Halloween Costume ideas 2015

अन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(४३) ...तुम्हापैकी एखादा शौचास जाऊन आला असेल अथवा तुम्ही स्त्रियांना स्पर्श केला असेल,६९ आणि मग पाणी उपलब्ध झाले नाही तर स्वच्छ मातीचा उपयोग करा आणि ती  आपल्या चेहऱ्या व हातावर फिरवा७० नि:संदेह अल्लाह मृदू व्यवहार करणारा व क्षमा करणारा आहे.
(४४) तुम्ही त्या लोकांनासुद्धा पाहिले आहे काय ज्यांना ग्रंथाच्या ज्ञानाचा काही भाग दिला गेला आहे?७१ ते स्वत: मार्गभ्रष्टतेचे ग्राहक बनले आहेत आणि ते इच्छितात की तुम्हीसुद्धा  मार्गभ्रष्ट व्हावे.
(४५) अल्लाह तुमच्या शत्रूंना चांगल्या प्रकारे जाणतो आणि तुमच्या पुष्टी व सहाय्याकरिता अल्लाहच पुरेसा आहे.
(४६) जे लोक यहुदी बनले आहेत७२ त्यांच्यात काही लोक आहेत जे शब्दांना त्यांच्या जागेपासून फिरवितात७३ आणि सत्य धर्मीविरुध्दडंक मारण्यासाठी आपल्या जिव्हांना तोडून मोडून  म्हणतात.




६९) मूळ अरबी वाक्य ``औलामस्तुमुन्निसाअ'' उपयोगात आला आहे. ज्याचा अनुवाद ``स्त्रियांना हात लावणे'' असा होतो. याविषयी मतभेद आहेत की `लम्स' अर्थात हात लावणे म्हणजे  काय? माननीय अली (रजि.) इब्ने अब्बास (रजि.) अबू मूसा अशअरी (रजि.) उबई बिन काब (रजि.) सईद बिन जुबेर (रजि.) हसन बसरी (रह.) आणि अनेक इमामांचे मत आहे की  याने अभिप्रेत संभोग (Sexual intercourse) आहे. आणि याच मताला इमाम अबू हनीफा (रह.) आणि त्यांचे साथी आणि इमाम सुफियान सुरी (रह.) यांनी स्वीकारले आहे. याच्या विपरीत  माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद आणि अब्दुल्लाह बिन उमर (रजि.) यांचे मत आहे आणि काही हदीसकथनाद्वारे ज्ञात होते की माननीय उमर बिन खक्ताब (रजि.) यांचेसुद्धा हेच मत  होते की याने अभिप्रेत स्पर्श करणे किंवा हात लावणे आहे आणि हेच मत इमाम शाफईचे होते. काही इमामांनी मधला मार्गसुद्धा अवलंबला आहे. जसे इमाम मलिक
(रह.) यांचे मत आहे की जर स्त्री आणि पुरुष एक दुसऱ्यांना कामवासनेने हात लावल्यास त्यांचे वुजू तुटेल आणि नमाजसाठी त्याना नवीन वुजू करावा लागेल. परंतु कामवासनेच्या  शिवाय एक दुसऱ्याला स्पर्श झाला तर त्यात काही दोष नाही.
७०) या आदेशाचे विस्तृत रूप हे आहे की जर मनुष्य बेवुजू आहे (वुजू न केलेला) किंवा त्याला स्नान करण्याची गरज आहे आणि पाणी उपलब्ध नाही तर तयमुम करून नमाज अदा  करू शकतो. जर आजारी आहे आणि वुजू किंवा स्नान केल्याने आजार वाढण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत पाणी उपलब्ध असतानासुद्धा तयम्मुमपासून अशा व्यक्तीने फायदा  उठवावा. तयम्मुमचा अर्थ इरादा करणे आहे. अर्थ आहे की जेव्हा पाणी उपल्बध नसेल किंवा पानी उपलब्ध आहे परंतु त्याचे वापर संभव नाही तर पवित्र माती (पवित्रता प्राप्त्  करण्यासाठी) उपयोगात आणावी. हा तयम्मुमच्या प्रकाराविषयी फिकाहशास्त्रींमध्ये मतभेद आहेत. एका गटाच्या मते तयम्मुमची पद्धत एकदा मातीवर हात मारून तोंडावर फिरवावा.  नंतर दुसऱ्यांदा हाथ मातीवर मारून हातांच्या कोहणीपर्यंत फिरवावा. इमाम अबू हनीफा, इमाम शाफई, इमाम मालिक आणि इतर अधिकतर विद्वानांचे हेच मत आहे. सहाबा आणि  ताबईनमध्ये माननीय अली (रजि.) उब्दुल्लाह बिन उमर (रजि.) हसन बसरी, शाबी आणि सालिम बिन अब्दुल्लाह (रह.) या मताचे होते. दुसऱ्या गटाजवळ फक्त एकदाच हात फिरवणे  योग्य आहे. तेच तोंडावर आणि हातावर मनगटापर्यंत फिरवावे, कोहणीपर्यंत हात फिरविण्याची आवश्यकता नाही हे अता, मअकूल, अजाई आणि अहमद बीन हंबल (रह.) यांचे मत  आहे आणि अहले हदीस लोक याचेच पालन करतात. तयम्मुमसाठी आवश्यक नाही की जमिनीवरच हात आपटला जावा. ही अट पूर्ण होण्यासाठी प्रत्येक धुळीने माखलेली वस्तू आणि  ती वस्तू जी जमिनीच्या धुलीकरणाने आच्छादित आहे; तयम्मुमसाठी योग्य आहे. काही लोकांचा आक्षेप आहे की अशाप्रकारे मातीवर हात मारून तोंडावर व हातावर फिरविल्याने  पवित्रता कशी प्राप्त् होणार? परंतु वास्तवतेत मनुष्याच्या मनात पवित्रतेची जाणीव आणि नमाजचा सन्मान कायम ठेवण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण मनोवैज्ञानिक उपाय आहे. याचा लाभ हाच आहे की मनुष्य किती जरी मुदतीपर्यंत पाणी वापरात घेऊ शकत नसेल तरी त्याच्या अंतर्मनात पवित्रतेची भावना (पाकी) शिल्लक राहील. पाकीचे (पवित्रतेचे) जे नियम  शरीयतने घालून दिले आहेत त्यांची अंमलबजावणी असा मनुष्य सतत करीत राहील आणि त्याच्या मनातून नमाजसाठी योग्य असल्याची स्थिती आणि नमाजसाठी अयोग्य स्थितीतील  अंतर कधीच लुप्त् होऊ शकत नाही.
७१) ग्रंथधारक विद्वानांविषयी कुरआन स्पष्टोक्ती आहे, ``यांना ग्रंथाच्या ज्ञानाचा काही भाग देण्यात आला आहे.'' याचे कारण त्यांनी अल्लाहच्या ग्रंथाचा एक भाग हरवून/विसरून  टाकला होता आणि आता जे काही अल्लाहच्या ग्रंथातून त्यांच्याजवळ उपलब्ध होते तर त्याच्या आत्मा आणि उद्देशापासून ते अनभिज्ञ झाले होते. ग्रंथधारकांची (यहुदी, खिश्चन) आवड  केवळ शाब्दिक तर्क वितर्क आणि आदेशांच्या लहान सहान गोष्टी तसेच श्रद्धाशीलतेच्या तात्त्विक रहस्यातच अडकून होती. याचमुळे हे लोक जीवनधर्माच्या वास्तविकतेला न जाणणारे  आणि ईशप्रदत्त जीवनधर्म प्रणालीपासून कोरे होते जरी त्यांना धर्माचे आणि लोकसमुदायाचे नेता म्हणून ओळखले जात होते.
७२) असे सांगितले गेले नाही की `यहुदी आहेत' तर उल्लेख केला, `यहुदी बनले आहेत' कारण प्रारंभी तेसुद्धा मुस्लिम (आज्ञाकारी) होते ज्याप्रकारे प्रत्येक पैगंबराचे अनुयायी  वास्तविकपणे मुस्लिम (आज्ञाकारी) असतात. नंतर मात्र ते फक्त यहुदी बनून राहिले.
७३) याचे तीन अर्थ आहेत -
(१) अर्थ अल्लाहच्या ग्रंथाच्या शब्दांत परिवर्तन करतात.
(२) अर्थ आपल्या मनाप्रमाणे व्याख्या
करतात आणि ग्रंथाच्या आयतींच्या अर्थाचा अनर्थ करतात.
(३) अर्थ म्हणजे हे लोक पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांचे अनुयायींच्या
संगतीला राहून त्यांचे ऐकतात आणि लोकांमध्ये परत जाऊन वेगळे काही तरी सांगतात. सांगितले जाते एक परंतु आपल्या दुष्टव्यामुळे
वेगळे काहीचे काही सांगून लोकांत प्रचार करतात जेणेकरून यांच्याविषयी लोकांच्या मनात भ्रम निर्माण करून इस्लामी जमातकडे
लोकांना येण्यापासूनच रोखून धरावे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget