Halloween Costume ideas 2015

रूग्णसेवेसाठीच वैद्यकीय क्षेत्रात घेतला प्रवेश

नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील मिर्झा तंजिल बेग (वय 24) या तरूणाच्या आयुष्याचा यशस्वी खडतर प्रवास इतर तरूणांसाठी प्रेरणादायक असल्याने शोधनच्या वाचकांच्या सेवेत  सादर आहे. मिर्झा तंजिल बेग यांनी नुकतेच एमबीबीएस पूर्ण केलेले असून ते सध्या लातूर एसआयओचे शहराध्यक्ष आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्याशी बशीर शेख व एम.आय. शेख  यांनी साधलेला हा संवाद.

प्रश्न - आपल्या प्रारंभिक शिक्षणा संबंधी काय सांगाल?
- माझे प्रारंभिक शिक्षण अंतरभारती माध्यमिक विद्यालय, बिलोली येथून मराठी माध्यमातून झाले. शालांत परीक्षेत मला फक्त 64 टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर मी हु.पानसरे  महाविद्यालय, अर्जापूर येथे 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. 12 वी परीक्षेत मला 61 टक्के तर नीटमध्ये 720 पैकी 293 गुण मिळाले होते. त्या आधारावर एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथे शासकीय कोट्यातून मला एमबीबीएसच्या प्रथम वर्षात 2013 ला प्रवेश मिळाला. त्यानंतर 2018 मध्ये माझे एमबीबीएस पूर्ण झाले व सध्या मी  येथेच एन्ट्रनशीप तसेच पदव्युत्तर शिक्षणाची तयारी करीत आहे.

प्रश्न - तुमच्या या प्रवासाबद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे?
- माझे गाव बिलोली हे महाराष्ट्र आणि तेलंगनाच्या सीमेवर आहे. शेवटचे गाव असल्यामुळे शासनाचे फारशे लक्ष या गावाकडे नाही. स्वातंत्र्यापासूनच येथील मुस्लिम समाज हा अतिशय गरीब अवस्थेतून वाटचाल करीत आहे. पूर्ण गावामध्ये आजपावेतो एकही मुस्लिम विद्यार्थी एमबीबीएस होवू शकला नाही. यावरून या गावातील मुस्लिम समाजातील  शिक्षणाची भीषण परिस्थिती लक्षात यावी. हीच एक बाब मला लहानपणापासून खटकत होती. याच कारणामुळे मला एमबीबीएस करण्याची प्रेरणा मिळाली. मात्र प्रवास अवघड होता.  शैक्षणिक गुणवत्ता बेताचीच होती. तरी परंतु, अल्लाहच्या कृपेने माझे मूळ उद्देश्य साध्य झाले असून, मी वैद्यकीय क्षेत्रामध्येच इन-शा-अल्लाह पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतरच  गावाकडे जाऊन रूग्णांची सेवा करणार आहे. कारण माझ्या गावात आजही दर्जेदार वैद्यकीय सेवा किफायतशीर दरामध्ये उपलब्ध नाही.

प्रश्न - बिलोली सारख्या मागास गावातून येवूनही तुम्ही स्वतःच्या व्य्नतीमत्वाचा इतका विकास कसा काय केला?
- याचे शंभर टक्के श्रेय मी एसआयओ या विद्यार्थी संघटनेस देतो.

प्रश्न - ते कसे काय?
- बिलोलीमध्ये एमबीबीएससाठी जी नीटची परीक्षा द्यावी लागते. तिची तयारी करून घेण्यासाठी कुठलीही शैक्षणिक संस्था नव्हती. शिवाय, 2013 मध्ये पहिल्यांदाच नीटची परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेण्याचे ठरल्यामुळे त्याचे वेगळेच दडपण माझ्यावर होते. त्यामुळे माझे मोठे बंधू अब्दुल कादर , मिर्झा तज्जमुल आणि माझे वडील मिर्झा खलील बेग यांनी मला  नांदेड येथे जाऊन नीटची तयारी करण्याचा सल्ला दिला व मोलाचे सहकार्य केले.

प्रश्न - मग काय झाले?
- मी नांदेडला आलो आणि पीर बुऱ्हाण येथे किरायाने खोली घेऊन दुसऱ्या एका अमान तानूरकर या विद्यार्थ्याबरोबर राहू लागलो. नीटसाठी चौगुले्नलासेस, माकणे-कोनाळे्नलासेस मध्ये  प्रवेश घेतला व अभ्यासाला सुरूवात केली.

प्रश्न - एसआयओच्या संपर्कात कसे आलात?
- नीटचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा मला स्वतःच्या गुणवत्तेला आव्हान मिळाल्याचे लक्षात आले. अभ्यासाचे दडपण खूप होते. दरम्यान, पीर बुऱ्हाण भागातच राहणारे  एसआयओचे अध्यक्ष मोहसीन खान यांच्याशी माझी ओळख झाली. त्यांनी मला एसआयओच्या साप्ताहिक कार्यक्रमात येण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद म्हणून मी एसआयओच्या  कार्यक्रमांना जाऊ लागलो.

प्रश्न - पुढे काय झाले?

- एसआयओच्या संपर्कात आल्यानंतर मला माझ्या व्यक्तीमत्वातील बलस्थाने आणि त्रुटी दोन्हींची जाणीव झाली. त्रुटींवर कशी मात करता येईल, याचा मी विचार करायला लागलो. या  कामी मला एसआयओच्या ’एहतेसाब’ अर्थात आत्मावलोकनाच्या पद्धतीचा भरपूर उपयोग झाला. या पद्धतीने मला स्वतःचे आकलन करता आले. ज्या त्रुटी माझ्यामध्ये होत्या त्या दूर  करता आल्या. एका व्यवस्थेमधून ठराविक अशा अंतराने एहतेसाब होत असल्यामुळे माझ्यामध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. शिवाय, एसआयओच्या बेसिक साहित्यामुळे मला इस्लामची माहिती झाली. नमाज अदा करतांना माझे लक्ष सज्द्याच्या ठिकाणी केंद्रीत करण्याची सवय लागली. त्यामुळे माझी एकाग्रता वाढली आणि सुरूवातीला नीटचा जो अभ्यास कठीण वाटत होता तो हळूहळू माझ्या आवाक्यात येत गेला. एसआयओच्या साहित्यामुळे मला इस्लामी व्यवस्थेची ओळख झाली. त्यातून माझ्यामध्ये आत्मविश्वासाची भावना प्रबळ  होत गेली. एसआयओचा सर्वात मोठा फायदा मला हा झाला की, मला माझे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून लांब राहण्याची यु्क्ती मिळाली. त्यामुळे अभ्यासावर अधिकाधिक लक्ष  केंद्रीत करता आले. यासाठी मी नांदेड एसआयओ युनिटच्या सर्व सभासदांचा आभारी आहे. त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे मला सद्मार्गावर चालण्याची संधी मिळाली. एसआयओ एक अशी संघटना आहे की जी विद्यार्थ्यांची ऐन त्यावेळेस मदत करते ज्यावेळेस त्यांना मदतीची गरज असते.

प्रश्न - भविष्याची तुमची काय योजना आहे?
- इन-शा-अल्लाह बिलोली ज्या गावात माझा जन्म झाला त्या गावात उत्कृष्ट आणि अत्याधुनिक वैद्यकीय सेवा खऱ्या अर्थाने सेवा म्हणून देण्याचा माझा मानस आहे. इस्लाममध्ये  खिदमतए- खल्क (समाजसेवा) ला फार महत्व आहे. भारतामध्ये हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती रहे. आणि हजारो सुफी संतांनी याच माध्यमातून समाजाची मोठ्या प्रमाणात सेवा  केलेली होती. तोच आदर्श मला माझ्या समोर ठेऊन रूग्णांची सेवा करावयाची आहे.

प्रश्न - हे तुम्ही कसे करणार?
- आज आपण पाहतो वैद्यकीय सेवांचे पूर्णपणे व्यापारीकरण झालेले आहे. कुठे-कुठे तर त्यात अपराधिक तत्वांचा सुद्धा शिरकाव झालेला आहे. त्यामुळे जनतेमध्ये वैद्यकीय सेवेबद्दल  एक सुप्त असा नकारात्मक भाव दिवसेंदिवस वाढतो आहे, असे माझे मत आहे. अशा नकारात्मक परिस्थितीमध्ये इस्लामी नैतिकतेची सांगड वैद्यकीय व्यवसायाशी घालून रूग्णांना  माफक दरात सेवा देता येईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही.

प्रश्न - तुम्ही वैद्यकीय परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय संदेश देऊ इच्छिता?
- हाच संदेश देतो की, मुलांनी एसआयओ (स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन) आणि मुलींनी जीआयओ (गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायझेशन) च्या माध्यमातून आपल्या व्यक्तीमत्वाचा  विकास करावा. आणि वैद्यकीय सेवेची तयारी करावी. कारण या दोन्ही गोष्टी एकमेकांना पुरक आहेत. हा माझा अनुभव आहे. विद्यार्थ्यांना करिअरबद्दल माहिती घेण्यासाठी डॉ. मिर्झा  तंजिल बेग (मो.9665000797) या नंबरवर संपर्क करू शकता. 3 मार्च रोजी जमाअते इस्लामी हिंद लातूरचे शहराध्यक्ष अबरार मोहसीन यांनी एमबीबीएस पूर्ण झाल्याबद्दल डॉ.मिर्झा तंजिल बेग यांचा पुष्पगुच्छ देऊन साप्ताहिक इज्तेमामध्ये सत्कार केला. यावेळी जमाअतच्या सर्व सदस्यांनी डॉ.बेग यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget