Halloween Costume ideas 2015

लज्जाशील समाजनिर्मितीची गरज

निर्लज्ज माणूस कितीही मोठा गुन्हा सहजपणे करू शकतो. एवढेच नव्हे तर त्यावर गर्व सुद्धा करू शकतो. अशा लोकांची संख्या ज्या समाजात वाढते तो समाज सुद्धा निर्लज्ज समाज  होवून जातो. अलिकडे प्रत्येक देशात असा निर्लज्ज समाज मोठ्या प्रमाणात फोफावतांना दिसतो आहे. आश्चर्य म्हणजे ’हया’ (लज्जा) ज्या समाजाचे व्यवच्छेदक लक्षण आहे त्या  मुस्लिम समाजातील एक मोठा गट ही निर्लज्जपणे वागताना दिसतो आहे.
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्हंटले आहे की, ’’प्रत्येक धर्माचे एक वैशिष्ट्ये असते, इस्लामचे वैशिष्ट्य हया आहे.’’ निर्लज्ज समाजामध्ये सर्वात जास्त हानी महिला आणि मुलांची होती.  अशा समाजात भ्रष्टाचार बोकाळतो, अप्रमाणिकता वाढते, लोक मोठ्या प्रमाणात खोटं बोलू लागतात, त्यामुळे कोणावरही सहजा-सहजी विश्वास ठेवता येत नाही. प्रत्येकाचे प्रत्येक  बोलणे तपासून पहावे लागते. प्रत्येक व्यवहार जपून करावा लागतो. जरा दुर्लक्ष झाले की, मोठ्या प्रमाणावर फसवणुकीला सामारे जावे लागते. समाजात स्वार्थीपणाची भावना प्रबळ  होते. त्यातून चक्रवाढ व्याजाची पद्धत रूढ होते. त्यात गरीबांचे सर्वाधिक नुकसान होते. श्रीमंत लोकांना गरीबांची दया येत नाही. त्यातून गरीबांच्या आत्महत्या वाढतात. त्या समाज  उघड्या डोळ्यांनी पाहून सुद्धा समाजाला फारसा फरक पडत नाही. समाज संवेदनाहीन होतो. कोणी कोणाच्या मदतीला धावून येत नाही. स्वहितापुढे राष्ट्रहिताशीही तडजोड केली जाते. सरकारमध्येही निर्लज्ज माणसांचा मोठ्या प्रमाणात शिरकाव होतो. त्याचा लाभ श्रीमंतांना होतो गरीब डावलले जातात. जिथे कुठे अशी परिस्थिती निर्माण झालेली असेल, त्या ठिकाणी  राहणाऱ्या मुस्लिम समाजाची जबाबदारी आपोआपच वाढते. नैतिकतेची उत्कृष्ट आचारसंहिता अर्थात कुरआन ज्यांच्याकडे आहे आणि तो अल्लाहचा कलाम (ईशवाणी) आहे असा ज्यांचा  दावा आहे त्यांना निर्लज्जतेकडून मिळालेले हे आव्हान स्विकारून आपला दावा खरा आहे, हे सिद्ध करण्याची संधी मिळते.
भारतीय मुस्लिम समाजाकडे ही संधी चालून आलेली आहे. भ्रष्ट, अनीतिमान आणि निर्लज्ज लोकांची भरपूर वाढ समाजात झालेली आहे. आपल्या कोषातून बाहेर पडून, आत्ममग्नतेचा  त्याग करून, आपल्या वागण्या-बोलण्या आणि व्यवहारातून इस्लामी लज्जाशिलतेचे प्रदर्शन जळीस्थळी करून लज्जाशील समाज कसा असतो हे दाखवून देण्याची संधी आपल्याला  मिळालेली आहे. हे आव्हान सोपे जरी नसले तरी अगदीच अश्नय आहे असेही नाही.
अगदी अशाच परिस्थितीमध्ये सातव्या शतकात
सुरूवातीला मदीना शहरात व नंतर अरबस्थानामध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी निर्लज्ज अरबी टोळ्यांमधून लज्जाशील समाज निर्माण करून दाखवला होता. प्रेषित सल्ल. यांचे  वारसरदार म्हणून आता आपली पाळी आहे. प्रेषित सल्ल. यांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीचे केवळ गुणगाण करून भागणार नाही तर त्या कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल.  त्यासाठी कुरआन आणि सुन्नाहमध्ये लज्जाशील समाज निर्मितीसाठी काय मार्गदर्शन केले आहे, याचा संक्षिप्त आढावा घेणे आजच्या लेखाचा उद्देश्य आहे. तर चला पाहूया, लज्जाशील  समाज कसा निर्माण होऊ शकतो ते जगातील प्रत्येक देश आपल्या नागरिकांना कायद्यात पकडतो मात्र इस्लाम आपल्या मानणाऱ्यांना नैतिकतेत पकडतो. कायदा त्यानंतर येतो.  कायद्यात पकडण्याची वेळच येऊ नये, यासाठी इस्लाम एक लज्जाशील समाज निर्माण करू इच्छितो. त्यासाठी इस्लामला मानणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये ’हया’ कशी निर्माण  होईल, यासाठी वेगवेगळे उपाय सूचवितो.
माणसामध्ये हया निर्मितीचे सर्वात मोठे साधन रोजा आहे. रोजा समज येताच ठेवावा लागतो. मणुष्य जेव्हा पौगंड अवस्थेत असतो तेव्हा त्याला केवळ अल्लाहसाठी अन्न आणि  पाण्याचा त्याग करण्याची शिकवण दिली जाते. तो संधी असूनसुद्धा रोजाच्या दरम्यान काही खात किंवा पीत नाही. खाण्यापिण्याची जेव्हा तीव्र इच्छा मनामध्ये निर्माण होते तेव्हा तो  स्वतःशीच लाजतो. येथूनच माणसाच्या व्यक्तीत्वात लज्जानिर्मितीची सुरूवात होते. हया निर्मितीचे दूसरे मोठे साधन नमाज होय. दिवसातून पाच वेळेस नियमित नमाज अदा करणारा  माणूस कुठलेही वाईट कृत्य करण्यापूर्वी स्वतःशीच लाजतो. कारण नमाजमुळे त्याच्या मनामध्ये हया निर्माण होते. कुरआनने म्हटलेले आहे की, ’इन्नसलात तन्हा अनिल फाहाशाई वल  मुनकर’ ’अर्थात निश्चितच नमाज अश्लिल व अपकृत्यापासून रोखते’ (संदर्भ : सुरे अनकबूत आयत नं. 45)
नियमितपणे नमाज अदा करणाऱ्या माणसाला व्यवहारात अपकृत्य करण्याची संधी येताच नुकत्याच अदा केलेल्या नमाजमुळे त्याच्यात निर्माण झालेल्या लज्जाशीलतेतून तो त्या  अपकृत्यापासून दूर राहतो. चार-दोन तासाच्या ठराविक अंतराने दिवसातून पाच वेळेस नमाज अदा केल्याने दिवसभरात त्याच्या मनामध्ये कायम लज्जेची भावना तेवत असते. त्यातूनच  तो एक लज्जाशील व्यक्ती बनतो आणि अशाच व्यक्तींच्या समुहातून एक लज्जाशील समाजाची निर्मिती होत असते.
लज्जेचा संबंध साधारणपणे लैंगिक वागणुकीशी लावला जातो. जेव्हा सर्वप्रथम एका स्त्री आणि एका पुरूषाची निर्मिती करून अल्लाहने त्यांना स्वर्गामध्ये ठेवले आणि एका विशिष्ट  वृक्षाच्या फळाचा आस्वाद घेण्यापासून रोखले तेव्हा सैतानाने शपथा घेऊन त्यांना त्या वृक्षाचे फळ खाण्यास भाग पाडले. तेव्हा त्यांचे गुप्तांग एकमेकांसमोर उघडे पडले आणि तात्काळ दोघांच्याही मनामध्ये लज्जेचा भाव निर्माण झाला. तेव्हा त्यांनी इतर झाडांची पाने तोडून स्वतःचे गुप्तांग झाकण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, 1) ’’ सरतेशेवटी त्या उभयंता (पती-पत्नी) नी त्या झाडाचे फळ खाऊन टाकले. परिणाम असा झाला की लगेच त्यांचे गुप्तांग एकमेकांसमोर उघड झाले आणि लागले ते स्वतःला स्वर्गाच्या पानांनी झाकावयास. आदम (अलै.) ने आपल्या पालनकर्त्याची अवज्ञा केली.’’(सुरे ताहा : आयत नं. 121)
2) ’’श्रद्धावंत स्त्रियांना सांगा की त्यांनी आपल्या दृष्टींची जपणूक करावी आणि आपल्या लज्जास्थानांचे रक्षण करावे आणि आपला साजशृंगार (लोकांसमोर) दर्शवू नये. त्या व्यतिरिक्त  जे सहजासहजी प्रकट होईल आणि आपल्या छातीवर आपल्या ओढणीचा पदर घालून ठेवावा. त्यांनी आपला साजशृंगार प्रकट करू नये परंतू, या लोकांसमोर पती, पिता, पतीचे वडील, आपली मुले, पतीची मुले, भाऊ, भावांची मुले, बहिणींची मुले, आपल्या जवळीकीतील स्त्रिया, आपल्या दासी, ते हाताखालचे पुरूष जे एखादा अन्य प्रकारचा हेतू बाळगत नसतील आणि ती मुले जी स्त्रियांच्या गुप्त गोष्टींशी अद्याप परिचित झालेली नसतील. महिलांनी आपले पाय जमीनीवर आपटत चलू नये की जेणेकरून त्यांनी जो आपला शृंगार लपविलेला आहे  त्याचे ज्ञान इतरांना होईल.’’ (सुरे नूर आयत क्र. 31)
3) प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी सांगितले की, ’’हया (लज्जा) आणि ईमान (श्रद्धा) दोघे एकत्र असतात. त्यापैकी जर एकही गेली तर दूसरी आपोआपच जाते. ’’ (हदीस)
4) प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी सांगितले की, ’’श्रद्धेचे 60 ते 70 किंवा यापेक्षा थोडे अधिक स्तर आहेत. सर्वात उत्कृष्ट स्तर तौहिद (अल्लाहला एक मानने) हा आहे आणि सर्वात शेवटचे स्तर खिदमते खल्क (जनसेवा) आहे. म्हणजे रस्त्यात पडलेल्या त्या वस्तू दूर हटविणे ज्यापासून वाटसरूंना इजा पोहोचण्याची शक्यता आहे.’’ (हदीस)
हया इस्लामी श्रद्धेचा अविभाज्य भाग आहे. आज अनेक लोक ज्या प्रकारचे तोकडे आणि तंग वस्त्रे परिधान करतात व त्यातून त्यांच्या शरीराचे नको तसे व नको तितके प्रदर्शन होत  राहते. त्यावरून एक गोष्ट लक्षात येते की, हे लोक किती निर्लज्ज आहेत. मात्र लज्जेचा संबंध फक्त शरीर झाकण्यापुरताच किंवा लैंगिक संबंधांमध्ये नैतिकता राखण्यापुरताच मर्यादित  नसून माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये सर्व वाईट गोष्टींपासून लांब राहण्यासाठी ज्या भावनेची गरज भासते त्या भावनेला इस्लाममध्ये ’हया’ अर्थात लज्जा म्हटलेले आहे. या संदर्भात  जमाअते इस्लामीचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी रहे. यांनी मोठे सुंदर भाष्य केलेले आहे. ते म्हणतात, ’’इन्सान के अंदर ’हया’ का जज्बा एक फितरी(नैसर्गिक) जज्बा है. और  उसका अव्वलीन (प्रथम) मजहर (प्रदर्शन) ’हया’ है. जो अपने जिस्म के मक्सूस हिस्सों (लैंगिक अवयव) को दूसरे के सामने खोलने में आदमी को फितरतन महेसूस होती है. कुरआन  हमें बताता है के, ये ’हया’ इन्सान के अंदर तहेज़ीब (संस्कृती) के इरतका (विकास) से मसनुई (कृत्रीम) तौर पर पैदा नहीं हुई है और ना ही ये इक्तेसाबी (दूसरीकडून घेतलेली) चीज  है. जैसा के शैतान के बाज शागीर्दोने कयास (अंदाजा) किया है. दरहकीकत (खरोखर) ये फितरी चीज है. जो अव्वल रोजसे इन्सान में मौजूद थी. शैतान की पहली चाल जो उसने  इन्सान को उसकी फितरत-ए-इन्सानी की सिधी राह से हटाने के लिए चली. ये थी के, उसके जज्ब-ए-हया (लज्जेची भावना) पर जर्ब (वार) लगाए और बरहनगी (नग्नता) के रास्ते से  इसके लिए फवाहीश (अश्लिलता) का दरवाजा खोले और उसको जिन्सी (लैंगिक) मामले में बद-राह (पथभ्रष्ट) कर दे. ब-अल्फाज-दीगर (दुसऱ्या शब्दात) कहें तो अपने हरीफ (प्रतिद्वंद्वी) अर्थात इन्सान के महाज (च्या आत) में जईफ तरीन (अतिशय नाजूक) मुकाम (स्थान) जो उसने हमले के लिए तलाश किया वो उसकी जिंदगी का जिन्सी पहेलू था.  और अपनी जर्ब जो उसने (सैतानाने) लगाई वो उस महाज-ए-फसील (युद्ध क्षेत्र) पर लगाई जो ’हया’ की सुरत में अल्लाह ने इन्सान की फितरत (प्रवृत्ती) में रख्खी थी. शैतान और  उसके शागिर्दों की ये रविश (पद्धत) आजतक ज्यूं की त्यूं कायम है. तरक्की (प्रगती) का कोई काम उनके हां शुरू नहीं हो सकता जब तक के औरत को बेपर्दा करके वो बाजार में न  लाकर खडा कर दे और किसी न किसी तरह उसे उरयां (नंगी) न कर दें. ये इन्सान की ऐन फितरत है के वो बुराई की खुली दावत को कम ही कुबूल करता है. उमूमन (साधारणपणे)  उसे जाल में फंसाने के लिए हर दाई-ए-शर (अपप्रवृत्तीचे प्रचारक) को खैरख्वाह (हितचिंतक) के भेस में ही आना पडता है.’’ (संदर्भ : तफहिमुल कुरआन खंड 2 पान क्र. 15-16).
आत्तापर्यंत झालेल्या वरील विवेचनावरून सुज्ञ वाचकांच्या लक्षात आलेच असेल की, लज्जाशील समाज निर्मितीचे आव्हान किती मोठे आहे? अशा समाजनिर्मितीच्या कार्यासाठी प्रत्येक  सद्प्रवृत्तीच्या व्यक्तीने स्वतःला वाहून घ्यावे, इथपत या कामाची गरज आहे. जमात-ए-इस्लामी हिंदने स्वतःला या कामासाठी 1941 पासून वाहून घेतलेले आहे. आपल्या तरूण पीढिस  व पुढच्या पीढिस निर्लज्जतेच्या वावटळीपासून सुरक्षित ठेवायचे असल्यास लज्जाशीलतेची सुरूवात आपल्या सर्वांना स्वतःपासून करावी लागेल. ही देशसेवाच नव्हे तर मानवतेची सेवा  सुद्धा ठरेल, यात वाद नाही.

- एम.आय.शेख
9764000737

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget