नाटक सरकारच्या बेटींग-सेटींग, अरबाज-सलमान खमंगता, आमिर खानचं पाणी फौडेंशन, राणा अयुबला धमक्या, पीएमची दर्गाभेट, मलालाची इंटरनॅशनल स्तुती, सिरियाची चर्चा, पाकिस्तान राष्ट्राचा दिवाळखोरपणा, मध्येच सोनू निगम, लता मंगेशकर अशा गोड गळयाच्या गायकांची मुस्लिमांविषयी ब्रेकिंग न्युज सारखी ठळक विधाने, पक्षपार्टीच्या माध्यमातून फुललेल्या सेलिबे्रटी इफ्तार पाटर्या, टिका, बहस-चर्चा ... दहशतवादी .... बेगुनाह कैदी.
    टीव्ही चॅनल्स तसाच बदलत राहिलो... आणि सगळीकडेच मला मी अनुभवत राहिलो. पण मघाशीच्या त्या भाभींचा चेहरा नजरेसमोरून हटत नव्हता. माझं स्पीच देखणं सजवून केलेलं होत.टाळयांचा आणि मानधनाच्या नादात खुप कांही सुंदर श्‍लोक, कोटेशन उदाहरणे देवून मी पॉझिटीव्हीटी जागविली होती, पण काय
कुणास ठाऊक मी आता उदासल्यासारखा जरा...
    भाभी रोजा असतील का? इफ्तार कसे होईल ? सहरी कशी झाली असेल ? त्यांची कांही व्यवस्था असेलही कदाचित पण
हरवलेल्या मुलाशिवायची ईद ....? त्यांची अजून माहिती घ्यायला हवी होती म्हणजे त्या काय करतात, कुठे राहतात? कमावते कोण परिस्थिती काय, वगैरे... असो....
    समोस्यांचा बेत आहे, थोडे कोपर्‍यावरच्या मस्जिदीत पाठवायचे आहेत. मुलगा जातो रोज मगरीबला .... टु व्हीलरवरून ! तिला उठवायला हवं ... नको आज अम्मीच्या हातचं कांहीतरी खाऊया. एकाच हाकेने अम्मी जागी झाली. तिच्या हातचा चहा घेतला बाकी बायको उठेल तेव्हा करेल स्वयंपाक... मुलगी दुपारच्या एक्स्ट्रा क्लासला गेलीय. मी चहा घेवून लोळत राहिलो, उद्या “शिक्षण व्यवस्थेवर” बोलायचयं, गेस्ट लेक्चरर म्हणून मोठ्या विद्यापीठात जायचंय, चला नोट्स काढूयात. टेबलजवळ बसून लॅपटॉप ऑन केला. असरच्या अजानचा आवाज आज कमी येत होता ऐकू. लॅपटॉपवर मी माझेही नकळत शिक्षणातून मध्येच हरवलेली मुले, विद्यार्थी शोधत होतो. सर्च करताना विद्यापीठातून हरविलेले विद्यार्थी असं कांहीस टाईप केलं. भांडवलदारी जिओ नेटवर्कनं बरीच नांवे माहितसकट लगेच ओपन केली. उदा. रोहित, नजीब वगैरे, भाभीच्या मुलाच काय झालं ?
त्याचा रोहित झाला की नजीब... ?
. . . .. . . . . .. . .. .
. . . .. . . . . .. . .. .
. . . .. . . . . .. . .. .
हम आह भी भरते हैं, तो हो जाते है बदनाम,
वो कत्ल भी करते है.... चर्चा नही होता.

- बशीर अमीन मोडक, 
रत्नागिरी

मुस्लिमांना सर्वाधिक आनंद देणारा महिना रमजान होय. या महिन्याच्या  आगमनापासूनच आनंद पुढील 29/30 दिवस वाढतच जात असतो. शबे कद्र त्यास रमजानच्या पूर्णता समीप असल्याची जाणीव करून देणारी असली तरी ही रात्र संपूर्ण वर्षातील रात्रीपेक्षा आणि दिवसापेक्षाही अमर्याद आनंद देणारी असते. या रात्री पासूनचा आनंद रमजान महिना संपला तरी लगत पहिल्या दिवशी तो साजरा करूनच विश्रांती घेतात. या कालावधीत श्रीमंत किंवा गरीब यांच्या आनंदात कसलाही फरक नसतो. समानतेचा हा एक आगळा-वेगळा प्रकार मुसलमान स्वतः अनुभवतात आणि तो इतरांनाही देतात.
    हा आनंद असण्यामागच्या कारणां पैकी प्रमुख कारणे 1) कुरआन 2) रोजे. तेव्हा कुरआन आणि रोजे का हे पाहणे औत्सुक्याचे ठरावे. 1) कुरआन अल्लाहने हजरत मुहम्मद पैगंबर (सल्ल.) यांच्यावर याच रमजान महिन्यात अवतरित केले ते सत्य जाणून सर्वत्र व्यापून असलेला जुलूम नष्ट व्हावा म्हणून आणि हे ही स्पष्ट करून की कुरआनद्वारे दिले जात असलेले मार्गदर्शन हे अंतिम असेल. अल्लाहची ताकीद आणि ही हिकमत एवढी यशस्वी ठरली की कुरआन अवतरित होताच जुलूम, अशांतता, अमानुषता नष्ट होऊन मानवता अस्तित्वात आली. इस्लाम मानवीय धर्म म्हणून आज सर्वमुखी आहे. कोणी याला मानवता धर्म म्हणो की इस्लाम एकच. कारण निरपराध माणसाची हत्या म्हणजे समस्त मानवतेची हत्या. कुरआनात स्पष्ट नमूद आहेच. सुरा 2 आयत 3 मधून दीन (धर्म) इस्लाम स्पष्ट होतो.
    शिवाय नमाज, जकात, हज आणि हे रोजे हे या मानवतेचे जपणुकीसाठीचे प्रशिक्षणासाठीच आहेत. कसे ते पाहू. या सर्वांचे महत्त्व कुरआनमध्ये तपशीलवार आहे. आज रमजान आणि रोजे याबाबत विवरण आहे ते रमजानमुळे आणि म्हणून रोजे आणि कुरआन बाबत प्राथमिकता उचित ठरावी.
    कुरआन नुसार एकमेव अल्लाहची इबादत आणि सदाचार (चारित्र्य) या बाबी अल्लाहला अधिक प्रिय आहेत. तर या दोनही बाबी रोजांद्वारे सहज आत्मसात होऊ शकतात. जसे रोजा असताना ठरवून दिलेल्या बाबी उदा. खोटे बोलणे, चहाड्या करणे, जाणीवपूर्वक रोजा तोडणे, विडी, सिगारेटचे सेवन या सर्वांपासून मुक्त असल्याने आणि ते सतत 29/30 दिवस घडून आल्याने दुराचार सहजरित्या निघून जातो आणि आपल्या ठायी असलेले सदाचार कायम राहतात. अल्लाह सदाचार्‍याना पसंत करत असल्यामुळे त्याची प्रसन्नता लाभते. थोडक्यात अल्लाहच्या प्रसन्नतेतून आपल्याला शांंती लाभते. शांती ही प्रगती करण्यास मोलाचे सहकार्य करते. शांती आणि प्रगतीतून मुक्तीचा मार्ग सुकर होतो. अल्लाहने रोजा माझा आहे आणि मी त्यास जबाबदार आहे.
    बरे ही प्रसन्नता ही होते ती रमजानच्या रोजाबरोबर अदा केलेला सदका, अदा केलेली जकात यामुळे ही शिवाय रोजांमधून मानवता ही अंमलात येते आणि शेजार धर्मही दोन्ही बाबी मानवतेची हाक आहे. आणि हाकेला ओ देणे इस्लामने इबादतमध्ये समाविष्ट केले आहे.
    रमजानमधील रोजे त्यातून लाभणारे सर्वोत्तम आचरण, तिलावत, शबेकदरची रहमत तसेच शेजारी सहेरी किंवा इफ्तार याची वाहिली जाणारी काळजी जिच्यामुळे मिळणारी आत्मीक शक्ती आणि समाधान, जकात, सदका यामुळे संपत्तीची होणारी शुद्धता. रोजामुळे वेळेची झालेली जाण आणि शिस्त आणि इबादतमध्ये उद्दिष्ट अशा सर्वच बाबी अल्लाहचे प्रेम यातून पूर्णत्वास जाऊन अल्लाहप्रती असलेले कर्तव्य व ते पार पाडण्याची जबाबदारी सर्व काही सुरळीत घडून येण्यासाठी एकमेव कालावधी म्हणजे रमजान होय. आणि अल्लाहस त्याच्या दासाचे शारीरिक स्वास्थ्याचा लाभ होवून जीवन सुखी समाधानी राहते व याचाच आनंद रमजानला अलविदा करूनही टिकत असतो. ईद त्याचेच प्रतीक. ईद मुबारक.

- डॉ. आयशा पठाण, नांदेड
9158805927

इस्लामी महिना रमजान, ज्यात रोजे अनिवार्य केले आहेत. जेणेकरून मनात ईशभय निर्माण व्हावे. पवित्र ईशवाणी, दिव्य कुरआनात म्हटले आहे. रमजान महिन्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले. मानवजातीकरिता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यानी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी. (2ः185)
    रमजान पवित्र ग्रंथ कुरआनचा महिना याच महिन्यात संपूर्ण मानवजातीसाठी कुरआनचे अवतरण अंतिम प्रेषित मोहम्मद सल्ल. यांच्यावर झाले. म्हणजेच कुरआन-रोजा- रमजान या महत्त्वपूर्ण तीन सुत्रांचा जर विचार केला तर कुरआनातील पहिला श्‍लोक (आयात) सर्व सृष्टीचा पालनकर्ता, विश्‍वाचा कर्ता आहे. कुरआन हा ईशवाणीचा ग्रंथ धरतीवरच्या प्रत्येक मानवासाठी मार्गदर्शन आहे.
    मानवाने जीवन कसे व्यतीत करावे, जीवन कसे जगावे, सत्य व अत्याची कसोटी,मानवसेवेसाठी, समर्पित समाज निर्माण करण्यासाठीची जीवन पद्धती आहे. अल्लाह रब्बूल आलमीन आहे. म्हणजे संपूर्ण मानवजातीचा पालनकर्ता आहे.
    ईशग्रंथ पवित्र कुरआनचे अवतरण याच रमजान महिन्यात पूर्णत्वाला आले. याच महिन्यात तीस दिवसाचा रोजा जो अल्लाहसाठी करतात जेणेकरून त्यांच्या मनात ईशभय निर्माण व्हावे. आत्मीक बळ वाढवणारे विनय नम्रता अंगी येणे पापकृत्या विरूद्ध ढाल शरीरासाठी, उत्तम आरोग्यासाठी वरदान, रोगप्रतिकारक शक्ती वाढवितो सत्याधिष्ठित नियम ज्यामुळे वैयक्तिक व सामाजिक जीवनात सुख समाधानाने जीवन जगू शकतो. तसेच उत्तम रीतीने जीवन व्यतीत करण्याचा मार्ग सदाचारी आचरण व ईशभयानेच निर्माण होते. ईशभयासाठीच इमानधारक रोजे करतात. अल्लाहशी जवळीक साधण्यासाठीच अल्लाहपुढे नतमस्तक होऊन (प्रार्थना)  नमाज पढतात. निःस्वार्थ वृत्तीने संपूर्ण मानवजातीचा विचार करायला लावणारे धैर्य, संयम, सहनशीलता, विचार करायला भूकेची जाणीव होते. गोरगरीब, निराधार, अनाथाशी आपुलकी व मदतीसाठी हात पुढे येतात. मदत फक्त मुसलमानांच नाही तर धरतीवरच्या प्रत्येक मानवाच्या सुख, दुःखात सामील होण्यासाठी पुढे येतो तो इमानधारकच ! आपल्या कुटुंबातल्या शिवाय शेजारी मग तो कोणीही असो निःस्वार्थ वृत्तीने मदतीसाठी पुढे येतो. सत्य-असत्याची जाण ठेवतो. चांगले वाईट, वैध-अवैध याची जाण मनात ईशभय ठेवतो व जीवन जगण्यास तत्पर होतो.
    ईशभय ठेवणार्‍यावर कृपाप्रसादाचा वर्षाव होतो, रोजा माणसाला माणूस बनवतो. चारित्र्यशील निष्ठावान बनतो रोजामुळेच मानव!
    सर्वशक्तीमान अल्लाहने आपल्या पवित्र ग्रंथ कुरआनात वारंवार आदेश दिलेले आहेत. ”नमाज कायम करा, जकात द्या. तुम्ही जमिनीवर वावरणार्‍यावर दया करा. अल्लाह तुमच्यावर दया करील. ही श्रद्धा उदात्त सत्कृत्याचा नैतिकतेचा संग्रह करीत असतो. माणसाच्या मनावर उदात्त अध्यात्मिक जीवनाची वस्तुनिष्ठ वास्तवता बिंबवण्यासाठीच हा आदेश दिला गेला आहे. रमजान महिन्यात रोजा तर करतात त्याबरोबर आध्यात्मिक व नैतिक प्रशिक्षणाबरोबर सह्योग, सेवा, त्याग, बलिदान, आत्मीक शुद्धता करतो, रोजा वाईट कृत्यापासून अलिप्त दहशतवादापासून गुन्हेगारीपासून दूर करतो.
    आम्ही सर्व मानवजात एकाच माता-पित्याची संतान. अल्लाहचे अनंत उपकार आहेत आमच्यावर परिपूर्ण जीवन व्यवस्थेत एक अल्लाहचा ईशग्रंथ पवित्र कुरआन व प्रेषित मोहम्मद सल्ल. यांचे आचरण आमच्यासाठी आदर्श नमुना आहे.
कुरआनात म्हटले आहे, ’तोच तर आहे ज्याने पृथ्वीमध्ये तुमच्यासाठी सर्व गोष्टी निर्माण केल्या. प्रत्येक गोष्टीला तो जाणतो आहे.’
    आकाश, पृथ्वीची निर्मिती, रात्रं-दिवसाचे परिवर्तन, नद्या-सागर, पाऊस, मृत जमिनीला पुनरूज्जीवन करणे, एक बियापासून हजारो दाने तयार करणे ह्या निशाण्या कुरआनात व्यक्त केल्या आहेत. पालनकर्ता अल्लाह सर्व साक्षी आहे. जीवनाच्या वास्तवाची जाण या स्पर्धात्मक युगात ठेवायची आहे. मृत्यू पश्‍चात जीवनाचा धाक व न्यायासाठी करावयाची तयारी, पवित्र कर्माची शिदोरी तयार करण्यासाठी मानव मनात ईशभयाची नित्तांत आवश्यकता आहे. अल्लाह जवळ प्रार्थना आहे, निर्णयाच्या दिवसाचा स्वामी. आम्हा सर्व मानवांना सरळ मार्ग दाखव व मनात ईशभय ठेवणारे बनव. आमीन!

कर्नाटकातील राजकीय नाटकाचा शेवटचा अंक नुकताच संपला. या नाटकाचा अन्वयार्थ एकाच वाक्यात सांगावयाचे झाल्यास काँग्रेसचे पाय जमिनीला लागले आहेत, असे सांगता येईल. कारण एकमेकांच्या विरूद्ध विखारी प्रचार करूनही काँग्रेस आणि जनता दल एकत्र आले. त्यातही काँग्रेसने पुढाकार घेतला आणि कुमार स्वामी यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली. स्वतःकडे अल्पत्व घेऊन सत्ता वाचविण्यात काँग्रेसला भलेही यश आले परंतु, या खेळीचा दूरगामी परिणाम पुढील लोकसभेच्या निकालांवर झाल्याशिवाय राहणार नाही. हे परिणाम दोन प्रकारे होतील. एक तर यातून प्रादेशिक पक्षांना बळ मिळेल. कारण त्यांना कळून चुकले आहे की, ज्या प्रमाणे कमी खासदार निवडून येऊनसुद्धा कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले. त्याचप्रमाणे काँग्रेसपेक्षा एकजरी खासदार जास्त निवडून आणला तर देशाचा पंतप्रधान बनविण्यासाठी काँग्रेस नक्कीच त्यांना पाठिंबा देईल. दूसरा परिणाम असा होईल की, काँग्रेस कार्यकर्त्यांचे नैतिक खच्चीकरण होईल, एव्हाना त्यांना कळून चुकले आहे की, लोकसभेत राहूल गांधी यांची पंतप्रधान बनण्याची शक्यता कमी झालेली आहे. त्यांनी सत्ता वाचविण्यासाठी जास्त आमदार असतांनासुद्धा कमी आमदार असलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री केला. तर उद्या केंद्रातही आपल्यापेक्षा कमी खासदार असलेल्या एखाद्या पक्षप्रमुखाला ते पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिल्याशिवाय राहणार नाहीत.
    काँग्रेसमुक्त भारताच्या मोहिमेला चांगलीच गति मिळाल्याने काँग्रेसला अपमानास्पदरितया कर्नाटकामध्ये जनता दलाला पुढे करावे लागले आहे. जनता दलाने दक्षिण कर्नाटकमध्ये जेथे त्यांचा त्यांचा उमेदवर निवडून येणे शक्य नव्हते त्या ठिकाणी त्यांनी काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेवून भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला होता, हे उघड गुपित होते. याची जाणीव असूनही काँग्रेसने कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री केले. यावरून काँग्रेस किती हतबल झालेली आहे आणि तिचे पाय कसे जमीनीवर आलेले आहेत, याची जाणीव झालेली आहे.
    कर्नाटकात निवडणूक निकाल आल्यानंतर अचानक राज्यपाल विजूभाई वाला यांची भूमिका केंद्रस्थानी आली. हे विजूभाई वाला तेच आहेत ज्यांनी नरेंद्र मोदींसाठी आपली जागा रिकामी केली होती. त्याचे बक्षीस म्हणून त्यांना कर्नाटकाचे राज्यपालपद मिळाले होते. त्यांनी आपल्या पक्षनिष्ठे पुढे राज्यपाल पदाला महत्व न देता निवडणुका नंतर झालेल्या काँग्रेस- जनता दल युतीचे बहूमत स्पष्ट दिसत असतांनासुद्धा येदियुरप्पा यांना सरकार स्थापण्यास पाचारण केले. एवढेच नव्हे तर त्यांचा शपथविधी करून घोडेबाजार करण्यासाठी भरपूर म्हणजे 15 दिवसाचा अवधी दिला. गोवा, मेघालयामध्ये पोळल्याने काँग्रेसने त्वरित हालचाल करून सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला व कर्नाटकाची सत्ता कायम राखण्यात यश मिळविले. यात राज्यपालांच्या निष्ठेविषयी कोणीच प्रश्न उपस्थित केलेले नाही किंवा त्यांनी स्वतः नैतिक जबाबदारी स्विकारून राज्यपाल पदाचा राजीनामा दिलेला नाही. यावरून आपल्या देशाचे राजकारण किती निगरगठ्ठ लोकांच्या हातात आलेले आहे हे दिसून येते.

माननीय सौबान (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तो दीनार उत्तम आहे जो मनुष्य आपल्या मुलाबाळांवर खर्च करतो आणि तो दीनार उत्तम आहे  जो मनुष्य अल्लाहच्या मार्गात ‘जिहाद’ (प्रयत्नांची पराकाष्ठा) करण्यासाठी वाहन खरेदी करण्यासाठी खर्च करतो आणि तो दीनार उत्तम आहे जो मनुष्य आपल्या सहकाऱ्यांवर खर्च  करतो, त्या सहकाऱ्यांवर जे अल्लाहच्या मार्गात ‘जिहाद’ करतात.’’ (हदीस : मुस्लिम)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, एक मनुष्य पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आला आणि विचारले, ‘‘कोणते दान (सदका) कृपा व पुण्याच्या दृष्टिकोनातून उत्कृष्ट  आहे?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘ते दान (सदका) सर्वोत्तम आहे जे तू त्या काळात द्यावे जेव्हा तू योग्य व सुदृढ असशील आणि तुला गरजूपणाचीही भीती आहे आणि अशी आशाही आहे की तुला आणखीन धन मिळू शकते अशा काळात ‘सदका’ (दान) करणे अतिशय उत्तम आहे आणि तू असे करू नये की जेव्हा तुझे प्राण कंठात यावेत आणि मरू लागशील तेव्हा तू दान कर आणि असे म्हण की इतके अमक्याचे आहे, आता तुझ्या म्हणण्याचा काय उपयोग? आता ते अमक्याचे झालेलेच आहे.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाहकडून दोन देवदूत (फरिश्ते) उतरत नाहीत असा कधी दिवस उगवत नाही. त्यांच्यापैकी  एक खर्च करणाऱ्या भक्तासाठी प्रार्थना (दुआ) करतो आणि म्हणतो की हे अल्लाह! तू खर्च करणाऱ्याला उत्तम बदला दे आणि दुसरा देवदूत संकुचित वृत्तीच्या कंजूष लोकांसाठी  शापाची प्रार्थना करतो आणि म्हणतो की हे अल्लाह! कंजूषी करणाऱ्यांना नष्ट व उद्ध्वस्त कर.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
माननीय अबू उमामा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हे आदमपुत्रा! जर तू आपल्या आवश्यकतेपेक्षा अधिक धन अल्लाहच्या गरजवंत भक्तांवर  आणि ‘दीन’च्या कार्यावर खर्च केले तर ते तुझ्यासाठी उत्तम असेल आणि जर तू आवश्यकतेपेक्षा अधिक धन गरजवंतावर खर्च केले नाही तर सरतेशेवटी ते तुझ्यासाठी वाईट असेल  आणि जर तुझ्याकडे आवश्यकतेपेक्षा अधिक धन नसेल म्हणजे तितकेच धन आहे ज्यातून तू आपल्या गरजा भागवू शकतोस, तेव्हा जर तू त्यातून खर्च केला नाही तर खर्च न  केल्याने अल्लाह तुझी निर्भत्सना करणार नाही. आपला सदका (दान) त्या लोकांपासून सुरू करा ज्यांचे तुम्ही संगोपन करता.’’ (हदीस : तिर्मिजी)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की अल्लाह म्हणतो, ‘‘तू माझ्या गरजवंत भक्तांवर आणि ‘दीन’चे कार्य पार पाडण्यासाठी खर्च  करशील तर मी तुझ्यावर खर्च करीन.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण : ‘तुझ्यावर खर्च करीन’चा अर्थ आहे की मनुष्य जे काही आपल्या मिळकतीतून अल्लाहच्या गरजवंत भक्तांच्या आवश्यकता आणि ‘दीन’च्या कार्यात खर्च करतो तेव्हा  त्याचा पैसा वाया जाणार नाही तर तो त्याचा बदला परलोकातदेखील प्राप्त करील आणि या जगातदेखील. जगात त्याच्या संपत्तीत समृद्धी येईल आणि परलोकात त्याला इतके मिळेल  की त्याची कल्पनासुद्धा करता येत नाही. माननीय अबू ज़र गिफारी (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे गेलो असता ते सावलीत बसले होते. जेव्हा त्यांची दृष्टी माझ्यावर पडली तेव्हा ते म्हणाले, ‘‘ते लोक नष्ट व उद्ध्वस्त झाले.’’ मी म्हणालो, ‘‘माझे माता-पिता तुम्हांवर कुर्बान, कोणते लोक नष्ट व उद्ध्वस्त झाले?’’ पैगंबर म्हणाले,  ‘‘ते नष्ट व उद्ध्वस्त झाले जे श्रीमंत असतानाही खर्च करीत नाहीत. आपली धनसंपत्ती खर्च करील, समोरच्यांना देईल, मागच्यांना देईल आणि उजवीकडे असलेल्यांना देईल तोच सफल होईल आणि अशाप्रकारचे श्रीमंत खर्च करणारे फारच कमी आहेत.’’  (हदीस : बुखारी, मुस्लिम)

(३५) (तो त्या वेळेस ऐकत होता) जेव्हा इमरानची पत्नी३२ सांगत होती, ‘‘हे माझ्या पालनकर्त्या! मी हे मूल जे माझ्या पोटात आहे, तुला अर्पण करते. ते तुझ्याच कार्याकरिता समर्पित  असेल, माझी ही भेट स्वीकार कर. तू ऐकणारा व जाणणारा आहेस.’’३३
(३६) मग जेव्हा ती मुलगी तिच्या पोटी जन्मास आली तेव्हा तिने सांगितले, ‘‘हे पालनकर्त्या! माझ्या पोटी तर  मुलगी जन्मली आहे - तिने कोणास जन्म दिला हे अल्लाहला ज्ञात होते. - आणि मुलगा मुलीसारखा असत नाही.३४ बरे असो मी हिचे नाव ‘मरयम’ ठेविले आहे. आणि मी तिला आणि तिच्या भावी संततीला धिक्कारल्या गेलेल्या शैतानाच्या उपद्रवापासून तुझ्या संरक्षणात देते.’’
(३७) सरतेशेवटी तिच्या पालनकर्त्याने त्या मुलीचा प्रसन्नतेने स्वीकार केला. तिचे  खूप चांगली मुलगी म्हणून संगोपन केले आणि जकरियाला तिचे पालक बनविले. जकरिया३५ जेव्हा तिच्याजवळ महिरपमध्ये३६ जात असे तेव्हा तिच्याजवळ काही न काही  खाण्यापिण्याच्या वस्तू त्याला आढळत असत. तो विचारत असे, ‘‘मरयम, हे तुझ्याजवळ कोठून आले?’’ ती उत्तर देत असे, ‘‘अल्लाहकडून आले आहे.’’ अल्लाह ज्याला इच्छितो त्याला  अमर्याद देतो.


३१) खिश्चन लोकांच्या मार्गभ्रष्टतेचे मुख्य कारण ते पैगंबर इसा (अ.) यांना अल्लाहचा दास आणि पैगंबर न मानता अल्लाहाचा पुत्र आणि ईशत्वात भागीदार ठरवतात. जर त्यांची ही  मूलभूत चूक नष्ट झाली तर सत्य आणि विशुद्ध इस्लामकडे त्यांचे पलटून येणे सहज सुलभ होईल. म्हणूनच या व्याख्यानाची सुरुवातच अशी करण्यात आली की आदम, नूह, इब्राहीम  (अ.)ची संतती आणि इमरान (अ.)च्या संततीतील सर्व पैगंबर मनुष्य होते.एकापासून दुसरा जन्म घेत राहिला.यांच्यापैकी कोणीही अल्लाह (खुदा)नव्हता.त्या सर्वांची विशेषता मात्र ही  होती की अल्लाहने आपल्या धर्माच्या प्रचारार्थ आणि विश्वकल्याणासाठी त्यांना निवडले होते.
३२) जर इमरानच्या स्त्रीशी तात्पर्य इमरानची पत्नी म्हटले तर अर्थ होतो की हा तो इमरान नाही ज्याचा वर उल्लेख आला आहे. तर ते आदरणीय मरयमचे पिता होते ज्यांचे नाव  कदाचित इमरान असावे. (इसाई कथनांनुसार मरयमच्या पिताचे नाव युवाखेम लिहिले आहे) तसेच इमरानच्या स्त्रीचा अर्थ इमरानच्या संततीची स्त्री घेतला गेला तर आदरणीय  मरयमची आई याच वंशाची होती, असा अर्थ निघतो. परंतु आमच्याजवळ असा माहीतीस्त्रोत उपलब्ध नाही की या दोन्ही अर्थांपैकी एकास प्राथमिकत: दिली जावी. इतिहासात  याविषयी काहीएक संदर्भ आलेला नाही की आदरणीय मरयमचे पिता कोण होते आणि त्यांच्या आईचा संबंध कोणत्या कबिल्याशी होता. जर हे कथन सत्य मानले की आदरणीय याहया  (अ.) आणि आदरणीय मरयम यांच्या मातोश्री बहिणी बहिणी होत्या तर इमरानची स्त्रीचा अर्थ इमरान वंशातील स्त्री हाच योग्य वाटतो कारण इंजिल (लुका) मध्ये उल्लेख  आला आहे की आदरणीय याहयाची आई आदरणीय हारून (अ.) यांची संतान होती. (लुका, १:५)
३३) म्हणजे तू आपल्या दासांची प्रार्थना ऐकतो आणि त्यांचे हेतू जाणतो.
३४) म्हणजे पुत्र त्या सर्व नैसर्गिक उणिवा आणि सास्कृतिक प्रतिबंधांपासून स्वतंत्र असतो जे मुलींना लागू होतात. म्हणून मुलगा झाला तर तो उद्देश चांगल्या प्रकारे प्राप्त् झाला  असता. ज्यासाठी माझ्या पुत्राला मी तुझ्या मार्गात अर्पण करु इच्छित होते.
३५) आता त्या काळाचे वर्णन आरंभ होते जेव्हा आदरणीय मरयम प्रौढावस्थेला आली. बैतुलमक्दिसच्या प्रार्थनास्थळात (हैकल) दाखल केली गेली. आणि अल्लाहच्या स्मरणात रात्रंदिवस व्यस्त राहू लागली. आदरणीय जकरिया यांच्या देखभालीत त्यांना ठेवण्यात आले होते. ते त्यांचे संभवत: काका होते आणि हैकलच्या पुजाऱ्यांपैकी एक होते. हे पैगंबर जकरिया नाहीत  ज्यांच्या हत्तेचा उल्लेख बायबलच्या जुन्या करारामध्ये आलेला आहे.
३६) शब्द `मेहराब'पासून लोकांचे लक्ष सर्वसाधारणपणे त्या महिरपकडे (कोणारा) जाते, ज्यात मस्जिदीमध्ये इमाम नमाजसाठी उभे राहतात. परंतु येथे तो अर्थ अभिप्रेत नाही. चर्च  आणि सिनेगॉगमध्ये मुख्य उपासनागृहाच्या इमारतीजवळील जमिनीपासून अधिक उंचावर ज्या खोल्या (Carels) बनविल्या जातात ज्यात पुजारी, प्रबंधक, सेवक तसेच ध्यानस्त  (मोतकीफ) राहतात, त्या खोल्यांना महिरप म्हटले जाते. याच खोल्यांपैकी एका खोलीत आदरणीय मरयम एकांतवासात (एतेकाफ) राहात होती.

वृत्तपत्र हा लोकशाही चा चौथा स्तंभ आहे. हे म्हणतात ते उगाच नाही. विविध भाषांतील राष्ट्रीय दर्जाची आणि प्रादेशिक वृत्तपत्रे ही समाजभान घडविण्याचे काम करतात. जगण्याच्या  संघर्षाशी जोडलेला आपला भारतीय समाज शिक्षणामूळे सुबुध्द होण्यात उणा पडत असला तरी दैनिक वृत्तपत्रे दररोज त्याचे सामान्य माणसाने वाचन केल्याने प्रबोधन करीत असतात.  मात्र काही दिवसांपूर्वी ‘कोब्रापोस्ट’ या वेबसाईटने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये देशभरातील प्रमुख माध्यमसमूह पैसे घेऊन कुणाच्याही बाजूने किंवा विरोधात बातम्या चालवण्यासाठी  तयार असल्याचे उघड झाले आहे. ‘ऑपरेशन १३६: पार्ट २’ या नावाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनने माध्यमसमूहांचे वस्त्रहरण करतानाच आगामी काळात बातम्यांच्या नावाखाली काय  काय दाखवले जाणार आहे, याची झलकही पाहायला मिळाली आहे. माध्यमजगतात खळबळ उडवून देणाऱ्या या स्टिंग ऑपरेशनची बातमी देण्याचे धारिष्ट्य मात्र कोणत्याही माध्यमाने  दाखवलेले नाही. टाइम्स ऑफ इंडिया, इंडिया टुडे, हिंदुस्थान टाइम्स, झी न्यूज, नेटवर्क १८, स्टार इंडिया, एबीपी न्यूज, दैनिक जागरण, रेडिओ वन, रेड एफएम, लोकमत,  एबीएनआंध््राा ज्योती, टीव्ही ५, दिनामलार, बिग एफएम, के न्यूज, इंडिया व्हॉइस, द न्यू इंडियन एक्सप्रेस, एमव्हीटीव्ही आणि ओपन मॅगझीन या माध्यमसमूहांनी पैसे घेऊन हव्या  तशा बातम्या छापण्यासाठी तयारी असल्याचे मान्य केले आहे. देशातील प्रमुख माध्यमसमूह निवडणुकीच्या तोंडावर पैशाच्या बदल्यात स्वत:ला विकण्यास तयार असल्याचे यातून स्पष्ट  झाले. याचाच अर्थ आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रचंड पैसा असलेल्या भारतीय जनता पक्षासाठी माध्यमांमध्ये मोठी संधी असल्याचेच या ऑपरेशनने दाखवून दिले आहे. ‘ऑपरेशन १३६: पार्ट २’ या स्टिंग ऑपरेशनमध्ये संबंधित माध्यमसमूहामधील जबाबदार पदाधिकाऱ्यांनी पैशांच्या मोबदल्यामध्ये अतिरेकी हिंदुत्वाचा अजेंडा राबवण्याबरोबरच विरोधकांचे  चारित्र्यहनन करण्यासही तयार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी हजारो कोटी रुपये काळे पैसे घेण्याचीही तयारी दर्शवली आहे. स्टिंग ऑपरेशनचे नाव ‘ऑपरेशन १३६’ असे ठेवण्याचे कारण म्हणजे काही महिन्यांपूर्वी आलेल्या ‘वल्र्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स’द्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात भारताचा क्रमांक १३६ वा आहे. या सर्वेक्षणातील निष्कर्षावरूनच कोब्रापोस्टने  आपल्या स्टिंग ऑपरेशनचे नाव १३६ असे ठेवले आहे. कोठला विचार राष्टवादी आहे व कोणता राष्ट्रद्रोही आहे हे अतिशय कर्कश्य पणे जाहीर करणाऱ्या संघटना आहेत व त्यांना  राजसत्तेचे अभय आहे, हिंदुत्ववादी राजकारणावर टीका करणारांस सोशल मीडियावर धमक्या देणे, फोन करून जीवे मारण्याच्या धमक्या देणे हे प्रकार नित्याचे झाले आहेत. अशा परिस्थितीत भारतीय वृत्तसंस्थांमधील पत्रकारांनी स्वत:वर आपणहून अभिव्यक्ती मर्यादा घालून घेतल्याचे दिसून येते, असे हे सर्वेक्षण नोंदवते. कोब्रा पोस्टचे रिपोर्टर पुष्प शर्मा यांनी  आपण आचार्य अटल नामक धार्मिक कार्यकर्ता आणि एका गुप्त हिंदुत्ववादी संघटनेचे प्रतिनिधी असल्याचे सांगून माध्यम समूहांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. आचार्य अटल यांनी  बहुतेकांसमोर असा प्रस्ताव मांडला की, धार्मिक स्वरुपाच्या बातम्यांच्या अनुषंगाने भाजपला फायदेशीर ठरतील, अशा बातम्या प्रसिद्ध करायच्या, त्याचबरोबर विरोधकांचे चारित्र्यहननही  करायचे. जेणेकरून धार्मिक ध्रुवीकरण होऊन आगामी निवडणुकीत भाजपला फायदा होऊ शकेल. धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध करण्याच्या आचार्य अटल यांचा  प्रस्ताव बहुतेकांनी कॅमेऱ्यासमोर मान्य केला आहे. वैशिष्ट्य म्हणजे या स्टिंगमधील व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसते आहे की, काळ्या पैशाविरोधातील लढाईतले शिपाई असल्याचा टेंभा  मिरवणारे हे माध्यमसमूह संबंधित मोहिमेचा मोबदला रोख रकमेच्या स्वरुपात देण्याची मागणी करीत आहेत. माध्यमसमूहांबरोबरच मोबाइल पेमेंट अ‍ॅप आणि पेमेंट बँक पेटीएमच्या  वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही स्टिंग करण्यात आले आहे. पेटीएमच्या या मंडळींनी आपले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी घनिष्ठ संबंध असल्याचे पुन्हा पुन्हा सांगितले आहे. पेटीएमचा डाटा  आपण पंतप्रधान कार्यालयाला देत असल्याचेही त्यांनी मान्य केले आहे. त्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली असून पेटीएम म्हणजे ‘पे टू पीएम’ असल्याचा निशाणा  साधला आहे. आम आदमी पक्षाचे नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही पेटीएम प्रकरणावरून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. माध्यमे स्वतंत्र असल्याने त्यांच्यावर  कोणाचा अंकुश नसतो. पण ती नि:पक्ष असली पाहिजेत. वृत्तपत्रातून येणारी त्यांची भूमीका निर्भीड आणि सडेतोड असली पाहिजे. कोब्रापोस्टचे हे स्टिंग ऑपरेशन जर खरे असेल, तर  राजकीय नेत्यांच्या, सरकारी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे वेशीवर टांगणारा आपला मीडिया, स्वत: किती स्वच्छ आहे याची प्रचिती ‘कोब्रापोस्ट’च्या ‘ऑपरेशन १३६’ने  आपल्याला दिली आहे.
-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)

जमा़अत ए इस्लामी हिंद नागपूरचा उपक्रम
नागपूर (डॉ. एम. ए. रशीद)-
पवित्र महिना रम़जान यायच्या आधीच जमा़अत ए इस्लामी हिंद नागपूरच्या विभिन्न शाखांच्या वतीने गरिबांना ‘रम़जान किट्स’चे वितरण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. हे कार्यक्रम जमाअतच्या जनसेवा विभागाकडून आयोजित केले जातात, अशी माहिती  संघटनेचे शहर अध्यक्ष डॉ अनवार सिद्दी़की यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, या किट्सच्या माध्यमाने गरिबांना रम़जान महिन्याचे  रो़जे पाळण्यात मदत मिळेल आणि ते कठीण परिश्रमापासून वाचतील. अशा प्रकारच्या मदतीने आधी संघटनेच्या अनेक शाखांचे  सदस्य आणि कार्यकत्र्यांद्वारे दारिद्र्यरेषेखालील विधवा व गरजवंतांची सूची बनविली गेली. त्यानंतर त्यांना किट वितरित करणे सुरू  झाले. या किट्मध्ये दैनिक खानपानाची सामग्री असते. विधवांमध्ये कामठीसहित संपूर्ण शहरात ८६० किट्स वितरणाची सूची  बनविण्यात आली होती.
किट्स वितरणकार्य जमा़अतचे ऑफीस, शिवनकरनगरची मस्जिद ताजुलवरा, हसनबा़गची मस्जिद उस्मानिया आणि जूने कारागृहाची  बाबुस्सलाम मस्जिदमध्येही झाले. ताजुलवरा मस्जिदचे इमाम मुहम्मद कासिम यांनी सांगितले की जमा़अतने हे परोपकारी कार्य  आमच्याकडून करवून आमच्यात अशी जाणीव निर्माण केला की हे किट्स वितरणकार्य आम्हालासुद्धा करायला हवे. इंन्शाअल्लाह  पुढील वर्षी आम्हीसुद्धा अशा प्रकारे अन्न वितरण कार्यक्रम ठेवू. याकामी शे़ख इमरान, अ़जहर खान, मुहम्मद सलीम, श़फी़क खान,  अल्ता़फुर्रहमान, उबैद शारी़क, शे़ख इ़कबाल, ज़ाकिर शे़ख , शारी़क जमाल, बाबुस्सलाम मस्जिदचे ज्वाइंट सेक्रेटरी असलम खान,  इनामुल ह़क, इमाम अनसार अहमद, उस्मानिया मस्जिदचे अध्यक्ष अब्दुल श़फी़क, इमाम शे़ख ऱफी़क, साजिद अली यांनी अथक  परिश्रम घेतले.
किट्स वितरणाच्या वेळी विधवांनी आपले विचार पुढीलप्रमाणे व्यक्त केले-
७२ वर्षीय विधवा बिल्किसबी
आपल्या ३८ वर्षीया अपंग मुलगी तबस्सुम बानोची व्यथेसोबत आयुष्य जगत आहे. त्यांची राहाण्याखाण्याची गंभीर समस्या होती. त्या बोलल्या की जमा़अतने आमच्याकरिता जी सहानुभूती आणि आवश्यकतेला पूर्ण केले त्याचे काहीच उत्तर नाही. त्यांच्या या मदतीने  आमच्या जीवनात आशेचा किरण आलेला आहे. रम़जान महिन्यात हे किट आमच्याकरिता मोठा आधार आहे.
६४ वर्षीय खुर्शीदा बे़गम म्हणाल्या की, जमा़अत ए इस्लामी हिंद माझी नेहमी मदत करते. मी विधवा आहे, बेसहारा आहे आणि आजारीही राहते. मला मुलं नाहीत. या जमा़अतकडून मला या किटव्यतिरिक्त औषधोपचाराकरिताही वेळोवेळी मदत केली जाते.

माणसाने जीवनामध्ये वास्तविकता कधीच नाकारू नये. वास्तविकतेचा स्वीकार केल्याने जीवन सुकर होते. ती नाकारणली तर ते  नरकप्राप्य होते. ‘शोधन’ साप्ताहिक असेच वास्तवाचा शोध घेणारे वृत्तपत्र आहे. त्यातील ‘ईशवाणी’ व ‘प्रेषितवाणी’ हे सदर फारच  प्रेरणादायी असते. एप्रिलच्या दुसऱ्या सप्ताहातील अंकामधील ‘मृत्यू, एक सापेक्ष अनुभव’ हा एम. आय. शेख यांचा लेख फारच  प्रेरणादायी व अप्रतीम आहे. तो वाचत असताना पवित्र कुरआनातील ‘कुल्लुन नफसीन जायक तिलमौत’ या आयतीची आठवण  झाली. अर्थात- ‘‘हर जानदार, जिसे जान है, जो साँस लेता है, को एक दिन मौत का मजा चखना है।’’ असे असताना आम्ही जगात ज्याला पर्याय नाही अथवा मृत्यूच्या बाबतीत फारच सजग आणि सावध राहिले पाहिजे.
मौत से किसकी रिश्तेदारी है?
आज मेरी, कल तुम्हारी बारी है।

याचे भान ठेवून सर्वांशी प्रेमाने, सलोख्याने व बंधुभावाने वागले पाहिजे. जात, धर्म, पंथ, संप्रदाय यावरून भांडणे होऊ नयेत. मतभेद  असले तरी मनभेद असू नयेत. गट असावेत, गटबाजी नसावी. या गोष्टी सर्वांना रसातळाला नेणाऱ्या आहेत. संत कबीरांनी योग्यच  म्हटले आहे की,
क्यों लढ़ता मुरख बन्दे, यह तेरी खामखयाली है।
है पेड की जड तो एक वही, हर मजहब एक-एक डाली है।

त्याच्याही पुढे जाऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात,
यह धर्म, वर्म सब है विचारीयों के।
तुकड्या कहे सभी का है एक ही नतीजा।।

अर्थातच ‘कुल्लुन नफसीन जायक तिलमौत’ कृपया सर्वांनी ‘मृत्यू : एक सापेक्ष अनुभव’ हा लेख जरूर वाचावा व त्यावर चिंतन  करावे.
- मनोहर रेचे दहिगावकर (ग्रामगीताचार्य),
अंजनगाव सुर्जी (९६५७३२४७४४)

इंधनाच्या किमती नागरिकांच्या आवाक्याबाहेर जात असून, त्यामुळे नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. कर्नाटक  निवडणूक काळात काहीशी रोखलेली दरवाढ आता सैल करण्यात आल्याने पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा भडका उडाला आहे.  महाराष्ट्रात काही ठिकाणी पेट्रोलचे दर प्रतिलिटर ८५ रुपये सात पैशांपर्यंत पोहोचले असून, डिझेलसाठीदेखील नागरिकांना ७१ रुपये ६६  पैसे मोजावे लागत आहेत. देशात महाराष्ट्रामध्ये इंधन सर्वांत महाग आहे. वेळोवेळी लावलेले 'सेस' जैसे थे ठेवले गेल्याने राज्यात  पेट्रोल, डिझेल महाग असल्याचे म्हटले जाते. किल्लारी येथे भूकंप झाला त्या वेळी पेट्रोल, डिझेलसारख्या इंधनावर एक रुपया सेस  लावण्यात आला. तेथील जनजीवन पूर्वपदावर येऊन कितीतरी वर्षे लोटली. परंतु, तरीही अद्याप हा सेस हटविण्यात आलेला नाही.  दोन वर्षांपूर्वी राज्यात दुष्काळ होता. त्या वेळीही सेस लावण्यात आला. गेली दोन वर्षे चांगला पाऊस होऊनही सेस कायम आहे.  महामार्गालगतचे वाइन शॉप बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला तेव्हादेखील दोन ते अडीच रुपये वाढविण्यात आले. परंतु, हे  वाढविलेले दर सरकारने पुन्हा कधीच मागे घेतलेले नाहीत. याखेरीज अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात व्हॅटदेखील अधिक आहे.  त्यामुळे राज्यात इंधनासाठी अधिक पैसे मोजावे लागत असून, नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडत आहे. कर्नाटक निवडणुकीमुळे  मध्यंतरी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. परंतु, निवडणूक निकालानंतर आता पुन्हा दरवाढीचे ओझे  नागरिकांच्या खांद्यावर टाकले जात आहे. दररोज १२ ते १३ पैशांनी होणारी दरवाढ आता २५ ते ३० पैशांनी होत आहे. जागतिक बाजारपेठेतील क्रुड ऑइलच्या किमतींवर देशात इंधनाची किंमत ठरत आहे.  चार-पाच रुपयांपर्यंत वाढ झाली की मधेच कधीतरी  चार-आठ आणे कमी करून दर कमी केल्याचा आभास निर्माण केला जातो. दरवाढीमुळे सामान्य माणूस मात्र होरपळत राहतो.  देशभर सगळीकडेच सामान्यांना महागाईच्या या झळांनी भाजून काढले असून प्रक्षुब्ध भावना व्यक्त केल्या जात आहेत. पेट्रोल-डिझेल  हे सरकारने उत्पन्नाचे आणि जनतेच्या खिशात हात घालण्याचे हक्काचे साधन मानल्याचे सिद्ध होत आहे. पेट्रोल-डिझेलवरील  कराच्या माध्यमातून महसूल मिळवण्याची चटक या सरकारला लागली असल्याचे एकूण व्यवहारावरून दिसून येते. कारण कितीही  तक्रारी केल्या तरीही लोक अपरिहार्यतेपोटी पेट्रोल पंपांवर जाणारच हे सरकारला माहिती आहे. त्यामुळेच सहजपणे हा पैसा मिळू  लागतो. एखादी व्यक्ती असो किंवा संस्था, सहजपणे पैसा मिळू लागला की त्याची चटक लागते. या सरकारने पेट्रोल, डिझेलवरचा  अबकारी कर अनेकवेळा वाढवला आहे. जगतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीच्या तुलनेत विचार केला तर पेट्रोल-डिझेलच्या  दरात वीस टक्क्यांच्या आसपास घट व्हायला पाहिजे होती, परंतु घट दूरच राहिली, त्यात सातत्याने वाढच होत राहिली. सन २०१६- १७ या वर्षात सरकारने पेट्रोल आणि डिझेल या दोन उत्पादनांवर ३,२७,५५० कोटी रुपये कमावले आहेत. केंद्रीय पर्यटनमंत्री के. जे.  अल्फान्सो यांनी मध्यंतरी, पेट्रोल दर वाढल्याने मोटार बाळगणारे उपाशी मरणार नाहीत, असे विधान करून आपली आणि आपल्या  सरकारची मानसिकता स्पष्ट केली होती. लोक उपाशी मरणार नाहीत, हे खरे असले तरी सुखाने जगू शकत नाहीत हेही तेवढेच खरे  आहे. कच्च्या तेलाच्या जागतिक बाजारपेठेत पुन्हा एकदा किंमतवाढीचा भडका पेटू लागला आहे. जे देश खूप मोठ्या प्रमाणावर  कच्च्या तेलाची आयात करतात त्यांना किंमतवाढीच्या झळीचा त्रास सहन करावा लागणार हे स्वाभाविक आहे. त्यात पुन्हा एखाद्या  देशाच्या चलनाचे डॉलरच्या तुलनेत विनिमय मूल्य घसरत असेल तर कच्च्या तेलाच्या आयातीचा खर्च वाढणार, हेही सहज लक्षात येते. जागतिक बाजारातील किंमत वाढ आणि देशातल्या पेट्रोल आणि डिझेल (एलपीजीदेखील) या इंधनदरातील किंमतवाढ यात  कुठेही मेळ लागत नाही. याचे कारण पेट्रोल, डिझेल यावर लादलेले भरमसाठ आकाराचे केंद्र आणि राज्य सरकारचे कर हे कर कमी  केले तर दरवाढ कमी करता येईल. पुढील दोन वर्षांमध्ये (२०२० च्या शेवटी) कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरलला ९० ते १००  डॉलरच्या घरात पोहोचतील, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. मात्र जागतिक बाजारपेठेत ज्या प्रमाणात कच्च्या तेलाच्या  किंमती वाढत आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढताना दिसत आहेत. या परिस्थितीत पेट्रोल  आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्या नाहीत, तर किंमतवाढीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल. अशा वेळी वित्तीय धोरण  अधिक कडक होऊन, व्याजदर वाढविले जातील. गुंतवणूक आणि आर्थिक विकासाला ते मारक आहे. आता निदान पेट्रोल, डिझेलच्या  दरवाढीवर मात्र सरकारने लगाम घातला पाहिजे ही लोकांची एक साधी अपेक्षा आहे.
-शाहजहान मगदुम
(मो. : 8976533404, Email: magdumshah@eshodhan.com)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget