राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून ते ग्रामपंचायत निवडणुकीपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराचा धुरळा उडवीत आहेत. एनकेनप्रकारे भाजपचा विजय व्हावा व सत्ताधारी असावा असा एककलमी कार्यक्रम राबविण्यासाठी ते जणू अहोरात्र झटत आहेत, त्यासाठी ते कमालीचे गंभीर आणि चिंतातुर असल्याचे चित्र दिसत असल्याने अशी शंका सर्वसामान्य मतदारांच्या मनात उद्भवण्यास पुरेसे कारण आहे. स्वपक्षाचा प्रचार करण्यात भूतकाळातील सर्व पंतप्रधानांना त्यांनी मागे टाकले आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षाही मोदींच्या प्रचारसभा अधिक म्हणजे पाच पटींनी जास्त झाल्या आहेत. त्यामुळे ते देशाचे पंतप्रधान आहेत की भाजपचे असा प्रश्न पडला आहे. त्यांच्या या प्रचारवेडामुळे त्यांचे स्वत:चे व त्यांच्या मंत्र्यांचे दौरेदेखील सरकारी खर्चाने होत असल्याने करदात्यांच्या हजारो कोटी रुपयांचा चुराडा पण होत आहे. हे योग्य आहे काय? एक प्रकारे देशाचे पंतप्रधान देशाच्या सर्वोच्च पदाचा उपयोग स्वत:च्या पक्षाच्या भल्यासाठी करत आहेत जेव्हा की त्यांनी जनतेच्या भलाईचा विचार करावयास हवा. हे अत्यंत दुर्दैवी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निवडणूक प्रचारसुद्धा हिंदूंचे लांगुलचालन करणारा आहे आणि मुस्लिमांना वाळीत टाकणारा आहे. याचे उत्तम उदाहरण उत्तर प्रदेशची निवडणू कआहे. या निवडणुकीत एकही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली नव्हती. अशा प्रकारे धार्मिक ध्रूवीकरण करण्यात मोदींनी कसलीही कसर सोडली नाही. गुजरातमध्येही तसेच घडत आहे. जो पक्ष सत्तेत नसताना धार्मिक विद्वेषावर आधारित मुद्दे हातात घेऊन काँग्रेसला कोंडीत धरण्याचा प्रयत्न करायचे आणि काँग्रेसवर मुस्लिमांच्या अनुनयाचे आरोप लावायचा तो पक्ष सध्या हिंदूंचा अनुनय करून हिंदुमतपेढीवर सत्तेची पोळी भाजत आहे. हे राष्ट्रीय एकात्मतेसाठी योग्य आहे काय?
- निसार मोमीन, पुणे.
- निसार मोमीन, पुणे.
Post a Comment