नवी दिल्ली
जमाते इस्लामीचे हिंदचे अध्यक्ष मौलाना सय्यद जलालुद्दीन उमरी यांनी पुलवामा येथे सीआरपीएफच्या काफिल्यावर नुकत्याच झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. जमाते इस्लामी हिंदच्या मीडिया विभागाने जारी केलेल्या पत्रकात मौलाना म्हणतात की, ”असे हल्ले काही लोकांच्या मृत्यूला आणि राष्ट्रीय नुकसानाला कारणीभूत ठरतील मात्र त्यामुळे कुठलाही प्रश्न निकाली निघणार नाही. हा हल्ला अतिशय वेदनादायक असून, 44 जवानांच्या हौतात्म्याला विसरता येणार नाही. या घटनेमुळे व्यथित होऊन सामाजिक सौहार्द बिघडविण्यापेक्षा शांती आणि सुरक्षा कशी पुनर्स्थापित करता येईल त्यासाठी बोलणी करणे हाच एकमेव मार्ग आहे. या मार्गानेच काश्मीरी जनतेच्या दुःखांचा शेवट होईल आणि याच मार्गाने काश्मीर घाटीमध्ये शांतता आणि स्थैर्य येऊ शकेल. मी केंद्र सरकारने या घटनेच्या कारणांसंदर्भात जी चौकशी सुरू केलेली आहे, त्याचे स्वागत करतो. सरकारच्या या प्रयत्नामुळे या घटनेमागील सत्य उघडकीस येईल आणि आपण या घटनेमागील खरा उद्देश शोधू शकू. चौकशीअंती हे लक्षात येईल की, काश्मीरमधील वातावरण बिघडविण्यासाठी तर ही घटना घडविण्यात आली नाही का? किंवा भारत- पाकिस्तानातील संबंध खराब करण्यासाठी तर ही घटना घडवून आणली नाही ना? किंवा हे एक असे मोठे षडयंत्र तर नाही ज्यामुळे देशातील शांतता आणि सहअस्तित्वाला निवडणुकांपूर्वी नुकसान पोहोचावे. मी अगदी व्यथित मनाने आपल्या संवेदना शहीद जवानांप्रती व्यक्त करतो आणि जखमी जवानांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो.”
Post a Comment