-बशीर शेख
मागचा आठवडा मुहम्मद
अफराजुल या मजुराच्या हत्येमुळे गाजला. वास्तविक पाहता अशा हत्या होत राहतात. यापेक्षा
जास्त भयानक पद्धतीने खासदार एहसान जाफरी यांना गुलबर्ग सोसायटीमध्ये त्यांच्या घरी
आश्रयाला आलेल्या 69 निरपराध मुस्लिमांबरोबर गुजरातमध्ये 2002 मध्ये मारण्यात आले होते.
अनेक जातीय दंगलीमध्ये यापेक्षा जास्त क्रौर्य मुस्लिम समाजाने सहन केलेले आहे. मात्र
अफराजुलच्या हत्येचे वैशिष्ट्ये हे की, आपल्या कृत्याचे शंभुनाथ रेगर नावाच्या खुन्याने
निर्भयपणे समर्थनच केले नाही तर त्याला राष्ट्रवादाचा मुलामा चढवून धीटपणे तो माध्यमांना
सामोरे गेला. त्याने हत्याकांडाचा व्हिडीओ आणि त्यानंतरच्या बॅकअप व्हिडीओमध्ये लव्ह
जिहाद या शब्दाचा वारंवार उल्लेख केल्यामुळे देशामध्ये असा गैरसमज पसरला की, अफराजुल
(वय 50) याने कुठल्यातरी हिंदू स्त्रीला आपल्या नादी लावले असावे. वास्तविक पाहता परिस्थिती
अशी नाही. अफराजुल तीन मुलींचा बाप होता. त्याच्या दोन मुलींची लग्ने झालेली आहेत.
तिसर्या मुलीचे लग्न देखील ठरलेले होते. या आरोपासंबंधी बीबीसीचे पत्रकार दिलनवाज
पाशा यांच्याशी बोलतांना अफराजुलचा जावाई बरकत अली यांनी सांगितले की, ”दोन वेळच्या
भाकरीसाठी जो माणूस आपल्या गावापासून हजारो किलोमीटर दूर येवून घाम गाळत असेल तो काय
लव्ह करेल आणि काय जिहाद करेल? आम्ही तर भूकेच्या पुढे विचारसुद्धा करू शकत नाही. शंभुनाथ
रेगर याने एखाद्या मुसलमानांला गाठून मारण्याचा निश्चय केलेला होता. त्याला अफराजुल
सापडला. त्याने त्याला ठार मारले. मी सापडलो असतो तर मला मारले असते. अफराजुल यांचे
कुठल्या दुसर्या महिलेशी संबंध असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांना मी इतक्या
जवळून जाणतो की त्यांच्या बाबतीत तसा विचार करणेसुद्धा गुन्हा आहे, असे माझे ठाम मत
आहे. ” यासंबंधीचा सविस्तर रिपोर्ट बीबीसी हिंदीवर विस्तृत प्रकाशित करण्यात आला होता.
या घटनेमुळे देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
मुस्लिमांच्या प्रतिक्रिया संतप्त होत्या. ही गोष्ट समजण्यासारखी आहे. मात्र हिंदू
बांधवांनी सुद्धा मोकळ्यापणे या घटनेचा निषेध केला. समाजमाध्यमावरच नव्हे तर मेनस्ट्रीम
माध्यमांमध्येसुद्धा उघडपणे या घटनेचा विरोध करण्यात आला. याकडे चिकित्सक नजरेने पाहिले
तर एक गोष्ट लक्षात येते की, या घटनेचा निषेध एवढ्या मोठ्या प्रमाणावर होण्याचे कारण
म्हणजे घटना नव्हे तर घटनेचे चित्रीकरण व समर्थन होय. या चित्रीकरणामुळे आणि आपल्या
समर्थनार्थ दिलेल्या राष्ट्रवादाच्या तर्कामुळे अनेक हिंदू बांधवांना या गोष्टींची
पहिल्यांदा जाणीव झाली की त्यांच्या तरूण पिढीमध्ये हिंसक विचारांची किती लागण झालेली
आहे? त्यांना भीती वाटली की, ज्या राष्ट्रवादाच्या मुलाम्याखाली आज शंभुनाथ उभा आहे
उद्या त्यांची आपली मुले उभी राहू शकतील. या उग्र राष्ट्रवादाने तरूण पिढीचे गुन्हेगारीकरण
करण्याइतपत मजल गाठलेली आहे. ही देशासाठी चिंतेची बाब आहे. राष्ट्रप्रेम निर्विवादपणे
एक सकारात्मक उर्जेचे स्त्रोत आहे. ते प्रत्येक खर्या भारतीयामध्ये असायलाच पाहिजे,
यात शंका नाही. मात्र त्याचा अतिरेक तो ही आपल्याच देशाच्या एका निरपराध नागरिकाच्या
हत्येमध्ये परावर्तित होत असेल तर ही खरोखरच चिंताजनक बाब आहे.
आतापर्यंत झालेल्या मॉबलिंचिंगच्या घटनामध्ये
अनेक लोकांचा बळी गेलेला आहे. दादरीच्या अख्लाकपासून सुरू झालेली निरपराध मुस्लिमांच्या
हत्येची साखळी अफराजुलपर्यंत येवून ठेपलेली आहे. या घटनाचक्रामध्ये लक्षात घेण्यासारख्या
काही बाबी आहेत, त्या खालीलप्रमाणे -
1- छोट्या - छोट्या
गोष्टीवर ट्विट करणार्या पंतप्रधानांनी अफराजुलच्या हत्येवर प्रतिक्रिया दिलेली नाही.
यापूर्वी त्यांनी अशा हत्या करणार्यांचा सुभाषित वजा शब्दांमध्ये गुळमुळीत निषेध जरूर
केलेला आहे. मात्र त्याचा काहीही परिणाम या कथित उग्रवाद्यांवर झालेला नाही. अल्पसंख्यांकांच्या
दृष्टीकोणातून ही सर्वात दुर्देवी बाब आहे. पंतप्रधान हा देशाचा सर्वोच कार्यकारी अधिकारी
असतो. त्याने घटनेची शपथ घेऊन देशातील सर्व नागरिकांच्या रक्षणाची जबाबदारी स्वेच्छेने
स्विकारलेली असते. पंतप्रधान मोदी तर उठता-बसता आपण 125 कोटी भारतीयांचे सेवक असल्याचे
वारंवार सांगत असतात. अफराजुलच्या निघृण हत्येचा निषेध करणे ही पंतप्रधानांची घटनात्मक
जबाबदारी होती. ती त्यांनी पार पाडली नाही. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी
अफराजुलच्या हत्येबद्दल जी भूमिका घेतली ती अधिक उठून दिसते.
2. सध्या बस अपघातामध्ये
मरण पावलेल्या लोकांना नुकसान भरपाई मिळते. परंतु, मॉबलिंचिंगमध्ये मारल्या गेलेल्या
एकाही मुस्लिम व्यक्तिला नुकसान भरपाई द्यावी, असा विचार सुद्धा केंद्र सरकारच्या मनामध्ये
येवू नये, हे या देशाच्या मुस्लिमांचे नव्हे लोकशाहीचे दुर्देव आहे.
3. या घटनेमध्ये टोकाची
भूमिका घेणारा शंभुनाथ एकटा नसून असे शेकडो तरूण तयार झालेले आहेत. यासाठी उग्र हिंदुत्ववादी
विचारधारेचे समर्थन करणार्या संस्था आणि संघटना जेवढ्या जबाबदार आहेत तेवढ्याच जबाबदार
काही वाहिन्यासुद्धा आहेत. ज्यांनी पार्श्वसंगीतासह अस्तित्वात नसलेल्या लव्ह जिहाद
चे अस्तित्व भारतभर असल्याचे तरूणांच्या मनावर बिंबविले. त्यामुळे शंभुनाथबरोबर या
वाहिन्यासुद्धा अफराजुलच्या खुनासाठी त्याच्या इतक्याच दोषी आहेत. या वाहिन्यांचा ढोंगीपणा
आणि लव्हजिहादच्या प्रचारातील फोलपणा अफराजुलच्या 6 डिसेंबरला झालेल्या हत्येच्या
14 दिवसापुर्वी एका घटनेतून ठळकपणे अधोरेखित झालेला आहे. ती घटना म्हणजे 23 नोव्हेंबर
रोजी भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान
व चक दे इंडिया फेम सागरीका घाटगे यांचे लग्न होय. या लग्नानंतर दिल्या गेलेल्या मेजवानीमध्ये
या जोडप्याचे अनेक हिंदू मित्र मनसोक्तपणे नाचले. वाहिन्यांनी त्याचे चित्रीकरण दाखविले.
वर्तमानपत्रांमध्ये कॉलमच्या कॉलम भरून या जोडप्याचे कौतुक करण्यात आले. एवढेच नव्हे
तर त्यांच्या मालदिव येथे सुरू असलेल्या मधुचंद्राची सुद्धा इत्यंभूत माहिती माध्यमातून
सगळ्यांपर्यंत पोहोचविली गेली. हिंदू-मुस्लिम लग्नांचा मोठा इतिहास या देशाला आहे.
अशा परिस्थितीत एकीकडे जहीर खानचे कौतुक करायचे दूसरीकडे अफराजुलसारख्या गरिबाला एकट्यात
गाठून मारायचे हा शुद्ध ढोंगीपणा आहे. हे जनतेनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.
4. त्या संघटना ज्यांनी
तरूणांची मने कलुषित केली, गरीब अल्पसंख्यांकांविषयी त्यांच्या मनामध्ये घृणा निर्माण
केली. खोटी आश्वासने देवून त्यांना झुलवत ठेवले. त्यांच्या मूळ समस्यांना बगल देवून
त्यांना बेगड्या राष्ट्रवादामध्ये वाहवत नेले. इतके की त्यांच्यातले खुनी झाले. त्या
संघटनाही शंभुनाथ बरोबर अफराजुलच्या हत्येस जबाबदार आहेत.
5. याशिवाय एक महत्वाचा
मुद्दा व या हत्याकांडाचा सर्वात दुर्देवी पहेलू असा की, या हत्याकांडाला समाज माध्यमातील
काही जल्पजांकडून समर्थनही मिळत आहे. केंद्र सरकार जो पक्ष सत्येत आहे त्या पक्षाने
ज्या पद्धतीचे राजकारण देशात सुरू केलेले आहे, त्याचा हा परिणाम आहे.
या घटनेनंतर मुस्लिमांकडून समाज माध्यमांवर जी
संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या त्यातही संतुलनाचा अभाव आढळून आला. इस्लामच्या
शिकवणीनुसार आपण शंभुनाथ रेगरला शिक्षेची मागणी करू शकतो परंतु त्याच्याशी घृणा करू
शकत नाही. प्रेषितांच्या शिकवणीत ते बसत नाही. कुरआनने एका आई आणि एका वडिलांपासून
जगाचा विस्तार झाल्याचे स्पष्टपणे म्हंटलेले आहे. त्यामुळे दुरून का होईना शंभुनाथ
आणि तसेच इतर मुस्लिम द्वेष्टे हे जरी वाईट वागत असले तरी ते बृहद मानवतेचे सदस्य आहेत.
उम्मते वस्त म्हणून आपल्याला जशास तसे वागता येणार नाही. तसे झाले तर त्यांच्यात आणि
आपल्यात काय फरक राहील? मग इस्लाम शांतीचा धर्म आहे, असा दावा कसा करता येईल? प्रेषित
सल्ल. आणि त्यांच्या सहाबी रजि. यांच्यावर मक्क्यामध्ये काय कमी अत्याचार झाले?
तरी परंतु मक्का जिंकल्यानंतर प्रेषित सल्ल.
यांनी आम माफी जाहीर करून या जगाच्या अंतिम दिवसापर्यंत मुस्लिमांना हा धडा घालून दिला
आहे की, हिंसेला उत्तर हिंसेने देणे इस्लामच्या शिकवणीत बसत नाही. मुळात टोकाच्या प्रतिक्रिया
जे मुस्लिम व्यक्त करीत आहेत, त्यांना कुरआनच्या शिकवणीचा गंधच नाही. त्यांनी कुरआनच्या
शिकवणी आत्मसात केल्या असत्या तर अशा प्रतिक्रिया आल्या नसत्या.
एकंदरित एकतर्फी सब्र (संयम) हीच आजच्या काळाची
गरज आहे. हे सब्र करत असतांना आपल्या या प्रिय देशाला व देशातील इतर समाज बांधवांना
जितके प्रेम आपुलकी आणि नैतिकतेची शिकवण देता येईल, तेवढे उत्तम.
Post a Comment