Halloween Costume ideas 2015

दहशतवादावर कारुण्याची मात

न्यूझीलंड येथील दोन मस्जिदींमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये ५०हून अधिक लोक ठार झाले तर अनेक जखमी झाले. ठार झालेल्यांमध्ये किमान ९-१० भारतीयांचादेखील समावेश  आहे. हा हल्ला विशिष्ट समाजाच्या लोकांवर झालेला असल्याकारणाने जगभरातील जगभरातील इस्लामोफोबियाने ग्रासलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पसह जगभरातील  जातियवादी, वर्णवादी, राष्ट्रवादी नेते आणि कार्पोरेट मीडियाला यास दहशतवादी कृत्य म्हणण्यास लाज वाटली. कारण आजपर्यंत त्याच समाजाचे नाव घेऊन त्यास दहशतवादात  गुरफटून टाकल्यामुळे आता या क्रूर कृत्याला दहशतवाद म्हणणे त्यांना चुकीचे वाटले होते. आपल्या चौकीदारांनी तर त्यावर प्रतिक्रियाच देण्याचे टाळले. विशेषत: काही पाश्चिमात्य  वृत्तसंस्था आणि संकेतस्थळे या हल्ल्याचे वर्णन अगदी अलीकडेपर्यंत गोऱ्या माथेफिरूने वर्चस्ववादी भावनेतून केलेला हल्ला (व्हाइट सुप्रीमसिस्ट अ‍ॅटॅक) असेच करत राहिल्या. मात्र  स्वत: न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी तो दहशतवादी हल्लाच होता असे खडसावून सांगताच पाश्चिमात्यधार्जिण्या कार्पोरेट मीडियाचे डोळे खाडकन उघडले आणि या कृत्यास  तेदेखील दहशतवादी कृत्यच म्हणू लागले. न्यूझीलंडमधील एका स्थानिक युवकानेच त्वेषाच्या तीव्र भावनेने विशिष्ठ देशवासियांना टारगेट करून हे दहशतवादी कृत्य केले.  न्यूझीलंडमधील या दहशतवाद्याने भारतीय, तुर्की आणि चीनी नागरिकांना लक्ष्य करुनच हे अमानवी कृत्य केले. त्याने प्रसिद्ध केलेल्या ७२ पानी ‘द ग्रेट रिप्लेसमेन्ट’ नावाच्या  जाहीरनाम्यात भारत, चीन आणि तुर्कीचा उल्लेख केला असून त्याने भारतीयांना आक्रमणकारी ठरवले आहे. या ‘जाहीरनाम्या’त पोलंड, ऑस्ट्रिया, फ्रान्स, अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, कॅनडा  आणि अगदी व्हेनेझुएलातील त्याच्यासारख्या माथेफिरूंकडून पाठिंबा मागतो तेव्हा हा वांशिक राष्ट्रवाद किती धोकादायक पद्धतीने पसरू लागला आहे याची प्रचिती येते. या भूमिकेतून  अनेक भारतीयांना आतापर्यंत जीवही गमवावा लागला आहे. अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणीही भारतीयांना वर्णद्वेशी शेरेबाजी आणि हिंसेलाही सामोरे जावे  लागते. प्रार्थनास्थळी किंवा कोठेही निशस्त्र, निष्पाप सामान्यांवर झालेले असे हल्ले दहशतवादीच असतात. ते विशिष्ट धर्मीयांनी घडवून आणल्यावरच दहशतवादी ठरवायचे, ही गोऱ्या  देशांची सवय प्रथम न्यूझीलंडने मोडून काढली हे योग्यच झाले. याचा धडा आपल्याकडील राजकारणी आणि गोदी मीडिया कधी घेईल तेव्हाच शुभदिन. ख्राइस्टचर्च घटनेतला मारेकरी  ब्रेंटन टॅरेंट हा मूळचा ऑस्ट्रेलियन आणि गोरा. त्याच्या गोळ्यांना बळी पडलेले बहुसंख्य स्थलांतरित होते. ‘आमच्या आदर्शातला न्यूझीलंड असा नाही,’ असे त्या देशाच्या पंतप्रधान  जेसिंडा आर्डेर्न यांनी शुक्रवारी रात्रीच जाहीर केले, हे बरे झाले. युरोपातील काही सरकारे आणि विद्यमान अमेरिकी सरकार स्थलांतरित नागरिकांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेऊ  लागले आहेत. मूलत: बेकायदा निर्वासितांबाबत सुरू झालेली चर्चा अखेरीस कायदेशीर स्थलांतरितांपर्यंत पोहोचतेच. अनेकदा निवडणुकीनिमित्त विशेषत भावनिक जनाधारावरच जन्माला  येणारे आणि तगून राहणारे नेते स्थलांतरितांच्या मुद्द्याचे हुकमी अस्त्र बाहेर काढतातच. त्यातून जो विखार निर्माण होतो आणि समाजमनात झिरपतो त्याचे उत्तरदायित्व घेण्यास असे  नेते कधीही तयार नसतात. एका अर्थाने या दहशतवादाच्या मुळाशी वांशिक राष्ट्रवाद आहे. वांशिक राष्ट्रवाद हा आता चांगलाच फोफावू लागला आहे. टॅरेंटच्या काही ‘आदर्शां’पैकी एक  लुका ट्रेनी याने इटलीत सहा स्थलांतरितांना जखमी केले. दुसरा डिलन रूफ ज्याने अमेरिकेत चर्चमध्ये नऊ आफ्रिकनांना ठार केले. आणखी एक डॅरेन ओसबोर्न, ज्याने लंडनमध्ये  मुस्लिम स्थलांतरितांवर व्हॅन चालवली. टॅरेंटने ‘स्फूर्ती’ घेतली तो अँडर्स बेरिंग ब्रायविक हा नॉर्वेजियन माथेफिरू, ज्याने ७७ युवकांचे बळी घेतले होते! खाईस्टचर्च येथील दहशतवादी  हल्ल्यानंतर जगभरातून दुःख व्यक्त होत आहे. पण या घटनेनंतर एक छायाचित्र नकारात्मक वातावरणात आशेचा किरण जागृक करत आहे. हे छायाचित्र आहे न्यूझीलंडच्या पंतप्रधान  जेसिंडा आर्डन यांचे. देशात मुस्लिम आणि निर्वासित यांच्याबद्दल तयार होत असलेल्या तिरस्काराच्या वातावरणात आर्डन या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातलगांना  भेटून जगासाठी मानवतेचा संदेश दिला आहे. या मुस्लिम कुटुंबीयांना भेटताना त्यांनी हिजाब परिधान केला होता. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांची गळाभेट घेतली. त्यावेळी आर्डन यांच्या  चेहऱ्यावर दुःख आणि त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळत होते. पीडित कुटुबीयांना भेटल्यानंतर त्या म्हणाल्या, ‘आपण विविधता, करुणा आणि दयेचे प्रतिनिधित्व करतो. जे लोक ही मूल्ये  मानतात त्या सर्वांचा हा देश आहे. ज्या निर्वासितांना गरज आहे, त्यांचाही हा देश आहे.' दहशतीच्या या काळात राजकारणातील मानवी चेहरा म्हणजे दहशतीचे राजकारण करणाऱ्या क्रूरकर्म्या वृत्तीच्या राजकारण्यांना बसलेली जबरदस्त चपराकच आहे. ‘उपाशी मुले आणि या मुलांचे अनवाणी पाय पाहिले आणि मला राजकारणात येण्याची गरज भासू लागली,' असे  त्यांनी राजकारणात येण्यापूर्वी म्हटले होते. उजव्या विचारांच्या राजकारण्यांनी जेसिंडा यांच्याकडून कारुण्य आणि प्रेम यांचे धडे जरूर घ्यावेत.

-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget