पैठण येथील नियोजित संतपीठासाठी विद्यापीठ अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे.येत्या जूनपासून विद्यापीठातर्फे प्रत्यक्ष अभ्यासक्रम सुरू होणार आहे.या अनुषंगाने सदर लेख...
मराठी संस्कृतीच्या रथाचा आस म्हणजे संत साहित्य होय. या साहित्याने आजवर आपल्या ‘मNहाठी’ संस्कृतीला दिलं काय, याचा ताळेबंद शोधत असताना त्यानं केलेल्या प्रबोधनाचा आणि जागरणाचा ठसा आपल्या मानपटलावर पहिल्यांदा उमटतो. जीवनाचा खरा अर्थ काय असावा, त्यात कोणती अंत:सूत्रं दडली असावीत, त्याचे नेमके उद्दिष्ट तरी काय असावं, त्यात कोणती या संदर्भात अंतर्मूख होऊन, विचार करण्यास भाग पडते, त्यातल्या सुखाचा आणि दुख:चा अन्वयार्थ कोणता, हे जीवन कशासाठी आणि कसं जगावं? या संदर्भात आपल्या आणभावाचे अमृत जगाला देताना संतांनी समाजात प्रबोधनाचे महान कार्य केले. प्रत्येक संतांनी आपल्या शिकवणीतून मानवतेच्या कल्याणसाठी पराकष्ट घेतलेले आहे. एकमेकांचा आदर आणि सन्मान करणे हा संत साहित्याचा गाभा आहे. मानवतेची प्रतिष्ठा जोपर्यंत आहे तो पर्यंत संत साहित्याचा रथ वेगाने धावत राहील. शांतीच्या प्राप्तीसाठी आत्मसमर्पण करणे संतांना अभिप्रेत आहे. संत समस्त मानवजातीत शांतता प्रस्थापित करण्याचे कार्य करतात. शांतता घरात वा बाहेर नसते. ती मनात असायला हवी.
प्रत्येक संतांनी मानवतेच्या मनावर मशागत केली. तेव्हा तेथे शांतीचे गोमटे फळाची प्राप्ती झाली. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘आनंदाचे ढोही आनंद तरंग’ आनंदावर आनंदाचा तरंग म्हणजे आनंदाच्या दुधावर आनंदाची सायच आहे. ती साय संतपीठाच्या चुलीवर काढायला हवी. ती कशी येईल? तर दु:खे जाळून आनंद उकळावा लागेल, संतपीठाच्या कारखान्यात समाजात वाढत जाणारी असहिष्णुता, दांभिकता, कट्टरता,स्वार्थीपणा, जातिवाद, प्रांतवाद यांना ताव दिल्यानंतर सहिष्णुता निर्माण होईल व हरवलेला तो जगण्याचा आनंद अनुभवता येईल. विषमता, विसंवाद, उदात्त मानवी मूल्यांची घसरण कुटुंबापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंसा या जगासमोरील मुख्य समस्या आहे. जगासाठी एखादी गोष्ट निरपेक्षपणे करणे हाही मोठा त्यागच आहे. निसर्गातील प्रत्येक घटक त्यागाच्या भूमिकेतून उभा आहे, परंतु ज्या मानवाला ईश्वराने बुद्धी दिली त्या बुद्धीचा वापर तो त्यागासाठी नव्हे तर स्वार्थासाठी करतो. कर्मफलाची लालसा नसलेला हा संत त्यागी पुरषाचेच महान प्रतीक आहे. त्याग ही ईश्वराने मानवाला दिलेली एक अद्वितीय देणगी आहे. या कसोटीवर जो खरा उतरतो तो संत! ‘ज्या अंगी मोठेपण त्यास यातना कठीण’ हे यासाठीच की त्यागात समर्पणाची भूमिका आहे आणि कृतार्थतेचा आनंद आहे. परंतु हा कृतार्थतेचा आनंद प्राप्त करण्यासाठी कर्मफलाचा त्याग करावा लागतो. तेव्हा कुठे संतत्व प्राप्त होते.
संतपीठाच्या निर्मितीचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्राच्या संतांनी केलेल्या कमगिरीची ओळख होणे महत्त्वाचे आहे. त्यात संत नामदेव, संत ज्ञांनेश्वर, संत बहिणाबाई व संत तुकाराम, शेख महंमद, शहामुनी यांच्या व्यतिरिक्त अठरापगड जातीच्या संतांनी मराठी साहित्य समृद्ध केलेले आहे. या संताच्या साहित्याचा मूलगामी शोध संतपीठाच्या माध्यमातून होईल व राष्ट्रीय व सामाजिक एकात्मता जोपासणारा संदेश जाईल.
संत साहित्य हे मानसिक स्वास्थ देणारे साहित्य आहे. आज प्रत्येक माणूस मानसिकदृष्ट्या कमकुवत होत चाललेला आहे. भौतिक सुखाच्या हव्यासामुळे मानसिकदृष्ट्या कमकुवत होत आहे. मानवाच्या मनावर संस्कार खऱ्या अर्थाने संत साहित्यामुळे होतात. संस्काराक्षम माणूस घडविण्याचे कार्य हे संतांनी केलेले आहे. त्यामुळे संताचे साहित्य वाचतांना डोवंâ आणि शरीर यांच्यात मेळ घालणे महत्त्वाचे आहे. संत साहित्य वाचतांना डोवंâ हे धडावर ठेवावं लागते तरच संत साहित्य खऱ्या अर्थाने कळते. नैतिक पराभवापासून समाजाला जर मुक्त करायचे असेल तर संत साहित्याची कास धरणे आवश्यक आहे. जागतिकीकरणाच्या युगात आपण प्रगती केली, माणूस हा बोटाच्या अंगठ्याजवळ आला परंतु हृदयात त्याला आपण समजावून घेतलेले नाही. हृदयात जर त्यांना आपण जागा दिली असती तर आज मोठ्या प्रमाणात होणाऱ्या. आत्महत्या, स्त्रीभ्रूण हत्या, बलात्कार, जातिभेदांची दुकाने बंद करण्यात आपण अयशस्वी होत आहोत. मानवी जीवन किती मौल्यवान आहे हे संतांनी वेळोवेळी आपल्या शिकवणीतून सांगितले आहे. खऱ्या अर्थाने जीवनाचं महत्त्व संत साहित्य सांगते तेच कार्य संतपीठाच्या माध्यमातून घडेल.
वृत्तपत्र वाचतांना अंगाला शाहारे आले ती बातमी अशी होती की, सख्या मुलाने आईला टेरिसवरून फेकून दिले तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझे डोळे पाणावले येथे एका आईचा पराभव झाला. कारण जगात येण्यापूर्वी हा मुलगा त्या आईच्या पोटात नऊ महिने पोटात होता हे तो विसरला. भूतकाळच्या खांद्यावरून आपण वर्तमान पाहाणे विसरलो आहे. जो भूतकाळ विसरतो त्याचे भविष्य धोक्यात आहे. या धोक्यातून समाजाला जर वर काढायचे असेल तर आज जगाला संत साहित्याची गरज आहे. जागतिकीकरणात प्रत्येक माणूस या कृत्रिम साधनांवर मेहनत करत आहे; परंतु सर्व समाजातील संतांनी साधनांवर मेहनत न करता मानवी मनावर मेहनत केलेली आपणास दिसून येते. आज पुन्हा तसेच उदयास येईल, या मेहनतेची आवश्यकता आहे. त्यासाठी संतपीठाची निर्मिती व्हावी व मूलगामी संशोधन होऊन समाजाला एक जीवन जगण्याचा मूलमंत्र मिळेल अशी शास्वतता येईल.
भारतात सामाजिक सलोखा, समता आणि एकात्मता आबाधित राहाण्यास संतांचे कार्य अप्रतिम आहे. संपूर्ण विश्वाला जोडणाऱ्या साहित्यात संत साहित्याचे महत्त्व आपल्या लक्षात आणून देण्याचे कौतुकास्पद काम संतपीठाच्या माध्यमातून होईल.
संत साहित्य हा मराठी वाङ्मयाची विलक्षण गवसणी पडली आहे. महाराष्ट्राच्या घराघरांतून, झोपड्याझोपड्यांतून, वस्त्यावस्त्यांतून, रानावणातून या संतसाहित्याचे विणाझंकार निनादत आहेत.
विविध धर्मांच्या व धर्मपंथांच्या संतकवींनी आपल्या लेखनाने मध्ययुगीन मराठी साहित्य समृद्ध केले आहे. बऱ्याच वेळा विशिष्ट संप्रदायाचे साहित्य म्हणजेच मध्ययुगीन मराठी साहित्य असे समीकरण करून वाङ्मयेतिहासाचे लेखन केले जाते, संसोधन केले जाते. वस्तुत: या धर्मसंप्रदायांच्या साहित्याबरोबर अन्य धर्माच्या व धर्मसंप्रदायांच्या संतकवींनी केलेल्या साहित्यनिर्मितीचा विचार केल्याविना मध्ययुगीन एक सेतु होते आणि समाजातील निम्नस्तरावर झालेला संमिश्र संस्कृतीचा उदय भारतातील सूफी विचारधारेच्या रूपाने झालेला दिसतो. चिश्ति परंपरेतील सूफी वहद्तुल वुजूद (अस्तित्वाची एकात्मता) आणि सुलह-कल (सार्वत्रिक शांतता) या दोन सिद्धान्तांवर श्रद्धा असणारे होते. हे दोन्ही सिद्धान्त हिंदू व मुस्लिम समुदायामध्ये सेतु बांधण्यास उपयुक्त ठरणारे होते. मानवी अस्तित्वाच्या एकात्मतेच्या पहिल्या सिद्धान्ताने हिंदू–मुस्लिमांमधील भिंत उद्ध्वस्त केली आणि आपण सगळे एक आहोत आणि आपण सर्व जण खऱ्या मानवाचा एक अंश आहोत. एक आविष्कार आहोत ही जाणीव निर्माण केली. ‘सुलह-कुल’ (सार्वत्रिक शांतता) या सिद्धान्ताने दोन समुदायांमध्ये मित्रत्वाचं नातं निर्माण केलं. सूफी संतांनी भारतातील प्रत्येक धर्माचे आदर केला आहे. कोणताही संत कोणत्याही धर्माचा अनादर करत नाही हे संतांचे विशेष असते. त्यामुळे हिंदू-मुस्लिम गुरु-शिष्य परंपरादेखील आपल्याला संतामध्ये दिसून येते.
जगासाठी एखादी गोष्ट निरपेक्षपणे करणे हाही मोठा त्यागच आहे. त्यागाच्या भूमिकेतून उभे राहण्याची शिकवण संतांनी सबंध समाजाला दिली. आजवरच्या शतकामध्ये संतसाहित्याने समाजाला जे मार्गदर्शन केले आणि जनमानसावर जे संस्कार केले त्यामुळे त्या त्या काळातील काही समस्यांना सामोरं जाण्याची मानसिकता या साहित्यानं निश्चितपणे निर्माण केली. चातुर्वण्र्य व्यवस्थेमुळे निर्माण झालेला विषमतामूलक जानिवेला व विचाराला विरोध करायला महानुभाव संप्रदायासारख्या संप्रदायांनी शिकवले. वीरशैव संतांनी समाजाचं उत्तरदायित्व पार पाडणारे कोणतेही कर्म अपवित्र नसते. त्यामुळे ते कर्म करणारा तो वर्गही अपवित्र नसतो हा विचार समजामानवावर ठसविला. ज्ञानदेव, नामदेव, तुकोबा, शेख महंमद, शहा मुंतोजी, शहामुनी इत्यादी संतांनी अद्वैत तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून एकात्मतेचा पुरस्कार केला. जैन संतांनी अहिंसा, सहिष्णुता, स्त्री-पुरुष समानता याचं महत्त्व प्रतिपादिले. सूफी संतांनी धार्मिक सामंजस्य आणि एकात्मतेची शिकवण दिली. शेख महंमद, शहा मुंतोजी बामणी, शहामुनी आदि मुस्लिम आणि सूफी संतांच्या काही शाखा यांचा संबंध इथं लक्षात घ्यायला हवा. नागेश संप्रदायनं जातीभेदमधील समन्वयात्मक दृष्टिकोन केवळ प्रतिपदिलाच नाही तर प्रत्यक्ष आचरणात आणला. समर्थ संप्रदायाने प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घातली. नाथ संप्रदायने योगतील चित्तवृत्तींनिरोधच्या सूत्राचा पुरस्कार करून मन:शांतीचा मार्ग दाखविला आहे.
संत साहित्याचा अभ्यास केल्यानंतर प्रत्येक संताचे माणसाशी असलेले नाते जवळचे होते. संताच्या सहवासाने नास्तिक हा आस्तिक होतो. ‘जाऊ देवाचिया गावा देव देईल विसावा’ या ओळीतील शांतरस मनात पोहचू लागला की एक आल्हाददायक आनंद प्राप्त होतो. म्हणूनच विसावा हा शब्द शांतीचे प्रतीक आहे. हा विसावा गुगलवर मिळणार नाही अथवा फेसबूकवर मिळणार नाही. तर हा विसावा संताचे कार्य अभ्यासल्यानंतर त्यापेक्षा पुढे आचारणनन्तर प्राप्त होऊ शकतो. त्यामुळे हा विसावा निर्माण करणारे संतपीठ विश्वशांतीची प्रयोगशाळा आहे असे म्हणणे उचित ठरेल.
- प्रा. आरिफ ताजुद्दीन शेख
Post a Comment