Halloween Costume ideas 2015

मराठी भाषेत इस्लामी साहित्याच्या निर्मितीमध्ये जमाअत-ए-इस्लामीची मोठी भूमिका- तौफीक अस्लम खान

औरंगाबाद (सलीम खान यांजकडून)
मराठी भाषेत इस्लामी साहित्यनिर्मितीच्या कार्यात जमाअत-ए-इस्लामी हिंदने मोलाची भूमिका पार पाडली आहे, असे प्रतिपादन जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष तौफीक अस्लम खान यांनी केले. येथील नेहरू भवनमध्ये रविवार, दिनांक ०३ डिसेंबर २०१७ रोजी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
   
    कार्यक्रमाच्या सुरूवातीला कुरआन पठण करीत असताना प्रा वाजिदअली खान म्हणाले की इस्लामच्या संदेशाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करूनच आपापसातील भेदभाव, दुरावा आणि आपापसातील गैरसमजुती दूर केल्या जाऊ शकतात. मुस्लिम समुदायासाठी हे कार्य काही नवीन नाही. कितीतरी प्रेषित आणि महापुरूषांनी या कार्यात स्वत:ला झोकून दिल्याची उदाहरणे आम्ही पाहू शकतो.
सदर मोहिमेचा अर्थ आणि पाश्र्वभूमी समजावून सांगताना जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र सल्लागार समितीचे सदस्य इलियास खान फलाही म्हणाले की आज आम्ही शांती, प्रगती आणि मुक्ती या संकल्पनांचा संबंध केवळ काही मर्यादित भौतिक सुखापुरताच समजून घेतला आहे. परिणामस्वरूप एवढी भौतिक प्रगती करूनदेखील आज मानवता बेचैन आहे. कसल्याही प्रकारची जगात शांतता दिसून येत नाही. सर्वत्र अराजकता पसरलेली आहे. जोपर्यंत मनुष्याला शांती, प्रगती आणि मुक्ती या संकल्पनांची खरी ओळख होणार नाही तोपर्यंत मानवतेच्या समस्यांचे निराकरण शक्य नाही. मानवतेची ही गरज लक्षात घेऊनच जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्रच्या वतीने ‘शांती, प्रगती आणि मुक्तीसाठी इस्लाम’ ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे इलियास फलाही म्हणाले. ते पुढे म्हणाले की मुळात इस्लामचा अर्थच कल्याण, शांती, अनुकंपा आणि मुक्ती असा होतो. जे काही आदेश इस्लाम धर्माने दिले आहेत त्यात मानवाचे कल्याणच अंतर्भूत असून सर्व प्रकारच्या जोखडातून आणि कर्मकांडातून त्याला मुक्त करणे हाच इस्लामचा उद्देश आहे. खान पुढे म्हणाले की या जगातील जीवन मनूष्यासाठी परीक्षागृह आहे. या जीवनातील भल्यावाईट गोष्टींबद्दल त्याला पारलौकिक जीवनात जाब द्यावा लागणार आहे. मनुष्याची कर्मे जर उत्तम असतील तर त्याचा निर्माता ईश्वर प्रसन्न होईल आणि त्याच्या प्रसन्नतेतच खरी मुक्ती आहे. सदर मोहिमेची रूपरेषा स्पष्ट करताना दावत विभागाचे सचिव शेख इम्तियाज म्हणाले की इस्लामच्या शांततेविषयीच्या दृष्टिकोनाशी लोकांना अवगत करणे हाच या मोहिमेचा उद्देश आहे. ते म्हणाले की शांततेचा अर्थ मानसिक आणि आत्मिक शांतता आहे. ते पुढे म्हणाले की या मोहिमेअंतर्गत पत्रकार परिषदा, चर्चासत्रे, पिंरसवाद, कारागृहांमध्ये आणि वसतिगृहांमधे, शैक्षणिक संस्थांमध्ये, वस्त्यांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. तसेच मोठ्या प्रमाणावर साहित्य वितरणदेखील करण्यात येईल. सर्वच जातिधर्मातील धर्मगुरूंच्या भेटी घेऊन त्यांचेही या मोहिमेत योगदान घेतले जाईल.
    यानंतर फॉलोअप या विषयावर मार्गदर्शन करताना दावत विभागाचे सदस्य अब्दुल वाजेद कादरी म्हणाले की कुठल्याही कार्याचे यश हे त्याच्या उत्कृष्ट नियोजनावर अवलंबून असते. त्यानंतर सल्लागार समितीचे सदस्य सय्यद ज़मीर कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित चर्चासत्रात वाजेदअली खान, डॉ. इम्रान अहमद खान, सय्यद शफीक हाश्मी, अब्दुल मूजीब, प्रा. मुहंमद नवीद विजापुरी, डॉ. सय्यद साजिद, मुमताज खान, फहिमुन्निसा बाजी इत्यादींनी भाग घेतला.
    या प्रसंगी औरंगाबाद, जालना, बीड आणि अहमदनगर विभागातील मोठ्या प्रमाणावर महिला व पुरूष कार्यकर्ते, स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एस आय ओ), युथ विंग, मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस (एम पी जे) च्या युवक कार्यकर्त्यांसोबतच गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायझेशन (जी आय ओ) च्या तरूणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शेवटी तौफीक अस्लम खान यांच्या दुआ (प्रार्थने) ने कार्यक्रमाची सांगता झाली.
जमाअते इस्लामी हिंद च्या वतीने येत्या १२ ते २१ जानेवारी २०१८ दरम्यान ‘शांती, प्रगती आणि मुक्ती’साठी इस्लाम’ मोहीम राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सदर मोहिमेची रूपरेषा समजून घेण्याच्या उद्देशाने येथील नेहरू भवनमध्ये आयोजित ‘मोहीम समीक्षा शिबिरा’त अध्यक्षीय भाषण करीत असताना तौफीक अस्लम खान म्हणाले की, इस्लाम धर्माच्या शिकवणीबाबत इतर धर्मियांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरसमज शिल्लक राहू नये तसेच त्यांनादेखील इस्लाम धर्माच्या शिकवणीला जवळून जाणून घेता यावे या उद्देशाने आज मोठ्या प्रमाणावर इस्लामी साहित्याचे मराठी भाषेत भाषांतर केले गेले आहे. या कार्यामध्ये जमाअत-ए-इस्लामी हिंदने मोलाची भूमिका पार पाडली आहे. या पुढेही जमाअतच्या वतीने मुबलक साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे खान म्हणाले.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget