Halloween Costume ideas 2015

टिपू सुलतानच्या पाचशे पत्रांचे मराठीत भाषांतर

मुंबई (शाहजहान मगदुम) –
हैदर अली आणि टिपू सुलतान या पितापुत्रांनी अठराव्या शतकाच्या मध्यात इंग्रजांना चांगलेच आव्हान दिले होते. त्यांच्या पाडावानंतर इंग्रजी सत्ता भारतात स्थिर व्हायला सुरुवात  झाली. म्हणून त्यांच्या इतिहासास जगाच्या पाठीवरील वसाहतवादाविरोधातील संघर्षाच्या इतिहासात मोठे स्थान आहे. सोलापुरातील गाजीउद्दीन रिसर्च सेंटर या संस्थेच्या सरफराज  अहमद आणि सय्यद शाह वाएज यांनी टिपू सुलतानच्या इतिहासाचा अभ्यास करून तब्बल  पाचशे पत्रांचे मराठीत भाषांतर केले आहे.
इसवी सन १७९९ मध्ये चौथ्या म्हैसूर युध्दात टिपू सुलतानचा पाडाव झाला. त्यानंतर टिपू सुलतानच्या कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी कर्नल वेलज्ली याने त्याचा सहकारी विल्यम  किर्क पेट्रीकच्या अध्यक्षतेखाली एका समितीचे गठन केले. त्या समितीने टिपू सुलतानच्या अनेक कागदपत्रांचे संकलन केले. त्यात त्यांना टिपू सुलतानची हजारो पत्रे सापडली. ती कालांतराने इंग्रजांनी इंग्लंडला स्थलांतरीत केली. तेथून सन १८११ मध्ये ती पत्रे विल्यम किर्क पेट्रीक याने प्रकाशित केली. त्याच्या संग्रहात ४३० पत्रे आहेत. इतिहाससंशोधक मोहीब्बुल  हसन यांनी ‘वाकीआ नामा’ नावाने टिपू सुलतानच्या राजदूतांच्या कंस्तुन्तुनियाच्या प्रवासवर्णनाचे १९९० च्या दशकात इंग्रजीत भाषांतर केले. हुसेन अहमद किरमानीच्या ग्रंथाचेदेखील  इंग्रजी भाषांतर करण्यात आले आहे. मात्र पत्रव्यवहाराविषयी मागील सत्तर वर्षांत भारतात संशोधन होऊ शकले नाही.
सोलापूरातील गाजीउद्दीन रिसर्च सेंटर ही संस्था मध्ययुगीन इतिहासाच्या संशोधनासाठी कार्यरत आहे. त्यातील सरफराज अहमद व सय्यद शाह वाएज यांनी टिपू सुलतानच्या साडेपाचशे  कागदपत्रांचे मराठीत भाषांतर केले आहे. त्यामध्ये ४५५ पत्रे, १० हुकुमनामे, तीन परिपत्रक आणि टिपू सुलतान लिखित ‘फतुहात ए मुजाहीदीन’ या ग्रंथातील पाचव्या प्रकरणातील लष्करी  आचारसंहिता यांचे मराठीत भाषांतर केले आहे. त्यामध्ये मोडी लिपीतील एक मराठी हुकुमनामादेखील समाविष्ट आहे. हैदराबादच्या निजामाच्या ग्रंथालयात हा मोडी हुकुमनामा ठेवला होता. तो या दोन्ही संशोधकांनी मिळून त्याचे मराठीत लिप्यांतर केले आहे. तर अलिगड विद्यापीठाच्या ग्रंथालयात टिपू सुलतानच्या राजदूतांचा हुकुमनामा व व्यापारी कंपनीचा हुकुमनामा होता. त्याचेदेखील मराठी भाषांतर करण्यात आले आहे.
या पत्रसंग्रहात टिपू सुलतानचे शैक्षणिक, सामाजिक, व्यापारी, आर्थिक धोरण आणि साहित्यिक योगदानाविषयीची पत्रे आहेत. हुकुमनाम्यात सक्तीचे शिक्षण, जनगणना, शेतकऱ्यांना  अर्थसाहाय्य, परराष्ट्र धोरण, बँकांविषयी माहिती दिली आहे. किर्क पेट्रीक याने संग्रहित केलेली फक्त १७८५ पर्यंतची कागदपत्रे आहेत. तर सरफराज अहमद व सय्यद शाह वाएज यांनी  भाषांतरित केलेल्या संग्रहात १७९९ पर्यंतची निवडक कागदपत्रे आहेत.

मूळ साधनांच्या भाषांतरासाठी सेंटरची महत्वकांक्षी योजना
गाजीउद्दीन रिसर्च सेंटरने मध्ययुगीन इतिहासाच्या संदर्भात प्रचंड ग्रंथसाठा जमवला आहे. त्यामध्ये अनेक हस्तलिखित प्रतींचा समावेश आहे. ही कागदपत्रे मराठी भाषेत आणण्याचा आमचा मानस आहे. याच योजने अंतर्गत आम्ही ‘इब्ने खल्दुन’ मुकद्दीमा मराठीत भाषांतरित केला आहे. इसवी सन ११ व्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंतच्या कागदपत्रांच्या  भाषांतरासाठी भाषांतर केंद्राची स्थापना केली आहे, असे गाजीउद्दीन रिसर्च सेंटरचे सचिव अ‍ॅड. महिबुब कोथिंबीरे यांनी म्हटले आहे.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget